दिग्पाल लांजेकर

lanjekar.digpal@gmail.com

Which is the first theatre in pune
VIDEO : नाट्यगृहांनी श्रीमंतीयुक्त पुण्यात पहिले सिनेमागृह उभारण्याचे धाडस कुणाचे? जाणून घ्या, पहिल्या सिनेमागृहाचा इतिहास
Yavatmal, Abuse, married woman,
यवतमाळ : पतीच्या प्राध्यापक मित्राकडून विवाहितेवर अत्याचार, पेढ्यात गुंगीचे औषध देऊन…
Loksatta kalakaran Egypt Dr Edward SaidOrientalize the book Wael Shockey
कलाकारण: इजिप्तमधली इंग्लिश गांधारी!
Threats of defamation to parents Sexual abuse of girl for eight months
नागपूर : आई-वडिलांना बदनामीची धमकी; मुलीचे आठ महिने लैंगिक शोषण
Mumbai, 22 Year Old Woman Drugged, Filmed Obscene video, Accused demanded Extortion, Mumbai, malvani news, Mumbai news, crime news, malvani police station,
दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन तरूणीचे केले अश्लील चित्रीकरण; बलात्कार, खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा
High court Denied Bail to Actor Sahil Khan, Mahadev Betting App Case, sahil khan denied bell in betting app case, Mahadev betting app, sahil khan, Mumbai high court, marathi news, Mahadev betting app news, marathi news, Mumbai news,
महादेव बेटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
mrunal thakur reveals she felt intimidated while working with Shahid Kapoor expert shares tips to overcome
मृणाल ठाकूरने सांगितले शाहिद कपूरबरोबर काम करताना दडपण येण्याचं कारण; वाक्यही न आठवण्याची स्थिती का आली?

‘फर्जंद’ आणि त्यापाठोपाठ ‘फत्तेशिकस्त’ आला आणि लागोपाठ दोन ऐतिहासिक चित्रपट सुपरहिट करण्याचं श्रेय मला मिळालं. जिथे संधी मिळेल तिथे जे शिकायला मिळेल त्याच्या फायद्या-तोटय़ाचा विचार न करता शिकणं हे महत्त्वाचं, हे मी विशी ते तिशीत शिकलो. हे सगळं मिळालंय ते काही मोह सोडल्यामुळे आणि काहीसा वेडेपणा केल्यामुळे !.. मी लकी आहे!!

जनरली आपल्याकडे यशस्वी व्यक्ती ‘लकी’ असते. सगळ्यांच्या मते त्याचं ‘नशीब’ जोरावर असतं म्हणून त्याला यश, कीर्ती वगैरे वगैरे मिळतं. तसा मी सध्या ‘लकी’ आहे. पण हे ‘लकीत्व’ खरंच असं ओंजळीत येऊन पडतं का? मागं वळून पाहिलं तर मी स्वत:च्या अनुभवाने ‘नाही’ असंच म्हणेन. लहानपणी संस्कृतमध्ये शिकलेली ‘श्रमे लक्ष्मी: प्रतिष्ठिता’ ही ओळ कायमची ‘लाइफलाइन’ बनून गेली आहे. अशा माझ्या अनेक ‘लाइफलाइन’ आहेत. माझ्या विशी ते तिशी या प्रवासात मिळालेल्या..

