बालशिक्षण क्षेत्रात जसजशी मी वावरत गेले, तेव्हा त्याच्या सकारात्मक बाजू प्रकर्षांने जाणवायला लागल्या. हे क्षेत्र मला मुलांमुळे, त्यांच्याबरोबर वेगवेगळे प्रयोग करता येण्यामुळे तर आवडायला लागलं आहेच, पण या क्षेत्रामुळे मुलांचा मी नव्हे, तर मुलांनी माझा सर्वागीण विकास केला आहे याची मला आता पूर्ण खात्री पटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी जेव्हा अगदी पहिल्यांदा बालवाडी प्रशिक्षणासाठी अर्ज भरायला गेले तेव्हाची गोष्ट. तेव्हा आजच्यासारखे देशीविदेशी ई.सी.सी.एड्.च्या कोर्सेसची सहज माहिती उपलब्ध नव्हती, किंबहुना ‘अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन’बाबत कशी माहिती करून घ्यायची हेही माहीत नव्हतं. त्या दिवशी त्या रांगेतील उभ्या असलेल्या आणि अर्ज घ्यायला आलेल्या मुलींना बघून मी द्विधा मन:स्थितीत पडले आणि दारातूनच मागे गेले, कारण चौकशी केली असता सगळ्या जणी एकूण दहावी किंवा बारावी झालेल्या होत्या, कोणीही तेव्हा तरी माझ्या नजरेस पदवीधर दिसल्या नाहीत. आधीच मी तेव्हा बालशिक्षणाबाबत खरोखरीच ‘अशिक्षित’ होते. मी संभ्रमात पडले, खरंच का हे क्षेत्र कमी शिकलेल्या, ज्यांना बाकी काही जमणार नाही अशा स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभं करणं या उद्देशानं आहे. काय बरं करावं, सुचत नव्हतं; पण त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मी परत धीर करून तिथे गेले. आपल्याला स्वत:ची नर्सरी काढायची आहे हा विचार मनात पक्का असल्याने आणि त्यासाठी त्या वेळेला ठाण्यामध्ये त्या प्रशिक्षणाशिवाय दुसरा पर्याय मला माहीत नसल्याने मी रांगेत उभं राहून अर्ज भरला. यथावकाश प्रशिक्षण पूर्ण करून त्यात पहिला क्रमांक पटकावला. सगळं प्रशिक्षणच मस्त मजेत आणि आवडीच्या मनासारख्या गोष्टी करण्यात घालवता आलं. खरं सांगते, माझ्या एम.कॉम.पर्यंतच्या शिक्षणात मला एवढी मजा नक्कीच कधी आली नव्हती.

बालशिक्षण अभ्यासक्रम सुरू झाला आणि माझ्या लक्षात आलं की, बालशिक्षिका म्हणून खरं तर आपण अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहोत, कारण मुलांचा मेंदुविकास ज्या वयात अत्यंत जोमात असतो त्याच वयाच्या मुलांबरोबर आपल्याला काम करायची संधी असते. मग असं असताना या क्षेत्राला महत्त्व कमी असल्याचं जाणवत होतं. त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळी इतर बालशिक्षिकांबरोबर वावरायचे तेव्हा त्यांच्या बोलण्यातून इतर आपल्याला कमी लेखतात असाच उल्लेख आढळायचा. तसंच हे क्षेत्र आर्थिक बाजूने तर अजिबातच समाधान देणार नसायचं आणि अजूनही बहुतांशी शाळांमधून नाही. बालशिक्षिकांचं स्वत:ला असं कमी लेखणं मनाला भयंकर खटकायचं. आताएवढी हे क्षेत्र आणि त्याबद्दलची जाण तेव्हा निश्चित नव्हती; पण या क्षेत्रात जसजशी मी वावरत गेले, तेव्हा त्याच्या सकारात्मक बाजू प्रकर्षांने जाणवायला लागल्या. हे क्षेत्र मला मुलांमुळे, त्यांच्याबरोबर वेगवेगळे प्रयोग करता येण्यामुळे तर आवडायला लागलं आहेच, पण या क्षेत्रामुळे मुलांचा मी नव्हे, तर मुलांनी माझा सर्वागीण विकास केला आहे याची मला आता पूर्ण खात्री पटली आहे.

