सुनील सुकथनकर  

मानवी जीवन आणि समाज यांची गुंतागुंत ही प्रेरणा, प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी कथात्मक सहजतेची धारणा आणि माध्यमाच्या कलात्मक प्रयोगशीलतेची साधना- मनात धरून लघुपट व चित्रपटाच्या क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव, केलेला अभ्यास, झालेला विचार यांचं चिंतन  सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या शब्दांत दर पंधरवडय़ाने

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर गेली पस्तीस र्वष लघुपट व चित्रपटनिर्मिती करत आहेत. त्यांच्या ‘बाई’, ‘पाणी’, ‘चाकोरी’सारखे सत्तरहून अधिक लघुपट; ‘दोघी’, ‘१० वी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘संहिता’, ‘हा भारत माझा’, ‘अस्तु’, ‘कासव’ असे अठरा चित्रपट; ‘भैंस बराबर’, ‘कथा-सरिता’, ‘माझी शाळा’ अशा अनेक मालिका यांना राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

एखाद्या पटकथेप्रमाणे सांगायचं तर..

  सीन क्र. १.

८ मे २०१६. आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन होता. त्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस ‘निराशा’ या आजाराला समíपत केला होता. ‘मन मोकळं करू या’ ही त्यांची घोषणा होती. त्या निमित्तानं ‘परिवर्तन’ या संस्थेसाठी सुमित्रानं- सुमित्रा भावे- बनवलेल्या मानसिक आरोग्य या विषयावरच्या दोन लघुपटांचा खेळ पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात होणार होता. अचानक तिला फोन आला.. एका वृत्तवाहिनीकडून अभिनंदन करणारा.. सुमित्रानं त्यांना नम्रपणे आठवण करून दिली की, ‘लघुपट संध्याकाळी प्रकाशित होणार आहेत. तर तो पाहा आणि मग अभिनंदन करा!’ अचंबित वाहिनी-संपर्ककर्त्यांनं सांगितलं की, ‘या फोनचा संदर्भ संध्याकाळच्या लघुपटांशी नाही.. तर तुमच्या ‘कासव’ या चित्रपटाला राष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळाल्याबद्दल हे अभिनंदन आहे.. त्या वाहिनीची टीम कॅमेरा घेऊन दारातच उभी आहे.. त्यांना आत घ्या आणि मुलाखत द्या!’ आता थक्क होण्याची वेळ सुमित्राची होती..

सीन क्र. २.

याच वेळी ‘कासव’चाच आठ मिनिटांचा ट्रेलर मुंबईच्या ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’मध्ये दाखवला जात होता. मी आणि डॉ. मोहन आगाशे चित्रपटाची ओळख करून देत होतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते. कार्यक्रम संपवून मी बाहेर पडलो आणि मलाही एका पत्रकार मित्राचा फोन आला. हीच बातमी देत अभिनंदन करणारा. त्याला आश्चर्य वाटत होतं की मला अजून ही बातमी माहीत कशी नाही!

दोन्ही समांतर सीन्सची परिणती एका मॉन्टाजमध्ये- दृश्य-मालिकेमध्ये- झाली. सुमित्रा पुण्यात घरी आणि मी आणि डॉ. आगाशे मुंबईत निरनिराळ्या स्टुडिओमध्ये दिवसभर मुलाखती देत होतो. आम्ही तिघं एकमेकांना छोटय़ा पडद्यावरच प्रत्यक्ष भेटलो..!

ही अशी पटकथा मनात घोळवत मी मध्यरात्री पुण्याकडे निघालो होतो. चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलंच असेल की हा क्षण फ्लॅशबॅकमध्ये जाण्याचा आहे. खरं आहे..

