जे जे आकाराला आलं ते ते निराकारात लुप्त होणार. जे अव्यक्त व्यक्तिरूपानं वावरलं ते पुन्हा अव्यक्तात विलीन होणार हे सत्य. तरीही आकाराचं प्रेम भक्तांनीही सोडलं नाही. त्यांच्या आणि आपल्या आकारप्रेमात महदंतर आहे आणि ते नंतर जाणून घेऊच, पण आधी त्यांचं सगुणाचं प्रेम थोडं जाणून घेऊ. ज्ञानदेव आणि नंतर निवृत्तिनाथांच्या समाधीनंतर नामदेवांच्या हृदयातून जे अभंग पाझरले आहेत ते त्यांची वियोगदशा आणि सखा ज्ञानदेवांवरील प्रेमार्तच चितारतात. ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रभू अलंकापुरीस गेले. नामदेवांना मात्र ज्ञानेशांचा वियोग सहन होईना. त्यांचं आक्रंदन पाहून प्रभूंनी विचारलं की, ‘‘नामदेवा, इतका शोकाक्रांत का आहेस? का दु:खी आहेस?’’ हे दु:ख नामदेवांनी दग्ध शब्दांतच उकलून सांगितलं. नामदेव म्हणाले, ‘‘ज्ञानदेव माझा दाखवाया वेळीं। जीव तळमळी त्याच्यावीण।। संत अंतरला सखा झाला दूर। आतां पंढरपूर कैसें कंठूं?।।’’ हे देवा, ज्ञानदेवाला पाहण्यासाठी माझा जीव तळमळत आहे.  निवृत्तिनाथही अंतरले आणि माझा सखा दुरावल्याची वेदना अधिकच तीव्र झाली आहे. आता पंढरपुरात कसा दिवस कंठू? मग म्हणतात, ‘‘तरीच येईन पंढरीस। दृष्टी देखेन ज्ञानेश।। ज्ञानदेवा भेटी व्हावी। ऐशी सोय देवा लावी।। ऐशियाच्या कृपादानें। तुम्हां संगती नाचणें।। पंढरीचें जें कां सुख। जाणे तो एक भाविक।।’’ हे देवा, ज्ञानोबा जर या डोळ्यांना दिसणार असेल ना, तर पंढरीस येईन! तिथं ज्ञानदेवांची आताही भेट व्हावी, असा काही तरी उपाय कर रे! ज्ञानदेवानं कृपा केली ना, तर मग तुझ्यासवे नाचताही येतं! जो भाविक आहे त्यालाच पंढरीचं हे सुख गवसतं! परमात्माच सर्वसमर्थ आहे, सर्वव्यापी आहे, करुणाघन आहे, हे जे ज्ञान आहे ना ते व्यक्तरूपात पाहिल्याशिवाय भक्ताला चैन पडत नाही. ते ज्ञान ज्ञानेशांच्या रूपानं सगुणात अवतरलं होतं. त्यामुळे परमात्म्याच्या बरोबर परमानंदात नाचताही येत होतं. ते सुख आता पंढरीत कुठं आहे, असं नामदेव विचारतात. मग म्हणतात, ‘‘ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर। त्यांत जलचर स्वस्थ होतों।। दुर्दैव तापानें आटलें तें नीर। वर्षी रघुवीर कृपामेघ।। ज्ञानदेवावीण व्याकुळ हे प्राण। तूं जगज्जीवन देवा होसी।। विठाबाई तूं ग जाणसी ना जाण। रक्षी मज कोण दुजें येथें।।’’ ‘सौख्यसरोवर’ ही किती मनोज्ञ उपमा आहे पहा! सरोवर पाण्यानं भरलेलं असतं. म्हणजेच सरोवराचा कण अन् कण पाण्यानंच व्याप्त असतो. तसे ज्ञानदेव हे माझ्यासाठी सौख्याचं सरोवर होते! म्हणजे सौख्यानं काठोकाठ भरलेले होते. माझ्या कल्याणाच्या भावानं पूर्ण व्याप्त होते. जलचर जसा सरोवरात निवांत असावा तसा मी त्या सौख्यमय सरोवरात स्व-स्थ होतो. पण पाण्यात निवांत असलेली मासोळी त्या पाण्याबाहेर काढताच तडफडू लागते तशी माझी अवस्था आहे. दुर्दैवाच्या तापानं, उष्म्यानं ते सौख्यसरोवरच आटलं. हे प्रभो, आता तुमच्या कृपेचा मेघ पुन्हा वर्षू दे आणि माझं सौख्यसरोवर, माझा ज्ञानराज पुन्हा साकारू दे! तू जगज्जीवन आहेस.  मग माझे प्राण व्याकूळ का आहेत, हे तू जाणतोस ना? तुझ्याशिवाय माझं रक्षण कोण करणार? हे विचारतच नामदेव धरणीवर कोसळले! मग? ‘‘नामदेव स्थिती पाहून श्रीपती। विस्मित ते चित्तीं स्तब्ध झाले।।’’ नामदेवांची ही स्थिती पाहून भगवंत स्तब्ध झाले. त्यांच्या मनात आलं, ‘‘कैशा रीतीं नाम्या संबोखूं मी आतां। कठीण अवस्था देव म्हणे!!’’ नामदेवाला आता कसं समजावू, असा प्रश्न देवालाही पडला.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com