अमृता देसर्डा

स्त्रीसुलभ गृहिणी होण्यापेक्षा माणूससुलभ लेखक व्हायचा आता कुठं प्रयत्न करतेय, असं वाटतं. लिखाणाच्या सुटय़ा पानांनी मला मोकळं व्हायची हिंमत दिली. त्यातून आतली खळबळ किमान स्वत:ला समजण्याची सक्षमता तयार होतेय. रांगोळीच्या रेषांनी, मेंदीच्या तारेने, घरातल्या साफसफाईने, ग्रंथालयातल्या कामानं आणि वकिलीतल्या अपयशानं जे जाणवलं नाही ते शब्दांच्या उमटण्यातून जाणवू लागलं आहे. लहानपणापासून विचारला गेलेला, ‘आता मला पुढं कोण व्हायचंय?’ हा प्रश्न स्वत:ला सध्या तरी विचारावासा वाटत नाहीए..

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?

दहावीत असताना ‘तुम्हाला मोठं झाल्यावर कोण व्हायचं आहे?’ हा प्रश्न एकदा बाईंनी आम्हाला वर्गात विचारला. आमच्यात कुजबुज सुरू झाली. प्रश्न तसा खूप सोपा होता. काहींना इंजिनीअर व्हायचं होतं, काहींना डॉक्टर, तर काहींना शास्त्रज्ञ. मी शांत होते. मला समजत नव्हतं नेमकं काय उत्तर द्यायचं ते. कारण काय व्हायचं, हे ठरवलं नव्हतं आणि जे काही व्हावंसं वाटायचं किंवा जे जाणवायचं ते सतत बदलत राहायचं. एखादी गोष्ट मनात आली की, ती आपण करू शकतो असं वाटायचं आणि तेच व्हावंसं वाटायचं. त्यावेळी मला घरातली कामं, साफसफाई करणं, स्वयंपाक करायला सहज जमायचा आणि आवडायचाही. बाईंचा मोर्चा माझ्याकडे वळला. तेव्हा मी हळू आवाजात म्हणाले, ‘‘मला नं बाई, उत्तम गृहिणी व्हायचं आहे.’’

माझ्या मैत्रिणी हे ऐकल्यावर हसायलाच लागल्या. वर्गातल्या मुलांमध्ये कुजबुज सुरू झाली. बाईसुद्धा हसल्या. नंतर मैत्रिणींमध्ये माझी खूप चेष्टाही झाली. ही गोष्ट मी आज आठवून बघते तेव्हा हसू येतं. दहावीत असताना वाटायचं ते आत्ता वाटतंय का? असा विचार करत राहते. ‘पुढे कोण व्हायचं आहे?’ हा प्रश्न आजही सतत समोर येतो आणि त्याचं उत्तर आजही बदलत राहतंय, असं वाटतं. काळानुसार माणसाचा स्वभाव बदलतो, मतं बदलतात. अर्थात बदलायचा विचार केला तरच हा बदल घडतो. उत्तम गृहिणी असणं ही किती अवघड गोष्ट आहे, हे नंतर समजायला लागलं. गृहिणीपण हे स्त्रीच्याच सुलभ भावनांचं नुसतं प्रगटीकरण नाही, तर ते एक व्यवस्थापन आहे, तो एक सांसारिक राजकीय व्यवहार आहे आणि जगण्यातल्या सहजीवनाचा एक अविभाज्य भाग कसा आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. स्वत:च्या जाणिवांचा विस्तार करण्यासाठी काय करायचं? हा प्रश्न मनात वारंवार डोकं वर काढत होता. मग पुस्तकांचा आधार घेत, डायरी लिहिण्याची सवय लावत, जाणिवांच्या पातळीवरचा एक नवा खेळ आपोआप सुरू झाला. नुसता अभ्यास करून काही होणार नाही, काम करून पैसे कमावले पाहिजेत, हा विचार मनात घोळू लागला. अनेक प्रयोग करून पाहिले. त्यातून शेतकरी मत्रिणीच्या शेतातली भाजी विकायचा प्रयत्न केला; पण तो फोल ठरला. मग पुन्हा नवीन व्यवसाय सुरू करावा, असा विचार आला. पैसे कमवायचे हे पक्कं होतं. मोठमोठय़ा रांगोळ्या काढता यायच्या. मग एका कार्यक्रमात रांगोळी काढायची संधी मिळाली. ती त्यांना आवडली. त्यातून दुसरीकडे बोलावलं गेलं. त्यातच मग कुणी विचारलं, ‘मेंदीही काढता का?’ तर आतूनच ‘होकार’ आला. त्यातून सलग दोन वर्षे रांगोळी-मेंदीची कामं करत राहिले. हे सगळं महाविद्यालयीन काळात सुरू होतं, त्यामुळे पुढचा प्रश्न होताच, ‘हे किती दिवस करणार?’ आर्थिक आणि मानसिक बाजूनं भक्कम होता येईल, यासाठी काही तरी वेगळं करायला हवं, असं वाटायचं.

