प्रपंचात राहून परमार्थ करू इच्छिणाऱ्या साधकांसाठी पू. बाबा बेलसरे यांनी सांगितलेले पाच बोधमणी आपण जाणून घेतले. आता सहावा बोधमणी वरकरणी कोडय़ात टाकणारा भासतो, पण त्यामागे सूक्ष्म वृत्तीपालटाच्या एका दीर्घ प्रक्रियेचा आरंभ आहे. हा बोधमणी म्हणजे, ‘स्वत: अमानी असून दुसऱ्याला मनापासून मान द्यावा.’ आता आपण ‘अमानी’ असावं म्हणजे काय? अमानी असणं म्हणजे स्वाभिमानी नसणं नव्हे. अमानी असणं म्हणजे अहंमानी नसणं. अनंत जन्मांच्या संस्कारांनुरूप आपल्यात वाईट गोष्टी जशा आहेत तसेच काही चांगले गुणही आहेत. काही क्षमता आहेत, काही कौशल्यं आहेत. पण जे लाभलं आहे त्यानं शेफारून जायचं नाही, त्याच्या जोरावर दुसऱ्याला तुच्छ मानून त्याच्याशी अवमानास्पद व्यवहार करायचा नाही आणि जे काही गुण आहेत, ज्या काही क्षमता आहेत त्यांच्या जोरावर कर्तेपणाचा अहंकार न जोपासता, त्या ज्यानं दिल्या त्या भगवंताच्या भक्तीकडेच हळुहळू वळवत जाणं, ही अमानी वृत्ती आहे. मातृभूमीच्या अजरामर स्तवनात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की, ‘‘गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे!’’ मी गुणरूपी फुलं या भावनेनं वेचली की त्या पुष्पांचा सुगंध माझ्या मातृभूमीला घेता यावा! तसंच आहे हे.. आपण जर साधनमार्गावर वाटचाल करीत असू, तर आपल्यातल्या सर्व गुणांचा, क्षमतांचा लाभ आंतरिक भक्तीच्या पोषणाकरीता झाला पाहिजे. जिथं समाजासाठी त्या क्षमतांचा विनियोग अपेक्षित असेल, तिथंही आपल्याला निमित्तमात्र मानून कर्तेपणा चिकटू न देता त्या गुणांचा वापर झाला पाहिजे. बरं खऱ्या मोठय़ा क्षमता किंवा गुणांचं जाऊ द्या, बरेचदा होतं काय की, आपल्यातल्या लहानसहान गुणांनाच माणूस मोठं मानतो आणि त्याचा स्वत:हूनच उदोउदो करीत असतो. दुसऱ्यासाठी थोडंस काही केलं तरी त्याला परसेवेचा मुलामा देत आपल्या ‘कर्तेपणा’चा डांगोरा पिटत असतो. त्यातही गंमत अशी की, आपल्यातले लहानसहान गुण दिसतात, पण अंतरंगातले मोठ-मोठे दोष दिसत नाहीत. त्याचप्रमाणे दुसऱ्यातले लहानसहान दोषही तीव्रतेनं दिसतात आणि अतिशय मोठे वाटतात, पण त्यांच्यातले मोठ-मोठे गुण काही दिसत नाहीत!  की त्या गुणांपासून आपणही प्रेरणा घ्यावी, असं वाटत नाही. त्यामुळेच हा बोधमणी सुचवतो की, आपण स्वत:कडे मोठेपणा घेत स्वत:चा उदोउदो करणं थांबवावं. त्याचबरोबर दुसऱ्याला तुच्छ मानणं सोडून त्याच्यातल्या गुणांची कदर करावी! अवधूताला सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीतून प्रेरणा घेता आली. या सृष्टीतला प्रत्येक पशुपक्षीही काही ना काही शिकवतो, असा त्याचा अनुभव होता.  इतकंच कशाला? देहविक्रय करणाऱ्या पिंगळेसारख्या स्त्रीकडूनही त्यानं भगवद्भक्तीचे अमीट संस्कार ग्रहण केले. तेव्हा चराचरातील ज्या ज्या  गोष्टींकडून.. पशु, पक्षी आणि माणसांकडून त्याला ज्ञान लाभलं, म्हणजेच त्याची आंतरिक जागृती झाली, जाणिवेची कक्षा रूंदावली त्या त्या गोष्टी आणि व्यक्तीला त्यानं गुरू मानलं. त्याचे चोवीस गुरू म्हणजे त्याची प्रेरणाकेंद्रंच होती. तेव्हा जोवर आपण आपल्या गुणमहात्म्याच्या गुणगानात दंग असतो आणि आपल्यालाच सर्वश्रेष्ठ मानत असतो तोवर दुसऱ्यातले गुण, दुसऱ्यातला मोठेपणा आपल्याला दिसूच शकत नाही. तो दिसू लागणं  आणि त्याची कदर करता येणं म्हणजेच अहंमान्यतेचा लेप सुटू लागणं!

– चैतन्य प्रेम