ज्ञानदेवांच्या वियोगानं उन्मळून पडलेल्या नामदेवांकडे पाहताना पांडुरंगालाही पेच पडला की, नामदेवाला आता कसं समजावू? त्याचबरोबर त्याच्या अंत:करणातही प्रेम उचंबळून आलं. त्या प्रेमभरात पांडुरंग नामदेवाला म्हणाला, ‘‘देव म्हणे नाम्या पाहे। ज्ञानदेव मीच आहें।। तो आणि मी नाहीं दुजा। ज्ञानदेव आत्मा माझा।। माझ्या ठायीं ठेवीं हेत। सोड खंत खंडी द्वैत।। नाम्या उमज मानसीं। ऐसें म्हणे हृषीकेशी।।’’ अरे नाम्या, तो ज्ञानदेव माझ्याशी एकरूप झालाय.. आता तोही मीच आहे. तो आणि मी दोघं वेगवेगळे नाहीत. तो माझा आत्माच आहे. त्यामुळे खंत सोड, द्वैतभावाचं खंडण कर आणि माझ्याच ठायी प्रेम ठेव. पांडुरंग सांगतात की, नामदेवा तुम्ही भक्त म्हणजेच माझ्या जीवीचा विसावा आहात. पुढे म्हणतात, ‘‘तुमचेनी माझें देवपण सत्य। चंद्रें पाझरत सोमकांत।। तुमचे भक्तीनें आणिलें रूपासी। अवाच्य अविनाशी अरूप तें।। पंढरीचा राणा सांगतो ह्य़ा खुणा। भक्तांच्या कारणा येणें मज।।’’ बाबारे, तुम्हा भक्तांमुळेच माझं देवपण सत्य ठरलं आहे. तुमच्या भक्तीनंच मी रूपात प्रकटलो आहे. जे अवाच्य आहे अर्थात ज्याचं वर्णन वाणीनं करता येत नाही, जे अविनाशी आहे आणि जे अरूप आहे म्हणजेच जे निर्गुण, निराकार आहे ते तुमच्यामुळेच सगुणात येतं. वाणीच्या कक्षेत येतं. काळाच्या मर्यादेत प्रकटतं. पंढरीचा राणा सांगतोय की केवळ  भक्तांसाठीच भगवंताला प्रकट व्हावं लागतं. मग विठोबा अनेक रूपकं वापरून समजावतात. त्यातलं पहिलं रूपक आहे सोन्याचं. ते म्हणतात की, ‘‘नग जों तें सोनें लेण्याजोगें होतें। मुदी कंकण तैं नामें त्यांचीं।। मुशीमाजी जेव्हां गेलें तें मुरोन। झालेसें सुवर्ण अभिन्न तें।। तैसा ज्ञानदेव भक्त तो मी देव। लौकिक लाघव दासांसाठीं।। ज्ञानसमाधी हे नाशी रूप नांवा। अंतींचा मेळावा मजमाजी।।’’ सोन्याचं जेव्हा दागिन्यात रूपांतर होतं तेव्हा त्याला वेगवेगळी नावं पडतात. पण जेव्हा ते पुन्हा सुवर्णकाराच्या मुशीत पडतं तेव्हा  तुम्ही भक्त म्हणजे भगवंतरूपी सोन्याचे जणू वेगवेगळे दानिगेच आहात. दागिने वितळल्यावर त्यांचं पुन्हा सोनंच होतं. तशी भक्ताची संजीवन समाधी म्हणजे नामरूपाचाच विलय आणि माझ्यातच पुन्हा मिळून जाणं आहे! मग कापुराच्या ज्योतीची आणि सर्वात मनोज्ञ अशी घंटा-नादाची उपमा देताना विठोबा म्हणतात, ‘‘तेज स्पर्शे ज्योती कर्पुरीं निघाली। दोन्ही तीं निमालीं एकदांची।। आघातानें नाद घंटेंतून उठे। शेवटीं तो मिटे घंटेमाजीं।। ब्रह्मीं माया स्फुरे चैतन्यप्रकाशें। शेवटीं तें वसें ब्रह्मरूपीं।। पांडुरंग म्हणे ऐक नाम्या ज्ञान। वाटो समाधान तुझ्या जीवा।।’’ नामदेवा, अग्निस्पर्श होताच कापूर पेट घेतो आणि मग कापूर आणि त्याची ज्योत दोन्ही निमून जातात. परमतत्त्वाच्या स्पर्शानं मुळातचं असलेलं अव्यक्त ज्ञान कापुराच्या ज्योतीप्रमाणे व्यक्त होतं आणि नंतर ते ज्ञान आणि ज्ञानी दोन्ही पुन्हा त्या परमतत्त्वाच्याच ठायी निमून जातात. आघातानं घंटेतून नाद उत्पन्न होतो आणि अखेर तो घंटेतच अलगद जिरल्यागत मिटून जातो. अर्थात घंटेतून नाद उत्पन्न व्हावा त्याप्रमाणे परमतत्त्वाच्या स्पर्शानं अव्यक्त व्यक्त होतं आणि पुन्हा तो नाद घंटेतच विरावा त्याप्रमाणे परमतत्त्वात लय पावतं. अगदी त्याचप्रमाणे चैतन्यस्पर्शानं अचल निर्गुण ब्रह्मरूपातून सगुण माया प्रकट होते आणि अखेरीस पुन्हा त्या ब्रह्मरूपातच लय पावते. तेव्हा हे नामदेवा, हे ज्ञान जाणून मनाचं समाधान करून घे!