कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी भूल देणे अपरिहार्य असते. मात्र आता औषधाचे फवारे मारून, विनासुई ‘जेट’ इंजेक्शनं वापरून भूल दिली जाते. वेदनारहित प्रसूती हा तर नवा शोध. भूलशास्त्रालातील काही अभिनव तंत्रांची माहिती देणारा लेख-
अफू किंवा मद्याच्या अमलाखाली गुंगीत पडलेल्या रुग्णावर शस्त्र चालवण्याचे दिवस संपले आणि १६ ऑक्टोबर १८४६ या दिवशी बोस्टन येथे ईथर वापरून एका रुग्णाचा दात न दुखवता उपटण्याचा प्रयोग करण्यात आला. आधुनिक भूलशास्त्राची ही सुरुवात समजली जाते.
त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. नवनवीन औषधं आणि नवं तंत्रज्ञान पुढे विकसित होत गेलं आणि आज संमोहन ऊर्फ भूलशास्त्र ही वैद्यकाची एक महत्त्वाची शाखा समजली जाते, जिच्यामुळे कोणत्याही शस्त्रक्रिया डॉक्टर आणि रुग्ण, दोघांसाठी जास्त सोप्या होऊ लागल्या आहेत. भूल देण्यामागे बरेच उद्देश असतात. रुग्णाला मुळीच दुखता कामा नये, आपल्यावर शस्त्र चालवत आहेत याची जाणीवसुद्धा होऊ नये. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाचे स्नायू पूर्ण शिथिल पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे ही भूल रुग्णाच्या दृष्टीनं अगदी सुरक्षित हवी आणि काम झाल्यावर तिचा प्रभाव लगोलग नष्ट व्हावा.
ईथर आणि क्लोरोफॉर्म हे सुरुवातीचे भुलीचे वायू या कसोटय़ांना उतरले नाहीत. प्रचंड उलटय़ा, हृदय आणि यकृतावर विषारी परिणाम अशा कारणांमुळे त्यांचा वापर मागे पडला. एकीकडे संमोहनशास्त्राचा विकास चालू राहिला आणि ही कला अधिकाधिक शास्त्रशुद्ध, प्रगल्भ झाली आणि तिची तीन पायऱ्यांमध्ये विभागणी झाली.
 पहिली पायरी म्हणजे रुग्णाची शुद्ध हरपणे. बहुधा हे काम शिरेतून दिल्या जाणाऱ्या औषधाचं असतं. दुसरी पायरी म्हणजे संपूर्ण शस्त्रक्रिया चालू असताना बेशुद्धावस्था कायम राहाणे. हे काम वायुरूप भुलीच्या औषधांनी केलं जातं. यासाठी श्वासनलिकेत एक नळी घालून ती अ‍ॅनॅस्थेशिया मशीनला जोडतात आणि मशीनमधून ऑक्सिजन आणि भुलीचा वायू यांचं मिश्रण रुग्णाच्या श्वासनलिकेपर्यंत पोचवलं जातं. तिसरी पायरी म्हणजे शस्त्रक्रिया संपते, भूल उतरते, रुग्ण शुद्धीवर येऊन स्वत: श्वास घेऊ लागतो आणि श्वासनलिकेत घातलेली नळी काढून टाकली जाते.