त्या वाटण्यातून एका सोसायटीच्या ग्रंथालयात काम करायची संधी मिळाली. संध्याकाळी फक्त तीन तास ग्रंथालयात बसून पुस्तकांचा हिशेब ठेवायचा, पुस्तकं नीट लावायची, सभासदांना द्यायची, मासिक वर्गणी गोळा करायची. काम आवडलं. काम करता करता तिथली बरीच पुस्तकं वाचून काढली. ग्रंथालयातल्या या तीन तासांनी मला खूप घडवलं. जवळपास दोन वर्ष हे काम अगदी प्रामाणिकपणे केलं; पण एकदा सोसायटीच्या बठकीत पुस्तकांचा घोळ दिसून आला. त्यांच्या मते बरीच पुस्तकं गायब झाली होती. मी ग्रंथालयात तीन तास असायचे फक्त. सकाळी वेगळा माणूस असायचा. दीड वर्षांतला हिशेब अगदी व्यवस्थित ठेवूनही गडबड कशी झाली ते मला समजलं नाही. चौकशीसाठी बोलावलं गेलं. मी तर एकही पुस्तक चोरलं नव्हतं किंवा पशांची अफरातफर केली नव्हती. खूप रडायला आलं. रडत रडत माझी बाजू मांडली; पण तरीही पुस्तकं गेली कुठं, हा प्रश्न होताच. पुस्तकांची चोरी झाली होती. शेवटी सोसायटीच्या एका सभासदाला माझी दया आली. त्यांना माझं बोलणं खरं वाटलं. त्यांनी सगळा हिशेब पूर्ण करायची जबाबदारी घेतली. या अनुभावातून जगण्यातल्या आरोपांची, अपयशाची झलक अनुभवायला सुरुवात झाली.

