काही कारणांनी लग्न न होणं, न करणं किंवा इतर कारणांमुळे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यांवर जोडीदाराची संगत न लाभणं त्या व्यक्तीसाठी एकटेपण देणारंच ठरत असतं. वर वर पाहता ‘ऑल इज वेल’चा मुखवटा पांघरला, तरी कातरवेळी जवळच्या, आपल्या माणसाची साथ हवीहवीशी वाटते. कोंडमारा करणाऱ्या या एकटेपणाला डोळसपणे भिडावं लागेल…

बालपण सरलं की किशोरावस्था सुरू होते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांपैकी किशोरावस्थेबद्दल माणसाला सगळ्यात जास्त आकर्षण असतं. शरीरात होणारे बदल सोडता, या वयात विरुद्धलिंगी व्यक्तीचं नव्यानं वाटणारं आकर्षण हेही त्यामागचं एक कारण असू शकतं. जोडीदार असण्याचं महत्त्व या वयापासून जे सुरू होतं, ते पार मरेपर्यंत टिकून राहतं. बाकीच्या नात्यांपेक्षा सर्वांत जास्त काळ जोडीदारच आपल्याबरोबर राहतो. म्हणूनच तर त्याला जीवनसाथी म्हटलं जात असावं. या जोडीदाराच्या असण्या-नसण्याचा व्यक्तीच्या आयुष्याच्या एकटेपणावर परिणाम होतोच.

children rejection of marriage marathi article
इतिश्री : मुलांचा लग्नाला नकार?
loksatta chaturang love boyfriend girlfriend chatting flirting College
सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!
Rural Medical Center, transfer a organization from old to new generation, daughter in law, mother in law,
सांधा बदलताना : हस्तांतरण..
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
international mother s day marathi news
स्त्री ‘वि’श्व: मातृत्वाचे कंगोरे
my friend article by vinod muley about his beautiful friendship
माझी मैत्रीण: ‘या, स्वागत हैं, वेलकम!’
Heart-touching Letters to Son from father
Photo: “प्रेम ही एक क्षणिक भावना” प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र; नक्की वाचा

हेही वाचा…पाळी सुरूच झाली नाही तर?

जसजशी किशोरावस्था सरते, तसतशा मित्रमैत्रिणी मागे पडतात. ‘हम आपके हैं कौन?’मध्ये माधुरी दीक्षितवर चित्रित असलेल्या एका गाण्यात या किशोरावस्थेचं वर्णन किती अचूक केलंय! ती स्वत:त होत असलेल्या बदलांची नोंद घेत विचारते, ‘ये कौनसा मोड हैं उम्रका?’ या वळणावर जुन्या मित्रमैत्रिणी, छंद, करिअर, या सगळ्यापेक्षा महत्त्वाच्या अशा जोडीदाराची मन वाट पाहायला लागतं. ज्यांना हा जोडीदार मिळतो, त्यांचे हात एकदम आकाशाला टेकतात. त्याच्याकडून वा तिच्याकडून मिळणाऱ्या महत्त्वामुळे, होणाऱ्या स्तुतीमुळे मुलामुलींचा आत्मविश्वास वाढतो. आपण कोणीतरी खास आहोत, ही भावना वाढीस लागते. त्याच्याविरुद्ध ज्यांना कोणी तरी जोडीदार मिळत नाही, त्यांना ‘आपल्यात काय कमी आहे, म्हणून आपल्याला कोणीच पसंत केलं नाही,’ असं वाटत राहतं. कितीही मित्र-मैत्रिणी, कुटुंबातल्या व्यक्ती बरोबर असल्या, तरी जोडीदाराअभावी येणारं एकटेपण खूप त्रासदायक असतं.

शरयू चार भावंडांतली मोठी बहीण. तिच्या विसाव्या वर्षी वडील वारले आणि घरातली सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. आईला साथ देत तिनं लगेच एक नोकरी सुरू केली. जसजसा काळ पुढे जात होता, तसतशा शरयूच्या मैत्रिणींचे साखरपुडे, लग्नं, बाळंतपणं होत गेली. चार भावंडांना मार्गी लावता लावता तिनं पस्तिशी ओलांडली. योग्य वयात लग्न व्हायला पाहिजे म्हणून तिच्या पाठच्या भावंडांच्या लग्नांची लगबग सुरू झाली. खरंतर जबाबदारीतून पार पडल्यावर तिलाही तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार हवा होता. पण भावंडांची लग्नं करायच्या नादात तिच्या लग्नाचा विचार कुणाच्याच मनात आला नाही. सगळ्या भावंडांची लग्नं झाल्यावर ‘आपण त्यांच्या संसारात अडथळा बनू’, ‘आई किती दिवस पुरेल?’, ‘आपण पूर्णपणे एकटे पडू’, अशी भीती तिला सतत वाटायची. जरी शरयू बाकीच्या भावंडांच्या संसारात खूश असू शकली असती, तरी जोडीदाराच्या अभावी येणाऱ्या एकटेपणाची झालर त्या खुशीला होतीच. अशा जोडीदार न मिळालेल्या कितीतरी शरयू आपल्या आजूबाजूला दिसतील. जबाबदारीमुळे, पत्रिकेमुळे, शारीरिक व्यंगामुळे, शिक्षण, करिअर, अशा विविध गोष्टींमुळे जोडीदार न मिळणं, पर्यायानं लग्न लांबणीवर पडणं, हे घडतं. आयुष्याच्या ज्या टप्प्यावर जोडीदाराचं सर्वांत जास्त महत्त्व असतं, त्या टप्प्यावर तो नसला तर एकटेपणा तर येणारच ना!

