मुला-मुलींची उशिरा लग्न होणं म्हणजे त्यांच्या ‘नैसर्गिक भावनांना’ दडपून पुढे जाणं आलं किंवा मग त्या अवैध मार्गानं मिळवणं आलं. शहरी जीवनात आजकाल अनेक तरुण-तरुणींच्या खिशात भरपूर पैसा खुळखुळत असतो. तो पैसा त्यांना धीट बनवतो. परिणामांना सावरण्याचे मार्गही त्यांना माहीत असतात. आणि मग वाकडय़ा वाटेनं चालताना कुणाची भीडभाड वाटत नाही. म्हणूनच योग्य वेळी लग्नं होणं जसं गरजेचं आहे तसंच विवाह हा संस्कार मानणंही.
आजकाल मुलींच्या विवाहाचं वय वाढत चाललं आहे. शिक्षण, करिअर, नोकऱ्या, आर्थिक स्वातंत्र्य, व्यक्तिमत्त्व विकास.. कारणे कोणतीही असोत, परंतु मुलीचे विवाहाचे वय २६-२७ आणि मुलाचे ३०च्या आसपास ही कल्पना रुजत चालली आहे. पुढच्या २०-२५ वर्षांत यावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याला समाजमान्यताही मिळेल यात शंका नाही.. परंतु हे सारे योग्य आहे का, याचा वेळेवरच विचार व्हायला हवा.
आमच्या लहानपणी (मी आज वयाच्या ऐंशीच्या टप्प्यावर आहे.) शिक्षण पूर्ण झालं की, मुलीच्या विवाहाचा विचार सुरू व्हायचा. वरसंशोधन सुरू व्हायचं. वराकडल्यांचे आचार-विचार-उच्चार, सांपत्तिक स्थिती, एकंदर घरचं वातावरण, राहणीमान यांची चाचपणी करून मग स्थळ नक्की केलं जायचं. लग्नं लागायची. मुली सासरच्या वातावरणात मिसळून जाऊन वैवाहिक जीवन सुरू व्हायचं. त्याकाळी विवाहाबाबतचे हे ठराविक टप्पे होते.
आता काळ बदलला आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रिया, हुशार, स्मार्ट बनल्या आहेत. नवऱ्याप्रमाणे त्यांच्याही खिशात पैसा आहे. स्वत:मध्ये दडलेल्या कर्तृत्वाची, कलागुणांची जाणीव तिला आहे. तिची जीवनाकडे बघण्याची नजर आणि त्यामुळे ‘ठाम’ झालेली मतं तिच्याजवळ आहेत. तिच्यात आत्मविश्वास आला आहे. ही बदललेली परिस्थिती नवरा आणि बायको दोघांनीही सामोपचाराने घेतली, तर उत्तम संसार होतात. नाहीतर मग भांडणं, हक्क, तूतू-मैंमैं सारख्या समस्या उभ्या राहतात. घरचं वातावरण गढूळ होऊन जातं. काहीवेळा ते घटस्फोटापर्यंत जाऊन पोचतं.
परंतु हे बदललेलं स्त्रीजीवन पाहताना एका गोष्टीची काळजी वाटते की, शिक्षण आणि करिअरच्या मागे लागल्यामुळे मुलींच्या विवाहाचं वय वाढत चाललं आहे. माझ्या घरात दोन नाती आहेत. २१ आणि २३ वयाच्या! त्यांच्या विवाहाबाबत मी विचार मांडला की, ‘‘माझं लग्न २१व्या वर्षी झालं. तुमची आई (माझी सून) घरात आली, तीही २१ वर्षांचीच होती. तुमचं काय?’’ त्या तात्काळ म्हणाल्या, ‘ते चाइल्ड मॅरेज होतं.’ मी थोडी हादरलेच!.. आता २६-२७ नंतर विवाह करायचा म्हणजे मुलगा मिळायला हवा, आवडायला हवा, त्यांच्यात सुसंवाद व्हायला हवा पुन्हा संसार सुखाचा व्हायला हवा. चार दिवस हीच चिंता मला पोखरत होती.
