सविता नाबर

‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत..’ कवी मंगेश पाडगावकर यांचं म्हणणं किती सत्य आहे हे पटतं. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे गीत अर्थासहित खूप छान वाटत होतं, पण त्याचा प्रत्यय मला असा आला-एक दिवस लॅपटॉपवर काम करता करता अचानक माझ उजवं मनगट सुजलं. एक्स रे, औषधोपचार सर्व काही झाले, पण निदान होईना. त्यानंतर काही दिवसांनी ताप आला. गोळ्या घेतल्यावर ताप गेला, पण हाताची सूज तशीच. सगळ्या टेस्ट झाल्या. शेवटी डेंग्यूच्या अँटीबॉडीज् मिळाल्या आणि डेंग्यू होऊन गेला असं समजलं. त्यानंतर बरेच दिवस सकाळी उठल्यावर हात सुजायचे आणि हातानं काही काम व्हायचं नाही. बोटाचं पेर अन् पेर सुजायचं आणि दुखायचं. अक्षरश: हातावर हात घेऊ न बसायला लागायचं. तेव्हा लक्षात आलं, की हात किती महत्त्वाचे आहेत. आपल्या शरीराच्या बाबतीत तर आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो. प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. ज्या वेळी त्या अवयवाला काही इजा होते आणि तो अवयव काही काम करू शकत नाही, तेव्हा जाणवतं, की एक सुदृढ, सशक्त देह असणं किती महत्त्वाचं असतं. हे जाणवणं हा खरा आनंद! मग छोटय़ा छोटय़ा प्रसंगांनी दु:खी कशाला व्हायचं?

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ

असाच आणखी एक जीवनानंदाचा दुसरा अनुभव. करोनाचे दिवस होते. एक लाट येऊ न गेली होती आणि दुसरी येऊ  घातली होती. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत होतो. कुणाच्या घरी जाणं नाही की कुणाचं घरी येणं नाही. दुकान, भाजी हेसुद्धा अगदी कमी आणि त्यातूनही ‘होम डिलिव्हरी’. कुणाचाही संपर्क नव्हता. त्यादरम्यान अनेक तरुण आणि सशक्त लोक गेल्याच्या बातम्या येत होत्या. भीतीच्या कचाटय़ात सगळेच सापडले होते. ओळखीचे, जवळचे नातेवाईक, असे बरेच लोक गेले. अशातच एक दिवस महानगरपालिकेचे लोक अँटीजेन टेस्ट करायला आले आणि कौस्तुभला, माझ्या नवऱ्याला करोना पॉझिटिव्ह म्हणून घोषित केलं. आतापर्यंत न जाणवलेली भावना एकदम मनात घर करून गेली. अरे.. म्हणजे आता हे आपल्या घरापर्यंत आलं तर! नवऱ्यापासून लांब राहायला पाहिजे. पटापट मी त्याची बॅग भरली, भराभर त्याला जेवायला वाढलं आणि हॉस्पिटलमध्ये पिटाळलं. घर सॅनिटाइज करून घेतलं, पण मनातली भीती.. ती दबा धरून बसलेली होतीच. काय होईल त्याचं? मलाही झाला तर पुढे काय आणि कसं करायचं? कारण घरात ८५ वर्षांच्या सासूबाई होत्या. दोन दिवसातच ती भीती सत्यात उतरली. मलाही करोना झाला. पण तोपर्यंत मी फील्डिंग लावून ठेवली होती. दवाखान्यात जावं लागलं तर कुणाकडून काय मदत घ्यायची, कुणाला काय द्यायला सांगायचं.. कारण माझी तब्येत बाहेरच्या जेवणाला जुमानणारी नव्हती. जेव्हा करोनाचा ‘स्कोर’ बघून डॉक्टरांनी मला ‘होम क्वारंटाइन’ व्हायला सांगितलं तेव्हा अर्ध अधिक काम झालं म्हणून जीव भांडय़ात पडला. चार दिवसांनी वास येणं बंद झालं. त्या दिवसांत मी अक्षरश: गॅसवर होते. चौदा दिवस झाले आणि मी सुखरूप बाहेर पडले या आनंदात मी तरंगायला लागले. आणि पुढे दोन—तीन दिवसांनी मला खूपच अशक्तपणा जाणवायला लागला. तो जवळजवळ चार महिने टिकला. अशक्तपणा आत्मविश्वासाचं शून्यत्व घेऊ न आला. बाहेर पडायला, एकटीनं कुठे जायला भीती वाटायला लागली. स्कूटर, गाडी चालवणं तर दूरच! ‘आपलं आयुष्य आता काही फार नाही,’ अशीही नकारात्मक भावना मनात यायला लागली. कौस्तुभच्या सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांनी मनाला उभारी दिली त्यातून बाहेर पडायला मदत झाली. नकाराची जागा ऊर्जेनं घेतली. आपण फार मोठय़ा दिव्यातून पार पडल्याचा आनंद वाटायला लागला. मनात हळूहळू चेतनेचा दिवा तेवायला लागला.