हेही वाचा…‘शुभंकर’ रुग्णांचा आधार!

कीर्ति जेमतेम ३५-३६ वर्षांची. तिच्या नवऱ्याचं-राकेशचं अपघाती निधन झालं. त्यांना १२ वर्षांचा मुलगा होता. राकेशचं स्थान तिला कोणालाच द्यायचं नव्हतं. सासर, माहेर सगळे गावाकडे. शहरात तिला मुलाच्या शाळेपासून ते नोकरी, घर, बाहेरचे व्यवहार सगळे सांभाळायचे होते. नाही म्हणायला ऑनलाइन व्यवहारांनी तिची कामं सोपी केली होती. पण इतकी वर्षं त्यांच्या त्रिकोणी कुटुंबानं खूप सुखाचे दिवस पाहिले होते, त्यामुळे आता हे सगळं एकटीनं खेचताना तिची खूप तारांबळ उडत होती. शारीरिक गरजांपलीकडेही राकेशचा एक भक्कम मानसिक आधार होता तिला. ऑफिसमधला किंवा इतर कोणताही त्रास घरातल्या मोठ्यांना सांगावा, तर त्यांना त्यातले छक्केपंजे कळतीलच असं नाही. शिवाय आजच्या काळातले सगळे संदर्भ त्यांना समजू शकत नाहीत. ते सहानुभूतीनं ऐकून घेतील खरं, पण सल्ला किंवा उपाय देऊ शकत नाहीत. उलट विनाकारण त्यांना त्रास कशाला, म्हणून कीर्ति आपल्या अडचणी त्यांना सांगायची नाही. मुलाला सारखी बाबांची आठवण येऊ नये, त्याला त्रास होऊ नये, म्हणून ती चेहऱ्यावर आनंदी मुखवटा लावून वावरायची. सगळ्यांना ‘ऑल इज वेल’ दाखवण्याच्या नादात ती तिचं दु:ख एकटीच सहन करत होती.

पूर्वी लग्नाच्या वेळी मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वयातलं अंतर जास्त असायचं. तेव्हा त्या नात्यांमध्ये आदर, भीती, या भावना असायच्या. स्त्रियांचं जोडीदारावर अवलंबून राहणं जास्त असायचं. आताच्या लग्नांमध्ये जोडप्यातलं वयाचं अंतर कमी असतं. त्यामुळे आधीची आदर, भीतीची जागा आता मैत्रीच्या नात्यानं घेतली आहे. बाहेर झालेले अपमान, दु:ख, नाकारलं जाणं, सगळं बिनदिक्कत कुणाला सांगू शकत असू, तर तो जोडीदारच असतो. मित्रपरिवार असतो, पण कुटुंब आणि लग्नव्यवस्थेनं तुम्हा दोघांना रोजच्या आयुष्यात एकत्र बांधलेलं असतं. बाकी कोणापेक्षाही जोडीदार वेळेला उपस्थित असतो. दुसरं म्हणजे तुमची शक्तिस्थानं, कमकुवत स्थानं, स्वप्नं, जोडीदाराला नक्कीच माहीत असतात. त्यामुळे त्याचा पाठिंबा कधीही जास्त अर्थपूर्ण असतो. तुमच्या कुटुंबातल्या मर्यादा आणि आतापर्यंत आयुष्यात झालेल्या गोष्टी एकवेळ पालकांना माहीत नसतात, पण जोडीदाराला नक्की माहीत असतात. दुसरं कोणी मदतीला, समजून घ्यायला येवो न येवो, जोडीदार हक्काचं ठिकाण असतं. अशा जोडीदाराच्या जाण्यानं ही ‘सपोर्ट सिस्टीम’ संपून जाते आणि मागे राहिलेल्या जोडीदाराला एकटेपणा देऊन जाते.

हेही वाचा…सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!

