सरिता आवाड sarita.awad1@gmail.com
दोन एकटय़ा व्यक्तींना निवृत्तीच्या वयात भेटलेली सोबत आणि लग्नाशिवाय जुळलेलं घट्ट नातं मला माझ्याच शेजारी पाहायला मिळालं. या सहजीवनास काही जणांनी विरोध के ला खरा, पण काही जवळच्या नात्यांनी, मित्रमंडळींनी त्याचं स्वागत के लं आणि या कु टुंबाच्या प्रेमाची ऊबही अनुभवली. पण यशस्वी झालेल्या या ‘लिव्ह इन..’ नात्यालाही जगण्यातले भोग चुकले नाहीत. राजाभाऊ देशपांडे आणि सविता नाखवा यांच्या २५ वर्षांच्या अतूट प्रेमाची आणि सुंदर सहजीवनाची ही गोष्ट.

कौटुंबिक नातेसंबंधांपलीकडची जिव्हाळ्याची नाती, मुळातल्या नात्याला पूरक असा सभोवताल, यांचं मनोज्ञ दर्शन मला नारायण ऊर्फ राजाभाऊ देशपांडे आणि सविता नाखवा या दोघांच्या निमित्तानं झालं आणि खूप आनंद झाला. आमच्याच ज्येष्ठ नागरिक वसाहतीत ते दोघे २५ वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहात होते.

Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना

राजाभाऊ देशपांडे मूळचे संगमनेरचे. निम्न मध्यमवर्गातल्या कुटुंबातले मोठे भाऊ. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच पैसे कमवायची गरज निर्माण झाली. मॅट्रिक होण्याच्या आधीच ते संगमनेरच्या प्रसिद्ध डॉ. गाडगीळ यांच्याकडे नोकरी करायला लागले. डॉक्टरांचे हिशोब सांभाळायला त्यांनी सुरुवात केली. प्रामाणिकपणा आणि लाघवी स्वभाव यामुळे थोडय़ाच दिवसात त्यांनी डॉक्टरांचा विश्वास संपादन केला आणि ते अगदी घरचेच झाले. डॉक्टरांच्या मुलांना ते भावासारखे होते. काही वर्षांनी त्यांचं बघून-सवरून लग्न झालं. पण वधू एकच रात्र राहून माहेरी निघून गेली. राजाभाऊंना लग्नाचा फक्त डाग लागला, त्यांच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. डॉक्टरांकडे काम चालूच होतं. डॉक्टरांच्या पत्नीनं संगमनेरला शाळा सुरू केली. त्या शाळेच्या मदतीसाठी वर्षांतून एकदा नाटक होत असे. त्यात राजाभाऊ उत्साहानं काम करायचे.

आपल्या मुलांना कॉलेजच्या शिक्षणासाठी गावाबाहेर जावं लागू नये, म्हणून संगमनेरमध्ये एक कॉलेज काढायची कल्पना काही जाणत्या मंडळींच्या मनात आली. डॉक्टरांनी आणि त्यांच्या मित्रांनी या कल्पनेचा जिद्दीनं पाठपुरावा केला. गावातल्या उद्योजकांनी गावाबाहेर जमीन देऊ केली आणि कॉलेज उभं राहिलं. डॉक्टरांनी विश्वासानं राजाभाऊंवर कॉलेजच्या हिशोबनीसाचं काम सोपवलं आणि हादेखील विश्वास त्यांनी सार्थ केला. कौंडिण्य सरांच्या  नेतृत्वाखाली हे कॉलेज नावारूपाला आलं. कॉलेजसमोर कर्मचाऱ्यांची वसाहत उभी राहिली आणि त्यात राजाभाऊ आणि त्यांची आई राहायला लागले. दरम्यान, डॉक्टरांच्या ज्येष्ठ चिरंजीवांचं लग्न होऊन शैला वहिनी या गाडगीळ परिवारात सहभागी झाल्या. त्या मुंबईला ‘के.ई.एम.’ रुग्णालयात नर्सिग करत होत्या. बरोबर काम करणाऱ्या अनेकींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यातलीच एक मैत्रीण, सविता नाखवा. सविता हुशार आणि कार्यक्षम होती. खरं तर तिला डॉक्टर व्हायचं होतं, पण थोडक्यासाठी प्रवेश हुकला आणि तिनं परिचर्येचा(नर्सिग)अभ्यासक्रम निवडला. कोळी समाजात जन्मलेल्या सविताताईंचं लग्न झालं नव्हतं. शैला वहिनींची राजाभाऊंशीही ओळख झाली होतीच. राजाभाऊ आणि सविता एकमेकांना अनुरूप आहेत, असं त्यांना वाटलं. त्या दृष्टीनं त्या दोघांशी बोलल्या आणि सविताताईंना घेऊन संगमनेरला आल्या. तिथे दोघांचा परिचय झाला. दोघंही निवृत्तीच्या जवळ आले होते. पण तब्येती निकोप होत्या. काही भेटीगाठींनंतर दोघांनी शैला वहिनींना हिरवा सिग्नल दिला.