पेंटोथाल या प्रभावी औषधानं पहिल्या पायरीचं काम सुमारे ५०-६० वर्षे अगदी चोख केलं. दुसऱ्या पायरीचं बेशुद्धावस्था चालू ठेवायचं काम हॅलाथेन आणि ट्रायलिन या वायुरूप औषधांनी केलं. ईथर-क्लोरोफॉर्मपेक्षा ही औषधं कितीतरी सुरक्षित होती. आता तर त्यांच्यापेक्षाही अधिक चांगली परिणामकारक औषधं वापरली जात आहेत. आजच्या जमान्यात भूल ही हवी तिथेच, हवी तितकीच, हवा तेवढाच वेळ दिली जाते. यामध्ये अतिशय नेमकेपणा (प्रिसिजन) आलेला आहे. पेंटोथालऐवजी आजकाल एक आश्चर्यकारक औषध वापरतात. त्याचं नाव प्रोपोफॉल. शिरेतून त्याचे थेंब जसे रुग्णाच्या शरीरात जाऊ लागतात तसा तो भाग अगदी बघता बघता जादू केल्यासारखा बेशुद्ध होतो. इन्फ्युजन पंप नावाच्या उपकरणातून प्रोपोकॉल सूक्ष्म मात्रेत संपूर्ण शस्त्रक्रिया संपेपर्यंत चालू ठेवता येतं आणि शस्त्रक्रिया संपल्यावर शांतपणे झोपलेला रुग्ण एकदम ताजातवाना, सावध होतो. डोक्यात कसलाही गोंधळ, भरकटणं, गरगरणं नाही. उलटी नाही. जिभेला जडपण नाही. विचार एकदम स्पष्ट आणि नेहमीसारखं बोलायला सुरुवात. फक्त मधल्या काळात काय घडून गेलं याचा पत्ता नसतो. मोडलेलं हाड जोडणे, क्युरेटिंग, मनोरोग्यांना विद्युत उपचार अशा छोटय़ा गोष्टींसाठी प्रोपोफॉल पुरेसं असतं, किंवा मोठय़ा शस्त्रक्रिया करत असताना मुख्य औषधाला मदत म्हणूनही ते वापरता येतं. एकच दोष म्हणजे कमकुवत हृदयाच्या रुग्णांसाठी ते वापरता येत नाही. हृदयरोग्यांना चालतील अशी दुसरीही औषधं आता आली आहेत. अर्थात अधिक महागडी.
प्रीमेडिकेशन म्हणजे शस्त्रक्रियेच्या आधी दिली जाणारी औषधं हा भूलशास्त्राचाच एक भाग आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला नेण्यापूर्वीच थोडं गुंगीचं औषधही देतात. त्यामुळे प्रत्यक्ष थिएटरमध्ये आणताना रुग्ण शांत, स्वस्थ असतो, पूर्ण सहकार्य करतो. साहजिकच शस्त्रक्रिया सुरळीत, निर्विघ्नपणे पार पडते. शस्त्रक्रियेचा रुग्ण आधीच प्रचंड घाबरलेला असेल, तर काय करणार? अशा रुग्णाला कमरेच्या स्नायूमध्ये केटॅमिनसारखं इंजेक्शन देतात. काही मिनिटांत त्याला गुंगी येते. त्यानंतर ऑपरेशन टेबलवर निजवून त्याला पुढची भूल दिली जाते.
 रुग्णाला बरेच आजार असतील तर भूलतज्ज्ञ आधीच त्याची तपासणी करून त्याच्यासाठी अनुरूप औषधांचं नियोजन करतो. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत होऊ नये म्हणून भूलतज्ज्ञाला अतिशय सतर्क राहावं लागतं, कारण सर्जन तर त्याच्या कामात मग्न असतो. सध्याच्या अत्याधुनिक थिएटरमध्ये रुग्णाचा रक्तदाब, नाडीचे ठोके, हृदयाचा आलेख, रक्तातील ऑक्सिजन व इतर वायूंचे प्रमाण अशा अनेक गोष्टी मॉनिटरवर सतत दिसत असतात. त्यामुळे भूलतज्ज्ञ एकटा असला तरी या माहितीच्या आधारे कोणत्याही क्षणी योग्य ती कृती करून संकट टाळू शकतो.
आता आपण भूलशास्त्रातली काही अभिनव तंत्र पाहू या. मेंदूच्या शस्त्रक्रिया मोठय़ा वैशिष्टय़पूर्ण असतात. नाजूक, सूक्ष्म, कौशल्यपूर्ण मुख्य म्हणजे रुग्ण जागृतावस्थेत हवा. मेंदूच्या विशिष्ट भागाला सर्जननी चेतावणी दिली की रुग्णानं त्याला प्रतिसाद द्यायला हवा. यात तो घाबरताही कामा नये, त्याला वेदनाही होऊ नयेत. यासाठी फेन्टॅतील आणि ड्रोपेरिडॉल अशा औषधांचं मिश्रण वापरून हा परिणाम साधला जातो, याला म्हणतात कॉन्शस अ‍ॅनाल्जेसिया. गळा आणि मानेच्या शस्त्रक्रिया मुळात करायला अवघड. त्यात श्वासनलिकेत नळी असल्यामुळे सर्जनला तो भाग दिसणार कसा? यासाठी एका अगदी लहान नळीतून ‘हाय फ्रीक्वेन्सी जेट व्हेंटिलेशन’ तंत्राचा वापर करून सेकंदाला सुमारे तीस मि.ली. भुलीचं औषध आणि ऑक्सिजन दिला जातो. यामुळे रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि सर्जनला आपलं हस्तकौशल्य दाखवायला वाव. या तंत्रामुळे स्वरयंत्राचा कर्करोग, मानेच्या मणक्याचा अस्थिभंग,  केलेले वार अशा कित्येक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत.  विशिष्ट शरीररचनेमुळे काही रुग्णांच्या श्वासनलिकेत नळी घालणं अशक्य होऊन बसतं. अशा वेळी घशात स्वरयंत्रावर जाऊन बसेल असा मास्क घालतात आणि त्यातूनच भूल दिली जाते. लहानसहान शस्त्रक्रियांसठी हे तंत्र सोयीस्कर पडतं. वॉर्डमध्ये हृदय किंवा श्वसन बंद पडलेल्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठीसुद्धा हा ‘लॅरिंजियल मास्क’ कामी येतो.
