खऱ्या सद्गुरूचा जो सहवास आहे त्याचा परिणाम अमीट असतो. या सद्गुरूंना पांडुरंग बुवा ‘नयनांचा विसावा’ म्हणतात याचं कारण या जगातल्या सर्व गोष्टी एकतर अपूर्ण आहेत किंवा त्यांच्या प्राप्तीनं होणारा आनंदाभासदेखील काही काळ टिकणाराच आहे. त्यामुळे या जगातल्या यच्चयावत व्यक्ती आणि वस्तूंना पाहून डोळ्यांना अर्थात मनाला कधीच तृप्तीचा, पूर्णत्वाच्या जाणिवेचा अर्थात विसाव्याचा अनुभव लाभत नाही. केवळ सद्गुरू हाच पूर्ण असतो. त्याच्या बोलण्यात आणि वर्तनातही पूर्ण ज्ञानच भरून असतं. त्यामुळे मनाची तगमग शांत होते. तो नयनांचा विसावा पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही, असं पांडुरंग बुवा सांगतात. मग कुणी समजावतं की अहो, भगवंत प्रत्येक जीवमात्रांत भरून आहेच ना? तरी तो दिसतो का? कुणी म्हणतं, तो सर्वात असूनही सर्वाच्या अतीत, पलीकडे भरून आहेच ना? मग परमात्मा आणि सद्गुरू यांच्यात कोणताही भेद नसल्यानं देहात नसलेले सद्गुरू हेही दिसत नसले, तरी सर्वत्र आहेतच. त्यावर पांडुरंग बुवा कळवळून म्हणतात..

कुणी म्हणती सर्वभूतीं भगवंत भरला।

कुणि म्हणती साक्षिरूपें भगवंत व्यापिला।

कुणि म्हणती तो अतीत सर्वाच्या राहिला।

नका बोलूं ज्ञान कोणी,

आम्ही डोळां पाहिला।।२।।

चैतन्यब्रह्म माझे कुणि मजला दाखवा।।

कुणी मला सांगताहेत की, भगवंत सर्व भूतमात्रांत भरून आहे. कुणी सांगतात की तो साक्षीरूपानं व्यापून आहे. कुणी सांगतात की तो सर्वामध्ये असूनही सर्वाच्या पलीकडे आहे. मला हे ज्ञान सांगू नका हो! कारण मी या डोळ्यांनी त्याला पाहिलं आहे! कसं आणि कुठं पाहिलं आहे? बुवा सांगतात..

या ठायीं देव माझा डोळ्यांनीं पाहिला।

या ठायीं भक्तिक्रीडा भावानें खेळला।

या ठायीं मंजु बोल गुरु माझा बोलला।

गुणगुणते माणगंगा

गुण त्याचे जणूं पहा ।। ३।।

चैतन्यब्रह्म माझे कुणि मजला दाखवा।।

भगवंत असूनही दिसत नाही, हे ज्ञान नका सांगू. कारण त्या देवाला म्हणजेच माझ्या सद्गुरूंना मी याच ठायी, याच गोंदवल्यात माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे. या इथं तो भावपूर्वक भक्तीक्रीडा खेळला आहे! अनेकानेक जिवांच्या अत्यंत सामान्य जीवनात त्यानं भक्तीप्रेमाचे रंग भरले आहेत. अनेकांची ओबडधोबड जीवनं त्यानं मोठय़ा प्रेमानं घडवली आहेत. अनेकांचा चिंता आणि काळजीनं भरलेला प्रपंच त्यानं तृप्तीचा करून दिला आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर स्वत:ला सोपवून दिलं त्यांच्या पाषाणहृदयातूनही उदात्त भक्ताची मूर्ती त्यानं घडवली आहे. अनेकांच्या शुष्क अंत:करणात त्यानं शुद्ध प्रेमाचा झरा निर्माण केला आहे. हे सगळं याच इथं घडलं होतं हो.. मी अनुभवलं होतं.. याच इथं, माझ्या गुरूचे मंजूळ बोल याच आसमंतात व्यापून राहिले होते. मधुर असं नाम त्यांनी इथंच उच्चारलं होतं आणि सहज गोड बोलण्यातून त्यांनी जिवाचं हित साधणारा बोधही इथंच आपल्या मुखातून प्रकट केला होता. या गोंदवल्यातून वाहणारी माणगंगा नदी ही जणू त्यांच्याच गुणांच्या चिंतनात अखंड वाहात आहे. माझ्या अंत:करणातली माणगंगाही अजून त्यांच्याच गुणस्मरणात पाझरत आहे! तो माझा सद्गुरू मला पुन्हा दाखवा हो!