मात्र एक महत्त्वाची अडचण होती, ती म्हणजे राजाभाऊंना अद्याप घटस्फोट मिळाला नव्हता. गेल्या अनेक वर्षांत त्यांचे आपल्या पत्नीशी काहीच संबंध नव्हते. पुन्हा तिचा शोध घेऊन रीतसर घटस्फोट घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे पुन्हा लग्न न करता एकत्र राहायचा पर्याय त्यांनी निवडला. या निर्णयाला त्यांच्या दोन्ही भावांनी कसून विरोध केला. पण बहीण, आई, यांनी पाठिंबा दिला. मुख्य म्हणजे गाडगीळ परिवार त्यांच्या मागे ठाम उभा होता. छोटासा समारंभ करून त्यांनी संगमनेरमध्ये आपल्या सहजीवनाला सुरुवात केली. सुरुवातीस सविताताई मुंबईला काम करत होत्या आणि संगमनेरला येऊन जाऊन होत्या. दोनएक वर्षांनी राजाभाऊंच्या आईची तब्येत बिघडली. म्हणून थोडी आधी निवृत्ती घेऊन सविताताई संगमनेरला कायमच्या आल्या. आई थोडय़ा एककल्ली, तऱ्हेवाईक होत्या. पण सविताताईंनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांची मनापासून काळजी घेतली. कॉलेजसमोरच्या प्रज्ञा सोसायटीत राजाभाऊंचं घर होतं. तिथल्या भगिनीवर्गानं त्यांचा खुल्या मनानं स्वीकार केला. हे साल होतं १९८५. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हा शब्दप्रयोगही त्यांना माहीत नव्हता. पण राजाभाऊंचा उत्साही आणि सालस स्वभाव सगळ्यांनी अनुभवला होता. उतारवयात का होईना, त्यांना चांगली सोबत मिळाली, याचा आनंद मोठा होता. काही वर्षांतच त्यांच्या आईंचं निधन झालं. आईच्या अखेरच्या आजारपणात सविताताईंनी अतिशय मनोभावे सेवा केली. आपल्या परिचर्येच्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग केला. त्यामुळे आसपासच्या सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव आणि आपुलकी निर्माण झाली.

एव्हाना सविताताई संगमनेरला चांगल्याच रुळल्या. आयुष्यात उशिरा का होईना, लाभलेल्या संसारात रमून गेल्या. स्वयंपाकाचा त्यांना अनुभव नव्हता. त्यांच्या घरी आई, आजी, मोठी बहीण हे खातं सांभाळायच्या. पण आता मात्र शेजाऱ्यांच्या मदतीनं सगळं शिकल्या. स्वभाव मुळात आनंदी आणि बोलका. शिवाय मदतीला कायम तयार. साहजिकच त्यांच्याभोवती गोतावळा जमला. अनेक उपक्रमांत त्या सहभागी व्हायच्या. मग तो सोसायटीतल्या बायकांचा योगासनांचा वर्ग असो, नाही तर लक्ष्मीपूजनाचं हळदीकुं कू. रंगपंचमीला तर सगळ्या स्त्रियांचं रंग खेळून झालं की सविताताईंकडे कॉफी आणि चटकदार भेळ अगदी ठरलेली. राजाभाऊ नर्मविनोदी, पण खूप बोलणारे नव्हेत. त्यांच्याही चेहऱ्यावर आता तजेला आला. ‘सवितामुळे माझं आयुष्य बदललं, आनंदी झालं’ असं त्यांनी बोलूनही दाखवलं. आता तेसुद्धा निवृत्त झाले होते.

