आरती अंकलीकर

दैवी गायिका, अत्युत्तम गुरू आणि संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्यावर जे रसायन तयार होईल, ते मी गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्याकडे शिकताना अनुभवलं. कडक शिस्तीच्या ताईंची जशी आदरयुक्त भीती वाटे, तसंच त्या भावोत्कटतेनं गाऊ लागल्यावर संपूर्ण वातावरण, अगदी आम्हालाही रागमय करून टाकतात, या जादूचं प्रचंड आकर्षण वाटे. साकारातून निराकाराकडे, मूर्ततेकडून अमूर्ताकडे जाण्याचा.. नादब्रह्माच्या अमूर्ततेचा तो अनुभव होता!

scene of Utsav Ganeshacha aadar Stree Shakticha based on education concept of teacher Swati Deshmukh
‘उत्सव गणेशाचा आदर स्त्री शक्तीचा’ ज्यांच्या कार्यावर देखावा त्यांच्याच हस्ते उद्घाटन
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
Descriptions of Lord Ganesha by various sants
बुद्धिदेवता ओंकारब्रह्म
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
ladki bahin yojana shri ram mandir drug side effects topic in ganeshotsav themes
लाडकी बहीण योजना, श्रीराम मंदिर,अमली पदार्थांचे दुष्परिणाम; गणेशोत्सवातील देखाव्यांत वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी
Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा

शाळेत एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर शाळा सुरू होताना तयारी करण्याची मजा काही और असे. नवीन पुस्तकं, वह्या, त्यांना कव्हर घालणं, लेबलं चिकटवणं, नवीन दप्तर, कधी नवीन गणवेश, कधी आदल्या वर्षीचा उसवून मोठा केलेला, नवा वर्ग, नवीन शिक्षिका.. पण एका गुरूकडून दुसऱ्या गुरूकडे जाताना अशा कोणत्याही तयारीची गरज नव्हती. ना पुस्तक, ना वह्या. मला कोणत्याही गुरूनं कधी काहीही लिहून दिलं नाही आणि मला लिहून घेऊ दिलं नाही. सगळं मेंदूत साठवायचं! राग, बंदिशी, आलाप, ताना, सगळं काही.

गानसरस्वती किशोरी आमोणकरांना सगळी शिष्यमंडळी ‘ताई’ असंच संबोधत. ताईंकडे जाण्यासाठी करावी लागलेली सगळय़ात महत्त्वाची तयारी म्हणजे मानसिक तयारी. आधी शिकलेलं सगळं काही पुसून पाटी कोरी करून ती नव्यानं लिहिण्यासाठीची मानसिक तयारी. कालांतरानं पुसलेली अक्षरंसुद्धा परत उमटू लागली, दिसू लागली नवीन अक्षरांबरोबर. नकळत वेगवेगळय़ा गायकी एकत्र आल्या आपसूकच. पण ताईंसमोर पहिल्यांदा बसताना, त्या क्षणी मात्र पाटी कोरी हवी होती. पाचवीतून परत पहिलीत गेल्यासारखं वाटत होतं मला. पाण्यानं भरलेला स्पंज पिळल्यावर जसा होतो, तशी मी ताईंचे सूर प्यायला आतुर. भाव अनुभवायला आतुर. शिकताना स्पंज हा कोरडाच हवा ना! ग्लास रिकामाच हवा. संपूर्ण शरणागती हवी. समर्पणभाव हवा.

ताईंना कार्यक्रमामध्ये वेगवेगळय़ा मूडमध्ये पाहिलं होतं. अनेक वेळा सुरुवातीला काही काळ दिव्यांमुळे, साउंड सिस्टीमच्या अडचणीमुळे, ए.सी.च्या तीव्रतेमुळे ताई काहीशा अस्वस्थ असत. कधी आयोजकांवर रागावलेल्या, कधी उशिरा येऊन पहिल्या रांगेत बसणाऱ्या श्रोत्यांवर रागावलेल्या. परंतु सगळं काही जुळून आल्यावर त्यांच्या भावोत्कट गाण्यानं आम्हाला वारंवार मंत्रमुग्ध करणाऱ्या ताई. या अनुभवांमुळे ताईंकडून शिकताना विलक्षण दडपण येत असे.

