राजन गवस

मातीच आमच्या जगण्याची सवंगडी. तिच्यामुळेच जगण्याला चढत गेला मातकट रंग! पायाला मातीचा स्पर्श प्रत्येक वेळी नवाच जाणवायचा. घट्ट वाटेवरची टणक माती, धूळमाखली माती, चिखल झालेली माती, निसरड करणारी माती. प्रत्येक हंगामात वेगळी भासणारी. अंगभर पसरणारी. माती, जगवणारी – तगवणारी ती एकटीच. मातीतच पुरली गेली आमची नाळ जन्मल्या जन्मल्या. तेव्हापासूनच झालो मातीचे.. पण आता सिमेंटच्या जंगलात सुरक्षित होऊ पाहणाऱ्या माणसाला मातीची निर्माण झालेली अ‍ॅलर्जी, मातीपासून दूर ठेवण्याचे चाललेले प्रयत्न. माणसाला जनावर बनवत चाललेत असं कुणालाच का वाटत नसेल?

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Indias highest paid actress Urvashi Rautela charges 1 crore for 1 minute
एका मिनिटासाठी १ कोटी मानधन घेणारी भारतातील ‘ही’ पहिलीच अभिनेत्री; दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रालाही यात टाकले मागे
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Unknown cargo ship collided with fishing boat in Palghar sea
पालघर समुद्रातील मासेमारी नौकेस अज्ञात मालवाहू जहाजाची धडक

आंदोलन या भानगडीचा पहिला परिचय झाला तो मातीमुळं. त्याचं झालं असं, राष्ट्रसेवादलाच्या शिबिरात होतो. आमचे सर अचानक हॉलमध्ये आले. त्या वेळी चाललं होतं बौद्धिक. म्हणाले, ‘‘पोरांनो आपल्याला मातीसाठी आंदोलन करायचंय. हाय का तयारी?’’ आम्ही जोरात ओरडलो, ‘‘हाय कीऽऽ’’ पण नंतर बघायलो लागलो एकमेकांकडं. आमच्यातली जी थोराड- जुनी जाणती होती, त्यांना कळलं होतं. आम्ही मात्र कोरे करकरीत.

मग आमचा साठ-सत्तर जणांचा तांडा चालला रस्त्यानं. तर रस्त्यांत शंभरभर पटकेवाले, टोपीवाले, धोतरवाले थांबलेले. सगळे रापलेले चेहरे. त्यात आमच्या गावाजवळचा म्हादू कुंभार दिसला. त्याच्याजवळ पळत पळत जाऊन थांबलो. म्हटलं, ‘‘म्हादूमा, इकडं कसं काय? काय काडलं?’’ तर तो माझ्या तोंडाकडंच बघत राहिला. एवढय़ात सगळे दोन लायनीत उभे राहिले. लगेच घोषणा. ‘कुंभारांनाऽऽ माती द्या.’ मग आम्ही फक्त कित्त खाऊन ओरडाय लागलो, ‘कुंभारांना माती द्या’ सगळे चालाय लागले. घोषणांनी पेठ दुमदुमून गेली. दुकानातले, रस्त्यावरचे सारेच लोक अचंबित होऊन बघाय लागले. त्यांनाही कळत नव्हतं. आमचे जोराचे आवाज, ‘कुंभारांना माती द्या.’ तांडा सरकाय लागला. गर्दी वाढली. आम्हाला आणखी चेव चढला. घोषणा द्यायला प्रचंड उत्साह. आमचा मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आला. मास्तरनं भर रस्त्यात बठक मारली. आम्ही सगळेच जागा मिळेल तिथं टेकलो. रस्ता बंद. सगळे रस्ते तुंबले. मास्तरनं जोरदार भाषण सुरू केले, ‘हे आमचे गोरगरीब कुंभार. याचं हातावरचा पोट. नदीकाठची माती काढून गाडगी-मडकी बनवतात. संसार चालवतात. त्यांच्या संसारात तहसीलदार, प्रांत माती कालवाय लागलेत. त्यांच्यावर जबरदस्ती कर लादून त्यांचा धंदा बरबाद कराय लागलेत.’ असं बरंच काय काय. मास्तर जोरात बोलले. आमचे आपलं एकच सुरू, ‘कुंभारांना माती द्या’. त्या वेळी मला कळलं होतं, माती जगवते, तगवते माणसाला. तोपर्यंत शेताभाताकडं फारशा गंभीरपणे बघायची दृष्टी नव्हती. पण त्या मोर्चानं माती रुजवली मेंदूत.

