प्रत्येक कलाकाराची सृजनता त्याला एक आत्मिक आणि त्यातूनच आध्यात्मिक आनंद देत असते. हा आनंद, तो अनुभव ते ते कलाकार मांडणार आहेत खास चतुरंगच्या रसिक वाचकांसाठी. कला मग ते गायन असो, वादन असो, नृत्य असो की लेखन, चित्रकला की अन्य काही प्रत्येक कलाकाराचे आपल्या कलेशी एक घनिष्ठ नाते असते. ती कला त्यांच्याशी संवाद साधत असते, त्यांना शिकवत असते, त्यांना परिपूर्णतेचा अनुभव देत असते.. काय असते कलाकाराची ही अनुभूती.. ही त्यांच्याच शब्दांत, दर शनिवारी..
किशोरीताईंना, माझ्या गुरूंना मी पहिल्यांदा भेटले आणि सरस्वतीच्या मंदिरात गेल्यावर जे वाटणं असतं ते अनुभवलं. त्यांचं व्यक्तिमत्त्वच असं आहे ना की जो कोणी त्यांच्या सान्निध्यात येईल तो त्यात हमखास विरघळून जाणारच. ताईंनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि मी मला हळूहळू सापडत गेले. माझ्या अस्तित्वाचा अर्थ, माझ्या आयुष्याचं ध्येय.. सारं काही..
मी त्यांच्या घरी जायला लागले, मला तो दिवस लख्ख आठवतोय. ताईंची शिस्त म्हणजे वेळेवर पोहोचणं आणि तेही साडी नेसूनच. मी तेव्हा सतरा-अठरा वर्षांची होते फक्त. साडीची सवय नव्हतीच. तारांबळ उडाली होती माझी पहिल्यांदा त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत. माझ्या आधीच माझे काही गुरूबंधू, गुरूभगिनींनी तानपुरा लावायला सुरुवात केली होती. पाय धुवून मीही तानपुरा हाती घेतला. देवघरात ताईंची पूजा सुरू होती. घंटेचा मंजूळ स्वर आणि ताईंच्या परफ्यूमचा दरवळ खोलीत हलकेच जाणवत होता.. आणि गाभाऱ्यातून देवीचं दर्शन घडावं तसं ताईं तिथे आल्या. मुद्रा गंभीर. सुरात मिळवलेले तानपुरे आम्ही छेडू लागलो. ताई यमनाचे सूर आळवू लागल्या, ‘मो मन लगन लागी’  तीनतालातली बंदिश सुरू झाली.. स्वरमंडल छेडलं गेलं होतं.. वातावरणात फक्त यमन.. हळूहळू हातातील तानपुराच्या स्पर्शही जाणवेना.. सर्वाचे डोळे मिटलेले होते.. यमन रागात बुडण्याची माझी अतीव इच्छा.. आणि यमन रागाचा ताईंना झालेला साक्षात्कार.. त्यांचं दिसलेलं साक्षात्कारी रूप मलाही दाखवू शकण्याचं त्यांचं सामथ्र्य.. विलक्षण भाववस्था होती ती. अगदी आजही, या क्षणी मी ती अनुभवू शकते.. मला स्वत:लाही विसरवण्याची जबरदस्त ताकद असणाऱ्या त्या गाण्याने मला इतकं बांधून ठेवलं की माझा पुढचा प्रवास दृष्टिपथात आला, दिसू लागला.. पण त्याचमुळे मला त्याही पूर्वी घेतलेल्या माझ्या दोन निर्णयाचं समाधान वाटत होतं..
  मला गणित प्रचंड आवडतं. दहावीत तर मला गणितातलं सुवर्ण पदकही मिळालं होतं त्यामुळे गणितातच करिअर करायचं ठरवत होते. त्याप्रमाणे रुइया कॉलेजला अ‍ॅडमिशनही घेतली अर्थात माझं गाणं सुरू झालं होतं त्यावेळी. दिल्लीच्या गंधर्व महाविद्यालयात गाण्याचा कार्यक्रमही करुन आले होते पण आवश्यक तो वेळ रियाझाला मिळेना. तेव्हा निर्णयाची वेळ आली. गणित विषय सोडून वाणिज्य शाखा निवडण्याचं मी ठरवलं. त्यासाठी सहा महिने ‘रुइया’ मध्ये घालवून ‘पोद्दार’ला अ‍ॅडमिशन घेतली. दरम्यान गाणं सुरू झालं होतं, गुरू वसंतराव कुलकर्णीकडे. एकदा पुण्याचे नानासाहेब देशपांडे, सवाई गंधर्वाचे जावईबापू, यांचं गाण्याचं आमंत्रण मला मिळालं होतं. त्यांच्याकडे दिग्गजांची मैफल भरली होती. हिराबाईं बडोदेकर, पु.ल.देशपांडे, वसंतराव देशपांडे आदी मान्यवरांसमोर गायचं होतं. दडपण होतं, पण अखेर शाबासकीची थाप पाठीवर पडली. तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की मला गाणं गाताना आनंद मिळतो आहेच, पण आपल्या गाण्याने दुसऱ्यांनाही आनंद देता येतोय.. हा दुहेरी आनंद आहे. आनंदाचं एक वर्तुळच पूर्ण होत होतं त्यामुळे. मला गाण्यातली ताकद समजली आणि त्याच वेळी पुन्हा एकदा माझ्या समोर निर्णयाचा क्षण आला. सीए व्हायचं की गायक ? मला बारावीत चांगले मार्क मिळाले होते त्यामुळे पुन्हा एकदा चार्टर्ड अकाऊंटटं होण्याची माझी जुनी इच्छा डोकं वर काढू लागली. त्यासाठी मला प्रवेश परीक्षा द्यायची होती. काय करावं निर्णय होत नव्हता.  गाण्याचा उपयोग उदरनिर्वाहासाठी होईल की नाही याची खात्री नव्हतीच, किंबहुना असा विचार मनाला स्पर्शही करत नव्हता. पण कोणत्या गोष्टीने मला निखळ आनंद मिळणार होता आणि कोणत्या गोष्टीने माझ्या जीवनाला अर्थ मिळणार होता? हेही प्रश्न महत्त्वाचे होते. गाणं तर माझा श्वास होता.. त्यातला आनंद खरंच मोलाचा होता, मग विचार करता करता लक्षात आलं की तोच मोलाचा, बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत..