मला आठवत होतं, वर्ष १९८४. आणि या चित्रपट बनवण्याच्या धडपडीची सुरुवात. ज्या प्रयत्नांना आम्ही नंतर नाव दिलं – ‘विचित्र-निर्मिती.’ मी, सुमित्राची मुलगी सती भावे, सुनील गोडसे असे आम्ही काही नाटकवेडे तरुण त्या वेळी आंतर-महाविद्यालयीन स्पर्धाना कंटाळून आमच्या आमच्या नाटक खटपटीत होतो. आमची मत्रीण सती हिची आई- सुमित्रा ही आमची मित्र-मार्गदर्शक बनली. आम्ही स्वत:च्या अनुभवातून आमची नाटकं लिहावीत, जुन्या नाटकांच्या कढीला ऊत आणत बसू नये – असा सुमित्राचा सल्ला होता. ‘सुमित्रामावशी’ या तेव्हा ‘स्त्री-वाणी’ संस्थेच्या अभ्यास-प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. स्त्रीच्या स्व-प्रतिमेचा अभ्यास करत होत्या. काही दलित स्त्रियांशी अनेक र्वष बोलून ओघवत्या गप्पांमधून त्या बायांचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यातून अशिक्षित, स्वत:ला अडाणी समजणारी बाई प्रत्यक्षात किती ताकदवान असते हा निष्कर्ष या अभ्यासकांचे डोळे उघडणारा होता. सुमित्रा आणि तिच्या ज्येष्ठ संस्था-चालक अमेरिकन गांधीविचारी डॉ. फ्रान्सिस यासस यांना हा निष्कर्ष त्या बायकांपर्यंत पोचवायचा होता. पुस्तक तर छापलं जाणारच होतं पण न वाचणाऱ्या बाईसाठी लिखित शब्दांच्या पलीकडे जाणारं माध्यम सुमित्राला हवं होतं. पथनाटय़, चित्र-प्रदर्शन, स्लाइड-शो अशी माध्यमं वापरून पाहत पाहत सुमित्राच्या मनाचा शोध चित्रपट माध्यमाशी येऊन पोचला. सुमित्रा ‘सिनेमा-बफ’ म्हणतात तशी चित्रपटप्रेमी नव्हती. पण सत्यजीत राय, ऋत्विक घटक यांचे नवे प्रयोग आवर्जून पाहणारी, गुरुदत्तच्या आत्यंतिक प्रेमात असणारी, डेव्हिड लीनसारख्या अमेरिकन दिग्दर्शकाचे चित्रपट पाहून प्रभावित झालेली होती.

चित्रपट हे माध्यम आपल्याला दिसणारं वास्तव जसंच्या तसं पडद्यावर उमटवतं; खरा, आयुष्याच्या अत्यंत जवळ जाणारा अनुभव देण्याची क्षमता या माध्यमात आहे; हे तिला जाणवत होतं. लहानपणापासून असणारी चित्रकला-रांगोळीची आवड, आईकडून आलेली संगीताची समजूत, लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात काम करून जाणिवेच्या रुंदावलेल्या कक्षा, कथा-कविता लिहिण्याची फग्र्युसन महाविद्यालयातल्या ‘साहित्य-सहकार’मध्ये जोपासलेली प्रेरणा आणि रोहिणी भाटे यांच्यासारख्या गुरूकडे कथक शिकताना मिळालेले नाद-तालाचेच नव्हे तर जीवनाच्या ऊर्मीचेही धडे – अशी सामग्री घेऊन सुमित्रानं या चित्रपट माध्यमाला हात घालायचं ठरवलं. व्हिडीओ कॅमेरा घरोघरी पोचण्याच्या आधीचा तो काळ होता. त्यामुळे लघुपटदेखील मोठय़ा चित्रपट-कॅमेऱ्यावर चित्रित करायचा, महागडी फिल्म-निगेटिव्ह वापरून, ध्वनी-यंत्रही वेगळं.. तंत्रज्ञांची टीम उभी करायची.. अवघड होतं ते सगळं!