नियमित शिकणं सुरू झालं. सकाळी ७ ते ९ माझं कॉलेज असायचं. त्यानंतर ताईंकडे. रघुनंदन पणशीकरही असे. कधी मीराताई पणशीकर, कधी सुलभ पिशवीकर, तर कधी दिल्लीची गुरिंदर. सकाळी ४ तास तालीम चाले आणि परत दुपारी ४ वाजता बोलावत ताई आम्हाला तालमीसाठी. सुट्टी नसेच. कधी काही कारणानं सुट्टी घेतली तर अस्वस्थ होत ताई. कोणतीही वैयक्तिक अडचण गाण्याआड येऊ न देण्याकडे कटाक्ष होता त्यांचा. विद्या ग्रहण करताना इतर कोणत्याही कौटुंबिक, वैयक्तिक कारणामुळे साधनेत, तालमीत बाधा येता कामा नये. साडी नेसून गेलेलं आवडत असे त्यांना, नीट दोन्ही खांद्यांवर पदर घेऊन. पंजाबी ड्रेस घातला तर दुपट्टा हवाच. त्या स्वत: अत्यंत साधी, सुती साडी नेसत घरी. मरून रंगाचे रुमाल असत त्यांचे. त्या वेळी मीदेखील तसे खरेदी केले होते माझ्यासाठी! कायम एक ‘नेझल ड्रॉप्स’ची बाटलीही त्यांच्याजवळ असे. मोठी टिकली- लाल रंगाची. केसांचं सैलसर पोनीटेल. धारदार नाक. ‘किशोरी’ हे नाव शोभेल असं व्यक्तिमत्त्व! लगबगीनं चालणं- एखाद्या किशोरीचं वाटावं तसंच. त्यात उदंड आत्मविश्वास. चेहरा करारी. नजर कधी भेदक, कधी स्वप्नाळू, कधी चिंतनशील. नखं थोडी वाढलेली, सुंदर आकार दिलेली. बोटात एक सोन्याची अंगठी. त्याला लोंबतं घुंगरू. उजव्या मनगटावर काळय़ा डायलचं, काळय़ा पट्टय़ाचं घडय़ाळ. कानात सोन्याच्या रिंग्ज. कधी कोणत्या तऱ्हेचा भपका नाही. त्यांचं वर्णन करता करता हलक्या पावलांनी येऊन त्या जणू माझ्या समोर उभ्या राहिल्या आता! आणि त्यांच्या भेदक नजरेनं लेख वाचतायत असा भास झाला! इतक्या माझ्यात सामावून गेलेल्या ताई. ज्यांचं अस्तित्व मी निरंतर अनुभवते अशा ताई.

सकाळी ९.३० वाजता पोहोचून तानपुरे जुळवत असू मी आणि रघू. नंतर रघू स्वरमंडलही मिळवत असे ताईंना राग विचारून. त्या वेळी ना तानपुऱ्याची मशीन्स होती, ना अ‍ॅप्स. भोपळा असलेले, सुरांच्या गाभ्यात घेऊन जाणारे तानपुरे जुळवणं हा नित्यनूतन अनुभव असे. त्यातल्या खर्जाच्या षड्जाच्या तारेतून ऐकू येणारा स्वयंभू गंधार, पंचमाच्या तारेतून झंकारणारा रिषभ नकळत रागविश्वाची कवाडं उघडतो. एक तबलावादकही असे. ठेका चांगला देणारा. लय चांगली असणारा. त्यानं याहून जास्त वाजवणं अपेक्षित नसलेला. ज्याला हा संयम आहे असा. तोही थोडा घाबरलेला, बावरलेला म्हणा ना!

ताईंच्या येण्याची आम्ही सगळे आतुरतेनं वाट बघत असू. तानपुरे छेडत. एकीकडे त्या सुरात मन भिजवत असू आम्ही.. जशी पेटवण्याआधी वात तुपात भिजवून ठेवतात ना तसं! आणि दुसरीकडे दरवाज्याकडे डोळे. ताई कधी येताहेत त्याकडे लागलेले. ताई आल्यावर आमच्या डोळय़ांचे कानच करून टाकत! काही वेळानं देवघरात घंटानाद ऐकू येई. ताई आता येणार लवकरच या विचारानं जीव सुखावे. काही मिनिटांनी ताई आत येत. तिरुपती बालाजीच्या गाभाऱ्याचा दरवाजा उघडला की भाविकांना जसं वाटतं ना, तसंच वाटे अगदी! माझा भाव भक्ताचा. आम्हा सगळय़ांचाच. ताई येऊन बसत. स्वरमंडलाची नखी घेऊन अलगद त्या स्वरमंडल छेडत. गरज असल्यास परत जुळवत ते. तानपुऱ्यामधल्या स्वरात लीन होऊन गायला सुरुवात करत. एक महिना सकाळ-संध्याकाळ यमन शिकवला ताईंनी. यमनचे सूर आळवू लागत. काही आलाप गाऊन बंदिश सुरू करत. विलंबित ख्यालाची बंदिश- ‘तोसे नेहा लागा..’ तबलावादकाला स्वरमंडलावर केलेल्या आघातांनी लय दाखवत. आपल्या भेदक नजरेच्या लगामाच्या सहाय्यानं तबलावादकाची लय आपल्या मुठीत ठेवत. राग आळवू लागत. अलगदपणे त्याला शरण जाऊन, त्याच्या गाभ्यात शिरून. त्या रागाच्या अभिप्रेत भावाला कवटाळू लागत.