लहानपणापासून आईनं वाचनाची आवड लावली. आणि पुस्तकं माझी मित्र बनली. खऱ्या आयुष्यात अनेक अडचणींच्या क्षणी काही मित्रांनी हात सोडला तरी पुस्तकांनी कधीही सोडला नाही. आठवीत असतानाच ‘मृत्युंजय’ आणि ‘युगंधर’ या शिवाजी सावंतांच्या दोन महान कादंबऱ्या वाचून झाल्या होत्या. त्या लवकरच उपयोगी पडतील असं वाटलं नव्हतं. दहावी उत्तीर्ण करतानाच लक्षात आलं होतं जगण्याची शाळा चालू झाली आहे. वडिलांच्या अत्यंत कष्टाळू स्वभावाच्या व्यस्त प्रमाणात त्यांची मिळकत होती. आईमुळे आम्हा दोन्ही भावांची डोकी ताळ्यावर होती. आजतागायत कुठल्याही परिस्थितीत व्यसनांचं आकर्षण न वाटण्याचं कारण केवळ आईचं प्रेम आहे. आई रागवेल यापेक्षा आईला वाईट वाटेल हे जास्त महत्त्वाचं! खूप कर्जबाजारी अवस्था असतानाही ‘मृत्युंजय’मधली माझी ‘लाइफलाइन’ ‘जे भंगतं ते तेज नसतं’ सतत सोबत करत राहिली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नातेवाईक आणि समाजाकडून होणारे अपमान आणि अवमान गिळताना कर्ण जवळचा वाटत राहिला आणि विपरीत परिस्थितीत उभं राहण्याची ताकद हे वाक्य देत राहिलं.

निनाद बेडेकर माझ्या आजोबांचे जवळचे मित्र होते. निनाद काकांमुळे इतिहास मनात भिनला. त्यांच्याकडून ऐकल्यानं कोंडाजी ‘र्फजदां’ची गोष्ट साधारणत: अकरावीतच मनात भिनली होती. तेव्हाच वाटलं होतं की ही गोष्ट आपण चित्रपटाच्या रूपात सादर करायचीच. काय आणि कसं ते तेव्हा नक्कीच माहीत नव्हतं. मग पुढे इतिहासाची आवड वेडात बदलली. वेडच! मग किल्ले पाहणं. डोंगरदऱ्यांतून, मावळातून हिंडणं आलंच. खिशात पैसे नसण्याचा तो काळ फार सुखावह होता असं आता वाटतं. पुणे- महाबळेश्वर – प्रतापगड -पोलादपूर – रायगड – ताम्हीणीमाग्रे पुणे हा सायकल प्रवास अशा वेडातच शक्य असतो. पण पुन्हा ‘ट्रिगर’ असतो अविनाश धर्माधिकारींचं ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे पुस्तक! त्यातला ‘भिरी भिरी भ्रमंती’ हा लेख वाचूनच हे धाडस करायचं बळ मिळालं होतं. याच प्रवासात रायगड हा एकांतात स्वर्ग असतो हे पहिल्यांदा जाणवलं. एकीकडे कॉलेजची वाट चालत होतो. या मखमली काळाच्या सुरुवातीलाच प्रवीण दवणे सरांचं ‘वय वादळवीजांचं’ हे पुस्तक हाती पडलं. आणि हे वय मखमलीमध्ये गुंडाळण्यापेक्षा जर उन्हात तापवलं तर हाती बरंच काही लागेल हे लक्षात आलं. तसंही घरच्या परिस्थितीचं ऊन जाळत होतंच. पण मनात मात्र कोंडाजी होते. ६० जणांना घेऊन २५०० विजापुरी सनिकांचा पराभव करणारे. पण त्यांच्यापर्यंत पोचणं त्यांच्या पराक्रमाइतकंच अवघड होतं. कॉलेजमध्ये जाऊन एकांकिका स्पर्धेत उत्तम कामगिरी केली की चित्रपटाचा रस्ता धरता येईल ही भाबडी समजूत होती. त्यामुळे ‘पुरुषोत्तम’ करण्याच्या आशेनं महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण त्या ग्रुपमध्येच शिरता नाही आलं. झालं! बाहेरही कुणी ओळखीचं नाही. शिकणार कसं आणि कुठे हा प्रश्न होताच.

