कार्तिक अय्यर कन्याकुमारीजवळ, भारताच्या दक्षिण टोकावर राहतात. त्यांच्या अरबी समुद्रालगतच्या शेतात ते नारळाचे उत्पादन घेतात. सीताराम पांडे हिमालयात राहतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटकांचे गाइड म्हणून काम करतात. या दोन टोकांमध्ये भारतातील लक्षावधी खेडी, शहरे आणि महानगरे आहेत. अनेकविध समाजांच्या, कितीतरी वेगवगळे धर्म व उपसंस्कृतींचे आचरण करणाऱ्या एक अब्जांहून अधिक लोकांचे भारत हे घर आहे. त्यांची शारीरिक वैशिष्टय़ेही वेगवेगळी आहेत. भारतीय लोक अगणित बोलीभाषा बोलतात. त्यांच्या खाद्यसंस्कृती आणि वेशभूषाही वैविध्यपूर्ण आहेत! मग त्यांना एक देश, एका देशाचे नागरिक म्हणून बांधून ठेवणारा सोनेरी धागा कोणता?

भारतातील सात मोठय़ा नद्यांचा धावता आढावा घेतला तरी याचे उत्तर लगेच मिळेल. या नद्या आहेत – गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी आणि या प्रत्येकीच्या असंख्य उपनद्या. यात सर्वात पवित्र समजला जातो गंगा-यमुना-सरस्वतीचा त्रिवेणी संगम. हा संगम उत्तर भारतातील अनेक नद्यांना घेऊन बंगालच्या उपसागराला मिळतो. द्वीपकल्पाच्या खालील भागात नर्मदा, कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांची आपापली एक व्यवस्था आहे. विंध्य, निलगिरी आणि सह्यद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावलेल्या छोटय़ा नद्या या नद्यांना मिळतात. भारताला सुपीक करणाऱ्या या सगळ्या नद्या नकाशावर ठेवा आणि मग बघा भारतीय उपखंडाला व्यापून टाकणाऱ्या प्रवाहांचे आणि जलाशयांचे कसे जिगसॉ पझल तयार होते.

dombivli, thakurli, traffic jam, Thakurli flyover
डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाण पूल कोंडीच्या विळख्यात, दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पुलावर वाहनांचा रांगा
Gokhale bridge, beam,
गोखले पुलाच्या जोडणीला विलंब, तुळईच्या सुट्या भागांना उशीर, कंत्राटदाराकडून खुलासा मागवणार
mumbai, Sea Coast Road,
मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण

भारतातील सात प्रमुख नद्या भारताच्या समृद्ध आणि विस्मयकारी संस्कृतीचा पाया आहेत. या प्रत्येक नदीरूपी देवतेला स्वत:चे व्यक्तिमत्त्व तर आहेच पण ती एखाद्या विशिष्ट अशा गुणाचे प्रतीक आहे. ती विशिष्ट वस्त्र, दागिने परिधान करते. काल्पनिक किंवा वास्तवातील प्राण्यांचा संदर्भ तिच्याशी जोडलेला आहे. अनेक मंदिरांमध्ये नद्यांची देवता म्हणून पूजा केली जाते आणि त्या भूमीला विपुलतेचा आशीर्वाद देतात. भारतातील वारसास्थळे समजल्या जाणाऱ्या सर्व मंदिरांच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गंगा आणि यमुनेची शिल्पे आवर्जून आहेत.

या नद्यांपैकी सर्वात पहिली म्हणजे गंगा नदी ही तर भारताच्या संस्कृती व नागरीकरणाची प्रमुख निर्माती आहे. ‘भारत म्हणजे गंगा आणि गंगा म्हणजे भारत’ असे मानले जाते.  गंगावतारम, अर्थात ही नदी मोक्षदायिनी म्हणून स्वर्गातून पृथ्वीवर कशी अवतरली याची आख्यायिका माहीत आहेच. ती भारताची गंगामय्या (आई) आहे. तिची कथा रामायण आणि महाभारत या भारतातील अजरामर महाकाव्यांमध्ये आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या मुकुटातील एक मणी म्हणजे गंगा. गंगेच्या आख्यायिकेचा प्रभाव अनेक पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांच्या संस्कृतींवर आहे. कंबोडिया, श्रीलंका, इंडोनेशिया आणि थायलंड हे यातील काही देश. श्रीलंकेत प्रत्येक नदीला गंगा म्हटले जाते. कंबोडियात अंगकोर वाटजवळ सिएम रीप नदीला गंगा म्हटले जाते आणि या नदीच्या प्रवाहामध्ये असलेले एक शिवलिंग ही नदी भगवान शंकराच्या जटेतून आली असल्याचे प्रतीक मानले जाते. इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये गंगा ही रामायणात गौरवलेली नदी म्हणून ओळखली जाते. आश्चर्य म्हणजे रोममध्ये गंगेचे एक शिल्प असून यात ती एका उठावदार चौकटीतील चार नद्यांच्या कारंजांमध्ये नद म्हणून दाखवण्यात आली आहे. गंगा ही देवता काल्पनिक पांढऱ्या मगरीवर स्वार झालेली, चकाकती श्वेत वस्त्रे ल्यायलेली आणि हिरेजडित मुकुट परिधान केलेली दाखवली जाते. ती पावित्र्याचे प्रतीक समजली जाते. तिच्या पाण्याला केवळ स्पर्श केला तरी स्पर्श करणाऱ्याची सर्व पापे धुतली जातात, असे समजले जाते. कबीर, तुलसीदास, मीराबाई आणि सूरदास या महान संतांनी त्यांचे भक्तीला समर्पित काव्य गंगेच्या काठावर निर्माण केले. गंगेच्या काठावर आश्रम, योग आणि ध्यानाची केंद्रे आणि घाटांवर लक्षावधी लोक त्यांच्या मृत पूर्वजांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करतात. गंगा ज्या कशाला स्पर्श करते, ते शुद्ध होते, असा भारताचा अभंग विश्वास आहे.

