छे! चुकलंच आपलं. गृहिणी-आई-बायको म्हणून असलेली चाकोरीबद्ध-अनिवार्य-कर्तव्य पार पाडताना आपल्यातल्या तिलाच आपण मारून टाकली. नाही म्हणायला शाळेत मुलांना शिकवताना आतली ‘ती’ होते जागी. उत्तम रंगतात मग ते तास. मुलंही खूश आणि मीही कृतार्थ!
व्हॉईस ओव्हरच्या क्लासचं आजचं सहावं लेक्चर! जवळजवळ संपूर्ण कोर्स पूर्ण होत आला होता. मोकळं वाटत होतं. रविवारची रोजची कसरत खंड न पाडता साधली म्हणायचं. आजही नेहमीप्रमाणे पोहचायला उशीरच  झाला होता. नमस्कार-चमत्कार आटपून लेक्चरची गाडी मूळ मुद्यांवर सरकली होती. जुळवून घेण्याची उपजत सवय, तेव्हा विषयाशी स्वत:ला जोडून घेतलं. आजचं लेक्चर होतं, ‘रेडिओ जॉकी’ या संदर्भातलं! मार्गदर्शन करणाऱ्या फार सुरेख बोलत होत्या. त्या क्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्य, क्षमता, मर्यादा यांची माहिती देताना मध्ये-मध्ये त्याला स्वानुभवांची जोड देत होत्या. आपला विषय मांडण्याची त्यांची कला उत्तमच होती. सगळेच रंगले होते. मीही. स्वत:चा समृद्ध प्रवास त्या मांडत होत्या, तेव्हा मनाला मात्र आतून टोचत होतं. अरे! हे असं आपल्यालाही साधता आलं असतं की? थोडय़ाशा सरावाने का होईना, आपणही हे पेलू शकलो असतो. आज बेचाळिसाव्या वर्षी आपण ही कला अवगत करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. घर-संसार, मुलंबाळं सांभाळताना आयुष्याची किती अनमोल वर्षे वेचली आपण. तेव्हा कसा नाही जाणवला हा आतला हुंकार?
 हे असं का घडलं? कदाचित आपलीच ओळख आपल्याला पटली नसावी. आपल्याला काय आवडतंय याचा विचार करण्यासाठी आपण क्षणभरही थांबून वेळ दिला नसावा. आई-बाबांनी, शिक्षकांनी त्याची जाणीव दिली. छे तसंही नाही. भरपूर अभ्यास करा, चांगले मार्कस् मिळवा. असाच मंत्रघोष सगळीकडे ऐकलेला. विचार करत होते तसंतसं मन अधिकच खंतावत होतं. निराशेचं काळं मळभ दाटून आतल्या आत झाकोळून जायला झालं होतं. अरेरे! चा सल मनाला आणखीनच बोचत होता.  
 आपल्यालाही आपल्या शक्तींचा योग्य वापर करता आला असता की. छे! चुकलंच आपलं गृहिणी-आई-बायको म्हणून असलेली चाकोरीबद्ध-अनिवार्य-कर्तव्य पार पाडताना आपल्यातल्या तिलाच आपण मारून टाकली. नाही म्हणायला शाळेत मुलांना शिकवताना आतली ‘ती’ होते जागी. उत्तम रंगतात मग ते तास. मुलंही खूश आणि मीही कृतार्थ! पण नेहमी हे घडत नाही, शक्यच नसतं. ‘पोर्शन’ नावाचा बागुलबुवा मागे लागलेला असतो. त्याला डावलून सर्जनाच्या वाटा धुंडाळणं, नवीन कल्पना मांडणं नेहमीच शक्य नसतं. शिक्षणाची चाकोरीबद्धता मुलांच्या सर्जनशीलतेवरच घाला घालते. उमलू पाहणारी मुलं मार्क-टक्क्यांच्या भोवऱ्यात गरगरत राहतात. मुबलक पैसा मिळवणं एवढाच यशस्वीतेचा निकष असणाऱ्या समाजात उत्तम नोकरी कशी प्राप्त होईल, यासाठी आपल्या सर्व क्षमता पणाला लावतात. माझंही असंच झालं होतं. आपल्याला काय आवडतं, कशात समाधान मिळतं हे शोधण्याचा प्रयत्न मी केला नव्हता, आणि मग हे असं अतृप्त इच्छांचं-स्वप्नांचं गाठोडं सांभाळत इथवर आले होते. तथाकथित समाजाच्या दृष्टीने मी यशस्वी होते, पण मानसिक पातळीवर मात्र अत्यंत उदास, बेचैन होते.
   समोर चाललेल्या लेक्चरला समांतर उठणारी माझ्या मनातली ही आंदोलनं मलाच दमवत होती. आंदोलनं तरी कशी म्हणू मी? आक्रंदनच होतं ते! माझ्या भाबडय़ा मनाचं! पण प्रत्येक काळय़ा ढगाला जशी एक चंदेरी लखलखती किनार असते ना, अगदी तसाच एक लख्ख विचार माझ्याही मनात चमकून गेला. ठीक आहे. झालं ते झालं! आत्मसमाधान, सर्जनातला तो आनंद, ती समृद्धता याला आपण पारखे झालो हे खरंच, पण अजूनही काही बिघडलं नाहीए. अजूनही यशस्वी होता येईल. आपली शाळेतली मुलं आहेत ना. त्यांना दाखवू शकतो आपण ही वाट. आपल्यासारखीच आवड असणारी, उत्तम वाचू-लिहू शकणारी मुलं, आपण शिकवता शिकवता हेरतोच की! त्यांच्यातल्या गुणांना पोषक अशा गोष्टी निवडून, त्यांना संधी देऊन, त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी मदत तर करू शकतो? नुसता ‘आर जे’च नाही तर उत्तम लेखक, उत्तम कवी, निवेदक आपण घडवू शकतो. आपल्या अनुभवाचा, वाचनाचा विविध क्षेत्रांतील माहिती संकलनाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपल्याला न दिसलेल्या, दाखवलेल्या वाटा आपण त्यांना नक्कीच दाखवू शकतो. या विचारासरशी मनातले ते काळेकुट्ट ढग क्षणात विरून गेले. मनभर लख्ख प्रकाश पसरल्यासारखा वाटला आणि अगदी सहज लेक्चरच्या पुढच्या टप्प्याकडे वळताना एक प्रसन्न जाणीव मनभर पसरली.
  निवेदनाचं प्रात्यक्षिक करायचं होतं. माईक तयार होता. काचेपलीकडे असलेल्या सरांनी, ‘चला,  टेक करू या’ म्हणून आवाज दिल्यावर मी भानावर आले. हो! आजचं हे प्रात्यक्षिक माझ्यापुरतं  असलं तरी ते माझं मुळीच नव्हतं. ते होतं माझ्या विद्यार्थ्यांचं. कारण त्याच्यासाठीच आता हे सर्व मी शिकणार होते. पुन्हा एकदा नव्याने घडणार होते. खऱ्या अर्थाने यशस्वी होणार होते.