बालशिक्षिका म्हणून माझी वाटचाल सुरू झाली तेव्हा एक तर बालशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रभावामुळे आणि वेळोवेळी इतरत्र शिक्षक मार्गदर्शनपर भाषणं ऐकून ऐकून आपण बालशिक्षिका म्हणजे बालकांचा सर्वागीण विकास साधण्याचं महान कार्य करत असतो, असा एक ठाम समज मनात होता. त्यामुळे आपणच काय ते या मुलांचे विकास साधणारे, अशा भावनेने सुरुवातीला या मुलांच्यात मी वावरायचे. भाषा विकास, गणिती विकास, कला विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास. बाप रे! केवढे ते विकास आणि ते आपल्यामार्फत होतात. या मुलांचे आपणच काय ते भले करणार आहोत, असाच एक समज बालशिक्षणाचा अभ्यासक्रम करताना व्हायला लागला. वर्गात त्याच विचाराने त्या लहानग्यांवर मी नजर फिरवत असे. बिचारे मातीचे गोळे. त्यांना आपल्याला आकार द्यायचाय. अजून एक जबाबदारीची आणि मीच तुमची रचनाकार असल्याची भावना मनाला व्यापून टाकायची. त्यांचा सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास आपल्याला करायचा आहे असं वाटत होतं; पण खरं चित्र काय होतं ते बघा..

मी शाळेत रुजू झाले. पहिले दोन दिवस मुलं वर्गात नव्हती. त्यांच्यासाठी वर्ग सजावट करायची होती. माझ्याबरोबरच्या काही जणी चित्र काढत होत्या. माझा चित्र काढण्याशी संबंध माझी शाळा संपल्यावर संपला होता. बालवाडी कोर्सदरम्यान चित्र काढण्यापेक्षा इतर पुस्तकांतील चित्रं फाडून सजावट केली होती. त्यामुळे मला चित्र काढता येतं का हे मला तसं फारसं आठवत नव्हतं, किंबहुना मला चित्र काढता वगैरे येत नाही असंच मला वाटतं होतं. मी अशीच चित्रांची जमवाजमव करून वर्ग सजावट केली. यथावकाश मुलं आली; पण नंतर ती येण्याच्या आधी वर्गातील फळ्यावर रोज काही तरी त्यांच्या स्वागतासाठी वेगवेगळी त्यांना आवडतील अशा प्राण्यांची किंवा कार्टूनची चित्र काढायला पाहिजेत असं वाटलं. सहज म्हणून झाडाला लोंबकळणाऱ्या माकडाचं फळाभर चित्र एका पुस्तकात बघून काढलं. फळ्यावर एक नजर टाकली आणि माझंच मला आश्चर्य वाटलं. कसं काय एवढं छान माकड आलंय बुवा! झालं, त्या दिवशी मुलं आणि मी माकडावर एकदम खूश होतो. आता मी रोज कोणत्या ना कोणत्या प्राण्याचं चित्र काढू लागले. मुख्य म्हणजे काढलेला प्राणी मुलांना बरोबर ओळखता येत होता. आपण काढलेल्या प्राण्याला मुलं त्याच नावाने ओळखत होती, ही त्यांची माझ्या चित्रांबद्दलची पावती, माझा चित्र काढण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवण्यास हातभार लावणारी होती. हा मला सुखद धक्काच होता. माझ्यातला सुप्त चित्रकार मुलांमुळे जागा झाला होता. मुलांनी माझा कलाविकास साधला होता.