काही काळ माझं मन यमनच्या सुरावटीमागे, ठेक्यामागे, बंदिशीच्या शब्दामागे धावे. ‘नी रे प रे- रे रेमगग रे नीगरेरे सा.. तोसे नेहाऽऽ लागाऽऽ मोरा..’ ताई मध्येच थांबून आम्हाला आवर्तन भरण्याची खूण करत. आम्ही ग्रहण केलेला यमन गाण्याचा यशस्वी प्रयत्न करत असू. ताईंच्या चेहऱ्यावर हळूहळू यमन दिसू लागे, काही वेळानंतर ताई पूर्ण यमन होऊन जात. मीही यमन होऊन जाई. रघू यमन.. सगळे सगळे यमन. सगळं जगच यमन होऊन जाई! ताईंच्या आगमनानं ‘कान’ झालेले आमचे डोळे, हळूहळू आमच्या एकेका ज्ञानेंद्रियावर ताबा मिळवत. ताईंचा यमन पसरू लागे आणि काही मिनिटांतच आम्हा सगळय़ांना यमन करून टाके. ताईंची आम्हाला कधी यमन, कधी संपूर्ण मालकंस, कधी जौनपुरी करून टाकण्याची ही अशी हातोटी. अशी जादू, मोहिनी!

अर्थात ताई खोलीत आल्या की आम्हीदेखील त्यांना संपूर्ण शरण जात असू. आमच्या मनाची, बुद्धीची कवाडं पूर्णपणे उघडत असत, त्यांच्या यमनाला कवेत घेण्यासाठी. आम्हीदेखील ‘यमन’ होण्यासाठी आतुर. नादब्रह्माच्या अमूर्ततेचा अनुभव. शब्दांपलीकडचा, तालापलीकडचा, रागापलीकडचा! ताईंच्या या ‘यमन’ करण्यानं मला पछाडून टाकलं. साकारातून निराकाराकडे जाणं. मूर्ततेकडून अमूर्ताकडे. सगुणाकडून निर्गुणाकडे. त्यांच्या या हातोटीच्या मागोव्याची धडपड सुरू झाली माझी!

दुपारी १ वाजता ताईंकडून निघत असू आम्ही. रघू चालत जाई घरी, मी बसनं. यमनातून बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नसे आमची. पेशीपेशींमध्ये यमन ठासून भरलेला असे. हळूहळू जसे स्टॉप जात, तशी कंडक्टरनं मारलेल्या घंटीमुळे मी यमनामधून बाहेर पडू लागे. घरी जाईपर्यंत पूर्ण जागी होई. आणि मग खूप रडू येई. अनेक वेळा मी आईसमोर बसून न जेवता रडल्याचं मला आठवतंय. कधीकधी तासभर!

ताईंची बुद्धी अफाट. रागाचा स्वयंभू विचार ताईंचा. जयपूर घराण्याची गायकी कोळून प्यायलेल्या, ती आत्मसात केलेल्या ताई. त्यापलीकडे जाऊन रागाच्या अमूर्ततेचा विचार करणाऱ्या, मनात आलेला प्रत्येक विचार गळय़ातून हुकमतीनं काढणाऱ्या ताई. पाण्यासारखा गळा, अत्यंत विलक्षण, असरदार. गळय़ात प्रत्येक अलंकार. मींड, खटका, मुरकी, तान, कण, जलद-अतिजलद ताना, दाणेदार ताना.. तारसप्तकातल्या मध्यमावरून क्षणात खाली षड्जावर येऊन मुखडा म्हणत. विलक्षण प्रतिभा, अतिउत्कृष्ट आवाज, बुद्धी, मन. त्यांच्या संगीतातल्या अध्यात्मामुळे अनेकानेक रसिकांची जीवनं उजळून टाकणाऱ्या ताई.