एके दिवशी मला एका मित्रामुळे कळलं की शाहीर दादा पासलकर त्यांच्या ‘मंगल थिएटर्स’ या ग्रुपकडून नाटकाचं एक शिबीर घेणार आहेत. ‘फर्जंद’च्या दिशेनं एक पाऊल पडणार होतं. त्यांचं तीन दिवसांचं शिबीर होतं.फी ३ दिवसांची १५० रुपये होती. तेवढेही पैसे परवडणार नव्हते. मग एका मित्राच्या मदतीने दादांना भेटलो आणि त्यांनी एकूण परिस्थिती पाहता, ‘तू ये तर खरा पशांचं मग बघू,’ अशी परवानगी दिली. पण तोवर एक दिवस हुकला होता. दुसऱ्या दिवशी लंचनंतर योगेश सोमणांचं लेक्चर होतं. त्यासाठी धावतपळत पोचलो तर आत फक्त दोन मुली आणि एक मुलगा. सर शिकवताहेत आणि मी आत पाऊल टाकणार तोच सर कडाडले, ‘‘आत यायचं नाही. एक मिनीट उशीर केलास.’’ बावरून बाहेर उभा राहिलो. लंचसाठी गेलेली २५ जणं माझ्या मागे उभी. सरांनी आतल्या केवळ तिघांना शिकवलं आणि बाहेरच्यांना वेळ पाळायचा धडा दिला. मागचे बहुतांशी निघून गेले पण मी आणि कुणालने अख्खं लेक्चर दारात उभं राहून ऐकलं. दिसेल तितकं पाहिलं. मग दादांनी माझी धडपड पाहून लोककलांचं शिक्षण दिलं. लोकवेशभूषा आणि लोकगीत, संगीत सगळं ‘मंगल थिएटर्स’ चं आणि दादांचं देणं आहे.

घर चालवण्यासाठी कॉलेज सांभाळून ३-३ जॉब एका दिवशी करावे लागले. जगणं नकोसं वाटू लागलं. त्याच वेळी अंजार आणि भूजमध्ये भूकंप झाला. मला संघाच्या माध्यमातून मदतकार्य करायला जाता आलं. त्या वेळी खूप जवळून मृत्यू पाहिला. जगण्याचं महत्त्व कळलं. परत आल्यावर नव्यानं स्वत: काहीतरी करायचं ठरवलं. म्हणून मग आम्ही काही मुलांनी एकत्र येऊन ‘सृजनरंग’ नावाचा एक ग्रुप सुरू केला. त्याच्याद्वारे आम्ही केलेली पहिली आणि शेवटची एकांकिका म्हणजे चंद्रशेखर फणसळकरांची ‘शर्यत’! या सुंदर एकांकिकेचं आम्ही आमच्या अभिनयानं केलेलं वाटोळं आजही आठवतं आणि हसू येतं. पण ती शिकण्याची पहिली पायरी होती आणि सुदैवानं आम्ही शिकायला हवं हेही कळत होतं. मग मोहन शेटेसरांच्या ‘सावरकर’ या महानाटय़ाची तालीम सुरू झाली. आणि त्या दरम्यान मला माझं आयुष्य बदलून टाकणारी व्यक्ती भेटली. प्रा. श्यामराव जोशी. आवाजाचा आणि विचारांचा जादूगार! त्यांच्याकडे ‘थिएटर’ शिकावं असं खूप वाटू लागलं. पण श्यामराव जुन्या गुरुकुल परंपरेतले. त्यांनी लगेच होकार दिला नाही. दरम्यान ‘संस्कारभारती’चं पुढचं एक महानाटय़ करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. मी लिहिलेल्या एकांकिका जिंकल्या होत्या. आणि जे महानाटय़  करायचं होतं ते मृणालिनी जोशी यांच्या कादंबरीवर आधारित करायचं होतं. मृणालिनी जोशी म्हणजे ‘इन्किलाब’, ‘राष्ट्रीय स्वाहा, ‘आलोक’ या कादंबऱ्या लिहिणाऱ्या तपस्विनी! ‘इन्किलाब’साठी फाळणीच्या काळात त्यांनी एकटीने भगत सिंगांचं घर गाठलं होतं. त्यांच्या आईने भगतसिंगाचा फोटो मृणालिनी आम्मांना दिला, जो आज ‘नूतन मराठी विद्यालय’ प्रशालेच्या लायब्ररीत आहे. त्यांची परवानगी घ्यायला गेलो. मनात एका महिन्यात सादर करू, असा अतिआत्मविश्वास. त्यांनी नेमकं तेच विचारलं. म्हटलं, ‘‘हे काय ७ दिवसांत लिहीन.

