श्रद्धा देव shraddha1541989@gmail.com
मानसोपचार विभाग.. त्या पुनर्वसन केंद्रात समुपदेशक म्हणून माझा पहिलाच दिवस होता. मे महिन्याची दुपार होती. मानसोपचार विभागातील सगळे  रुग्ण दुपारचं जेवण आटोपून त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये परत जात होते. माझं नुकतंच चिकित्सा मानसशास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन मी इथे नोकरीला लागले होते. मनात प्रचंड उत्साह, आवडत्या विषयात काम करायला मिळणार याचा आनंद आणि पहिल्या दिवसाची मनातली धाकधूक असं सगळं सुरू असताना मला पहिल्याच दिवशी ४० रुग्णांच्या समुपदेशन आणि त्यांच्या सर्वागीण सुधारणेची जबाबदारी  देण्यात आली. खूप मोठं काम होतं, पण भरपूर शिकायलाही मिळणार होतं.

मी माझ्या केबिनमध्ये येऊन प्रत्येक रुग्णाची फाइल वाचायला सुरूवात केली. तेवढय़ात, जोरजोरात गप्पांचा आवाज आला. मी बाहेर जाऊन पाहिलं तर एक देखणा, उत्साही २५-३० वर्षांचा तरुण आणि साधारण त्याच वयाची एक तरुणी एकमेकांशी जोरजोरात बोलत होते, मधेच हसत होते, एकमेकांना चिडवत होते. काहीसे मळलेले कपडे कसेबसे चढवले होते दोघांनी. त्यांच्याशी ओळख करून घ्यावी म्हणून  मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना नाव विचारलं. दोघांनी एकमेकांकडे पहिलं आणि सरळ त्यांच्या खोलीत पळून गेले. मला त्या दोघांबद्दल प्रचंड उत्सुकता वाटू लागली. मी त्या केंद्रातल्या समाजसेवकाशी बोलले आणि त्यांची नावं मागितली. केबिनमध्ये जाऊन त्यांच्या फाइल्स पहिल्या, वाचू लागले. त्यांची नावं, कुटुंब, त्यांचे मानसिक त्रास, आणि इतर काही वैद्यकीय इतिहास..

त्यांच्याबरोबरच इतर काही रुग्णांच्या फाइल्स वाचून झाल्या. दिवस संपत आला. आम्हाला नेणारी स्टाफची गाडी आली होती, पण निघायला अजून थोडा वेळ होता म्हणून विचार केला, की वॉर्डमध्ये राऊंडला जाऊन यावं. स्त्रियांच्या वॉर्डमध्ये जाऊन मग पुरुषांच्या वॉर्डमध्ये गेले. सगळ्यांची विचारपूस करत, त्यांचं निरीक्षण करत असताना स्वत:चीही ओळख करून देत होते. बहुतेक सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावर नवीन समुपदेशक कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. भरपूर प्रश्न विचारत होते. काही जण मात्र त्यांच्या त्यांच्या खोलीत झोपलेले होते, तर काही स्वत:शीच बोलत होते. मला सकाळी दिसलेला तो तरुण मात्र कुठेच दिसत नव्हता. मी वॉर्डच्या शेवटच्या रूमपाशी गेले. तिथे तो त्याच्या कपाटात काहीतरी करत होता. पण सकाळच्या त्यांच्या अवतारात आणि आत्ताच्या वागण्यात जमीन-आसमानाचा  फरक होता. त्याला कोणीतरी खोलीत आल्याचं जाणवलं आणि तो मागे वळला.  त्याला घाम फुटला होता, डोळ्यांत हलकं पाणी होतं, तो बऱ्यापैकी घाबरलेला दिसत होता. त्यानं कपाटाचं दार जोरात लावलं, खिशात काहीतरी घातलं आणि हात खिशातच ठेवून पटकन बाहेर पळून गेला. पुन्हा एकदा मी त्याच्याशी काहीही बोलू शकले नाही. त्याचा रूममेट म्हणाला, ‘‘मॅडम, तो असाच आहे. त्याला किल्लय़ा गोळा करायला आवडतात. कपाट  उघडा त्याचं म्हणजे तुम्हाला कळेल.’’ मी अशा गोष्टींसाठी असलेलं ‘ऑब्सेशन’ पहिल्यांदाच बघत होते. अशा केसेस सहसा ‘क्लेप्टोमेनिया’च्या असतात. पण याच्या बाबतीत काहीतरी वेगळेपण होतं. माझी उत्सुकता ताणली गेली होती.  त्याच्या कटुंबाशी एक भेट मी लवकरच निश्चित केली.