ताईंकडचा अभ्यास आता सगळ्या शंका-कुशंका मागे ठेवून निश्चितपणे प्रवाही झाला होता. हळूहळू स्वत:विषयीचे संदेह, किंतु, शंकाही मिटायला लागल्या. गाण्यातला आत्मिक आनंद मिळू लागला होता. मला आठवतंय, ताईंकडचा प्रत्येक दिवस मला वेगळा आनंद देऊन जायचा.. ताईंनी स्वरमंडल छेडलं की आसमंतात नाद भरून राहायचा.. एकेक स्वर आपण सगुणाकडून निर्गुणाकडे जातोय ही भावना निर्माण करायचा.. आणि आम्ही सुद्धा त्यात एकाग्र व्हायचो.. ताईंना आमच्याकडून शंभर टक्के शरणागती हवी असायची.. शरणागती संगीताला.. नादब्रह्माला.. यमन राग, त्याची बंदिश, त्याचा ताल हा त्याचा सांगाडा वरच राह्य़चा आम्ही त्यात खोल खोल आत उतरलेले असायचो.. देहभान विसरलेलो आम्ही.. या अनुभवातूनच मला, मी का गावं? मी कशासाठी गायचं? या प्रश्नांची जशी उत्तरं मिळाली तसंच हे गाणं सशक्त करण्यासाठी मी काय करायचं आहे, याचंही उत्तर मिळालं. आतापर्यंत शिकण्याचा, बाह्य़ प्रवास सुरू होता. आता आत्मशोध सुरू झाला. तोपर्यंत मी वंसतरावांकडे आग्रा-ग्वाल्हेरची गायकी शिकले होते. ताईंची गायकी ही मी इतकी वर्षे शिकलेल्या गाण्यापेक्षा खूप भिन्न होती. आवाजाचा लगाव भिन्न होता, गाण्यातली शिस्त वेगळी होती, आकारयुक्त गायकी होती.. त्यांचा स्वर माझ्या कानांत, हृदयात सामावून गेला, किंबहुना माझ्या अस्तित्वातच सामावून गेला. तो भिडणारा आवाज माझ्या कंठातून यावा याने मी झपाटले गेले.
ताई म्हणत, गळा पाण्यासारखा हवा, जिथे मन पोहोचतं तिथे गळा पोहोचला पाहिजे.. त्यासाठी माझे अहोरात्र परिश्रम सुरू झाले.. गाणं शिकणं म्हणजे त्यात खोल उतरणं, हे कळायला लागलं. तन, मन,   बुद्धी आणि आत्मा यांच्या एकत्रित बंधातून संगीत निर्मिती होते याची जाणीव होती ती.. मग ताल-लयीचा अभ्यास, बंदिशींचा अभ्यास सुरू झाला, आवाज कमावण्यावर भर देणं सुरू झालं.
