‘‘पाऊस, धबधबे, जलाशय, समुद्र पाहिला की ‘मी मज हरपून बसले गं’अशी अवस्था होऊन जाते. मी पहिल्यांदा समुद्र पाहिला तो कोकणातील दिवेआगरचा. तिथेच मला मृत्यूची तयारी एका क्षणात होऊ शकते याचा साक्षात्कार झाला. पण नंतर मात्र जगभरातील समुद्रानं, पाण्यानं शब्दातीत अनुभव दिले. क्रोएशियातील समुद्रकिनाऱ्यावरील ब्लू केव्ह्जच्या निळाईचा गहिरा अनुभव असो, की झडारच्या किनाऱ्यावरचा ‘समुद्र ऑर्गन’चा चमत्कार. ‘डेव्हिल्सथ्रोट’चा अनुभव थरार निर्माण करणारा तर इग्वासू धबधब्याच्या अजस्र धारेखालून बोटीनं नखशिखान्त भिजत जाण्याचा अनुभव काळजाचे ठोके वाढवणारा!’’ सांगताहेत लेखिका मृणालिनी चितळे.

माझ्या लहानपणी प्रवासासाठी प्रवास करायची अशी पद्धत नव्हती. मध्यमवर्गीयांना तर ही आवड परवडण्यासारखीही नव्हती. प्रवास केला जायचा तो नातेवाईकांकडे जाण्यासाठी. त्याही वयात खिडकी मिळवण्यासाठी माझा आटापिटा असायचा. धुरांच्या रेषा सोडणाऱ्या आगगाडीतून जाताना कोळशाचे बारीक कण नाकातोंडात, क्वचित डोळ्यांत जायचे; तरी खिडकी सोडायची माझी तयारी नसायची. खिडकीतून दिसणारे डोंगर, झाडं, तळी, घरं, स्टेशन्स, त्यावरील हमाल, भिकारी, प्रवासी या सर्वाविषयी मनात कुतूहल असायचं. मला आठवतंय, तेव्हापासून प्रवासातील छोट्यामोठ्या प्रसंगांतून जाताना मनात उमटणारे विचारांचे तरंग, त्यामध्ये मिसळत जाणारे जाणिवांचे रंग, जाग्या होणाऱ्या आठवणी, आठवणीतल्या कविता, यामुळे कोणताही प्रवास माझ्यासाठी एक ‘इव्हेंट’ असायचा. अजूनही असतो.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

हेही वाचा – पाहायलाच हवेत: वहिवाटेच्या पलीकडचा प्रवास

डोंगरदऱ्या, घनदाट जंगलं, प्राणी, पक्षी त्याहूनही अधिक पाऊस, धबधबे, जलाशय, समुद्र पाहिला, की ‘मी मज हरपून बसले गं’ अशी अवस्था होऊन जाते. मी पहिल्यांदा समुद्र पाहिला तो कोकणातील दिवेआगरचा. तेव्हा मी सोळा वर्षांची होते. माझ्याबरोबरची भावंडं पोहण्यासाठी समुद्रात घुसली. लाटा झेलत, मऊ रेतीचा स्पर्श अनुभवत मीही आत गेले. पाणी खांद्यापर्यंत पोहोचलं तेव्हा माझा भाऊ म्हणाला, ‘‘तुला पोहता येत नाही, हे लक्षात आहे ना?’’ ऐकलं आणि पायाखालची वाळू निसटली. पाण्यातच मी कोलांटी घेतली. वाटलं, ‘संपलं सारं.’ डोळे उघडले, तर मी ‘होते’! मृत्यूची तयारी एका क्षणात होऊ शकते, याचा झालेला साक्षात्कार. त्यानंतर मी पाठीवर लाटा झेलायला शिकले. पोहायला शिकले. कोणार्कचं आमचं घर समुद्रकिनारी होतं. सकाळी सकाळी उठून ‘शुभ्र तुरे लेवून आल्या निळ्यानिळ्या लाटा’ या काव्यपंक्तीचा मनमुराद आनंद लुटला. फ्रान्समधील नीस गावी पोचलो, तेव्हाही नुकतंच उजाडलं होतं. शुभ्र तुऱ्यांच्या ओढीनं मी समुद्रात गेले. लाटांबरोबर आलेले गुळगुळीत गोट्यांचे धपाटे अंगाखांद्यावर सोसत निमूटपणे बाहेर पडले. प्रत्येक माणसाचं पाणी वेगळं, तसंच समुद्राचं असावं. प्रत्येक गावातील त्याची आदत आणि नजाकत वेगळी. आर्द्रता आणि रौद्रता वेगळी. त्यामध्ये माणसांनी अविश्रांत लुडबुड केल्यामुळे झालेले बदल तर समजून घ्यायला आणखीनच अवघड. राखाडी रंगाचं पाणी प्रदूषणयुक्त असतं आणि निळंशार पाणी प्रदूषणमुक्त अशी माझी भाबडी समजूत होती. परंतु आशिया आणि युरोप खंडाला जोडणारा इस्तंबूलचा भूमध्य सागर अत्यंत प्रदूषणयुक्त आहे हे कळल्यावर त्यामध्ये पोहण्याचा विचार सोडून द्यायला लागला. मात्र परीकथेतील शोभावा असा अनुभव घेता आला क्रोएशियातील समुद्रकिनाऱ्यावरील ब्लू केव्ह्जमध्ये.