पुस्तकांच्या सहवासात राहिल्यामुळं जगण्याचं प्राधान्य बदलत गेलं. पुस्तकांच्या सान्निध्यात एक वेगळीच नशा अनुभवायला मिळू लागली. पानांशी होणारा संवाद आवडायला लागला. त्यातून वकिलीच्या अभ्यासाची गोडी लागली. एल.एल.बी. केलं. कायद्याच्या पुस्तकांशी मत्री झाली. वकील होण्यापेक्षा दिवाणी किंवा फौजदारी न्यायाधीश व्हायला हरकत नाही, असं एकदा माझी मत्रीण गप्पा मारता मारता सहज म्हणाली. मग त्यासाठीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पुढच्या शिक्षणासाठी मुंबईत राहायला गेले. छोटय़ा शहरातून मोठय़ा शहरात जायचा एक वेगळा संघर्ष सुरू झाला. मुंबईच्या धावत्या वेगात रमायला लागले. उच्च न्यायालयात काम सुरू केलं. न्यायाधीश परीक्षेची पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा दिली. एम.पी.एस.सी. भवनात मुलाखतीला बोलावलं; पण ऐन मुलाखतीच्या दिवशी वयाच्या तांत्रिक कारणामुळे मुलाखतीस अपात्र ठरवलं गेलं. त्या दिवशी फोर्टच्या त्या दगडी इमारतीजवळ बसून हमसून हमसून रडले. आपण न्यायाधीश होऊ शकत नाही आणि वकील असूनही वकिली करता येत नाही, या विचाराने निराश झाले; पण पुन्हा प्रयत्न करून बघायला हवा म्हणून मनाने उभारी घेतली. एकदा नाही, तर तब्बल चार वेळा पूर्वपरीक्षा, तीन वेळा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. पुन्हा दोन वेळा मुलाखत दिली. लेखी परीक्षेत तीन वेळा पहिल्या दहात आले; पण एकाही मुलाखतीत किमान २० गुण मिळू शकले नाही. दरम्यान, एल.एल.एम. पूर्ण केलं. मुंबई आवडू लागली होती. न्यायालयात जायच्याऐवजी मी ग्रंथालयातच रमू लागले. तिथली पुस्तकं मला हाका मारायची. त्यांना जवळ घेऊन तासन्तास त्यांच्याशी गप्पा मारत बसायचे.

दरम्यान, कलानगरच्या कुटुंब न्यायालयात एका जोडप्याची घटस्फोटाची केस चालवली; पण त्यातून आनंद झाला नाही. अशिलाला जे हवं ते दिलं तरी त्यांच्या नात्यात झालेली जखम आपण बुजवू शकलो नाही, ही बोच मनात राहिली. वकिली करण्याची धमक आपल्यात कमी आहे, याची जाणीव झाली. न्यायालयात जायला निघायचे, पण पाय आपोआप न्यायालयाच्या ग्रंथालयातच वळायचे. तिथल्या पुस्तकांत मन रमायचं. न्यायालयात ते कधीच रमलं नाही. ज्यांच्या हाताखाली काम करायचे ते वरिष्ठ एकदा म्हणाले, ‘‘तुम्हाला साध्या साध्या गोष्टी समजत नाही. नुसता पुस्तकी अभ्यास करून वकील होता येत नाही.’’ त्यांच्या या शब्दांनी माझे डोळे खाड्कन उघडले. मी त्यांना पत्र लिहिलं, ‘आजपासून मी येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा.’ त्यांना पत्र दिल्यावर शेजारीच असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या लॉ डिपार्टमेंटला गेले, तर नोटीस बोर्डवर माझं नाव झळकत होतं. विद्यापीठात एलएल.एम.च्या परीक्षेत तिसरी आले होते. हसावं की रडावं, हे कळत नव्हतं. ‘नुसता अभ्यास करून वकील होता येत नाही..’ हे शब्द मनात घोळत होते. त्यामुळं आता पुढं काय करायचं, हा प्रश्न माझी पाठ सोडत नव्हता. त्यामुळं वकिली नाही, तर किमान नोकरी तरी करता येईल, संशोधन करता येईल किंवा एम.फिल. करता येईल असा विचार केला.