यमुना आहे शृंगाराची नदी. ती कृष्णाशी निगडित आहे. अर्भकावस्थेतील कृष्णाला रात्री भर पावसात पूर आलेल्या यमुनेतून सुरक्षितपणे नेण्यात आले आणि त्यावेळी यमुनेच्या पाण्याने त्याच्या पवित्र पायांना स्पर्श करण्यासाठी कमाल पातळी गाठली अशी कथा भागवतात आहे. यमुना नदी राधा आणि कृष्णामधील प्रणयाची साक्षीदार आहे. यमुना-राधा-कृष्ण या आख्यायिका भारताच्या कला, संगीत व नृत्याचा पाया आहेत. यमुना ही कृष्णाची महाराणीही आहे. हिमालयातील यमुनोत्रीत, म्हणजेच तिच्या उगमस्थानी तिची आराधना कृष्णाची पत्नी म्हणूनच होते. यमुना आणि प्रणयाचे रूपक आणखी गहिरे झाले ते सम्राट शाहजहानने त्याची प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहाल हे प्रेमाचे स्मारक आग्रा येथे यमुनेच्या काठी बांधल्यामुळे. हिमाचल प्रदेशात यमुनेच्या पाण्याच्या प्रेमात बेभान होऊन नाचताना पायातील तोडा हरवल्यानंतर शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंह यांनी यमुनेच्या काठावरच पाओंता साहीब गुरुद्वारा बांधून घेतला! आता ही सगळी पाश्र्वभूमी जाणून घेतली, तर यमुनेच्या काठावर प्रणयाची, मौजमजेची, नृत्याची आणि आनंदाची गाज ऐकून कोणाला आश्चर्य वाटणार नाही. यमुनेचे वाहन आहे कासव. यमुना सुफी पंथाचा अविभाज्य भाग असल्याने, मिनिएचर पेण्टिंग्जमध्ये ती मुघल शैलीतील पोशाखात दिसते.

सरस्वती नदी सर्व भारतीयांच्या हृदयात आहे. ती लुप्त झालेली नदी आहे, सर्वाना प्रकाशमान करणारी विद्येची किंवा ज्ञानाची देवता म्हणजे सरस्वती. भूगर्भशास्त्राचे अभ्यासक म्हणतात की, सरस्वती हिमालयात उगम पावली आणि गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराजवळ अरबी समुद्राला मिळाली. ग्लोबल हेरिटेज ट्रस्टने सरस्वती-मोहंजोदडो संस्कृतीचे संशोधन सुरू केले आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांतून तिचा जमिनीखालील प्रवाह तसेच झऱ्यांच्या स्वरूपात राहिलेले अवशेष दिसून आले आहेत. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही पायाभूत हालचाली झाल्यामुळे गुजरातमधून सरस्वती नाहीशी झाली आणि पूर्वेकडे यमुनेच्या दिशेने वळली, तिथेच प्रयाग किंवा अलाहाबाद येथे गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम झाला. याच स्थळी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. बद्रिनाथजवळ माना गावात तसेच हिमाचल प्रदेशात डाक पठ्ठर येथे सरस्वतीचे अवशेष दिसतात. अनेकांचे म्हणणे आहे की गुजरातमधील नल सरोवर म्हणजे सरस्वतीच्या पाण्याचाच अवशेष आहे. हातांमध्ये पुस्तके आणि वीणा घेतलेल्या सरस्वतीची वाहने हंस आणि मोर समजली जातात. एक ज्ञानाचे तर दुसरे सौंदर्याचे प्रतीक.