या उशिरा होणाऱ्या लग्नाच्या प्रश्नाला आणखीही बरेच बारकावे आणि कंगोरे आहेत.. उशिरा लग्न म्हणजे ‘उशिरा मुलं होणं’! आता तिशीचं वय मुलं होण्यासाठी योग्य आहे का? तिचं शरीर तिला उत्तम साथ देईल का? गर्भारपण, बाळंतपण आणि पाठोपाठ येणारं मुलांचं संगोपन या गोष्टींना ती समर्थपणे सामोरी जाऊ शकेल का?.. या प्रश्नांबरोबरच आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार व्हायला हवा, तो म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या तरुण वयातल्या नैसर्गिक भावना!! २०-२१ वयाच्या आसपास तरुण-तरुणींना एकमेकांच्या सहवासाची ओढ वाटते. आकर्षण वाटायला लागतं. मग समोरच्याला किंवा समोरचीला आकर्षित करून घेण्यासाठी नवनवीन फॅशन्स सुरू होतात. तऱ्हेतऱ्हेचे कपडे, केशरचना, पर्सेस, सँडल्स, शूज यांच्यावर खर्च सुरू होतो. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात बदल करून घेण्यासाठी ब्युटी पार्लर्स, जिम यांची दारं खुली असतातच. टीव्हीवरच्या जाहिरातीही खाद्य पुरवत असतात.. आणि मग एकत्रितपणे वावरता येतील असे समारंभ, पाटर्य़ा, प्रवास आयोजित केले जातात. यातूनच संघटन वाढत जातं. जोडीदाराविषयीच्या कल्पना मनात ‘घर’ करू लागतात.
आता ‘उशिरा लग्न’ म्हणजे ‘नैसर्गिक भावनांना’ दडपून
पुढे जाणं आलं किंवा मग त्या अवैध मार्गानं मिळवायच्या.
शहरी जीवनात आजकाल अनेक तरुण-तरुणींच्या खिशात
भरपूर पैसा खुळखुळत असतो. तो पैसा त्यांना धीट
बनवतो. परिणामांना सावरण्याचे मार्गही त्यांना माहीत असतात. आणि मग वाकडय़ा वाटेनं चालताना कुणाची भीडभाड वाटत नाही. दुसरी एक गोष्ट! आपल्या समाजात कितीही बदल झाले, तरी एक गोष्ट अजून तरी रूढ आहे, ती म्हणजे लग्न झाल्यावर मुलगी मुलाच्या घरी राहायला जाते. अगदी माहेरचं आणि सासरचं दोन्ही आडनावं लावली, तरी एका नवीन आडनावाची भर पडतेच आणि अशी मुलगी सासरी गेली की, तिला अनेक नवीन गोष्टींना सामोरं जावं लागतं.. सासरचा गोतावळा, तिथली आजारी,  जराजर्जर वृद्ध मंडळी, इतर नातेसंबंध, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, स्वभाव, आग्रह, दुराग्रह, घरात आजवर चालत आलेल्या परंपरा, रूढी, पूजाअर्चा  या आणि अशा अनेक गोष्टींना तिला सामोरं जावं लागतं.
नवी सून घरात आली की, घरातली इतर मंडळी बहुधा आपलं आयुष्य बदलत नाहीत. तिलाच स्वत:ला मुख्यत्वे बदलावं लागतं. जमवून घ्यावं लागतं. वेळप्रसंगी नमतं घ्यावं लागतं. मनाला मुरड घालावी लागते. आता वय वाढलेल्या आणि ‘ठाम’ मतं झालेल्या मुलींना हे बदल स्वीकारणं जड जातं. मनात गुंता वाढत जातो. हनिमूनला जाऊन आल्यानंतरची धुंदी खाडकन उतरते; पाय जमिनीला लागतात.
जी जोडपी लग्न झाल्याझाल्या घरापासून वेगळे राहायला लागतात, त्यांचेही संसार फार सुखाचे होतात, असं नाही. घरातल्या उतारवयातल्या माणसांची जबाबदारी आणि इतर चालत आलेल्या रूढी-परंपरा जरी टळल्या, तरी घरातली कामं वाढतात. नवरा-बायको दोघं घराबाहेर जाणार म्हटल्यावर २४ तासांची बारीकसारीक कामं कशी आणि कधी करायची?.. आला गेला, पाहुणेरावळे, किराणाधान्य, भाजीपाला, सणवार, आजारपण, डॉक्टर, तपासण्या, औषधं आणणं, नादुरुस्त टेलिफोन- गेलेले बल्ब बदलणं, पेपरवाला- धोबी- केबलवाला यांचे पैसे देणं, स्वयंपाकघरात वाढत चाललेली झुरळे, मुंग्या मारणं- मुलं झाली की त्यांचं पाळणाघर, शिशुवर्ग, अभ्यास, गृहपाठ, शिकवण्या, परीक्षा, पालकसभा, रविवारी मुलांच्या आवडीचे पदार्थ करणं- अहो काय नाही? अशा शंभर गोष्टी सांगता येतील. नवरा-बायको दोघांची मशिन्स बनून जातात. या स्वतंत्र राहणाऱ्या जोडप्यांना सकाळ केव्हा झाली आणि संध्याकाळ केव्हा झाली हे जसं समजत नाही, तसं आपण तरुण कधी होतो आणि म्हातारे केव्हा झालो हेही समजत नाही.
