रामानंद महाराज यांच्या दर्शनास आलेल्या त्या अनाथ मुलाला सद्गुरूंच्या रूपानं अखंड निरपेक्ष वात्सल्याचा स्रोतच लाभला आणि वामन हे अगदी समर्पक नावही लाभलं. वामनाची कथा अगदी चिरपरिचित आहे. वामनाची मूर्ती लहान होती, पण अवघं त्रलोक्य तीन पावलांत पादाक्रांत करीत त्यानं असुरराज बळीला सुतल पाताळात ढकललं. अगदी त्याचप्रमाणे साधकानं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन पावलांत त्रिगुणांवर मात करीत अहंकारावरही स्वामित्व मिळवावं; या सद्गुरू संकल्पाचं बीज या नामकरणात होतं! आता थोडं स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहिलं तरी लक्षात येईल की, जागृत (जागृति), ‘मी’जाणिवयुक्त निद्रा (स्वप्न) आणि सुषुप्ति (प्रगाढ निद्रा) या तिन्ही अवस्थांत ‘मी’ आणि ‘जग’ टिकूनच असतं. ‘मी’च्या सुखाचा आधार म्हणून ‘जग’ आत्यंतिक महत्त्वाचं असतं. माझ्या अनंत भावना, कल्पना, वासना या जगाशीच जखडल्या असतात. हे जगच खरं आपलं आहे आणि मी खरा या जगाचाच आहे, अशी आपली सुप्त दृढ आंतरिक भावना असते. त्यामुळेच या दृश्य जगापलीकडे भासत असलेल्या परमात्म तत्त्वाशी जो एकरूप आहे आणि या जगात विरक्तपणे वावरत आहे, असा सद्गुरूच खरा आपला आहे आणि आपणही पूर्णपणे फक्त त्याचेच आहोत, अशी आपली सहज आंतरिक स्थिती होत नाही! नव्हे, अशी आपली स्थिती होणं जगालाही पटत नाही. त्यामुळे जग आपल्याला आपलेपणाच्या भावनेत गुंतवू पाहतं आणि आपणही आपलेपणाच्याच ओढीनं जगाशी जखडून घेत असतो; पण हे जग खरंच आपलं आहे का आणि आपण खरंच या जगाचे आहोत का हो? हे जग कसं आहे? तर हे जग त्रिगुणांचं आहे. अर्थात ते सत, रज आणि तम या गुणांचं आहे. म्हणजेच सापेक्ष प्रेम, दया, अनुकंपा, सहवेदना, सहृदयता, त्याग, सेवा आदी सद्गुणांचाही वावर या जगात आहे. त्याचबरोबर भौतिक उन्नतीसाठीची धडाडी, परिश्रमांची परिसीमा, नवनिर्मिती, स्वकष्टार्जित सुखसाधनांद्वारे सुखोपभोगाची लालसा आदी राजसिक गुणांचाही वावर जगात असतो. त्याचबरोबर कमालीची स्वार्थपरायणता, परकष्टार्जित सुखसाधने बळकावून सुख भोगण्याची लालसा, स्वत:ला अप्राप्य झालेले सुख इतरांनाही लाभू नये, अशी वृत्ती, त्यासाठी विध्वंसाचीही तयारी, क्रौर्य आदी तामसी गुणांचंही प्राबल्य या जगात आहे. अशा या त्रिगुणांनी युक्त जगात वावरताना प्रसंगपरत्वे आपल्याही मनात हे गुण उफाळून येत असतात. त्यामुळे सद्गुणांच्या प्रभावानं कधी आपल्यातला, भले अपेक्षायुक्त का असेना, पण प्रेमभाव जागा होतो. कधी आपण इतरांसाठी त्याग करतो, कधी इतरांच्या दु:खात सहभागी होत त्यांना आधार देतो. कधी रजोगुणांच्या आधारावर आपण भौतिक प्रगतीसाठी अपार परिश्रमही करतो. स्वप्रयत्नांच्या जोरावर सुखोपभोगाची साधनं संशोधित करतो, तयार करतो, निर्माण करतो आणि त्यांच्याद्वारे सुखोपभोग घेतो. कधी तामसीपणाच्या आहारी जाऊन आपण स्वार्थ भावनेनं बरबटतो, विध्वंसक होतो, इतरांचं सुख बळकावतो किंवा नष्ट करतो. तेव्हा आपण खरंच कुणाचे असतो हो? जगाचे असतो की आपल्याच मनाच्या त्रिगुणयुक्त ओढींचे असतो? नि विचार केला की लक्षात येईल, आपण केवळ आपल्या मनाचेच अर्थात स्वत:चेच आणि स्वत:पुरतेच जगत असतो. सद्गुरूंचं होणं म्हणजे ‘मी’ऐवजी ‘तू’चं होणं आहे.

– चैतन्य प्रेम