बाकी सारे दिवस तर ठीक जातात पण, तुझा तो लाडका ‘पाऊस’ फार जीव नकोसा करतो गं. तप्त मातीवर पहिले थेंब पडू लागतात. माती सुगंधू लागते आणि मनात फक्त तुझे विचार पसरवत जाते, ‘कुठे असशील, काय करत असशील तू.. हा पाऊस तुलाही असं अस्वस्थ करत असेल का?..
रात्रीचा एक वाजून गेलाय. मनाविरुद्धच मी ऑफिसच्या बाहेर पडलोय. मी गाडी सुरू करतो, गाडीतल्या सिस्टीमवरचे सूर कानी पडतात, सत्यशील देशपांडे गात आहेत, ‘किसको ऐसी बात कहे..’ खरंच कोणाला सांगू अशी ही अवस्था! जुलै महिन्यात पडणारा तुफान पाऊस! मनात एक अदृश्य भीती दाटून आणणारा, एक अस्वस्थ हुरहुर दाटून येते. मन मनास उमगत नाही.. अशी अवस्था करणारा पाऊस. काचेवर गाडीचे वायपर सरसर फिरत आहेत आणि मनावर आठवणींचे! पावसाचे थेंब पुसले जातात, पण या आठवणीचं काय करू? बाहेरचं फारसं धड दिसतही नाहीये. तसं मनातलं काही तरी कुठे काही कळतंय? संध्याकाळपासूनच मी थोडा अस्वस्थ आहे, जसजसे ढग दाटून आले तसा. हा अवेळीच नाही तर प्रत्येक पाऊस मला अस्वस्थच करतो, अजब अशी बेचैनी पसरवत जातो. काही कळत नाही मग. आधी भुरभुर वाटणारा पाऊस आता नुसता कोसळतो आहे. ऑफिसमधून बाहेर पडण्याचीच इच्छाच नव्हती. वाटलं एखाद्या खोलीत कोंडून घ्यावं, काम करत राहावं, काही संपर्क नको जगाशी.  
‘खरं तर पाऊस मला पूर्वी कधी आवडलाच नाही. लहान होतो तेव्हा बाकीची मित्रमंडळी मजेत भिजत, कागदी होडय़ा करून पाण्यात सोडत. पण मी? मी नाही हे काही केलं. पुढे कॉलेजमध्येही पहिली काही वर्षे मी कटाक्षानं या पावसापासून दूर राहिलो. शेवटच्या वर्षी सारं जग बदलू लागलं होतं, आमचा दहा-बारा मित्र-मैत्रिणींचा एक छानसा ग्रुप जमला होता आणि नुकताच तुझा.. त्यात प्रवेश होऊ  लागला होता. एकदा आपल्या ग्रुपची पावसात ट्रिपची टूम निघाली. मनापासून यायची इच्छा नव्हतीच, पण तू खूप उत्साही दिसलीस. खरंच ती ट्रिप लक्षात राहावी अशीच होती. आपण सारे कुठल्याशा गडावर गेलो होतो, अगदीच भुरभुर पाऊस पडत होता. तुझ्या बटांवर ते चिमुकले थेंब इतके सुंदर दिसत होते, की नजर हटत नव्हती. तेवढय़ात तुला कोणी तरी कविता म्हणायचा आग्रह केला. ती ऐकायला मीही उत्सुक होतोच. तुझ्या तोंडून आली ती,
‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी,
 घर माझे चंद्रमौळी अन् दारात सायली’
तुझ्यामुळे कविता, गाणी, काव्य आवडायला लागले, आणि तशीच तूही. पण या भावना अशा शब्दात व्यक्त करणं मला कधी जमलंच नसतं. तरीही हळूहळू आपण बाकी ग्रुपपासून वेगळे होत गेलो. तू एकदा बोलायला लागलीस की अखंड धारा बरसताहेत असं वाटायचं. कवितेचे सारे भाव तुझ्या डोळ्यांत दाटून यायचे, अन् मी तुला पाहताच राहायचो. वाटायचं असं एखाद्या गोष्टीवर प्रेम करता यायला हवं, जीव ओवाळून टाकावा असं हे जगणं.
असेच एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. एम.बी.ए. च्या दुसऱ्या वर्षांला होतो आपण तेव्हा. थोडी हलकी सर होती, म्हणून लायब्ररीच्या पायऱ्यांवर आपण दोघे बसून होतो. तू ‘चल, ना भिजूया’ असा हट्ट धरून होतीस, आणि मी नेहमीप्रमाणे ‘नको’चा राग आळवत होतो. त्या दिवशी कसे आठवत नाही पण तू माझे ऐकलेस, आणि थांबलीस. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतंच आणि तू हलकेच गुणगुणायला सुरुवात केलीस, ‘ओ, सजना बरखा बहार आयी, रस की फुहार लायी, अखियों में प्यार लायी’ तू गुणगुणत होतीस आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.. आणि मी चटकन उठलो, म्हटलं, ‘चल घरी जाऊया’..