हे सगळं आठवायचं कारण, माझ्या सोबत शिकलेल्या मित्राच्या घरी गेलो होतो, त्याची बायको मला आपल्या मुलाबाबत सांगत होती, मुलाला घरातून बाहेर पडताना आम्ही सॉक्स घालतो. नंतर बूट. मग उचलून थेट त्याच्या स्कूल बसमध्ये पोहचवतो. त्याच्या पायाला किंचितही माती, धूळ लागता उपयोगाची नाही. आला की त्याचे सर्व कपडे, सॉक्स वॉशिंग मशीनला टाकते. उगाच घरात धूळ, माती यायला नको. बिचाऱ्या सहज भोळेपणानं आपण किती उच्चभ्रू झालो आहोत, हे सिद्ध करत होत्या. त्यांच्या बोलण्यात धूळ, माती म्हणजे एकदम तिरस्काराचाच विषय झाली होती. सगळं शांतपणे ऐकता ऐकता मित्राचं, माझं जगणंच तरळून गेलं. शाळा घरापासून दोन मल दूर. वाटेत बारमाही वाहणारे दोन ओढे. घरातून बाहेर पडलं की, पायवाटेनं खिदळत खिदळत पहिल्या ओढय़ावर यायचं. कारण नसताना पाण्यात बारीकबारीक दगड मारून तरंग मोजत बसायचं. मग दुसरा ओढा येईपर्यंत वाटेकडेच्या गवताची पानं चघळत जायचं उगाचच उंच झाडाच्या टिक्कीपर्यंत दगड फेकून आपल्या मनगटाची ताकद आजमावत चालायचं. पायात एखादी आंब्यांची कोय सापडली तर तिला फुटबॉलसारखं पायानं ठेचलंत वाटेवरून पळवायचं. यात कधी कधी पायाची बोटं, अंगठा रक्तबंबाळ. पावसाळ्यात तर गुडघाभर चिखल. एक पाय घातला की दुसरा काढायचा. ओढय़ाला पूर आला की कपडे, दप्तर डोक्यावर गुंडाळून घेऊन पोहतच ओढा ओलांडायचा. भिजल्या अंगानं तसंच शाळेत. शनिवार आला की वर्ग सारवायची जबाबदारी सगळ्यांची. कुणाकुणाच्या गोठय़ातलं शेण आणायचं. सारवायची जबाबदारी पोरींची. पाणी आणायचं काम पोराचं. चिक्कार दंगामस्ती. भिंतीच्या कडेनं शेणाचा थर वाळला की त्याच्या खपल्या काढायच्या. कागदाची चिलीम करायची. त्यात खपल्या भरायच्या. चिलीम पेटवून एक एक झुरका मारायचा. मास्तरला सापडलं की बेदम मार खायचा. मातीच्या अंगा-खांदय़ावरच आमचं बालपण गेलं. पाय चिखलानं माखलेले असले तर शाळेत आल्यावर आणि घरात जाताना धुवायचे. तरी चिखल उरायचाचं कुठं कुठं. पण त्याचं तितकं काय वाटायचं नाही. खेळता खेळता चिक्कार माती-धूळ जायचीच तोंडात. मातीच आमच्या जगण्याची सवंगडी. तिच्यामुळेच जगण्याला चढत गेला मातकट रंग. मातीचा स्पर्श नाही असा क्षणच नाही जगण्यात. पायात चपला तर कॉलेजला गेल्यावर आल्या. तोवर काटय़ा-कुटय़ात, राना-वनात मोकळ्या पायानचं पळत राहायचं. पायात कसलाबसला काटा मोडलेला असायचाच. संध्याकाळी काटा काढण्याचा खास कार्यक्रम. एखादा बाभळीचा, कुंभळाचा काटा खोलवर घुसला असेल तर घरातली सगळी धावायची मदतीला. सुईनं बोचकरून काटा काढणं सुरू झालं की कळ मेंदूपर्यंत जायची. काटा काढून झाली की पेटत्या दिव्यावर बिबा तापवून सरळ काटा मोडलेल्या जागेवर ठेवला की चटका असा बसायचा की, हात तोंडावरच. दुसऱ्या दिवशी पुन्हा अनवाणी पायानं पायवाटेवर. पायाला मातीचा स्पर्श प्रत्येक वेळी नवाच जाणवायचा. घट्ट वाटेवरची टणक माती, धूळमाखली माती, चिखल झालेली माती, निसरड करणारी माती. प्रत्येक हंगामात वेगळी भासणारी. अंगभर पसरणारी. भर उन्हात तापलेल्या मातीचा गंध आणि पावसाच्या पहिल्या सरीनं चिंब झालेल्या मातीचा गंध. जिवाला मोहरून टाकणारे मातीच्या गंधाचं साम्राज्य. पहिली पावसातली माती, पावसाची झड सुरू झाल्यानंतरची भरलेली माती, पीक तरारल्यावरची माती, पीक कापल्यानंतरची भयाण रिक्त पोकळी सोसणारी माती. जगवणारी – तगवणारी ती एकटीच. मातीतच पुरली गेली आमची नाळ जन्मल्या जन्मल्या. तेव्हापासूनच झालो मातीचे. आईनेही डोहाळे लागल्यानंतर कधी कधी चोरून खाल्लेली असते माती. तेव्हाच ती पसरत गेली पेशीपेशीत. अलीकडच्या काळात हॉस्पिटलं आली. नाळ मातीत पुरण्याऐवजी हॉस्पिटलच्या डस्टबिनची धनीण झाली. डोहाळे लागल्यानंतर या सिमेंटच्या जंगलात आई कुठे शोधणार माती. तेव्हापासूनच सुरू झालं असेल का हे सारं मातीपासूनचं तुटणं? पण असं म्हणणंही अन्यायकारकच होईल अनेकांच्या बाबतीत. उगाचच साऱ्यांना एका माळेत का गुंफा? पण मातीपासून दूर होणं रखरखीत येतंच समोर.