जोडीदाराची अनुपस्थिती किंवा त्यांचं नसणं, यात कदाचित कोणी काही करू शकत नाही. पण तो असूनही सोबत नसेल, तर येणाऱ्या एकटेपणाला दूर करणं कुणाच्या हातात असतं? मला रामायणातले उर्मिला-लक्ष्मण याप्रसंगी आठवतात. उर्मिलाच्या एकटेपणाबद्दल अनेकदा बोललं तरी जातं, पण लक्ष्मणाचा एकटेपणा दुर्लक्षितच राहतो. भावाप्रतीचं कर्तव्य म्हणून लक्ष्मण जसा लांब वनवासात गेला, तसं आजच्या युगातही कुटुंबाप्रतीचं कर्तव्य म्हणून किती तरी लक्ष्मण जोडीदाराला सोडून कामाच्या ठिकाणी निघून जातात. त्यात परप्रांतातून किंवा वेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या शहरात आलेल्या कामगारांपासून ते परदेशी नोकऱ्यांसाठी गेलेल्या मंडळींपर्यंत सगळेच येतात. पुरुषालाही जोडीदाराची भावनिक साथ गरजेची असतेच. मनुष्यप्राण्यांसहित सर्व प्राणिमात्रांमध्ये जोडीदाराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जोडीदार आहे, तो जिवंतही आहे, तरी तो वर्षांनुवर्षं वेगळा राहणार, या गोष्टीचा कितीही कंटाळा येत असला, तरी कर्तव्यापोटी ते तसंच खेचत राहावं लागतं. भरपूर पैसा कमावूनही जोडीदार सोबत नसण्याचं दु:ख, त्यातून येणारा एकटेपणा अशा जोडप्यांना असहाय्य करतो. कर्तव्य आणि भावना यांत कर्तव्य जिंकतं, तेव्हा ते एकटेपणा घेऊन येतं .

आणखी एका प्रसंगात जोडीदाराचा वियोग होतो – घटस्फोट. वाढत्या मतभेदांना कंटाळून जोडपं जेव्हा घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येतं, तेव्हा पुढच्या आयुष्यात (पुनर्विवाह झाला नाही तर) एकटेपणा येणार हे निश्चितच असतं. मतभेदांच्या, भांडणांच्या कटकटीपेक्षा घटस्फोटामुळे मिळणारं स्वातंत्र्य सुरुवातीच्या काळात सुखावून जातही असेल, पण नंतर तो एकटेपणा जाणवल्याशिवाय राहात नाही.

हेही वाचा…मनातलं कागदावर : रंगीत जादूचा खेळ!

वरच्या सगळ्या परिस्थितीत एक तर जोडीदारच नाही किंवा शारीरिकरीत्या तो सोबत नाही किंवा विभक्त झालेला आहे. पण आणखी एका परिस्थितीत जोडीदारावर प्रेम आहे, ते एकत्र आहेत, त्यांच्यात मतभेदही नाहीत, पण तरीही एकटेपणा आहे, असंही काहींच्या बाबतीत होतं. नवरा आहे, पण तो स्वत:च्या कामात किंवा स्वत:च्या विश्वात हरवलेला आहे. बऱ्याचदा व्यसनाधीनता ही समोरच्या जोडीदाराच्या एकटेपणाला कारणीभूत असते. दारूचं व्यसन असणाऱ्या नवऱ्याच्या बायकोला खमकं बनून एकटीला संसार हाकावा लागतो, याची कैक उदाहरणं आपल्याच आजूबाजूला दिसतात.

करोनानंतरच्या काळात या नात्यातल्या एकटेपणाला कारणीभूत एक तळहाताएवढा पिटुकला खलनायकही आला आहे- मोबाईल. कित्येक जोडप्यांच्या नात्याला हा मोबाईल कमकुवत करत असल्याचं विवाह समुपदेशन करताना दिसून येतं. यात नवरा की बायको, असा भेदभाव नाही. स्क्रीनचं व्यसन कोणालाही लागत आहे आणि ते दारूच्या व्यसनासारखं दिवसातल्या एका वेळेपुरतं मर्यादित नाही. अनेकदा मोबाईलच्या नादात आपल्या जोडीदाराचा एकटेपणा आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. परिस्थितीनुसार अपरिहार्य कारणांमधला एकटेपणा दूर करणं आपल्या हातात नसेल कदाचित, पण जो सोबत आहे त्याची काळजी घेणं, त्याला वेळ देणं आणि प्रेम देणं, हे तर आपल्या हातात निश्चित आहे.

हेही वाचा…माझी मैत्रीण’ : सुमी!

पालकांच्या आयुष्याच्या संध्याकाळी तरुण मुलं त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी घरटं सोडून निघून जातात, आपापल्या विश्वात रमून जातात. अशा वेळी जुन्या आठवणी काढायला, एकमेकांच्या औषधोपचारांची काळजी घ्यायला, शरीराच्या कुरबुरी ऐकायला आणि अशारीरिक प्रेम द्यायला जोडीदारच लागतो. आयुष्याच्या एका वळणावर कोणी तरी पुढे जाणार आणि कोणी तरी मागे राहणार हे नक्की असलं, तरी जोडीदाराशिवाय म्हातारपण काढणं सोपं निश्चितच नाही. अशा एकट्या पडलेल्या म्हाताऱ्या जोडीदाराची जबाबदारी तरुण पिढीला घ्यावी लागेल.

trupti.kulshreshtha@gmail.com