पुढे तुझ्या आग्रहाखातर, मी चक्क रागदारी, हिंदुस्थानी संगीत ऐकू लागलो. आठवतं तुला? एकदा तुझ्या आग्रहाखातर आपण सवाई गंधर्वला गेलो होतो, तो तुझा सखा पाऊस, तिथेही तुझ्यामागे आला, भर सप्टेंबर महिन्यात, तू तर काय.. पावसात जितका भिजलो नाही तितका तुझ्या सुरात भिजून निघालो.. तुझं गुणगुणणं मला चिंब करून गेलेलं. शिक्षण संपलं, अर्थार्जन सुरू झालं. आपण दोघे वेगवेगळ्या क्षेत्रांत, मी आय.टी.वाला तर तू इन्व्हेस्टमेंट बँकेत. मी चिडवायचो तुला ‘तुला कशी जमत असतील ही गणितं इन्व्हेस्टमेंटची, फायद्या-तोटय़ाची, कविता कर तू आपल्या’ खरंच कविता जगायचीस तू!
एकदा मी घरी होतो, ऑगस्ट महिन्याचे शेवटचे दिवस, दुपारी चार वाजताच काळोख दाटू लागला, पावसाची चिन्हे दिसू लागली. मी, तुला फोन केला, म्हटलं,‘ ए, बाहेर पाहिलयंस का?  काय मस्त हवा आहे, आत्ता या वेळी आपण सोबत असायला हवं. बाहेर पडणार आहेस की इन्व्हेस्टमेण्ट्सची गणितंच मांडत राहणार आहेस? पिकअप करू का तुला थोडय़ा वेळात? चल लाँग-ड्राइव्हला जाऊ  या.’  तू ‘हो’ म्हणालीस. खूप उत्साहाने मीही तयार झालो. खाली पाìकगमध्ये पोहचून गाडी काढणार, पाहतो तर काय, तू समोर दिसलीस. मी सुखावलो, वाटलं, जो विचार माझ्या मनात चालू आहे, तसेच काही हिच्याही.. जी हिच्याबद्दल ओढ मला जाणवते ती तिलाही कदाचित.. पण माहीत नाही काही तरी बिनसले होते त्या दिवशी तुझे. गाडीत बसल्यावर मी तुझा हात हाती घेतला, पण तू काही न बोलता सोडवून घेतलास. तुझा चेहरा उतरलेला होता. आपण थांबलो एका ठिकाणी, मी पुन:पुन्हा तुला ‘काय झालंय’ असं विचारलं, पण तू ‘काही नाही’ या पलीकडे काही बोलली नाहीस.
ती आपली शेवटची भेट. वारंवार मी तुला काय झालंय, असं विचारत राहिलो, फोनवर, मेल्सवर, पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरत होते. नंतर नंतर तू माझे फोन घेणंही बंद केलंस. अनेक दिवसांच्या तुला बोलतं करायच्या माझ्या प्रयत्नातून काहीच हाती लागलं नाही. माझं काही चुकलं होतं का हा विचार करत माझ्या डोक्याचा भुगा होऊन गेला पण उत्तर सापडेना. शेवटी सारं विसरून मी स्वत:ला माझ्या कामात गुंतून घेत गेलो. जगाच्या दृष्टीने एक यशस्वी माणूस, पैसा-अडका सारं काही बक्कळ कमावणारा. पण स्वत:च्या दृष्टीनं आपलं साधं प्रेम धडपणे व्यक्त करून तुला स्वत:जवळ ठेवू न शकलेला अयशस्वी. गेल्या पाच वर्षांत मी कधी तुझा शोधही नाही घेतला, कुठे असशील, कशी असशील, काय करत असशील, लग्न करून आपल्या आयुष्यात सुखी की माझ्याप्रमाणंच..
बाकी सारे दिवस तर ठीक जातात पण, तुझा तो लाडका ‘पाऊस’ फार जीव नकोसा करतो गं.  ‘कुठे असशील, काय करत असशील तू असा वेळी-अवेळी दाटून येणाऱ्या पावसाला कशी सामोरी जात असशील? हा पाऊस तुलाही असं अस्वस्थ करत असेल का? जशा तुझ्या आठवणी मनात काहूर माजवतात माझ्या, तशा त्या तुझ्याही मनी दाटून येत असतील का? आजही तू कविता, गाणी तशीच गुणगुणत असशील का? ‘काली घटा छाए’ किंवा ‘पिया बिन नहीं आवत’ हे आजही तुझ्या ओठी येत असेल का माझ्यासाठी? उत्तरं कधी मिळणार नाहीत असे हे सारे प्रश्न!
घरी पोहोचलोय मी माझ्या. रात्र अशी आता भिजूनच संपेल. गाडीतले मेहदी हसन यांचे सूर अजूनही कानात घुमत आहेत..
कर रहा था गम्म-ए-जहाँ का हिसाब।
आज तुम याद बेहिसाब आये।।