तिच्यापासून दूर पळण्याचा आपणंच किती सुरू केला आटापिटा. घरातून, गावांतून मातीला हद्दपार करण्याचे आटोकाट प्रयत्न. घरात चित्रविचित्र रंगाच्या फरश्या आल्या. भिंतीला अचाट रंगाची आवरणं आली. सिमेंटचे रस्ते, डांबरी रस्ते, पायात कसल्या कसल्या वहाणा. घराला, बंगल्याला खिडक्या, दारांचा कडेकोट बंदोबस्त. फक्त माती आत येता उपयोगाची नाही. कधी काळी असायचे अंगण. टाकला जायचा सडा. असायची मध्यभागी तुळस. शेजारीच फुललेली असायची सदाफुली. दूर कोपऱ्यात कुठे तरी जास्वंदीचे लालभडक फूल करत असायचे अंगणाची राखण. कोंबडय़ा आपली पिलावळ सांभाळत फिरत असायच्या अंगणात. घरात तगमग झाली की, माणसंही लोळायची अंगणात. लहान मुलांचं दुडदुडायचं एकमेव ठिकाण म्हणजे अंगण. अंगण असायचं घराची शोभा. अंगणातली माती सतत करत राहायची पाठलाग. अंगण भरून टाकायचं प्रत्येकाचं भावविश्व. अंगण असायचं घराच्या सुखदु:खाचं सोबती. अंगणात पहिलं पाऊल ठेवूनच ऊन रांगायचं घरात. अंगणातच यायचा चोरपावलांनी अंधार. आणि उंबऱ्याला ओढली जायची राखेची इभूत. अंगण करायचं किडामुंगी जीवजंतूंचं रक्षण आणि घरापासून संरक्षण. अशा अंगणातच कधी कधी पडायचा चांदण्याचाही सडा. तेव्हा आपोआपच ओलावायच्या पापणीच्या कडा. मातीला हद्दपार करता करता हे अंगणच खाऊन टाकलं सिमेंटच्या क्रूर विळख्याने.