 हात, पाय, खांदे, गुडघे यांच्या शस्त्रक्रिया आज सरसकट ‘रिजनल ब्लॉक’ देऊन करतात. त्या त्या अवयवाच्या संवेदना आणि स्नायूंची हालचाल यावर नियंत्रण ठेवणारी मुख्य नस बधिर केली जाते. पूर्वी हे काम अंदाजानं केलं जाई. भूलतज्ज्ञाचं शरीररचनेचं ज्ञान कसोटीला लागे. त्यात चुका होत. आता ‘नव्र्ह स्टिम्युलेटर’ हे विद्युत उपकरण किंवा अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीनं त्या नसचा अचूक ठावठिकाणा काढून तिथेच ते इंजेक्शन दिलं जातं.
    हाडांच्या शस्त्रक्रिया इतरही अनेक मोठय़ा शस्त्रक्रियांच्या नंतर रुग्णाला काही दिवस अतोनात वेदना होतात. यामुळे त्याच्या शरीरप्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. तो लवकर बरा होत नाही. यासाठी आता ‘एपिडय़ूरल’ची मदत घेतली जाते. पाठीच्या मणक्यात मज्जारज्जूच्या बाहेरच्या आवरणात एक नळी ठेवली जाते. तिच्यामधून ऑपरेशननंतर तीन-चार दिवसही वेदनाशामक औषधाचा डोस ठरावीक वेळाने देतात. रुग्णाला लक्षणीय आराम मिळतो. तो तातडीने आवश्यक त्या हालचाली, फिजिओथेरपीचे व्यायाम करायला लागतो.
औषधाचे फवारे मारूनही भूल देतात. दुर्बिणीतून तपासणी (ब्राँकोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी) करताना आधी फवारा मारून तोंडाचा आतला भाग बधिर करतात. दातांचं काम करताना हिरडीत इंजेक्शन द्यायचे ही जुनी गोष्ट. आता ‘जेट’ इंजेक्शनं आली आहेत, सुईविना इंजेक्शन देता येतं. नाकाची शस्त्रक्रिया करताना आधी नाकपुडीत बधिर करणाऱ्या औषधात भिजवलेली गॉझटेप पॅक करून मग काम करतात.
वेदनारहित प्रसूती हा भूलशास्त्राचा नवा अवतार गेल्या पाच वर्षांत खूपच प्रचलित आणि लोकप्रिय झाला आहे. वर वर्णन केल्याप्रमाणे ‘एपिडय़ूरल’ नळीतून फेंटॅनील आणि बधिर करणाऱ्या औषधाचे अगदी लहान लहान डोस थोडय़ा थोडय़ा वेळाने दिले जातात. यामुळे प्रसूती वेदना नाहीशी होते, पण स्नायू कार्यक्षमच राहतात. याला ‘वॉकिंग अॅनालजेसिया’ म्हणतात. अशा प्रकारे नैसर्गिक प्रसूतीची वेदना दूर करून स्त्रीच्या आयुष्यातली ही अत्यंत आनंदाची घटका भूलशास्त्रानं अविस्मरणीय केली आहे.
भूलशास्त्रातील सातत्यानं चाललेल्या आश्चर्यकारक प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही आता यशस्वी होऊ लागल्या आहेत. म्हणूनच आता असं म्हणायला हरकत नाही की आज प्रत्येक यशस्वी सर्जनमागे एक कुशल भूलतज्ज्ञ असतो.   
डॉ. लीली जोशी -drlilyjoshi@gmail.com
(या लेखासाठी विशेष साहाय्य) ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. मीरा मुळे,
 डॉ. राजीव गरुड

upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप