scorecardresearch

छोटय़ांच्या मोठय़ा गोष्टी

माणसाची बुद्धी म्हणजे नेमकं काय? मेंदूचा व्यवहार ही एक फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.

|| प्रतिमा कुलकर्णी

माणसाची बुद्धी म्हणजे नेमकं काय? मेंदूचा व्यवहार ही एक फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. जंगलात राहणारा, शिकार करणारा मानव आज विकासाच्या अतिप्रगत टप्प्यावर येऊन पोचला आहे, ते त्याच्या बुद्धीच्या जोरावर. बुद्धी नेमकी कशी येते, कशी विकसित होते, याला काही नियम, निकष आहेत का.. हे मला माहीत नाही. पण मला एक नक्की माहिती आहे की वय, शिक्षण, स्टेट्स या सगळ्याचा तिच्याशी काही संबंध नाही!

विज्ञानाला संपूर्ण वेगळी दिशा देणारे अल्बर्ट आइनस्टाइन यांना त्यांच्या बुद्धीबद्दल विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, मी बुद्धिमान नाही, फक्त अतोनात चौकस आहे. हे आइनस्टाइन वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत अडखळत बोलायचे, एकेक वाक्य बोलायला खूप वेळ घ्यायचे. कदाचित त्या काळात त्यांच्या मेंदूत खूप व्यामिश्र व्यवहार चालत असावा. सगळ्यांना वाटत असे की ते मंदबुद्धी आहेत. पण वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांना कंपास दाखवला आणि त्यांनी पाहिलं की कंपास कसाही धरला तरी त्याचा काटा उत्तरेकडेच जातो. तेव्हा ते म्हणाले की ज्या अर्थी काटा कायम उत्तरेकडेच जातो त्या अर्थी उत्तर दिशेच्या ‘अवकाशामध्ये’ असं काहीतरी आहे की ते त्या काटय़ाला तिथे खेचून घेतं.. ज्या पाच वर्षांच्या मुलाला शाळेचा अभ्यास नीट समजू शकत नव्हता त्याला त्या छोटय़ा वयात कुणीही न सांगता एक वैश्विक सत्य उमगलं होतं.

विनोबा भावे यांच्याही लहानपणीची एक सुंदर गोष्ट आहे. ते साधारण ७-८ वर्षांचे असताना त्यांच्या आईने देवाला एक लाख तांदळाचे दाणे वाहण्याचा संकल्प केला. त्या देवासमोर बसून तांदूळ वाहतायत हे विनोबांच्या वडिलांनी पाहिलं. ते म्हणाले, तू असे किती दाणे मोजत बसणार? त्यापेक्षा असं कर- एक शेराचं माप घे, त्यात किती दाणे राहतात ते बघ. त्याप्रमाणे हिशेब कर आणि तेवढी मापटी वहा म्हणजे झालं. आई ‘हो’ म्हणाली, पण त्यात काहीतरी चुकतंय असं मात्र त्यांना वाटलं. त्यांनी लहान विनोबांना म्हटलं की, मला यात काहीतरी चूक आहे असं वाटतंय पण काय ते कळत नाही आहे. त्या लहान वयातही विनोबा म्हणाले की, ‘‘आई, देवाला तुझे तांदूळ नकोयत. पण तू भक्तिभावानं त्याचं नाव घेत एक एक दाणा वाहताना तुझ्यात जो बदल होईल तो त्याला हवा आहे.’’

आइनस्टाइन काय किंवा विनोबा काय, ही मोठीच व्यक्तिमत्त्वं होती. उपजतच प्रतिभेचं देणं घेऊन आलेली. पण अजून ज्याचं मोठेपण सिद्ध झालेलं नाही, ज्याचं विधिलिखित जीवितकार्य स्पष्ट झालेलं नाही, अशा काही मुलांच्या या गोष्टी..

सृजन प्रभुदेसाई-आत्ताचं वय १२. जी घटना मी सांगणार आहे त्या वेळचं वय साधारण अडीच. सृजनची आई श्रृजा प्रभुदेसाई- आपण तिला नाटक आणि मालिकांमधून बघतो आणि वडील संतोष. त्याचं सर्व कुटुंब शाकाहारी आहे, शिवाय सृजन लहानपणापासून प्राणी-प्रेमी पण आहे. एखादं लहान मूल जसं शेजारी-पाजारी जातं, लाड करून घेतं, तसाच तोही जातो. त्याच्या शेजारचं कुटुंब मांसाहारी आहे. एकदा सृजन त्यांच्या घरी गेला आणि त्या मावशीला म्हणाला, ‘‘तू कोंबडी खाऊ नकोस, तिला लागतं.’’ त्या लहान वयातही सृजनच्या बुद्धीची चुणूक मावशीला दिसत होती. तो काय म्हणतोय ते बघण्यासाठी ती त्याला म्हणाली, ‘‘तू भाजी खातोस, मग भाजीला नाही का लागत?’’ – लाखो लोकांना पेचात टाकणारा आणि उत्तर न सुचलेला हा प्रश्न.. सृजनने काही क्षण विचार केला आणि म्हणाला, ‘‘भाजी तू एके ठिकाणी ठेवलीस तर दुसरीकडे जाऊ शकत नाही, पण कोंबडी जाऊ शकते..’’ इतक्या लहान वयात विचारांची इतकी सुस्पष्टता? मी ही गोष्ट ऐकली तेव्हा विस्मयचकित झाले होते. त्याच्या सुदैवाने त्याला आई-वडीलही असे मिळालेत की ते त्याला प्रश्न विचारायला वाव देतात, त्याच्याशी एक ‘व्यक्ती’ म्हणून वागतात. आज सृजन बारा वर्षांचा आहे, मोठा झाल्यावर तो काय करतोय हे पाहण्यासारखं असेल.