नर्मदाही मातृदेवता मानली जाते. तिने साहित्य, कला आणि अध्यात्माला प्रेरणा दिली आहे. नर्मदेच्या पात्राभोवती घनदाट जंगले आणि वन्यजीवन आहे. मांडू, महेश्वर आणि इंदूरसारखी अनेक ऐतिहासिक शहरे तिच्या काठावर वसलेली आहेत. नर्मदेला मोठय़ा उपनद्या नसल्याने ती वैराग्याचे प्रतीक मानले जाते. तिला ‘कुमारी’ नदीही म्हटले जाते. सर्व इच्छा गळून पडाव्यात म्हणून भाविक नर्मदेची परिक्रमा करतात. विंध्य पर्वतातील अमरकंटक या नर्मदेच्या उगमस्थानापासून सुरू होणारी ही परिक्रमा नर्मदा गुजरातमधील भडोच येथे अरबी समुद्राला मिळते तिथे समाप्त होते. हा मार्ग एकूण ९१७ किलोमीटर्सचा आहे. या यात्रेला निघालेले भाविक स्वत:सोबत अन्न, पाणी किंवा बिछाना काहीही घेत नाहीत आणि वाटेतील गावांमधून मिळणाऱ्या किमान सुविधांवर अवलंबून राहतात.

गोदावरी नदीचा उल्लेख रामायणात प्रकर्षांने येतो. कारण राम, लक्ष्मण आणि सीता त्यांच्या वनवासाच्या काळात गोदावरीच्या काठावर राहिले होते. गोदावरी भक्तीची नदी म्हणून गौरवली जाते. गोदातीर पवित्र झाला आहे तो आणखी एका घटनेने. स्वामी रामदास समर्थ आणि त्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील स्मरणीय भेटीने. इतिहास सांगतो की, रामदासांनी त्यांच्या भगव्या वस्त्रातील एक भाग शिवाजी महाराजांना दिला आणि स्वराज्याप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक म्हणून भगवा ध्वज उंचावून स्वत:चा राज्याभिषेक करून घेण्याची सूचना केली. गोदावरी उगम पावते महाराष्ट्रातील सह्यद्री पर्वतरागांमध्ये नाशिकजवळ गंगाद्वार येथून आणि पूर्वेकडे वाहत जाऊन अखेर बंगालच्या उपसागराला मिळते. सीतेची पंचवटी तसेच त्र्यंबकेश्वरमधील शिवमंदिर गोदावरीच्या काठावरच आहे. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्याहीपूर्वी हम्पी येथील विजयनगर साम्राज्याच्या संस्थापकांनी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या धाडसी युद्धांसाठी ओळखली जाते ती कृष्णा नदी. शौर्याचे प्रतीक समजली जाणारी कृष्णा नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर टेकडय़ांमध्ये उगम पावते आणि अनेक महत्त्वाच्या उपनद्यांना सामावून घेत कर्नाटक, आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णाकाठची वैभवशाली स्मारके म्हणजे मराठा साम्राज्यातील महाकाय किल्ले, विजयनगर साम्राज्यातील नेत्रदीपक इमारती.

कावेरी नदीने आद्य शंकराचार्यासह भारतातील अनेकांना भारावून टाकले. कूर्गमधील तळकावेरी येथे उगम पावणाऱ्या कावेरी नदीला दक्षिणेची गंगा म्हटले जाते. गंगेप्रमाणेच कावेरी नदीला कूर्गमध्ये सुज्योती आणि कन्नगी नद्या येऊन मिळतात आणि त्रिवेणी संगम होतो. कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या कावेरी नदीच्या प्रदेशातही घनदाट जंगलं आणि वन्यजीवन आहे. तंजोर येथील बृहदीश्वर मंदिर आणि चिदंबरम येथील तांडव करणाऱ्या भगवान शंकराचे मंदिर अशी अनेक प्रसिद्ध मंदिरं कावेरीच्या काठाजवळच आहेत. कावेरीमुळे द्वीपकल्पातील शेते समृद्ध होतात.

भारतातील या सप्त नद्यांमध्ये समावेश होत नसला, तरी महाराष्ट्रातून वाहणारी इंद्रायणी नदी ही समाजोद्धाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वरी लिहिणारे महान संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी इंद्रायणीचा तीर अजरामर केला आहे. हे सर्व जण मानवी हक्क आणि समानतेसाठी उभे राहिले. १३व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. अस्पृश्यांना त्यांचे समानता व अध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचे हक्क मिळवून देण्यासाठी भारताच्या इतिहासात झालेली ही पहिली चळवळ. या चळवळीने पुढील चारशे वर्षे भक्तीसाहित्याचा अमूल्य खजिना तयार केला. आजही या चळवळीची जादू भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिराकडे खेचून आणते. या मंदिरातून प्रेम आणि समतेचा संदेश भारतभरात जातो. भारतातील नद्यांनी धार्मिक व लोकसाहित्य, काव्य, संगीत, नृत्य, कला, स्थापत्य आणि शिल्पकला या सर्वाना प्रेरणा दिली आहे. या नद्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेतच, शिवाय त्यांनी भारताची प्राचीन संस्कृती सुवर्णाच्या धाग्याने बांधून ठेवली आहे. भारतीयांच्या मानसिकतेत असलेले या नद्यांचे अस्तित्व त्यांना एक राष्ट्र आणि एका राष्ट्राचे नागरिक म्हणून एकत्र ठेवत आहे.

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com