प्रथम स्पीडबोटीनं प्रवास करत आम्ही एका बेटावर गेलो. तेथून छोट्याशा बोटीतून कडेकपारीतील गुहेच्या तोंडापाशी. गुहेच्या आत प्रवेश करताना होडीत ओणवं व्हावं लागलं. आत गेल्यावर क्षणभर काही दिसलं नाही. हळूहळू सारं भवतालनिळ्याशार लावण्याचा साज चढवून सामोरं आलं. त्यामागचं रहस्य नावाडी सांगायला लागला. गुहेच्या वर असलेल्या बारीकशा फटीतून सूर्यकिरणं आत येतात, तेव्हा आरस्पानी पाण्यात आकाशाची निळाई प्रतिबिंबित होते. गुहेच्या आतील चुनखडीचा दगड आणि पांढरी शुभ्र रेती यामुळे निळा रंग अधिकच गहिरा होतो. कानावर नावाड्याचे शब्द पडत होते, ओठावर मात्र पाडगावकरांचे शब्द येत होते. ‘हलकेच निळा घन आला, बरसून गेला, प्राणात निळी नवलाई उधळून गेला.’

ब्लू केव्ह्जमध्ये निसर्गाचा अलौकिक चमत्कार अनुभवता आला, तर त्याच देशातील झडार गावाच्या किनाऱ्यावर मानवनिर्मित ‘समुद्र ऑर्गन’चा! समुद्र ऑर्गन म्हणजे वास्तुशास्त्र आणि कल्पकता यांचा अद्भुत मिलाफ आहे. त्यासाठी प्लास्टिकच्या ट्यूब्ज पाण्यामध्ये अशा पद्धतीनं बसविल्या आहेत, की त्यावर लाटांचा आघात झाला की ऑर्गनचे सूर उमटावेत. किनाऱ्यावर ठेवलेल्या होल्समधून ते स्पष्टपणे ऐकू येतात. संगमरवरी पायऱ्यांवर पाण्यात पाय सोडून बसायचं. सोबतीला सागर आणि ऑर्गनचे सूर. वेगळाच अनुभव.

प्रशांत महासागर, हिंदी महासागर, भूमध्य सागर अशा विविध समुद्रकिनारी भटकताना, जहाजामधून समुद्रसफरीचा आनंद लुटताना, महाकाय लाटा, लाटांबरोबर तरंगत येणाऱ्या मोरपंखी रंगाच्या बर्फाच्या लाद्या, डॉल्फिन आणि व्हेल मासे, समुद्रात पाय रोवून उभ्या असलेल्या टेकड्या, निर्जन बेटावरील पेंग्विन, गिधाडं.. अशा किती तरी गोष्टी अनिमिष नेत्रांनी बघताना निसर्गातील वैविध्य आणि अथांगता अनुभवता आली.

अरुणाचलमधील तवांगमधून हेलिकॉप्टरनं खाली उतरताना, ब्रह्मपुत्रा नदीचं महाकाय पात्र दृष्टीस पडलं तेव्हा आणि अ‍ॅमेझॉनच्या जंगलात भटकंती करताना मनात कोणताही धार्मिक भाव नसताना हात जोडले गेले. जंगलात भटकताना गमबूट घालून चिखलातून वाट तुडवण्याची, घामाच्या धारांनी ओलंचिंब केलं वा डासपिसवांनी डसलं तरी चालत राहाण्याची तयारी मात्र हवी. ती असेल तर तिथले शेकडो वर्षे जुने वृक्ष, झाडांना विळखा घालून त्यांना मारून टाकणाऱ्या अनाकोंडा जातीच्या वेली, साप-मगरींसह अनेक प्राणी, पक्षी पाहताना आपण एखाद्या प्रदर्शनातून फेरफटका मारत असल्यासारखं वाटतं. त्या रात्री जाग आली ती प्रचंड मेघगर्जनेनं. जंगलाचं जंगलपण राखण्यासाठी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे वीजपुरवठा बंद केला होता. मिट्ट काळोख. फक्त विजांचा लखलखाट. शब्दश: मुसळधार पाऊस. त्यामध्ये थरथर कापणारी लाकडी झोपडी आणि आम्ही. दुसऱ्या दिवशी पुढच्या मुक्कामाला पोहोचण्यासाठी बोटीतून प्रवास करायचा होता. आम्ही बोटीत बसलो तेव्हा पाऊस कोसळतच होता. हमरस्त्यावरून धावणारी सुसाट वाहनं चुकवावीत, अशा शिताफीनं आमचा नावाडी पाण्यातून वाहात येणारे भले मोठे ओंडके चुकवत नाव हाकत होता. बोटीतील अनेकांनी स्तोत्रं म्हणायला सुरुवात केली होती!