त्या काळात मला खूप सर्दी होत असे. कारण काही कळत नव्हतं. ताईंनी आईला फोन केला. टॅक्सी करून दुपारी ३ वाजता मला घेऊन यायला सांगितलं घरी. टॅक्सी खाली थांबवायला सांगितली आईला आणि मी वर गेले, तर ताई निघायच्या तयारीतच होत्या. मला त्या बॉम्बे हॉस्पिटलला घेऊन गेल्या. डॉ. किणी यांच्याकडे. ताईंचा अपरंपार विश्वास होता त्यांच्यावर. त्यांनी मला तपासलं, औषधं दिली. परत टॅक्सीत बसून आम्ही ताईंना घरी सोडलं त्यांच्या. ताईंनी टॅक्सीवाल्याला आमच्या घरापर्यंतचे- म्हणजे माटुंग्यापर्यंतचे पैसे दिले आणि ‘त्यातले काही उरले, तर यांना परत द्या,’ असंही टॅक्सीवाल्याला सांगितलं. डॉक्टरांची फीसुद्धा त्यांनी दिली होती. केवढं प्रेम, केवढी कळकळ!

ताई मला अनेक ठिकाणी कार्यक्रमांना नेत. माझा पहिला विमानप्रवास ताईंनीच घडवला. आम्ही दिल्लीला गेलो होतो त्यांच्या मैफलीसाठी. प्रवासात खूप लाड करत ताई. प्रेमानं नेलपॉलिश लावत, त्यांच्या साडय़ासुद्धा देत नेसायला. एकदा अहमदाबादला कार्यक्रम होता ताईंचा. ‘भद्र’ या मराठीबहुल परिसरात. ताईंचा आवाज बसला होता. खूप सर्दी झाली होती त्यांना. मी त्यांच्यामागे तानपुऱ्यावर होते. त्या दिवशी ताईंनी मला खूप गायला लावलं. मीही आत्मविश्वासानं गायले. ताई खूप खूश झाल्या. दुसऱ्या दिवशी मला त्यांनी अहमदाबादला खरेदीसाठी नेलं आणि एक छान ड्रेस घेऊन दिला. प्रत्येक वेळी कार्यक्रमाला जाताना त्या माझ्या आईला साजूक तुपातला शिरा करून द्यायला सांगत. तो त्यांना खूप आवडे. ‘‘तुमच्या मुलीला नाही हं देणार. मीच खाणार!’’ अशी गंमतही करत. माझी आईसुद्धा सत्यनारायणाला प्रसाद करावा, तशा भावनेनं या गानसरस्वतीसाठी शिरा करत असे.

कार्यक्रमाला जाण्याआधी खूप वेळ घेत ताई तयारी करण्यासाठी. रागाच्या विश्वात शिरण्याचा प्रवास तिथेच सुरू होत असे. बहुतेक वेळी आधी १५ दिवस तोच राग गात घरी. तयारी झाल्यावर हॉलवर जाऊन तानपुरे जुळवण्यात कधीकधी उशीर होई. बंद खोलीत एकांतात बसत थोडावेळ आणि मगच रंगमंचावर येत. संयोजक, वादक, श्रोते, सगळेच थोडे दडपणाखाली असलेलं अनुभवलंय मी. रागाच्या भावविश्वात एकदा का प्रवेश झाला, की ताई त्या संपूर्ण सभागृहाला यमन करून टाकत काही क्षणांमध्ये.

गुरुपौर्णिमेला आग्रहानं पंक्तीत जेवायला बसवत ताई. खमंग तूप कढवून त्याची धार उकडीच्या मोदकावर! प्रत्येक कृती ‘परफेक्ट’. चित्रकला असो, की विणकाम असो, की स्वयंपाक.. ‘शिष्यानं शिकताना श्रोता न होता, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं गाणं ऐकलं पाहिजे. विद्याग्रहणात तत्परता हवी. गुरूनं आज्ञा करताच ग्रहण केलेलं तंतोतंत गाताही यायला हवं. त्यासाठी भानावर असलेलं मन आणि त्याबरोबर चालणारा गळा हवा,’ असं म्हणत ताई.

आपल्या सगळय़ांच्या मनात भरून राहिलेल्या ताई.. आपल्या मनाच्या अशा कोपऱ्यांना स्पर्श करणाऱ्या, जे कोपरे आहेत याची आपल्याला जाणीव नसलेल्या. बागेश्रीचा विरह, भूपाची शांतता उत्कटतेनं उभी करणाऱ्या. पराकोटीचं बुद्धिकौशल्य आणि गळय़ावर हुकमत असणाऱ्या समस्त गानरसिकांच्या दैवत गानसरस्वती किशोरी आमोणकर!