७ दिवस रेकॉर्डिंग आणि ७ दिवस तालीम.. झालं..’’ त्या मनमोकळं हसून म्हणाल्या, ‘‘बाळा असं नाही. पात्र लेखकाच्या अंगी भिनावं लागतं.. अशी वेळ यावी लागते की ते पात्र लेखकाला सांगतं की बाबा मी असं बोलणार आहे.. तू लिहिलेलं नाही बोलणार.. मग ते पात्र कागदावर खरं होतं.. बघ जमतंय का?’’  हा मंत्र आजही मनात रेंगाळतो.. जमतं का नाही माहीत नाही, पण जमत असावं बहुधा. कारण मी लिहिलेली पात्रं लोकांना आवडतायत. नंतर हेच नाटक लिहायला मला तब्बल एक वर्ष लागलं. पण त्याची पावती अशी मिळाली की नाटक बघायला आलेले तपस्वी चित्रदिग्दर्शक राजदत्त मला मिठी मारून म्हणाले, ‘‘पोरा, मला जे आयुष्यभर जमलं नाही ते तू करून दाखवलंस.’’ या नाटकाची तालीम सुरू करण्याच्या दिवशीच वडिलांचं निधन झालं. त्यांना अग्नी देऊन दुसऱ्या दिवशी नाटकाची तालीम घेतली. हे श्यामरावांना कळलं आणि सगळं स्थिरस्थावर झाल्यावर निरोप दिला, ‘ये आता शिकायला’. त्यांच्याकडे शिकायला जाताना हेही कळलं की ज्या दिवशी मी ती तालीम घेतली त्या दिवशी अशा परिस्थितीत मी तालीम घेतल्याचं कळल्यावर ते खूप रडले होते. श्यामरावांकडे शिकणं चालू होतं.. अजूनही चालू आहे..  नव्यानं आवाज, अभिनय यांची ओळख होऊ लागली होती. त्यांच्याशी बोलताना (म्हणजे त्यांचं ऐकताना) ती आजही होत राहते. त्यात एक दिवस योगेश सोमणसरांचा फोन आला. फोनवर सरांनी सांगितलं ‘‘तुला ‘दृष्टी’ करायचीय’’. अरे बापरे, ‘दृष्टी’!  सरांची अत्यंत अवघड आणि ताकदीची एकांकिका. स्पर्धेला दोनच दिवस राहिलेले. समोर रश्मी देवसारखी ताकदीची अभिनेत्री. सरांनीच त्यांच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये सांगितलं, ‘‘करशील तू!’’. या एकांकिकेनं २००९ चा सवाई अभिनेता हा किताब मला मिळवून दिला.