सुमित्राच्या हाताशी होतो आम्ही चार नाटकवेडी पोरं.. त्यात माझा आणखी एक शाळेपासूनचा मित्र येऊन मिळाला- सुधीर पलसाने. हा आज मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत नामवंत छायाचित्रकार आहे! त्याला तेव्हाही छायाचित्रणाची आवड होती. सुमित्रानं स्वत: एक ‘स्टील फोटोग्राफी’चा कोर्स केला. वृत्त-छायाचित्रकार म्हणून काम करणारी विद्या कुलकर्णीही सामील झाली. सुमित्रानं पुण्यातल्या ‘एफटीआयआय’मधल्या प्राध्यापकांना भेटून आपला चित्रपट बनवण्याचा मनोदय सांगितला. त्यातल्या जवळजवळ सर्वानी कीव, उपहास, दुर्लक्ष, चेष्टा, चार परावृत्त करणारे शहाणे बोल- अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या. प्रोत्साहन दिलं ते फक्त राष्ट्रीय संग्रहालयाचे प्रमुख पी. के. नायर यांनी. त्यांनी कोरडं कौतुक न करता संग्रहालयातले लघुपट अभ्यासण्याची संधीही दिली. शिवाय आम्ही सगळे टी.व्ही. आणि व्हीसीआर भाडय़ाने आणून (म्हणजे काय हे आजच्या अनेक तरुणांना समजावून सांगणं कठीण आहे..!) मिळणाऱ्या धंदेवाईक चित्रपटांचादेखील अभ्यास सुरू केला. तो खूप शास्त्रीय होता हे आज कळतंय.. एक एक दृश्य स्थिर करून कॅमेरा कुठे लावला असेल, का लावला असेल, कसं केलं असेल, ऐकू येणारे आवाज- त्यांचा वापर, दृश्यामागून दृश्य जोडताना केलेलं संकलन अशा घटकांचं आमच्या परीनं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करत होतो. हे सगळं करताना आम्हा सर्वामधली वयाची, स्त्री-पुरुषपणाची बंधनं गळून पडत होती. आम्ही पोरं सुमित्रा मावशींना ‘सुमित्रा’ अशी एकेरी हाक मारू लागलो. चित्रपट शिक्षणाच्या बिगरी यत्तेतले आम्ही सारे विद्यार्थी होतो. त्यामुळे कोणीच लहान-मोठं नव्हतं. आम्ही मुलगे स्वयंपाक करायला शिकलो. मुली बाहेरची कामं करायला लागल्या. आमच्या तेव्हाच्या मध्यमवर्गीय साचेबद्ध संस्कारात हे बदल मोठे होते. आपण स्त्री-प्रतिमेबद्दलाचा लघुपट बनवतो आहोत, तेव्हा आपण समानता अंगी बाणली पाहिजे, असा भाबडा (पण खरं तर अत्यंत योग्य) विचार करून आम्ही स्वत:ला बदलत होतो. चित्रपट बनवण्याची ही प्रक्रिया इतकी आनंददायी होती की बहुधा तेव्हाच मनात पक्कं होत होतं की आता आयुष्यात हेच करू या! यात मज्जाय..!!

