० स्वयंपाकघरामध्ये कॅलेंडर आवर्जून ठेवा, ज्यामुळे तिथीनुसार दिवस कळेल. कुणाचा वाढदिवस, सण, समारंभ, लग्नकार्य याची नोंद तारखेनुसार घेता येईल आणि त्याप्रमाणे महिन्याच्या कामाचे नियोजन करता येईल.
० स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तूंची मांडणी आणि रचना अशी असावी की ओटय़ापाशी उभे असताना भांडी, चहा-साखर, मीठ, पीठ, मसाले, फोडणीचे साहित्य किंवा सतत लागणारे सामान एकाच ठिकाणी उभे राहून आपल्याला घेता येईल. मिक्सर ग्राइंडर, ब्लेंडर, ओव्हन यांच्याही जागा ठरवून घ्याव्यात, म्हणजे उगाचच इकडे-तिकडे करत दमणूक होण्यापेक्षा हालचाल कमी होऊन काम लवकर होईल.
० कामांचा योग्य क्रम ठरवून वेळापत्रक तयार करा. वेळ वाया घालवू न देता आपल्या हातात असलेल्या वेळेचा उपयोग करा. फोनवर बोलत असल्यास बोलता बोलता मोकळ्या असलेल्या हाताने डायनिंग टेबल, किचन ओटा, अस्ताव्यस्त असलेले सामान आवरता येईल, टी.व्ही. बघता बघता कपडय़ाच्या घडय़ा करणे, भाजी नीट करणे, ऑफिसला जाणाऱ्या असलात तर दुसऱ्या दिवशीची तयारी करणे म्हणजे कपडे, अ‍ॅक्सेसरी, फाइल्स, नोटस् काढून ठेवणे, इ. कामे करता येतील.
० आदल्या दिवशी सकाळपासून करायच्या कामांची यादी तयार करून प्राथमिकतेने कोणते काम करायचे हे ठरवून घ्या. ऑफिसमध्ये जात असाल तर तेथे गेल्यावर आधी कोणते काम करायचे हेही ठरवून ठेवा. यादी तयार केली की त्या हिशोबाने कामाची आखणी करता येईल.
० माझ्याशिवाय हे काम कोणी व्यवस्थित करू शकणार नाही असे म्हणत प्रत्येक काम आपल्याकडे ओढून घेऊ नका. घरातील कामात घरातील सर्वाना सहभागी करून घ्या. मुलांना त्यांच्या वस्तू योग्य जागेवर ठेवण्यास सांगणे, प्रत्येकाने आपले बूट, चपला शूरॅकमध्ये ठेवायची सवय लावणे, नाश्ता किंवा जेवणाच्या वेळी पाण्याचे ग्लास भरणे, पदार्थ टेबलावर आणून ठेवणे, खाऊन झाल्यावर भांडी बेसिनमध्ये ठेवणे ही कामे वाटून द्या, म्हणजे तुमच्यावर सगळा भार पडणार नाही.
० घरातील सगळी बिले भरण्याचा एक दिवस नक्की करा. ऑनलाइन बिले भरण्याचा पर्यायही वापरता येईल.
० घरातील कपाटे साफ करणे, आणलेले वाणसामान भरून ठेवणे, डबे साफ करणे, बाथरूम आणि टॉयलेटची सफाई, चादरी-पडदे बदलणे, ते धुणे या सर्वासाठी एक एक दिवस राखून ठेवा म्हणजे एकाच दिवशी सगळा भार
पडणार नाही.
० महिन्याचे बजेट तयार करून घरात असलेल्या वस्तू सोडून गरजेपुरते सामान भरा. सामान भरताना मॉलमधून घेण्यापेक्षा होलसेल मार्केटमधून खरेदी केल्यास स्वस्त व चांगल्या प्रतीचा माल मिळेल.
० घरात साचलेले रद्दीसामान, कपडे, चपला, बाटल्या, पेपर वेळच्या वेळी काढून टाका. म्हणजे घरातील जागाही अडणार नाही आणि पाल, झुरळ, मुंग्या यांचाही त्रास होणार नाही.
० आपल्या कामाचा आणि दमणुकीचा राग घरातील सदस्यांवर काढू नका. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आवडी-निवडीची दखल घ्या. मुलांसाठी वेळ देणे, त्यांना संस्कार देणे, त्यांचा अभ्यास याकडे लक्ष द्या. सुटीच्या दिवशी फिरायला जाणे, सिनेमा पाहणे, नाटक पाहणे, हॉटेलिंग यांसारखे वेगळे प्लॅनिंग करा. नात्यातला ताजेपणा टिकवून ठेवा.
संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House management
First published on: 31-10-2015 at 00:30 IST