काळ पुढे धावतच होता. आयुष्यभर नोकरीनिमित्त बाहेर असलेले डॉक्टर गाडगीळांचे धाकटे चिरंजीव अरविंद गाडगीळ निवृत्तीनंतर संगमनेरला परतले. डॉक्टर गाडगीळांचंही निधन झालं होतं. अरविंद गाडगीळ आणि राजाभाऊंची वरचेवर गाठभेट व्हायला लागली आणि गप्पाही व्हायला लागल्या. या गप्पांमधून दोघांना असं वाटलं की निवृत्त आयुष्य आपण अशा ठिकाणी काढावं जिथे वैद्यकीय सुविधा असतील, अन्य सुखसोयी असतील, पण जो वृद्धाश्रम नसेल. योगायोगानं तेव्हाच पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वसाहतीची संकल्पना विशद करणारा लेख वर्तमानपत्रात आला. आपलं स्वप्न प्रत्यक्षात येतंय असं दोघांना वाटलं. गाडगीळांच्या विनंतीवरून प्रकल्पाची चौकशी करायला राजाभाऊ पुण्यात आले आणि दोघांसाठी घराचं बुकिंग करूनच परतले. लगेच २००२ मध्ये ही दोन्ही कुटुंबं पुण्यात या प्रकल्पात राहाण्यासाठी दाखल झाली.

या वसाहतीतील सुरुवातीचा कालखंड नव्या नवलाईचा होता. सगळे रहिवासी नुकतेच निवृत्त झालेले, साठीच्या आतबाहेरचे ‘नववृद्ध’ होते. डोळे शांत करणारी हिरवाई, मागे उंच डोंगर, पावसाळ्यात दिसणारे धबधबे, आवारात टुमदार देऊळ अशा वातावरणात ही निरनिराळ्या गावातली, निरनिराळ्या क्षेत्रातली मंडळी जमली. त्यात प्रसिद्ध लेखक गो. पु. देशपांडे, आयुर्विम्याचे माजी अध्यक्ष श्री. जोशी, पु.ल.देशपांडे यांचे निकटवर्ती मधु गानू अशा खास लोकांचीही मांदियाळी होती. मागच्या अंगणात कडुनिंबाचं मोठं झाड होतं. त्या झाडाभोवती बांधलेल्या पारावर संध्याछायेत ही मंडळी गप्पा मारायची. या पाराला ‘अत्रे कट्टा’ असं नाव मिळालं. राजाभाऊ या कट्टय़ाचे ‘मॉनिटर’ बनले. वाचनालय, ‘दिवाळी पहाट’चा संगीत कार्यक्रम अशा उपक्रमांत सहभागी व्हायला लागले. सविताताईंनाही इथे राहाणं पसंत पडलं. मुख्य म्हणजे इथे उत्कृष्ट कँटीन होतं. तिथे प्रेमानं,आग्रहानं वाढणारी मंडळी होती. पुरणपोळीसकट सगळं तिथे मिळत होतं. स्वयंपाकाचा मुळात थोडा कंटाळा असलेल्या सविताताईंना ही सोय खूपच आवडली. भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्यात गच्चीत होणारा भोंडला सगळ्या स्त्रियांच्या आवडीचा. गच्चीत कडेकडेनं कुंडय़ा होत्या, परिश्रमपूर्वक सुंदर बाग फुलवली होती. अशा फुललेल्या गच्चीत गेल्या-गेल्या ‘स्वर्ग धरेला चुंबायाला खाली लवला मजला गमला..’ अशी अनुभूती मिळायची. त्या बागेत होणाऱ्या भोंडल्यात गाणी म्हणणं, खिरापत करणं, दुसऱ्यांची खिरापत ओळखणं सविताताईंना मनापासून आवडायचं. कधी संगमनेरला आल्या की शेजारी राहणाऱ्या मृणाल गोसावींना किती किती सांगू असं त्यांना व्हायचं. कॉलेजचे प्राचार्य कौंडिण्य निवृत्तींनंतर पुण्याला याच वसाहतीत आले होते. मृणालताईंनीसुद्धा तिथे यावं असा सविताताईंचा आग्रह असायचा. छोटय़ा मोठय़ा सहलीही निघायच्या. विशेष म्हणजे इथे राहणाऱ्या आरती वैद्य यांनी ‘लिव्ह-इन..’ या विषयावर नाटुकलं लिहिलं आणि इथल्याच कलाकारांना घेऊन सादरही केलं.