शेवटी तो दिवस आला, जेव्हा मी समितच्या आईला भेटणार होते. हो, त्याचं नाव समित. जेव्हा त्याची आई माझ्या केबिनमध्ये आली, तेव्हा मला विश्वासच बसला नाही, की ही त्याची आई असेल. (हो, तेव्हा माझी मतं पूर्वग्रहदूषित होती, कारण मी नव्यानंच समुपदेशक म्हणून कामाला सुरुवात केली होती.) त्या अतिशय सुंदर, टापटीप आणि खूप शिकलेल्या वाटत होत्या. मी त्यांना अभिवादन करून त्यांच्याबरोबर संभाषणाला सुरुवात केली. त्यांनाही माझ्याशी बोलण्याची खूप उत्सुकता होती असं वाटलं. ‘‘मॅडम, आप मिले क्या समित से? वो बहोत अच्छा हैं।  पर घर लेके जाती हूँ तो बहोत परेशान करता है।  मैं उसे बिलकुल संभाल नही पाती। आपने उस के रिपोर्ट्स देखे?’’

मी त्याच्याविषयीची माझी काळजी त्यांच्याकडे व्यक्त के ली आणि त्याच्या कौटुंबिक वातावरणाबद्दल, तसंच त्याच्या बालपणाबद्दल खोलात जाऊन विचारपूस केली. त्यांनी बाकी सर्व गोष्टी सांगतानाच हेही सांगितलं, की तो ७-८ वर्षांचा असताना  त्याला बौद्धिक अपंगत्व असल्याचं निदान मानसोपचारतज्ज्ञांनी तसंच बालरोगतज्ज्ञांनी केलं  होतं. तो ३० वर्षांचा असला तरी त्याचं मानसिक वय १० वर्षच होतं. तो नेहमीच खुशालचेंडू असायचा आणि घरी खूप छान राहायचा. त्याला गाडीतून फिरायला फार आवडायचं. काही वर्ष तो विशेष मुलांच्या शाळेतही गेला. पण काही वर्षांपूर्वी त्यानं खूप हिंसक कृती के ली आणि त्यानंतर अशा घटना वारंवार घडू लागल्या.  समितच्या आईचं बोलून झाल्यावर  मी त्यांना पहिल्या घटनेपूर्वी काही विशिष्ट गोष्ट झाली होती का, असं विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही एकदा मॉलमध्ये गेलो होतो. त्याचे वडील २-३ वर्षांसाठी कामानिमित्त अमेरिकेला शिफ्ट होणार होते आणि त्यासाठी खरेदी करायला आम्ही गेलो होतो. तेव्हा तो एका खेळण्याच्या दुकानात गाडय़ांशी खेळत होता. खेळता खेळता त्यानं एका छोटय़ा गाडीची किल्ली घेतली आणि दुकानाबाहेर आला. दुकानदारानं त्याच्याकडे ती किल्ली मागितली पण समितला मात्र ती अजिबात परत द्यायची नव्हती. आम्ही सगळ्यांनी त्याला खूप समजावलं, पण अचानक त्यानं डोळे फिरवले, त्याला प्रचंड घाम आला आणि नंतर तो जोरजोरात ओरडू लागला, डोकं आपटू लागला. शेवटी आम्ही ती खेळण्यातली कार त्याच्यासाठी घेतली आणि त्या दिवसापासून त्याला किल्लय़ा जमा करण्याची जणू सवयच लागली, तो विविध प्रकारच्या किल्लय़ा जमा करू लागला.  त्यातल्या कुठल्याच किल्लय़ांचा त्याला काही उपयोग होणार नव्हता. पण तरीही तो त्या जमा करून एका गुप्त जागी ठेवी आणि चुकून जरी तिथं कोणी गेलं किंवा किल्ली घेण्याचा प्रयत्न केला तर खूप हिंसक होई. त्याचा हिंसकपणा, किल्लय़ा जमा करायची सवय दिवसेंदिवस वाढू लागली आणि मला त्याला एकटीला सांभाळणं कठीण होऊ लागलं आणि म्हणून आम्ही त्याला या केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या लाडक्या मुलाला असं इथं ठेवणं किती जड जातंय हे तुम्हाला नाही कळणार. पण तो आता इथे आनंदी असतो. आम्ही त्याला सणासुदीला घरीही घेऊन जातो. त्याची इथली मैत्रीण, निर्मला, त्याला खूप आवडते. ’’

मला त्याच्याबद्दल मनापासून काळजी वाटू लागली आणि मी त्याच्याशी शांतपणे बोलावं असं ठरवलं. त्याची आई आली आहे हे कळताच तो माझ्या केबिनमध्ये धावत आला आणि आईला विचारलं, ‘‘मेरे लिये खाने को  क्या लाया?’’ त्यानं आईनं आणलेला खाऊ घेतला आणि मला दिला.  ही माझी आणि त्याची पहिली थेट भेट  होती. मी तो खाऊ घेऊन रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली आणि त्याच्या लॉकरमध्ये तो ठेवला. त्या पुनर्वसन केंद्रात घरून आणलेले  पदार्थ किंवा वस्तू समुपदेशनात ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचे पालन केले आणि केंद्रातील सर्व नियमांचे पालन केले तरच बक्षीस म्हणून हळूहळू देण्याची पद्धत होती. तो नियम होता तिथला.