पुढे ‘अर्णव आर्ट ग्रुप’ या संस्थेकडून ‘अवध्य’ या सावरकरांवरील एकांकिकेची निर्मिती ‘सावरकर करंडक’ स्पर्धेसाठी केली. या एकांकिकेची गंमत झाली. ‘सावरकर करंडक’ एक वैशिष्टय़पूर्ण एकांकिका स्पर्धा होती. यात फक्त सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ या ग्रंथावर आधारित एकांकिका सादर करायची होती. मला स्क्रिप्ट सबमिशनच्या दोन दिवस आधीपर्यंत सुचत नव्हतं. कारण ९७ संघांनी राज्यभरातून भाग घेतलेला. ‘सगळेजण बारी आणि कोलूभोवती फिरणार. आपली एकांकिका वेगळी कशी ठरणार?’ हा विचार सतावत होता. ग्रुपमधले सगळे शिव्या देत होते की अरे तीन हजार रुपये भरलेत एन्ट्रीचे. वाया घालवणार तू. आता त्यांना काय सांगू? मी अडकलो होतो. वारंवार ‘जन्मठेप’ वाचत होतो. आणि एक दिवस मध्यरात्री अडीच वाजता अचानक झोपेतच जाणवलं की सावरकरांनी ‘जन्मठेप’ मध्ये आत्महत्येच्या विचारांवर विजय कसा मिळवला ते लिहिलंय. खाडकन जाग आली आणि समोर असलेल्या वर्तमानपत्रातली हेडलाइन दिसली. ‘बाल आणि युवा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत वाढ.’ म्हटलं इतिहास कन्टेम्पररी होऊ पाहतोय. म्हणून मला कदाचित त्या अंदमानातल्या आत्म्यांनी अडकवून ठेवलं नसेल ना? मृत्यू आणि सावरकरांचा संवाद हा धागा पकडून एकटाकी एकांकिका लिहिली. आमच्यापैकी योगेश देशपांडे नामक मित्र धावत सोलापूरला गेला आणि शेवटच्या क्षणी ती स्क्रिप्ट सबमिट झाली. एवढं झाल्यावर स्पर्धेत एकांकिका चालू असताना म्युझिक सिस्टिम बंद पडली. म्हटलं सगळं मुसळ केरात! पण तरीही ‘करंडक’ मिळाला. कारण परीक्षकांचं म्हणणं होतं. हा आशय विषय आताच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. इतिहासातून आत्ताच्या नैराश्यासारख्या समस्येवर उत्तर शोधण्याचा ‘अवध्य’ म्हणजेच आत्ताचे हे ‘मृत्युंजय’ नाटक हा यशस्वी प्रयत्न आहे. हे नाटक अनेक अडचणींना तोंड देऊन अंदमानच्या सेल्युलर जेलमध्येही सादर केलं गेलं. १०० वर्षांनी म्हणजे २०१० ला हे सादर करणारे आम्ही पहिले भारतीय आहोत याचा सार्थ अभिमान आहे.