तोच अनुभव गोष्ट सांगण्याच्या बाबतीत. ‘‘एकदा काय होतं..’’ असं मी सांगताच मुलं माझ्याकडे गालावर हात ठेवून एकटक बघत गोष्टीच्या सफरीवर जायला तय्यार होतात. आता वर्गातला अगदी हा नेहमीचा अनुभव; पण सुरुवातीला हे असं चित्र नव्हतं. मी खरं तर दोन मुलांची आई झाल्यावरच इथे बालशिक्षिका म्हणून आले होते; पण माझ्या मुलांबाबत गोष्ट हे डिपार्टमेंट माझं अजिबात नव्हतं. ते माझ्या आईचं म्हणजे त्यांच्या आजीचं व मावशीचं होतं. मी कधी त्यांना गोष्ट सांगितल्याचं आठवत नाही; पण वर्गात इथे मुलांचा भाषाविकास साधायचा होता ना, मग गोष्ट सांगायलाच हवी. मला माझ्या आईच्या गोष्टी आणि ती ऐकताना रंगून जाणाऱ्या माझ्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोर यायचे. यांचेसुद्धा चेहरे गोष्ट ऐकताना असेच झाले पाहिजेत एवढंच मनात यायचं. अगदी पहिली गोष्ट मी वर्गात सांगितली तेव्हा वर्गात मुलांबरोबर पालकही होते. गोष्ट संपल्यावर एका आईने विचारलं, ‘‘बाई, नवीनच आहात का?’’ माझ्या गोष्टीचं मूल्यमापन झालं होतं. पुढे मी रोज गोष्ट सांगतच राहिले. रोज एक तरी गोष्ट मुलांना सांगायचीच हा माझा स्वत:साठी मी घातलेला नियम होता, कारण गोष्ट सांगणं या प्रक्रियेतून मुलांशी जी आपली मैत्री होते तेवढी बाकी इतर कशानीच होत नाही हे घरामध्ये माझी मुलं आणि आजी किंवा मुलं आणि त्यांची मावशी यांच्याकडे बघून नक्की माहीत होतं; पण त्याचबरोबर गोष्ट सांगणं मला स्वत:ला खूप आवडतंय हेही जाणवायला लागलं. थोडय़ाच दिवसांत माझ्या गोष्ट सांगण्याच्या ‘क्वालिटी’मध्ये फरक पडलेला मुलांच्या चेहऱ्यावरून जाणवायला लागलं. मुलं आता आपली गोष्ट तन्मयतेने ऐकतात हे कळलं. त्यासाठी त्यांना नेमकी वयानुसार कोणती गोष्ट सांगायची, कशी गोष्ट सांगायची, केव्हा गोष्ट सांगायची याचा नेमका आणि अचूक अंदाज यायला लागला. मुलांनी भाषाविकासातील – गोष्ट सांगता येणे हा माझा विकास साधला होता. कथाकथन हा प्रकार मला जमू लागला. माझ्या व्यक्तिमत्त्वातील कथाकथनकार मला उमजला.

भाषाविकासातील दुसरा टप्पा म्हणजे – गाणी. बाप रे! मुलांसाठी गाणी म्हणायची, तीही नाच करून! सुरुवातीला मी वर्गाची दारं लावून घेत असे. आपल्याला कोणी ऐकणार नाही, पाहणार नाही याची काळजी घेत असे. पण जसजशी र्वष जाऊ  लागली तसतसा वेगवेगळ्या बालगीतांचा संचय करण्याचा नादच लागला. मराठीमध्ये प्रत्येक प्रसंगानुरूप एक तरी गाणं मिळतंच मिळतं किंवा तशी जुळवण्याचाही नाद लागला. बालगीतं – त्यामध्ये बडबडगीतं, अभिनयगीतं, साखळीगीतं, व्यायामगीतं असे किती तरी प्रकार, तर बालकवितांचा तर काय खजिनाच खजिना हाताशी लागला आणि त्याचा उपयोग करायला योग्य वाव मिळाला. भाषाविकासाचा दुसरा टप्पाही माझा मुलांमुळे छान विकसित झाला आहे. त्यात गाणी म्हणणं तर आलंच, पण गाणी रचणं म्हणजे गायिका आणि बाल कवयित्री असा व्यक्तिमत्त्व विकास माझा या बालशिक्षिकेच्या प्रवासात झाला.

आता पुढचा टप्पा. डिसेंबर महिना चालू झाला. स्नेहसंमेलनाचे दिवस आले. ‘‘बाई वर्गाचा एक छानसा नाच बसवायचा असतो.’’ आमच्या मुख्याध्यापिका मला सांगत होत्या. पहिलेच वर्ष. माझ्या शाळेच्या वर्षांतही मी खरोखरीच कधी स्नेहसंमेलनात, नृत्यात भाग घेतला नव्हता. त्या वर्षीचा विषय होता देव. माझ्याबरोबरीच्या त्या वेळच्या शिक्षिका सगळ्या जुन्या होत्या. त्या सराईतपणे कामाला लागल्या. त्या वर्षी माझ्या नशिबाने एक पालक माझ्या मदतीला धावून आले. त्यांनीच गाणं निवडलं, नाच बसवला. माझा त्या वर्षीचा प्रश्न सुटला होता. असाच मला दरवर्षी सोडवता आला असता, पण मला ते मान्य नव्हतं. माझी मुलं, माझा नाच असंच असायला हवं होतं. दुसऱ्या वर्षीपासून विषय मिळाला की गाणी शोधणं, त्याच्यावर काय स्टेप्स बसवता येतील याचा घरी सराव करणं असा अभ्यास चालू झाला. एवढय़ा लहान मुलांचा नाच बसवताना नेमकं काय करावं लागतं, त्यांचं गाणं कसं पाठ करून घ्यावं, ते त्यांना नाच करताना मनसोक्त म्हणू कसं द्यावं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरही गाण्याचे भाव येतात याचं प्रत्येक वर्षी नव्यानं प्रशिक्षण मिळत गेलं. माझीच माझ्यातल्या नृत्य दिग्दर्शकाशी स्पर्धा असायची. माझ्या व्यक्तिमत्त्वातला नृत्य दिग्दर्शक उदयाला आला.

