उत्सव नात्यांचा!

जगण्याचा उत्सव साजरा करणाऱ्या या आगळ्या कुटुंबाविषयी..

(संग्रहित छायाचित्र)

सुचित्रा साठे

आजूबाजूला नात्याचे बंध सैल होत असतानाच एक कुटुंब मात्र गेली पस्तीस वर्ष दरवर्षी भेटत आहे. नऊ आते-मामे-मावस भावंडांचं हे कुटुंब आता त्यांची मुलं, नातवंडं यांच्यासह आपलं नातं दृढ करत आहे. ‘आपण एकमेकांचे आधारस्तंभ आहोत,’ ही जाणीव त्यांच्यात रुजली आहे. कुणी आजारी पडलं तरी सोबत आणि डबा मिळतो आहे. जीवनातला जोडीदार पुढे निघून गेल्यावर हक्काने चार दिवस राहण्यासाठी एकमेकांना जिव्हाळ्याची बेटं सापडली आहेत. एकमेकींसाठी हक्काचं माहेर निर्माण करण्यात कुटुंबातल्या जावा यशस्वी ठरल्या. जगण्याचा उत्सव साजरा करणाऱ्या या आगळ्या कुटुंबाविषयी..

मैत्री एक सोपी व्याख्या आहे,

रोज आठवण यावी असं काही नाही,

एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं,

असंही काहीच नाही.

पण मी तुला विसरणार नाही

ही झाली खात्री आणि

तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.

शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी

गाठी बसणं महत्त्वाचं.

ज्यांनी हे जाणलं त्यांनी

माणसातलं माणूसपण जाणलं.

हे शब्द वास्तवात आणले आहेत आते-मामे-मावस भावंडं असणाऱ्या नऊ जणांनी. सहवासाने नुसतीच गाठ बसली नाही तर ती निरगाठ बसल्यामुळे पस्तीस वर्ष झाली तरी ती सुटलेली नाही, उलट हा जगण्याचा एकत्रित उत्सव अखंडपणे सुरूच आहे आणि सुरूच राहील याची त्यांना खात्री आहे.

झालं काय, एका कौटुंबिक सोहळ्यात या कुटुंबातल्या एका बुजुर्ग व्यक्तीने सगळ्यांना डिवचत सुनांच्या रोखाने नकारार्थी सूर लावला. ‘‘आम्ही बहीण-भाऊ कायम एकत्र राहिलो म्हणून तुम्ही एकत्र आणि आनंदाने जमला आहात, पण तुम्हाला असं एकमेकांना धरून राहणं जमणार आहे का?’’ हे ऐकताच नऊ जावांपैकी एक आनंदाने मनापासून उसळलीच. ‘‘का नाही जमणार? आम्ही सगळ्या जावा साधारण एकाच वयाच्या आहोत. साधारणपणे लग्नाला सात-आठ वर्ष झाल्यामुळे तेव्हापासून एकमेकींच्या सातत्याने संपर्कात आहोत. साहजिकच एकमेकींच्या स्वभावाची ओळख झाली आहे. घरातली सगळी लग्नकरय झाली आहेत, त्यामुळे एकत्र येण्याला काही तरी निमित्त हवं, आपण भिशी सुरू करू या आणि तीही फक्त जावांची भिशी नको तर त्यांच्या पुढाकाराने कौटुंबिक भिशीच ठेवली तर.. म्हणजे एकत्र यायला एक निमित्त मिळेल.’’

निर्णय घेणं जावांच्या ‘हातात’ होतं. त्यांना ही कल्पना आवडली. त्यामुळे ‘शुभस्य शीघ्रम’ म्हणत, पहिल्या भिशीचा रविवार त्याच बैठकीत ठाण्यात करण्याचं नक्की झालं. पैसा महत्त्वाचा नव्हता, पण भेट होणं आणि नात्यांचा गोफ घट्ट विणला जाणं महत्त्वाचं होतं. म्हणून सुरुवातीपासून प्रत्येकी दोनशे रुपये ठरले ते या घटकेपर्यंत, म्हणजे गेली पस्तीस वर्ष तेवढेच आहेत. कल्याणच्या गीता व यशवंत साठे, ठाण्याच्या जयश्री व मधुसूदन मनोहर, मीरा व विनायक आपटे, माधुरी व प्रदीप लेले, पनवेलच्या स्वाती व जयंत कर्वे, पुण्याच्या सीमा व विजय आपटे, अनगांवच्या नीता व सुरेश लेले, स्मिता व अरुण लेले, ठाण्याच्या सुचेता आणि शरद फडके अशी सारी भावंड आणि त्यांचे कुटुंबीय चहापानाला जमले खरे, पण ‘जा-जा ये-ये’ च झाली. वेळ कमी पडला म्हणून पुढच्या वेळेपासून सकाळी जेवायलाच जमण्याचं ठरलं. पनवेल-चिंचवड, अनगांव येथे राहाणाऱ्यांनी तर आदल्या दिवसापासून राहायला येण्याचंच आमंत्रण दिलं आणि हा सिलसिला पस्तीस वर्षांपासून सुरुच आहे.