ही गोष्ट मला एवढी महत्त्वाची का वाटली? आमच्या तरुणपणी वेगळ्याच गोष्टींना बुद्धी मानलं जात असे. त्या वेळी ‘इंटलेक्चुअल’ या शब्दाला फार महत्त्व होतं. अशा या इंटलेक्चुअल लोकांचा अगदी दबदबा असे. मी आणि माझ्यासारख्या अभ्यासात ‘ढ’ मुली या लोकांमुळे दबून जात असू. पुढे अनेक वर्ष गेल्यावर माझ्या लक्षात आलं की ‘इंटलेक्चुअल’ आणि ‘इंटेलिजंट’ या दोन पूर्णपणे स्वतंत्र गोष्टी आहेत!

असाच एक मुलगा बबलू. त्याचं खरं नाव मला माहीत नाही पण आम्ही त्याला बबलू म्हणायचो. आमच्या मालिकांचं संकलन ज्या स्टुडिओत चालायचं तिथे काम करणाऱ्या एका टेक्निशियनचा पुतण्या. ओरिसातल्या एका गावाहून मुंबईत आला आणि स्टुडिओत आपल्या काकाला मदत म्हणून काम करायला लागला. काम म्हणजे पडेल ते काम!

आमच्या मालिकांचं संकलन करायची भक्ती मायाळू. तिच्या कामाचा व्याप वाढला तेव्हा तिच्या मदतीला म्हणून आम्ही एक तरुण संकलक आणला. तो १-२ दिवस आमच्याबरोबर राहिला, आमचं काम पाहिलं. आणि मग त्याने ‘झोका’ मालिकेचा एक सीन आमच्या गैरहजेरीत एडिट केला. बबलू ते सगळं बघत होता. सीन करून झाल्यावर बबलू म्हणाला, ‘‘तुम्ही हा सीन छान केलात, पण भक्ती मॅम असं करत नाहीत!’’

भक्तीचा ‘हात’ अतिशय मुलायम आहे, शिवाय तिचे माझे सूर जुळलेले आहेत. आमच्या संकलनाची एक पद्धत होती. बोलणाऱ्या माणसाचं बोलणं संपलं की लगेच पुढचा माणूस बोलायला लागत नाही. काही क्षण मध्ये जातात. जसं एखादी घंटा वाजून गेली, तिचा नाद विरला, तरी आसमंतात त्या नादाची कंपनं शिल्लक राहतात. विजयाबाई मेहता याला ‘आस’ म्हणतात. तशी ‘आस’ राहीपर्यंत भक्ती कधी तो शॉट कापायची नाही. या नव्या मुलाने गिलोटिन चालवावं तसे शॉट्स कापले होते. तांत्रिकदृष्टय़ा त्याचं काही चुकलं नव्हतं. जर पेस-वेग- हा एकच निकष लावला तर त्याच्या संकलनाचं कौतुकही झालं असतं कदाचित. पण मग तो सीन प्रेक्षकांच्या मनात उतरला नसता. हा फरक फार सूक्ष्म आहे. तो सूक्ष्म फरक न समजणं हा गुन्हा नाही, पण समजणं हे कौतुकास पात्र आहे. संकलन शिकलेल्या मुलाला दोन दिवस आमच्या सोबत राहूनही ते लक्षात आलं नव्हतं. पण गावाहून आलेला बबलू, जो कधीतरी येता-जाता भक्तीचं काम बघायचा, नंतर एडिट झालेले ते सीन वेगळ्या टेपवर ट्रान्स्फर करायचा, तो त्याला म्हणाला, ‘‘भक्तिमॅम ऐसा नाही काटती है!’’ बबलू पुढे उत्तम संकलक बनून ग्राफिक्समध्ये काम करायला लागला!

एक घटना मात्र अशी आहे की त्या मुलीच्या विचारांच्या स्पष्टतेबद्दल तिचं कौतुक वाटायच्या ऐवजी काळजीच जास्त वाटली. बसमधून जात असताना समोरच्या बाकावर दोन मुली बसल्या होत्या. बहुतेक घरकाम करणाऱ्या असाव्यात. कपडे, दागिने असं बोलणं चाललेलं असताना एकीने दुसरीला विचारलं- ‘‘तू मंगळसूत्र नाही घातलंस?’’ ती म्हणाली मला कंटाळा येतो. त्या उत्तराने मैत्रिणीला धक्का बसला पण त्यातून ती सावरेपर्यंत उत्तर आलं- ‘‘कधी कधी मला नवऱ्याचाही कंटाळा येतो..’’

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लाइफ इज ब्युटिफुल ( Life-is-beautiful ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kathakathan by pratima kulkarni in loksatta chaturang

ताज्या बातम्या