प्रत्येक कलाकाराला गुरुकडून विद्या घेऊन ती पचवून मार्गक्रमणा करायची असते, स्वत:चा मार्ग शोधायचा असतो. खरं तर रागसंगीतात परंपरा महत्वाची. संगीतातल्या घराण्यांनी अनेक गायकी निर्माण झाल्या, मग आपला गळा,बुद्धी, मन यांच्या कुवतीनुसार स्वर, लय यांच्या अभ्यासातून आणि स्वरभाव-लयभाव-शब्दभाव यांच्या अभ्यासाने घराणी संपन्न होत गेली. पण या पारंपरिक गाण्यातून स्वत:च्या सृजनशीलतेची वाट धरणं हा देखील साधकाच्या संगीत प्रवासातील महत्वाचा टप्पा. तोच तुमचा खरा प्रवास असतो. तुमचा गळा कसा आहे, तुमची बुद्धी कशी आहे, तुमचा आत्मनंद कशात आहे याचा शोध महत्त्वाचा. इथेच माझ्यातला श्रोता प्रगल्भ व्हायला लागला. माझं गाणं मलाच स्पर्श करतंय का, काय गाऊन मला खरा आनंद मिळतोय आणि हा आनंद इतरांना वाटून तो ठेवा सतत वाढवता येतोय का या प्रश्नातून मी मला सापडत गेले. संगीतातून मिळणारा उच्चकोटीचा आनंद मिळायला लागला, ज्याला कुमारजी ‘तृप्ती आनंद’ म्हणत. ती अशी तृप्ती असते जी कधीच पूर्ण होत नाही. वेगळीच भावावस्था जिथे तुम्ही स्वरांशी तादात्म्य पावता..  १९८३ चं वर्ष होतं ते. ‘सवाई गंधर्व महोत्सव’ हा खूपच प्रतिष्ठेचा मानला जातो. अगदी देशभरात. सगळे नामवंत त्यात गात असत. मुख्य म्हणजे त्यावेळी आपलं गाणं झालं की कलाकार निघून जात नसत, उलट नवोदितांना प्रोत्साहन द्यायला सारे उपस्थित असायचे त्यामुळे नामवंतांची दाद मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असायचं. मी अगदीच नवखी होते त्यावेळी. जेमतेम वीस वर्षांची. त्यावेळी मी मुंबईत राहात होते. महोत्सवासाठी पुण्यात आले. आयोजकांनी एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती. माझी गाण्याची वेळ रात्री नऊची ठरली होती. त्यावेळी साजेसा ‘नंद’ राग मी निवडला होता. गेला महिनाभर हा राग मी घोटत होते. गळ्यावर चढवत होते. मी समारंभस्थळी निघणार तेवढय़ात गोखले यांचा फोन आला की तुमचं गाणं नऊ वाजता नाही तर अकरा वाजता होईल. झालं.. मी निवडलेला ‘नंद’ राग रात्री अकरा वाजता गाऊन चालणार नव्हता. समयचक्राप्रमाणेच मी ‘बागेश्री’ची निवड केली. आता बागेश्री डोक्यात घोळू लागला. त्यावेळी मी इतकी नवखी होते की आपल्याला ‘सवाई’साठी बोलावलंय आणि आपल्याला गायचंय याचंच अप्रूप जास्त होतं. त्यामुळे ‘मी हा राग गाणार आहे. दुसऱ्या कुणाला तो गायला सांगू नका,’ असं काही सांगायचं असतं हेही माहीत नव्हतं.. रात्री साडेदहा वाजता पुन्हा फोन आला, तुमचं गाणं आता बारा बाजता होईल.. असं करत करत एक वाजता मी तिथे पोहोचले आणि माझं गाणं सुरू झालं पहाटे तीन वाजता! आता या वेळेसाठी मी राग निवडला ‘जोगकंस’. माझे गुरू पं.वसंतराव कुलक र्णी यांचे गुरू म्हणजे माझे दादागुरू पं. जगन्नाथबुवा पुरोहितांनी स्वत: रचलेला हा राग.. रंगमंचावर पोहोचले. समोर जवळजवळ दहा हजार प्रेक्षक. त्यातही समोरचे सगळे दिग्गज. गंगूबाईं हनगल, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे.. तानपुरे मिळवेपर्यंत हळूहळू समोरचा माहोल धूसर होत गेला. गुरूंचं, ताईंचं स्मरण केलं.. आणि गाण्याला सुरुवात झाली. तानपुऱ्याचा पहिला झंकारच मला वेगळ्या जगात घेऊन गेला. माझं अस्तित्व जणू सूरांमध्ये विरघळून गेलं. मी त्यातून बाहेर पडले ज्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. पण खरं सांगू ती जी भावावस्था होती ती विलक्षण होती, संगीताने ‘सिद्ध’ झालेली ती बैठक. या क्षणी आता कुणी जागं करू नये, इथून हलू नये, कुणाशी बोलू नये असं वाटत होतं. मन अतिशय तरल.. शरीर हलकं ..
 संगीत हाच मी निवडलेला आनंद मार्ग आहे. पण आता जीवनाच्या या टप्प्यावर गायिका म्हणून तृप्तीचा आनंद, कधी बैचेनी, कधी तळमळ, कधी ओढ अनुभवत असताना आणि माझ्याकडे गाणं शिकायला येणाऱ्या शिष्यांकडून जेव्हा गाणं शिकायची तीच ओढ, तेच समर्पण दिसतं तेव्हा मी समाधानी होते. तरीही मला अनेक प्रश्न पडतात, अनेक वर्षांच्या रियाझाने प्रगल्भ झालेला गायक मैफिलीत जेव्हा नवनवीन निर्मिती करतो तेव्हा तो केवळ एक माध्यम नसतो का ? किंबहुना गायकाचं नसलेपण हेच त्याचं अस्तित्वच आहे का? ज्याप्रमाणे संगीतात संपूर्ण सकारात्मकता हवी तसंच जीवनातही सकारात्मकतेची आवश्यकता आहे ना! त्यासाठी षड्रिपूंवर ताबा नको का मिळवायला ? ..