अनेकांनी सुमित्राला सल्ला दिला की, तुमच्या संस्थेकडे असणारी तुटपुंजी पुंजी कोणा प्रथितयश दिग्दर्शकाकडे देऊन टाका. नामवंत कलाकार घ्या आणि हा लघुपट ‘बनवून’ घ्या. सुमित्रानं तो सल्ला धुडकावला. मला जे सांगायचंय ते मलाच सांगायला हवं, अशी धारणा मनात धरून तिनं पटकथा लिहायला घेतली. तिचा बालपणीचा मित्र तेव्हा छायाचित्रकार म्हणून नावारूपाला येत होता- डेबू देवधर. डेबूदांनी तिची कल्पना उचलून धरली आणि तांत्रिक साहाय्यासहित आमच्या प्रकल्पाच्या पाठीशी उभे राहिले. आम्हाला जाणवणारा खरेपणा हा आमच्या चित्रपट प्रक्रियेचा पाया असणार होता. खरं आयुष्य आणि त्यातले कसदार अनुभव व्यक्त होतील असे प्रसंग, ते घडवण्यासाठी जिथे ते घडले अगदी तीच किंवा तशीच ठिकाणं, कलाकार म्हणून त्यात शोभतील अशी खरी माणसं, मेक-अप न केलेले चेहरे, त्यांचे जुने, वापरलेले कपडे, तशीच भांडी-कुंडी, असं आम्ही जुळवू लागलो. ‘स्टील फोटोग्राफी’चा कॅमेरा घेऊन आमच्या ‘कलाकारांना’ उभं करून एक एक फ्रेम बघू लागलो.. एका एका घटनेला किती वेळ लागतोय ते तपासू लागलो. नकळत संकलनाची तयारी करू लागलो. प्रत्येक दृश्य किंवा ध्वनी प्रेक्षकापर्यंत काय अनुभव पोचवतो आहे असे तपशील नोंदवत चार्ट्स बनवू लागलो. म्हणायचं असलेलं सारं त्या दृक्श्राव्य प्रतिमांमधून व्यक्त होतंय का, ते व्यक्त करण्यासाठी दुसरी काही अधिक परिणामकारक प्रतिमा सुचते आहे का हे बघू लागलो. सुमित्राची पटकथा, त्यानुसार आम्ही तयार केलेले शॉट्स, कॅमेरा-अँगल, इतकंच काय तीन-साडेतीन दिवसांत शूटिंग कसं कसं, कुठे कुठे करायचं याचं आम्ही बनवलेलं वेळापत्रक पाहून डेबूदा चकित झाले. शिवाय त्यांनी आमची एक तंत्रज्ञान शिकवणारी कार्यशाळाही घेतली.

वस्तीतल्या म्हाताऱ्या बायांची आम्ही ‘तालीम’ घेत होतो. सुमित्रानं तयार केलेले संवाद त्यांना वाचायला देता येणार नव्हते, कारण त्यांना वाचताच येत नव्हतं! आमची प्रमुख कलाकार एक दलित कार्यकर्ती होती. तिला पथनाटय़ करण्याचा अनुभव होता. सुमित्रा त्या म्हाताऱ्यांना सांगत होती की, या बाईचं मूल गेलंय, तुम्ही तिची समजूत काढताय, असा प्रसंग आहे.. तालीम चालू असताना त्या आजीबाई बोलताना गोंधळल्या आणि आमच्या नायिकेला हसू आलं. त्या आजी तिच्यावर संतापल्या. ती त्यांना सांगू लागली, ‘‘आजी, खरं नाहीये हे.. माझं मूल गेलंय असं खोटं खोटं करतोय आपण!’’ आजी संतापून म्हणाल्या, ‘‘खोटं म्हणजे काय? खरंच असतं सगळं.. मूल गेलंय तुझं आणि तू हसतेस कशी?’’.. आम्हा सर्वाच्या डोळ्यात पाणी आलं.. आणि मनात पक्का निर्धार झाला.. जे काही करायचं ते ‘खरं’ करायचं.. चित्रपट हे प्रेक्षकाला फसवण्याचं साधन म्हणून खूप वापरलं गेलंय.. प्रचाराच्या नावाखाली सरकारी संस्थांनीही वापरलंय – तोही वेगळा खोटेपणाच! आपण ‘खरे’पणा जपू या!

‘बाई’ या आमच्या या पहिल्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुमित्रानं व्हिएन्नामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजकार्याच्या काँग्रेसमध्ये समाजकार्याच्या प्राध्यापक स्त्रीने चित्रपट माध्यम वापरण्याचा अभिनव प्रयोग म्हणून ‘बाई’ लघुपट दाखवून शोध-निबंध सादर केला. पण त्यापेक्षा मोठं पारितोषिक आम्हाला सतत मिळत होतं. मी त्या वेळी १६ मि.मी. प्रोजेक्टर चालवायला शिकलो. आणि आम्ही वस्त्या-वस्त्यात, खेडो-पाडी आमचा हा ‘बाई’ नावाचा लघुपट दाखवू लागलो.. बघणाऱ्या बाया लघुपट संपल्यावर आमची कथा बाजूला टाकून स्वत:च्याच ‘जलमाच्या कहाण्या’ सांगू लागल्या.. ‘अल्कोहोलिक अनोनिमस’ संस्थेच्या पुरुषांच्या गटानंदेखील ‘बाई’ पहिला आणि सगळ्या ‘दारुडय़ा’ पुरुषांनी आपल्या भूतकाळातल्या आठवणींनी डोळे टिपले.. त्या बाईच्या ताकदीचं कौतुक केलं.. आणि लक्षात आलं, हेच तर या माध्यमाचं काम आहे..