परवा दोन वेगळेच विचार ऐकायला मिळाले. दोन तिशी-पस्तिशीच्या तरुणी म्हणाल्या, ‘‘आम्ही लग्नच करणार नाही. आम्हाला ती मुलंही नकोत आणि संसाराच्या कटकटीही नकोत. आम्ही रग्गड पैसा कमावतो आहोत. मजेत राहू.’’ तेवढय़ापुरती मी गप्प झाले. परंतु मनात विचार आला की, अंगात तरुणपणाचा जोश आहे, तोपर्यंत हे सर्व ठीक आहे. परंतु आणखी तीस-पस्तीस वर्षांनंतर जेव्हा त्या सत्तरी-पंच्याहत्तरीजवळ पोचतील आणि एकेक व्याधी डोकं वर काढायला लागतील तेव्हा त्यांना कोणाच्या तरी शारीरिक-मानसिक आधाराची गरज नाही का भासणार? त्यावेळी काय करायचं? वृद्धाश्रम हा पर्याय आहे का?
दुसरा एक नवीन विचार असा होता की, माझ्या मैत्रिणीची नात २४ वर्षांची आहे. लग्नाला तयार आहे. तिला कशा तऱ्हेचा जोडीदार हवा, अपेक्षा काय, विचारल्यावर म्हणाली, ‘‘त्याच्याबरोबर जन्म काढताना मी ‘बोअर’ होता कामा नये!’’ मी चक्रावलेच. वाटलं २४ तास आणि संबंध जन्म एकमेकांबरोबर काढायचा म्हणजे कधी तरी ‘बोअर’ होणारच की! तिलाच काय त्यालाही होईल. पहिली काही दिवसांची नवलाई संपली आणि रुटीन आयुष्य सुरू झालं की, हळूहळू गुणांपेक्षा अवगुणच लक्षात यायला लागतात.. मग काय एकमेकांना सोडून द्यायचं? आणि अगदी दुसरा शोधला, तरी तेच होणार! पहिले पाढे पंचावन्न!!
माझं आजकाल असं ठाम मत झालंय् की, विवाहाचा विचार करण्यापूर्वी दोघांनीही एक गोष्ट मनाशी नक्की करायला हवी की, आपण ‘विवाह’ हा ‘संस्कार’ म्हणून स्वीकारणार आहोत का ‘करार’ म्हणून?- ‘संस्कार’ या शब्दात अनेक गोष्टींचा समावेश होतो. देहशुद्धी, आत्म्याची शुद्धी, गुणांची वृद्धी, जीवन उंचावणं, सर्वाथानं ते परिपूर्ण करणं, वरच्या पातळीवर नेणं, समृद्ध करणं- थोडक्यात आचार- विचार- उच्चार यांचा समतोल राखणं वगैरे वगैरे!! ‘करार’ म्हटला की त्यात अटी येतात. त्यात कायद्याची अंमलबजावणी येते. मन-भावना यापेक्षा बुद्धी अधिक काम करते. पटलं तर एकत्र राहायचं, नाही तर निर्विकारपणे वेगळं व्हायचं. अशा विवाहात जर मुलं झाली नाहीत, तर उत्तम असतं. निदान त्यांची तरी परवड होत नाही. लिव्ह-इन-रिलेशनशिप हा याच कराराला फुटलेला कोंब आहे.
आज मी ८० पूर्ण झालेली स्त्री आहे. विविध क्षेत्रांत सजगपणे आयुष्य जगले आहे. अनेक अनुभव गाठीशी जमा झाले आहेत आणि त्यांच्या जोरावरच या लेखातले विचार मांडले आहेत. माझ्या मते कुटुंबसंस्था, विवाहसंस्था हे मानवी मूल्यांचे आधारस्तंभ आहेत. ते खिळखिळे होऊन चालणार नाहीत. त्यांच्या चौकटीत राहून जीवन व्यतीत केले पाहिजे. तरच ते जीवन सुखाचे होईल. सुरक्षितही होईल.
जीवन सुखावह होण्यासाठी दोघांजवळ सामंजस्य, सामोपचार, संयम, सहनशीलता, सुवर्णमध्य- हे ‘स’सुद्धा असायला हवेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onलग्नMarriage
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage rituals of contract
First published on: 22-12-2012 at 05:07 IST