त्यानं तो दिवस त्याच्या आईबरोबर मजेत घालवला. माझे नेहमीचे राऊंड्स  आणि समुपदेशन सत्रं सुरू झाली. समितची सत्रं आठवडय़ातून दोनदा असायची. काही सत्रांमध्ये तो स्वत:ला खूप छान व्यक्त करायचा तर काही वेळेस शांत राहून काहीतरी बनवत राहाणं त्याला आवडायचं. त्याचे मूड सतत बदलत असायचे. पण त्याच्या औषधांमुळे ते थोडंफार नियंत्रित होतं. मी हळूहळू त्याच्याशी संवाद वाढवला आणि किल्लय़ांविषयीसुद्धा बोलायचा प्रयत्न केला. पण तो त्या बाबतीत अजूनही फारसा व्यक्त होत नव्हता. त्यानं मला कधीही त्याच्या खोलीमध्ये येऊ दिलं नाही. मात्र त्याच्या सत्रांमधल्या कलेशी निगडित अनेक गोष्टी त्याला समजून घ्यायला खूप उपयोगाला यायच्या, कारण तो त्याच्या चित्रांमधून, हस्तकलेमधून व्यक्त होत असे.

एके  दिवशी मी नेहमीप्रमाणे राऊंड मारत होते. समित त्याच्या वॉर्डच्या दारापाशी बसला होता. काहीसा निराश वाटत होता. त्याच्या सत्राचा आज दिवस नव्हता, तरीही मी त्याचं सत्र ठेवलं. त्याच्याबरोबर थोडेसे उपचारात्मक काल्पनिक खेळ  खेळावेत असं ठरवलं. तो सत्राला आला आणि विविध बाहुल्या, खेळणी बघून थोडा मिश्किल हसला. मी निर्मलालासुद्धा ग्रुप सत्रासाठी बोलावलं होतं. तिला बघून तो अधिकच खूश झाला. त्यांनी खेळण्यांशी खेळायला  सुरुवात केली. कधी ते दोघं शिक्षक आणि विद्यार्थी व्हायचे, कधी आई-वडील, तर कधी आणखी काही. अचानक समित थोडा रागावला आणि त्यानं त्याची एक आठवण- जी त्याच्या पहिल्या  हिंसक घटनेपूर्वी झाली असावी, ती खेळातून मांडली. तो निर्मलावर ओरडला आणि तिला समितची नीट काळजी घेता येत नाही, असा दोष देऊ लागला. त्याच्या वडिलांचं तो अनुकरण करत होता. तो म्हणत होता,  ‘‘तुला तुझ्या मुलाला नीट सांभाळता येत नाही म्हणून मी अमेरिकेला चाललो आहे. मी तिथे तरी थोडे दिवस शांततेत आणि सुखी राहीन. रोज काही ना काही तरी नाटकं असतात, त्यापासून तरी सुटका होईल.’’ समितला रडू आलं. तो रडू लागला. ‘‘मैं पपा से प्यार करता हँू, लेकिन उनको मैं पसंद नही हूं। ’’ असं म्हणून त्यानं खिशातून एक किल्ली काढली आणि ती हाताळू लागला. ‘‘मेरी माँ  मेरे लिये सब सुन लेती हैं, क्यूकी वो मुझसे बहोत प्यार करती  हैं। पर मैं पढाई नही  करता, मुझे पढना नाही आता, मुझे समझना नही हैं, कभी कभी मैं  ठीक से खाना भी नही खाता। पर मुझे मेरे मम्मी पप्पा बहोत पसंद है। पर उनको मैं  पसंद नही हूँ।’’ त्यानं त्याचं मन मोकळं केलं. माझा हात पकडला आणि मला त्याच्या खोलीत ओढून घेऊन गेला. त्यानं त्याचं कपाट  उघडलं. मोठा खजिना माझ्यासमोर होता. माझा त्यावर विश्वासच  बसत नव्हता. त्याच्या कपाटात अनेक प्लास्टिकच्या पिशव्या  होत्या आणि त्या सगळ्या पिशव्यांमध्ये प्रचंड प्रमाणात जमा केलेल्या किल्लय़ा होत्या. त्या किल्लय़ा त्यानं कुठून कु ठून जमा केल्या, कोणालाच माहीत  नाही.

त्यानं त्या सगळ्या पिशव्या उघडल्या आणि मला म्हणाला,‘‘ मेरे पापा मुझे छोड के चले गये। अपनी गाडी भी लेके गये। और मेरे लिये सिर्फ ये चाबी छोड दी..’’

(लेखातील नावे बदललेली आहेत)