या आशा निराशेच्या उंबरठय़ावर असतानाच दिवाळीच्या सुमारास माझ्या आईच्या कर्करोगाचं निदान झालं. अन्ननलिकेचा कर्करोग निघाला. वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षांपर्यंत कार्यरत असणारी माझी आई, तिला या रोगानं ग्रासावं याचे आश्चर्य वाटत राहिलं. निदान झाल्याच्या तिसऱ्या महिन्यात तिचं शारीरिक अस्तित्व संपून गेलं. प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य टिपणारी, नाजूक कलाकुसरीची आवड, जाण आणि कलाकारी असलेली, शक्य तितक्या सर्व बाबतींत स्वयंपूर्ण असणारी आई पाहाता पाहाता नजरेआड झाली. कोणतीही वेगळी, विचित्र लक्षणं दिसली नाहीत आणि एकदम मृत्यूचा परवानाच हाती आला. वडिलांच्या माघारी तिनं स्वत:चं असं जग निर्माण केलं होतं. त्यामध्ये ती छान रमायची. जीवन समाधानानं आणि परिपूर्णतेनं जगण्याकडे तिचा कल होता. सकाळचं फिरणं, नियमित वाचन, थोडा वेळ वामकुक्षी, थोडा वेळ टी.व्ही., यूटय़ूबवरचं संगीत, रेसिपीज, छोटय़ा टिप्स, नातेवाईकांशी गप्पा, बागेत काम करणं, अशा शिस्तबद्ध रीतीनं तिनं आयुष्याचा दिनक्रम आखला होता. प्रत्येक गोष्टीत मनापासून आनंद आणि मिळेल त्यात संतुष्टता मानणं, रसिकता हा तिचा स्वभावधर्म होता. कर्करोगाचं निदान झाल्यापासून ते तिच्या मृत्यूपर्यंतचा काळ झरकन संपला आणि वाटून गेलं की किती क्षणभंगुर आहे हे जीवन! आतापर्यंत माझं, माझं म्हणत माझं होतं ते कधी निसटून गेलं कळलंच नाही. प्रत्येक वस्तूत, गोष्टीत जीव गुंतलेला असतो. ज्या क्षणी आपलं अस्तित्व संपतं त्या क्षणी सगळं जग आपल्या दृष्टीनं संपतं आणि जगाच्या दृष्टीनं आपण!

निसटता क्षण किंवा निसटती वेळ म्हणजे काय हे मी करोनाच्या काळात अगदी जवळून अनुभवलं. जीवन आणि मरण यात असलेली अंधुक, धूसर रेषा म्हणजे काय, हे आतापर्यंत मी ऐकत आले होते. पण आईच्या मृत्यूच्या वेळी जेव्हा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला, तेव्हा जाणवलं, की वर्तमान क्षण किती महत्त्वाचा आहे. भूतकाळात रमणं आणि भविष्यकाळाच्या स्वप्नात जगणं हे निरर्थक आहे. आताचा हा क्षण जगणं आणि तोही आनंदानं हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. याहीपेक्षा भयंकर अनुभव, प्रचंड त्रास, यातना यामधून अनेकजण जातात. पण, थोडय़ा काळाच्या अंतरानं मला लागोपाठ आलेले हे अनुभव आयुष्यात मला बरेच काही शिकवून गेले. आहे हा क्षण आनंदात कसं जगायचं हे शिकवून गेले.                         

savitanabar@gmail.com