त्याचप्रमाणे वर्गात प्रत्येक गोष्टीचे आम्ही नाटय़ीकरण करत असू. म्हणजे सांगितलेल्या गोष्टींचे नाटकात रूपांतर करून ते वर्गात सादर करायचे असा आमचा उद्योग चाले. प्रत्येक नाटकामध्ये त्यातील पात्रांची निवड, त्यांचे संवाद, ते कसे म्हणायचे याची एका नाटय़ दिग्दर्शकाप्रमाणेच आमच्या वर्गात माझी तयारी चाले. त्यातून आमची सुरेख बालनाटय़े तयार होत. त्याचे आम्ही बाकीच्या वर्गासाठी सादरीकरण करत असू. एक नाटय़ दिग्दर्शक म्हणून माझा प्रवास होत होता, जो एरवी अशक्य होता.

असेच पपेट शो करणं, विविध हस्तकलेच्या वस्तू तयार करणं, टाकाऊतून टिकाऊ  तयार करणं, मुलांसाठी वेगवेगळे खेळ तयार करणं, उपक्रम आखणं यातून आपल्या अंगात उपक्रमशीलता आहे याबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणजेच मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हे जे बालशिक्षणाचे उद्दिष्ट आहे ते माझ्याबाबतच या बालशिक्षिकेच्या प्रवासात साध्य झालं आहे. किंबहुना या मुलांमुळे माझाच सर्वागीण विकास झाला आहे यात काहीही शंका नाही.

आता हेच बघा नं, त्याच्याबरोबर केलेले उपक्रम मी या सदरामार्फत आपल्यापर्यंत पोहोचवले आणि एक लेखिका म्हणून माझा व्यक्तिमत्त्व विकास झाला याचं श्रेय ‘लोकसत्ता’ आणि ‘वाचक’ यांच्या आधी मुलांचंच आहे, कारण त्याच्यामुळेच तर मला उपक्रम करता आले.  एवढा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात वावरल्याने झाला असता.

त्यामुळेच या क्षेत्रात आल्याचा मला सार्थ अभिमान तर आहेच, पण इतरांपेक्षा आपण कमी प्रतीचं आणि सोप्पं काम करत आहेत असंही अजिबात वाटत नाही. माझ्यासारख्या या क्षेत्रात असलेल्यांना मला खरंच सांगावंसं वाटतं, आपलं महत्त्व आपण जाणून घेऊ  या. त्यासाठी आपल्याला काळाच्या बरोबर राहायलाच हवं. मराठी शाळा, त्यांची इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे होणारी गळती, हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्यात मात्र एक सक्षम शिक्षक असलाच पाहिजे जो भाषेपलीकडे जाऊन मुलांचं अनुभवविश्व संपन्न करेल. काळानुसार आपले उपक्रम, त्यासाठीची अभ्यासयुक्त नियोजनपूर्ण तयारी हे सगळं करायलाच हवं. मग माध्यम बाजूला ठेवून मुलं आपल्याकडे येतीलच येतील हे नक्की.

शेवटी एवढंच सांगावंसं वाटतंय, बालशिक्षक हा आपल्याला एक समृद्ध करणारा प्रवास आहे आणि या क्षेत्रात असणाऱ्या आपल्या सर्वानाच हातात हात घालून तो अधिक समृद्ध करायचा आहे.

 ratibhosekar@ymail.com

मराठीतील सर्व शिकू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children education issue
First published on: 10-12-2016 at 00:35 IST