हा सगळा प्रायोगिक उपद्व्याप चालू असताना ‘फर्जंद’चं काय? शिवकालीन चित्रपटमालिकेचं काय? हा भुंगा मेंदू कुरतडत असायचाच. मग मनाशी घट्ट ठरवलं की मनोरंजनाच्या मुख्य प्रवाहात जायचं. जवळचं क्षेत्र मालिकेचं. २००९ला सवाई अभिनेता झाल्यानंतर निर्माते शशांक सोळंकी यांनी सिरियल देऊ केली होती. पण काही कारणाने ती थांबली ती नंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या नावाने प्रसारित झाली. एक छोटीशी भूमिका या मालिकेत मिळाली. मुंबईत राहण्याचा पत्ता नाही. इथेच कार्यकारी निर्माते असणारे संदीप जाधव यांच्याशी मत्री झाली.  नोकरी सोडून मालिका घ्यायची. तेही कमी पशात. पण समोर दिसत होती ऐतिहासिक चित्रपटमालिका. त्यासाठी ही रिस्क आवश्यक होती. कारण माध्यमं शिकायची होती. स्मिता तळवलकरांच्या ‘अस्मिता चित्र अ‍ॅकॅडमी’मध्ये शिकवत होतो. त्यांनी लेखन पाहून एक मालिका लिहायला दिली होती. त्यामुळे काहीशी प्रॅक्टिस झाली होती. ‘गंध फुलांचा’साठी पटकथा लिहिणाऱ्या विवेक आपटेंना संवाद लेखक हवा होता. एकदा सेटवर आलेला सीन मनाप्रमाणे नव्हता म्हणून दिग्दर्शक संगीत कुलकर्णी विचारात पडले होते. त्यांना म्हटलं, ‘‘मी ट्राय करू?’’ त्यांना हवा होता तसा सीन लिहून दिला. त्यांच्यासमोर लिहीत असताना त्यांना माझा लेखनाचा वेग जाणवला आणि त्यांचं त्या वेळचं वाक्य आठवलं की अजूनही हसू येतं. ते म्हणाले होते, ‘किती भसाभस डायलॉग लिहितो हा!’ आणि पुढे मला संगीत सरांनी ‘तू माझा सांगाती’ लिहिण्याची ऑफर दिली. याच वेळी मृणालताईंनी (कुलकर्णी) ‘रमामाधव’साठी साहाय्यक म्हणून बोलावलं. एकाच वेळी दोन ऑफर आल्यानं गोंधळून गेलो. पण सिनेमा करायचा ठरवला कारण टेलिव्हिजनचं माध्यम तर पाहिलं होतं. पण चित्रपट अनुभवायचा होता. मग ‘रमामाधव’ करता करता ‘फर्जंद’चं काम सुरू केलं. ‘तू माझा सांगाती’ तोपर्यंत पुढे गेली. त्यामुळे ती मालिकाही लिहिता आली. त्यात काम करताना चिन्मय मांडलेकरची ओळख झाली. ज्या दिवशी चिन्मयची ‘तुकाराम’ म्हणून लुक टेस्ट झाली त्या दिवशी मी प्रचंड नव्‍‌र्हस होतो. कारण चिन्मय मी लिहिलेले डायलॉग म्हणणार होता. त्यानं टेस्ट संपल्यावर विचारलं, ‘हे कुणी लिहिलं?’ माझं नाव कळल्यावर मला बोलवून म्हटलं, ‘‘मस्त लिहिलंय!’’ मग जो धीर चेपला तो कायमचा. हे सगळं होईतो कोंडाजी खुणावत होतेच. निनाद बेडेकरांच्या हाताखाली अभ्यास पूर्ण झाला होता. त्यामुळे एकदाचं ‘फर्जंद’ कागदावर उतरवावं असं वाटत होतं. त्यात मला ५ दिवसांची सुटी मिळाली. डेली सोप करताना ५ दिवसांची सुटी म्हणजे दिवाळी. सुटी घेऊन पुण्यात येता येताच समीर बुधकर नावाच्या मित्राला फोन केला आणि म्हटलं, ‘‘मी रायगडवर चाललोय. येतोयस का?’’ काही न बोलता समीर कार घेऊन माझ्या आधी घराखाली उभा होता. जाताजाता केदार दिवेकरलाही फोन केला. रायगडावर पोचलो दुपारी एकच्या सुमाराला. शिवरायांना रिवाजाप्रमाणे मुजरा करून दोन दिवस राहणार असल्याची वर्दी दिली आणि आशीर्वाद घेऊन टकमक टोकावर जाऊन बसलो. आज स्क्रिप्ट लिहायचीच असं पक्कं केलं होतं. लॅपटॉपची बॅटरी संपली वगैरे कारणं नको होती म्हणून लिहायला चक्क पाचाडमधून ५-६  पेन विकत घेतले आणि दोन फुलस्केप वह्य़ा. दुपारी २ वाजता माझ्या लाडक्या टकमक टोकावर बसलो. शिवरायांचं स्मरण केलं आणि त्यानंतर थेट अंधार पडल्यावर मी ‘जय भवानी जय शिवराय’ असा शेवटचा शब्द कागदावर लिहिल्याचं स्मरतं. माझ्या आजूबाजूला आश्चर्याने बघत बसलेले केदार आणि समीर सांगतात की त्या काळात तू वर पाहिलंही नाहीस फक्त तीन पेन संपल्याचा व्यत्यय आला तेवढाच. ‘फर्जंद’ एखाद्या प्रसादासारखी पदरात पडली होती. परत मुंबईला आल्या आल्या चिन्मयला ‘फर्जंद’ची स्क्रिप्ट वाचायला दिली. त्याने स्क्रिप्ट आंतरराष्ट्रीय असल्याचं सांगितलं. जोमानं प्रयत्न सुरू केले की आता सिनेमा करायचाच! तोवर ‘फर्जंद’ची विविध निर्मात्यांकडे जवळजवळ १५० वाचनं झाली होती. मला जमत असलेल्या चांगल्या कामाची दखल इंडस्ट्रीकडून घेतली जात होती. याचं सगळं श्रेय मी श्यामरावांनाच देईन. कारण एखाद्या गोष्टीकडे भलत्याच अँगलने बघायची दृष्टी त्यांनीच दिली आहे. त्यानंतर मला ‘सखी’ मिळाली. ही मालिका महत्त्वाची ठरली, कारण यात मी नायकाची भूमिका तर केलीच पण रुची सावर्ण नावाची उत्तम कोआर्टिस्ट मला मत्रीण म्हणून मिळाली. अंकित मोहनची भेट रुचीमुळेच झाली. ‘सखी’ अपेक्षेपेक्षा लवकर संपली. मग चित्रपटच करायचा हा चंग बांधला होता. त्याच वेळी संदीप जाधवांचा फोन आला. त्यांच्या ‘माझिया माहेरा’ या मालिकेतला एक कलाकार अचानक आजारी पडला होता. ज्या चॅनेलवर नायक केलाय तिथे नायिकेचा भाऊ? निर्णय अवघड होता. पण संदीप सरांच्या आग्रहाखातर घेतला. आणि इथे संदीप सरांनी ‘फर्जंद’ची कथा ऐकली. त्यांनी महेश जाऊरकर , स्वप्निल पोतदार , वैभव डांगे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध उद्योजक अनिर्बान सरकार या मित्रांच्या साहाय्याने ‘फर्जंद’चं शिवधनुष्य उचललं. संदीप सर नसते तर कदाचित ‘फर्जंद’ इतक्या लवकर साध्य झाला नसता.