अ‍ॅमेझॉनच्या जंगलाप्रमाणे ब्राझीलमधल्या इग्वासू धबधब्याचा थरारही स्तिमित करणारा. तो पाहताना बाकिबाब यांचे (बा.भ. बोरकर) शब्द ओठांवर आले. ‘पाणियाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी, आज त्याच्या प्रत्ययाने मीही पाणी, मीही पाणी.’ धबधब्यातलं फेसाळतं-उसळतं पाणी. पाण्यातून उमलून आलेलं इंद्रधनू. एका अजस्रधारेखालून बोटीत बसून, नखशिखान्त भिजत जाण्याचा अनुभव काळजाचे ठोके वाढवणारा! छोटी छोटी असंख्य फुलपाखरं मात्र बिनधास्तपणे धबधब्याकडे झेपावताना दिसली. जेमतेम दोनअडीच दिवसांचं आयुष्य लाभलेले ते इवलेसे जीव! वाटलं, त्यांचं हे वागणं म्हणजे मनसोक्त जगून झाल्यानंतरचा इच्छामरणाचा तर मार्ग नसेल? विचारानंही मन कासावीस झालं. मनाच्या या अवस्थेत ‘डेव्हिल्सथ्रोट’च्या गोलाकार भागापर्यंत पोहोचलो. वर्तुळाकृती कड्यावरून सहस्रावधी धारा कोसळत होत्या. थरार निर्माण करणाऱ्या. पूर्वीच्या काळी आपल्याकडे गुन्हेगाराला जशी कडेलोटाची शिक्षा दिली जायची, त्याप्रमाणे इकडे पाणलोटात ढकलून देण्याची शिक्षा. शिक्षेनंतर नखसुद्धा दृष्टीस न पडू देण्याची मानसिकता इथूनतिथून सारखीच.

आपला देश असो वा परदेश! निसर्ग मला विलक्षण आनंद देत असतो. कधी तो रुसतो, गरजतो. हिमवर्षांव करतो. तेव्हा ठरवलेला बेत रद्द करावा लागतो. हिमालयातील ट्रेकिंगच्यानिमित्तानं तर हा अनुभव पावलोपावली येतो. समोर ईप्सित शिखर दिसत असतं, तरी माघारी फिरायला लागतं. मन हिरमुसतं. एखादा पक्षी पाहण्यासाठी केलेली भटकंती तर अनेकदा निरर्थक ठरते, पण अकस्मात ‘तो’ समोर येतो तेव्हा शाळेतला दोस्त भेटल्याचा आनंद होतो.

भूतानला दिसलेला मोनाल, अँडीज पर्वताच्या परिसरातील काँडॉर आणि कोलंबसला विहार करणारा कार्डिनल जेव्हा दर्शन देऊन गेले, तेव्हा दिवस सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं. निसर्गाच्या कुशीतले हे सारे क्षण भरभरून जगण्याचे असतात. ते मिळवण्यासाठी कुणाशी स्पर्धा करायची नसते. मनात ईर्षा नसते. तर मनाची कवाडं उघडून त्याच्याशी मुक्त संवाद साधायचा असतो. त्याच्याशी आणि स्वत:शी.