संध्याकाळी हिरवळीवर गप्पांचे फड रंगत होते. सविताताई नर्सिगच्या क्षेत्रातले अनुभव सांगायच्या. असे मजेत दिवस चालले असताना राजाभाऊं ना कर्क रोग झाला. काखेत लहानशी गाठ आल्याचं निमित्त झालं. सविताताईंना वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असल्यानं त्यांनी लगेच योग्य वैद्यकीय उपचार मिळतील अशी खबरदारी घेतली. पण आजार दिवसेंदिवस बळावत गेला. सविताताईची दक्ष आणि प्रेमळ काळजी होतीच. पण २०१० मध्ये राजाभाऊंचं या आजारानं निधन झालं आणि सविताताई एकाकी झाल्या.

तशी त्यांना आर्थिक विवंचना नव्हती. स्वत:चं निवृत्तिवेतन मिळत होतं. पण लग्न झालेलं नसल्यामुळे राजाभाऊंचं फॅमिली पेन्शन मात्र त्यांना मिळू शकलं नाही. राजाभाऊं ची सोबत हरपल्यावर त्यांचा जीवनरस हळूहळू आटत गेला. अजूनही त्या संध्याकाळी हिरवळीवर गप्पा मारायला जायच्या. पण त्यांच्या बोलण्यात तोचतोचपणा यायला लागला. बोललेल्या, ऐकलेल्या गोष्टींचा विसर पडायला लागला. डिमेंशियानं त्यांना ग्रासलं. संगमनेरच्या मृणालताई आता त्यांच्या शेजारी राहायला आल्या होत्या. बँकेची कामं करताना सविताताईंना त्यांची खूप मदत व्हायची. पण मृणालताईंनासुद्धा सविताताई कधी कधी ओळखायच्या नाहीत. असं असलं तरी संगमनेर असा शब्द कानावर पडला, की त्यांची स्मरणसाखळी जागी व्हायची. त्यांचं असं विझून जाणं पाहिलं की राजाभाऊंचा अभाव त्यांना सोसला नाही हे लक्षात येत होतं. अशा नाजूक अवस्थेत शेजारच्या मृणालताई, रवी-विद्या पंढरपुरे यांनी त्यांना खूप समजून घेतलं. सुदैवानं उज्ज्वला ही तरुण, उत्साही मुलगी त्यांच्यासोबत २४ तास राहायला आली. तिनं सविताताईंची चांगली देखभाल केली. संध्याकाळी ती त्यांना नीटनेटकं करून बागेत फिरवत असे. पणतीमधलं तेल संपल्यावर ज्योत विझून जावी तशा त्याही पाच-सहा महिन्यापूर्वी या जगातून निघून गेल्या. ‘ना ऊन आणिक सावली’ अशा जगात राजाभाऊंच्या पावलावर पाऊल टाकत.

‘आता कितीसे चालणे?; सोपा उतारच शेवटी.. झाले जरा मागे-पुढे तरीही तिथे भेटू पुन्हा’ या विंदांच्या ओळी आठवतात. त्या ‘ऊन आणिक सावली’ नसलेल्या जगात राजाभाऊ आणि सविताताई भेटलेच असतील, असं मीच मला समजावते!