आजूबाजूचे नात्यांचे बंध-अनुबंध सैल होत असतानाच्या काळात ही भिशी चालू राहिली. कारण सहवासातून निर्माण झालेली ओढ, परस्परांबद्दल खात्री, एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती. दरवेळी किमान पंचवीस-तीसजण जमायचेच. घरीच स्वयंपाक करण्याची पद्धत होती. त्यामुळे कमी पडलं तरी सगळ्याच जणी पटकन मदतीचा हात पुढे करायला सरसावायच्या. कधी उरलं तर विनासंकोच शिधा न्यायलाही तयार. एकदा शेवेच्या भाजीचा बेत होता. चिंचवडची शुद्ध हवा, अंगणात रंगलेला पुरुषवर्गाचा क्रिकेटचा खेळ, एकमेकांना केलेला आग्रह, याला ‘तोंड’ देत भाजीने चक्क तळ गाठला. मग झटपट भाजणीच्या थालीपीठांची योजना झाली. ‘शेवटच्या पंगतीला काही तरी विशेष असतं’ अशी गोड कुरकुर करत लहानांसकट पुरुषवर्गही स्वयंपाकघरावर डोळा ठेवून असतात हे सिद्ध झालं.

एकीने डोशाचा बेत केला तेव्हा तर गंमतच झाली. दोघीजणींनी गॅसवर दोन्हीकडे डोशांचा रतीब घालणं चालू केलं. एक राऊंड झाल्यावर बच्चेकंपनी हाताशी आली. कोणाला डोसा हवा आहे का विचारणं, चटणी-सांबार आणायला सांगणं, ‘एक साधा डोसा, दोन मसाले डोसे’ अशी ऑर्डर घरात पोहोचवणं यात त्यांना खूपच मजा वाटली. गोल, पातळ डोसे घालण्याचा मुला-मुलींसाठी जणू ‘वर्कशॉपच’ घेतला गेला. ‘आता तोंडी हिशोब करून बिलं द्या’, असं छोटय़ांना सांगताच त्यांनी साळसूदपणे पळ काढला. यजमानीणबाईंना फक्त ‘डोसा डोसा’ हाच जप करावा लागला.

अनगांव खरं तर खेडं, पण लहानांपासून थोरांपर्यंत तिथे सगळेच खूश असायचे, कारण पर्यावरणातील बदल. गाईचं दूध काढताना सगळी लहानगी गोळा व्हायची. एरवी दूध पिताना खळखळ करणारी मुलं, फेस आलेला दुधाचा ग्लास पिताना एकमेकांच्या दुधाच्या मिशा बघत, चिडवत आनंदात संपवायची. शेतात मातीत खेळण्यात, झाडावर चढण्यात रंगून जायची. केळीची पानं, द्रोण, पत्रावळी सगळ्यांचंच अप्रूप. घरून भरून आणलेले जेवणाचे डबे कसे संपायचे, कळत नसे. ताकाच्या कळशा उचलण्यातही चढाओढ. एकानं जांभळाच्या झाडावर चढायचं, फांदी हलवायची आणि इतरांनी घरून आठवणीने आणलेल्या जुन्या साडीत ती गोळा करायची आणि भांडत-भांडत खायची;  हा आवडता खेळ. शेतातली वांगी, आवळे अशी भाजी तोडण्यातही मुलांचा पुढाकार. सकाळी भाजीवाल्यांनाही बोलवायचं आणि त्यांच्या पाटय़ा खाली करून प्रत्येकीने जणू ‘भाजीवाली’ व्हायचं. रात्र झाली आणि त्यातून दिवे गेले की मात्र सगळ्यांची पाचावर धारण! कोणीही जागेवरून हलणार नाही. अशा वेळी एखादा काका भुताची गोष्ट सांगून चांगलाच घाबवरणार. अनगांवला रात्रीची जेवणं झाली की कुल्फी पार्टी ठरलेली. कुल्फीची गाडीच घराकडे बोलवलेली असायची आणि मनसोक्त थंडगार व्हायचं. हळूच सगळे अंगणात चांदणं पांघरून आडवे व्हायचे. ‘रात्री आकाश पडलं तर..’ लिंबू-टिंबूचा अवघड प्रश्न हास्याची खसखस पिकवायचा.