शोधता शोधता ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स’मधल्या कायद्याच्या विभागात संशोधन करण्याची संधी मिळाली. वकिलीचं अपयश पचवण्यासाठी ही नोकरी खूप उपयोगी पडली. नोकरी करत असतानाही अपूर्ण वाटत राहायचं, अस्वस्थ वाटत राहायचं. मनातल्या या अस्वस्थ जाणिवेला वाट द्यायला हवी म्हणून कागदांना जवळ केलं. त्यावर सुचेल ते लिहू लागले, मनात येईल ते शब्दांत मांडू लागले. स्वत:शी बोलून लिहिलं की चांगलं वाटतं हे याच काळात समजलं. कोरी पानं आपली वाटायला लागली. काय लिहायचं, हा प्रश्न कधी पडलाच नाही. लेखणी जणू काही माझी जवळची मत्रीण झाली. आत जे दाटून येतंय ते बाहेर कसं काढायचं, हा प्रश्न स्वत:ला विचारायला लागले. आतल्या-बाहेरच्या जाणिवा शांत बसू द्यायच्या नाही. त्यातूनच डायरी लिहिणं थांबलं आणि सुटी पानं जवळची वाटू लागली. सुटय़ा पानांवर एकेका कथेचा, कवितेचा जन्म होऊ लागला. आपल्यातल्या अस्वस्थपणाला शब्दच वाट दाखवू शकतील, हा विश्वास निर्माण झाला. आजही ते अपूर्णत्व आणि अस्वस्थपण जिवंत आहे. मनाच्या तळाशी असलेल्या गोष्टी कागदाला सांगता येतात, स्वत:च्या आत आहे ते बाहेर काढायला कागद मदत करतात. लिहायला लागल्यामुळं अस्वस्थपणाच्या जवळ जाऊन ते समजून घेता येत आहे, असं वाटू लागलं. मनाची उदासी कागदं झेलू शकतात. पुस्तकांनी मनात डोकावायला शिकवलं, तर कागदांनी आणखी खोलात जाण्याचा मार्ग दाखवला आहे.

अनेक प्रश्नांची, कल्पनांची, संकल्पनांची निर्मिती त्यातून झाली. काहींची उत्तरं मिळाली आणि काहींची अजूनही शोधतेय. स्वत:शी बोलण्याचा आणि त्यातून लिहिण्याचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात नोकरी सोडली; पण त्याचा त्रास झाला नाही. स्त्रीसुलभ गृहिणी होण्यापेक्षा माणूससुलभ लेखक व्हायचा आता कुठं प्रयत्न करतेय, असं वाटतं. त्या सुटय़ा पानांनी मला मोकळं करायची हिंमत दिली. त्यातून आतल्या खळबळी किमान स्वत:ला समजण्याची सक्षमता तयार होतेय. रांगोळीच्या रेषांनी, मेंदीच्या तारेने, घरातल्या साफसफाईने, ग्रंथालयातल्या कामानं आणि वकिलीतल्या अपयशानं जे जाणवलं नाही ते शब्दांच्या उमटण्यातून जाणवू लागलं आहे, असं वाटू लागलं आहे. पुस्तकांच्या ओळींनी वेगळी

दिशा दाखवली, ती अशी. ज्यातून स्वत:च्या अस्तित्वाचा, अंतरंगाचा शोध घ्यायला मदत होतेय. जे स्वत:च्या आत्मभानातून प्रतिष्ठेकडे नेईल. ज्यातून एक माणूस म्हणून असण्याची जाणीव सतत जिवंत राहील, ही जाणीव स्त्री असण्याच्या एका जाणिवेपासून खूप पुढं नेईल, त्यातून जन्माला आलेली आत्मप्रतिष्ठा किती तग धरेल माहीत नाही, पण मनाच्या आत चालू असलेला कोलाहल शमवायला लेखणीचा आधार घेण्याशिवाय सध्या तरी पर्याय दिसत नाही.

कागदावर लिहिलेल्या ओळींना पदर असतात अनेक अर्थाचे, विचारांचे, भवतालाच्या जाणिवेचे. आतून व्यक्त होणारा भावनिक, आत्मिक आणि गुंतागुंतीचा मानवी कल्लोळ शब्दांच्या माध्यमातून बाहेर पडतो तेव्हा, ‘आता मला पुढं कोण व्हायचंय?’ हा प्रश्न स्वत:ला सध्या तरी अजिबात विचारावासा वाटत नाही. मला फक्त लिहायचंय.. शब्दांच्या माध्यमातून स्वत:लाच खोदायचंय..

amrutadesarda@gmail.com

chaturang@expressindia.com