एक आदिवासी बायांचा गट पहिल्यांदा शहरात आला होता. त्यांना एका संस्थेनं ‘थेटरात लागलेला सिनेमा’ दाखवला. त्यातल्या काही बायांना उलटय़ा झाल्या म्हणे..! त्यांना मग त्यांनी ‘बाई’ दाखवायचं ठरवलं.. त्या आधी घाबरल्या होत्या! पण मग त्या गुंगून गेल्या. इतकंच काय, शेवटी म्हणाल्या, ‘‘आम्ही मल मल चालत पाणी आणायला जातो.. त्यावर काढा की सिनेमा!’’

या अनुभवातून दोन गोष्टी घडल्या- आम्ही लघुपट बनवत राहायचं ठरवलं आणि खेडेगावातल्या बायांच्या पाण्याच्या प्रश्नावर ‘पाणी’ हा लघुपट करायचं आम्ही मनात पक्कं केलं आणि दुसरं म्हणजे मी आणि सुधीर दोघंही आमचं कॉलेज संपवून ‘एफटीआयआय’मध्ये शिकायला गेलो.. सुधीर छायाचित्रण आणि मी दिग्दर्शन..!

फ्लॅशबॅक पूर्ण..!

आज ‘कासव’ला सुवर्णकमळ मिळाल्यावर माझ्या मनात ही सुरुवात रेंगाळत होती.. या पहिल्या लघुपटाच्या प्रक्रियेतून आम्ही काही मूल्यं शिकलो होतो. समाजातल्या प्रश्नांचा सूक्ष्म अभ्यास समाजापर्यंत पुन्हा परत पोचवायला हवा- त्यातून माणसं सजग, सक्षम होऊ शकतात. ही समजूत अनुभव रूपातून मांडायला हवी. म्हणजे प्रेक्षकाच्या मनाला स्पर्श करता येईल. आणि हे अनुभव दृक्श्राव्य माध्यमातून मांडण्यासाठी चित्रपट माध्यमाची भाषा आत्मसात करायला हवी. आपण भल्या मनानं बनवलाय म्हणून तो चित्रपट चांगला होईल असं नाही! अनुभव आणि मांडणीतला सच्चेपणा ही आपली ताकद आहे.

याच जाणिवेतून आम्ही काम करत राहिलो आणि आश्चर्य म्हणजे सामाजिक संस्था किंवा चळवळी यांच्यापेक्षा आधी आम्हाला चित्रपटसृष्टीनं आपलंसं केलं.. हीच मूल्यं मानत, शिकत, चुकत-माकत आम्ही लघुपट आणि चित्रपट बनवत राहिलो. कधी कधी ‘सामाजिक जाणीव’वाले असा छाप मारून आम्हाला व्यावसायिक आणि कलात्मक दोन्ही प्रकारच्या दिग्दर्शकांच्या नामावलीतून वगळलंही गेलं. पण प्रेक्षक मात्र साच्यांच्या पलीकडे जाऊन अनेक प्रश्नांना स्पर्श करणारे चित्रपट ‘साध्या’ चित्रपटांप्रमाणे पाहत राहिले. आणि चित्रपटसृष्टीही मोकळेपणानं त्यांचं स्वागत करत राहिली.

म्हणूनच आज ‘कासव’ला सुवर्णकमळ देऊन एक उत्तम चित्रपट म्हणून सन्मान झाला होता. मानसिक आरोग्य साजरं करण्याच्या दिवशी हा पुरस्कार मिळणं हे अनपेक्षित नाटय़ होतं. ‘विचित्र-निर्मिती’च्या आमच्या वाटचालीच्या पटकथेत अचानक सामोरं आलेलं..!

sunilsukthankar@gmail.com

chaturang@expressindia.com