त्या जागी आल्या चकचकीत, तकाकणाऱ्या रंगीबेरंगी फरशा. त्यावरच बाया काढू लागल्या रांगोळ्या. आणि अंगणातील माती फरशीखाली स्वत:ला चिणून घेऊन कण्हतच शोधू लागली दु:खाच्या रांगोळ्या. भेटतो तो सांगतो, मला धुळीची अ‍ॅलर्जी आहे. फारच जपतो मी स्वत:ला धुळीपासून.

मातीची अ‍ॅलर्जी असणारे हे दिवस. शहारात, महानगरांत तर माती दिसत नाही. असलीच तर रस्त्याकडेला. गटारांच्या तळाला. पण तिथं तर काय तिचा तिरस्कारच तिरस्कार. थोडा मातकट माणूस दिसला तर पाल पडल्यासारखे सरकतात लोक. लगेच लावतात रुमाल तोंडाला. एखाद्याच्या पायाला चुकून डसली माती आणि उठले चकाचक फरशीवर पायाचे ठसे तर कोसळतंच आकाश. इतका मातीविषयीचा तिरस्कार. यालाच आपण आधुनिक, उच्च अभिरुचीचं जगणं म्हणायचं का? आधुनिक व्हायला हरकत नाही, उच्चभ्रू असण्याला आमची ना नाही. ज्याने त्याने आपल्या इच्छा-आकांक्षांनुसार जगावंच पण जगताना आपण मातीवर जगतो आहोत एवढं नको का ध्यानात ठेवायला? ती जगवणारी आहे हे राहू द्या बाजूला. पण तिच्या उरावर आपण मांडलं आहे आपलं सारं अस्तित्व एवढं तरी नको का मनात ठेवायला? पण आज जो तो खूप यातायात करत आहे तिच्यापासून दूर राहण्यासाठीच. सिमेंटच्या जंगलात सुरक्षित होऊ पाहणाऱ्या माणसाला मातीची निर्माण झालेली अ‍ॅलर्जी, मातीपासून दूर ठेवण्याचे चाललेले प्रयत्न. त्याला जनावर बनवत चाललेत असं कुणालाच का वाटत नसेल? मातीचा स्पर्श जगण्याला अगणित कोंब फुटवून सहृदय बनवतोय माणसाला. असा सहृदय माणूसच दुर्मीळ झाला का? सगळेच दुरावले का मातीपासून. मातीपासून तुम्ही जितके दूर दूर पळाल तितके तुम्ही प्रतिष्ठित, उच्चभ्रू. काय खुळचट जगण्याच्या कल्पना. सगळेच नसतात असे, पण अशांची संख्या वाढणंही चिंताजनक. शेवटी मातीच होणार आहे प्रत्येकाची, एवढं साधं सत्यही कळू नये एवढे आपण भ्रमिष्ट झालोय. त्याला कोण काय करणार?

मातीच कधीतरी शिकवेल शहाणपण. तीच निर्माण करेल नवा माणूस, कारण मातीएवढं सर्जनशील नाहीच कोणी पृथ्वीवर.

chaturang@expressindia.com