हळूहळू मोठय़ांप्रमाणे छोटेही एकमेकांत गुंतत गेले. ‘जावा-जावा उभा दावा’ हा वाक् प्रचार खोटा ठरला. अहमहमिकेने मेनू ठरवू लागल्या. त्यांच्याबरोबर त्यांची मुलंही सगळी कामं करण्यात तरबेज होऊ लागली. चार माणसांत वावरण्याचा, ‘हवं-नको’ बघण्याचा संस्कार रुजत गेला. केळवणं, डोहाळजेवणं एकत्र केली गेली. एकीने तर कर्जतच्या आंबेजोगाई मंदिरात भिशी ठेवली. एका लग्नात सगळ्या नणंदांनी हट्ट धरला की आम्हाला पण बोलवा तुमच्या भिशीला. तेव्हा एकीने मनावर घेऊन सगळ्या नणंदांना बोलावून मायेचं पांघरूण म्हणून दुलई देऊन माहेरवाशिणीच्या ओटय़ा भरल्या.

घरातल्या बायकांप्रमाणे पुरुषांच्याही गप्पा रंगायच्या. घरातल्या कुरबुरी सांगून बायकांची मनं मोकळी व्हायची. उपाय सुचवला जायचा. मानसिक आधार दिला घेतला जायचा. खरेदीची चर्चा, अनुभव याची देवाण-घेवाण रंगायची. एकीला प्रवासाचं प्लॅनिंग करण्याची आवड होती. तिच्यामुळे अनेक छोटे-मोठे प्रवास एकत्रच केले गेले. ‘आपल्या’ माणसांची एक मिनी प्रवासी कंपनीच तयार झाली. कुठेही, केव्हाही, कोणाकडेही सहज येऊ-जाऊ लागले. वेळ होता म्हणून फोन न करता दारात दत्त म्हणून उभं राहण्याइतकं हक्काचं, प्रेमाचं नातं निर्माण झालं. कालांतराने एकीला घराच्या बिकट अवस्थेमुळे सगळ्यांना घरी बोलावणं अवघड वाटू लागलं. पण त्या गोष्टीकडे सगळ्यांनी चक्क कानाडोळा केला. उलट काळजीपोटी आवर्जून सगळे तिच्याकडे जातात. ‘आपण एकमेकांचे आधारस्तंभ आहोत, ही जाणीव आपापसात रुजली होती. कुणी धडपडलं, आजारी पडलं तरी सोबत आणि डबा मिळत होता. जीवनातला जोडीदार पुढे निघून गेल्यावर हक्काने चार दिवस राहण्यासाठी एकमेकांना जिव्हाळ्याची बेटं सापडली. एकमेकींसाठी हक्काचं माहेर निर्माण करण्यात सगळ्या जावा यशस्वी ठरल्या.

आता सगळी मंडळी सत्तरीच्या आसपास आहेत. मुलांची लग्नं पार पडलीत. काही परदेशी जा-ये करत आहेत. काहींना आजारपणाने त्रस्त केलंय. तिघांना अचानक मृत्यूने गाठलंय. तरीसुद्धा सगळ्यांच्या सवडीने भिशी अजून होतेच आहे. कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटंसुद्धा सुटतात, कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवायची असतात. नात्यांचा गोफ घट्ट विणणारी अशी कौटुंबिक भिशी आणि तीसुद्धा पस्तीस वर्ष अखंड चालू असलेली, असं उदाहरणं क्वचितच.

कुटुंब बोन्साय झाल्यामुळे नातीच संपत आली आहेत. एकटेपणा वाढत चाललाय. अशा वेळी ‘देऊ या-घेऊ या प्रेमाचा आहेर’ म्हणत ‘वसंत आला नात्यात, बाई उत्सव चाले जगण्याचा’ असा पर्याय स्वीकारला तर..

suchitrasathe52@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Celebrate relationships suchitra sathe abn

ताज्या बातम्या