आज न्यायालयात दाखल झालेल्या प्रौढ वयातील घटस्फोटाच्या केसेस पाहून मनात येतं की या सगळ्या समस्या आज नव्याने निर्माण झाल्या आहेत का? आपल्या मागच्या पिढीत त्या अस्तित्वात नव्हत्या का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अर्थातच नकारार्थी आहेत. समस्या या त्या काळातही होत्याच. सामोपचाराने नाही सुटल्या तर त्यासाठी न्यायालयात जाऊन दादफिर्याद मागता येते ही जाणीव मात्र आज निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“खूप सोसलं आत्तापर्यंत. कधी स्वत:च्या पसंतीची साडी घेता आली नाही की कधी मोकळेपणी माझ्या बहिणींना घरी बोलविता आलं नाही. हे कधी कुणाचा अपमान करतील सांगता यायचं नाही. मुलाबाळांची लग्नं झाली. माझी जबाबदारी संपली. मला आता घटस्फोट घ्यायचा आहे.” नीरजा म्हणाली. नीरजा वय वर्षे पासष्ट. एका डॉक्टरची बायको. समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करताना घटस्फोट या शब्दानं धक्का बसावा असं काही नव्हतं. कारण अधूनमधून कुणी ना कुणी असं बोलणारं भेटतंच. तरीही धक्का बसला तो नीरजाचं वय बघून. आत्तापर्यंतचा अनुभव असा होता की या वयातील व्यक्ती समुपदेशनासाठी यायच्या तेव्हा त्यांची गरज आपलं दु:ख दुसऱ्यापाशी बोलून दाखवणं ही असायची. त्यांच्याशी बोलताना जाणवायचं की आहे या परिस्थितीत बदल होणार नाही हे त्यांनी जाणलेलं असायचं आणि स्वीकारलेलंही. जोडीदाराविषयी त्यांच्या अनेक तक्रारी असल्या तरी त्यांची मूळ समस्या असायची ती त्यांचा एकाकीपणा. प्रौढ वयातही साध्यासाध्या गोष्टींसाठी मन मारायला लागल्यामुळे वाटय़ाला आलेलं वैफल्य आणि आपण आपल्या सांसारिक स्थितीत बदल करू शकत नाही या जाणिवेमुळे आलेली अगतिकता. यातून बाहेर पडण्यासाठी नवऱ्यापासून वेगळं राहावं वा न्यायालयात जाऊन घटस्फोट मिळवावा असं सांगणारी व्यक्ती अगदी तुरळक असायची. गेल्या काही वर्षात मात्र घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे ते फक्त तरुणांमध्ये नाही तर ज्येष्ठ वयातील जोडपीही कायदेशीररीत्या विभक्त होण्यासाठी पुढे येत आहेत. पुण्यातील कुटुंब न्यायालयातील उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत प्रौढ वयातील एकूण १६४ जणांनी घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज केला आहे. २९ जणांना परस्पर संमतीने घटस्फोट मिळाला आहे तर ४० जणांना मेंटेनन्स द्यायची अॅर्डर न्यायालयाने काढली आहे. वास्तविक पतीपत्नीमधील नातंच असं आहे की वादसंवाद, मत-मतांतरे सततच होत असतात. त्यातही गंमत असते. त्यामुळे संसाराची रंगत वाढत असते. पण हे कुठवर? जोवर या वादातही संवाद असतो आणि मतभेदांमध्ये कडवटपणा नसतो तोवर. तोवर कितीही भांडणं झाली तरी जुळवून घ्यायची इच्छा असते. ‘आयुष्यभर फक्त मी आणि मीच तडजोड करत आले आहे. आता मला असहय़ झालं आहे. मला घटस्फोट हवा आहे.’ असं जेव्हा एखादी व्यक्ती वकिलाला भेटून सांगायला लागते तेव्हा या विधानामागे वेदना असते आणि नातं मुळापासून उस्कटत चाललं असल्याची भावना. एकमेकांविषयीचा इतका कडवटपणा काही महिन्यात वा काही दिवसांत तयार झालेला नसतो. त्याला मागचे संदर्भ असतात. किती मागचे हे आपल्या कल्पनेपलीकडचे असतात.

मराठीतील सर्व शिशिरातला वसंत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About court article
First published on: 08-10-2016 at 01:13 IST