असाच संवाद प्रवासात भेटणाऱ्या माणसांशी साधायची इच्छा असते, पण कधी वेळ कमी पडतो, कधी भाषेचा अडसर मध्ये येतो. आवडलेल्या गावी महिनाभर मुक्काम ठोकून तिथला माणूस समजून घ्यावासा वाटतो, तेव्हा पैशांचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे प्रवासात भेटलेली माणसं त्या देशाचं प्रतिनिधित्व करणारी नसतात. एखाद्या देशात जाण्यापूर्वी तिथली संस्कृती, इतिहास आणि सद्य:स्थिती याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न मी जरूर करते; परंतु यामधून त्या देशाची ओळख होऊ शकत नाही. मनात काही प्रतिमा तयार होतात. ज्या कोनातून त्यांच्याकडे पाहायची माझी क्षमता आहे, तशी इन्म्प्रेशन्स असतात. या प्रतिमा तयार होताना त्यांची आणि आपली संस्कृती, विचार यांची तुलना केली जाते. व्हिएन्ना येथील शोनब्रुन पॅलेस बघताना असंच घडलं. आत प्रवेश करताना नजरेत भरल्या त्या गतवैभवाच्या आणि राजविलासाच्या जागोजागी विखुरलेल्या खुणा. शिसवीचे पलंग. अलमाऱ्या. काचेची घड्याळं, झुंबरं, मखमली पडदे. खास दालनांना दिलेला सोन्याचा मुलामा. चांदीची क्रोकरी. हे सर्व वैभव भोगलेल्या हाब्सबर्ग घराण्याचा इतिहास तिकिटाबरोबर दिलेल्या ऑडीओकॅसेटद्वारे डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांचे आपापसांतील नातेसंबंध, हेवेदावे, पराकोटीचे प्रेम., तऱ्हेवाईकपणा, अठराव्या शतकातील राणी एलिझाबेथ म्हणजे ऑस्ट्रियन सम्राज्ञी, स्वत:चं सौंदर्य आणि बांधा टिकवण्यासाठी अर्धपोटी राहण्याचा तिचा अट्टहास. ढीगभर दागिने, दिमतीला नोकरांचा तांडा, राजाचं अपरंपार प्रेम असूनही ती सतत उदास असायची. का, तर म्हणे आपली सासू आपल्यावर कायम पाळत ठेवते या जाणिवेनं. ऐकताना हसू आलं आणि दोन संस्कृतींमधील अंतर मिटून गेलं.

शोनब्रुन पॅलेस पाहिल्यानंतर नुकताच पाहिलेला उदयपूरजवळचा कुंभालगड किल्ल्यावरचा राणा कुंभालचा राजवाडा आठवला. अतिविशाल दालनं आणि स्वसंरक्षणासाठी बांधलेली तटबंदी. अंधारी भुयारं. हत्तीच्या धडकेनं पडू नये असं प्रवेशद्वार. एवढी सगळी काळजी घेऊनही आत गेल्यावर दृष्टीस पडले ते प्रशस्त वास्तूचे भग्न अवशेष. दागिने, उंची फर्निचर, गालिचे यांचा अभाव. या पार्श्वभूमीवर शोनब्रुन पॅलेसभोवती साधी संरक्षक भिंत नव्हती, या वास्तवातून दोन देशांच्या इतिहासातली तफावत जाणवली. अर्जेन्टिनामधील ब्वेनोसएयर गावी प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत ‘रेकोलेटासेमिटरी’ म्हणजे कबरस्तान आहे हे पाहून आमच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र ते ठिकाण म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना होता. ग्रीक मंदिरं, गोथिक पद्धतीची चर्चेस, चिमुकली घरं. छपरांवर देवदूताच्या प्रतिमा. काचेच्या तावदानातून दिसणाऱ्या शवपेट्या. विषण्णतेचा स्पर्श न झालेली तिथली शांतता! तिथल्या रस्त्यानं फिरताना राजकोटमधील स्मृती जाग्या झाल्या. “इथं पाहण्यासारखं काय आहे?’’ असं आमच्या एका स्नेह्याला विचारलं असता, तो म्हणाला होता, ‘यहाँ का स्मशान देखनेलायक है। एशिया में नंबर एक हैं।’ त्यांनी गाडीची व्यवस्था केली म्हणून जाणं भाग पडलं. स्मशान म्हणजे काही एकरांचा हिरवागार परिसर होता. ठिकठिकाणी कारंजी. संगमरवरी वाटा. फुलांचे ताटवे. देवदेविकांच्या मूर्ती. ग्रंथालय. तिथेच एका बाजूला चिता धडधडत होती; त्या परिसराचा अविभाज्य भाग असल्यासारखी. मंद स्वरात चाललेलं गीतापठण. किलबिलाट. पाण्याचा खळखळाट. स्मशान या शब्दातल्या भयावहतेचा जराही स्पर्श न झालेलं वातावरण. ‘रेकोलेटासेमिटरी’ आणि राजकोटमधील स्मशानभूमी! दोन वेगळ्या खंडांतील, भिन्न संस्कृतींचं दर्शन घडवणारी पर्यटनस्थळं! जीवन आणि मरण हातात हात घालून वावरत असल्याची उत्कट अनुभूती देऊन गेली.