त्यानंतर पाठोपाठ अजय आणि अनिरुद्ध आरेकरांची निर्मिती असलेला ‘फत्तेशिकस्त’ आला आणि लागोपाठ दोन ऐतिहासिक चित्रपट सुपरहिट करण्याचं श्रेय मला मिळालं. अर्थात चित्रपट शिवरायांचा आहे. त्यात कमी पडता कामा नये हे आरेकर बंधुद्वयाने कटाक्षाने पाळले. इतकेच नाही ‘फत्तेशिकस्त’ यशस्वी झाला तरी त्या यशाची वाट न पाहता ‘जंगजौहर’ हा तिसरा चित्रपटही घोषित केला.

जिथे संधी मिळेल तिथे जे शिकायला मिळेल त्याच्या फायद्या-तोटय़ाचा विचार न करता शिकणं हे महत्त्वाचं, हे मी विशी ते तिशीत शिकलो. मी लकी आहे कारण मी फक्त यशस्वी नाही तर अनेक गोष्टी निभावू शकलो आहे. संगीत नाटकाचा भाग अलीकडे नामशेष होऊ लागला असला तरी कीर्ती शिलेदार, दीप्ती भोगले यांसारखी काही साध्वीतुल्य व्यक्तिमत्त्वं ते टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हाताखाली ‘संगीत स्वरविभ्रम’ करताना संगीत नाटकाची प्रोसेस अनुभवता आली आहे. बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, पांडुरंगराव बलकवडे या इतिहासकारांचा साक्षेपी व्यासंग पाहता आला आहे.  गो.नी.दांच्या साहित्यावरच्या प्रेमामुळे विजय देव, वीणा देव, मृणाल कुलकर्णी यांसारख्या साहित्यिक कलावंत कुटुंबाचा स्नेह माझ्या आयुष्याचा ठेवा बनला. हे सगळं मिळालंय ते काही मोह सोडल्यामुळे आणि काहीसा वेडेपणा केल्यामुळे आणि छत्रपतींच्या आशीर्वादामुळे!.. मी लकी आहे!!