परदेशात फिरताना कधी कधी बोलायची इच्छा असताना भाषेची कशी अडचण उद्भवते तर कधी शब्दाविना संवाद कसा घडतो, याचे दोन अनुभव.. कोपा कबानाच्या चौपाटीवर दिसलेल्या एका मुलीच्या दंडावर काढलेल्या टॅटूकडे लक्ष गेलं, तर ती चक्क गणेश प्रतिमा होती. तिची नाळ भारताशी जोडली असणार म्हणून बोलायचा प्रयत्न केला तर स्पॅनिशशिवाय तिला दुसरी कोणतीच भाषा येत नव्हती. गणेशमूर्ती आणि शिवलिंग यांच्या प्रतिमांचे आकृतिबंध इतके वैश्विक असावेत, की साल्झबर्ग येथील आईस केव्ह्ज किंवा लास व्हेगास येथील ‘फायर ऑफ माऊंटन’सारख्या नैसर्गिक म्युरल्समध्ये ते ठिकठिकाणी दिसायला लागतात.

हेही वाचा – मला घडवणारा शिक्षक: पित्याने दिला ज्ञानरूपी वसा

आम्ही स्वित्झर्लंडमधील झरमॅट या गावी जायला निघालो होतो. खिडकी मिळाल्यामुळे मी खूश. बर्फाच्छादित डोंगर, लाल, रंगाची झाडं. हरणाच्या गतीनं बागडत येणारं सोनसळी ऊन. यामध्ये व्यत्यय आला तो माझ्यासमोर बसलेल्या सहप्रवासिनीमुळे. तिनं लॅपटॉप काढला आणि पडदा ओढला. चिमूटभर ऊन तिला सोसवत नसावं. ‘किती रुक्ष आणि अरसिक आहे ही!’ माझ्या मनात आलं आणि मुळशी धरणाजवळचा एक प्रसंग आठवला. पावसाळ्याच्या दिवसांत तिथले डोंगर चढताना आम्ही वारंवार म्हणत होतो, ‘काय सीन आहे!’ आमच्यासोबत असलेला तिथला रहिवासी फटकन म्हणाला, ‘‘तुम्हाला सीन आहे, आम्हाला मात्र शीण आहे.’’ कामात व्यग्र असलेल्या इथल्या या माझ्या सहप्रवासिनीकडे मी पाहिलं. काही मिनिटांपूर्वी मी तिला रुक्ष आणि अरसिक ठरवून टाकलं होतं. दुसऱ्यांबद्दल आपण किती पटकन मत बनवतो. ‘जजमेंटल’ होतो. अचानक वातावरण ढगाळ झाल्यावर अर्धवट खिडकी उघडण्याचा मोह मला आवरला नाही. काही क्षणात गर्द झाडीत ऊन गडप झाली. माझ्याकडे समजूतदार कटाक्ष टाकून तिनं खिडकी पूर्ण उघडली. उन्हाचा कवडसा आल्यावर मी बंद केली. एकाही शब्दाची देवघेव न करता, खिडकीची उघडझाप चालू राहिली. मनात आलं, प्रवास.. मग तो प्रत्यक्षातला असो वा सहजीवनातला, मैत्रीच्या साकवावरून चालण्याचा वा संस्थात्मक काम करण्याचा, खिडकी उघडी ठेवायची की बंद यावर दुसऱ्याचाही अधिकार असतो हे समजून घेता आलं की तो नेहमीच आनंददायी होतो!

वय वाढलं तरी प्रवासात खिडकीजवळची जागा मिळवण्याचा माझा आटापिटा अजूनही चालू आहे. फक्त आगगाडीत नाही, तर विमानातही. विमानातून दिसणारं अनंत रंगांच्या छटा कवेत घेऊ पाहणारं सर्वदूर पसरलेलं आकाश! त्याखाली दिवाळीतील किल्ल्याप्रमाणे दिसणारी घरं, डोंगर, नद्या, समुद्र.. तर कधी नुसतेच कापूस पिंजल्या ढगांचे पुंजके. क्वचित कधी आकाशगंगेच्या काठानं प्रवास करत असल्याची विलक्षण अनुभूती, तर कधी इंद्रकवच आणि एव्हरेस्ट शिखराचं दर्शन. खिडकीतून बाहेर बघताना मनात रेंगाळणाऱ्या प्रवासातल्या आठवणी.. परतपरत जगावेसे वाटावेत असे किती तरी क्षण मी मुठीत घट्ट पकडून ठेवलेले असतात.

chitale.mrinalini@gmail.com