श्रीबाबामहाराज आर्वीकर सांगतात की, ‘‘सत्कार्य म्हणजे चिरंतन परमेश्वराच्या प्रकाशाकडे चालवाट करण्याची कृती..’’ आणि आधीच सांगितल्याप्रमाणे, हा शब्द ‘वाटचाल’ नाही, ‘चालवाट’च आहे! वाटचाल म्हणजे जी वाट मिळाली आहे त्या वाटेनं चालणं आणि ‘चालवाट’ असं सुचवतो की जी चाल सद्गुरूंना अभिप्रेत आहे, ती चाल ज्या वाटेनं साधेल, त्या वाटेनं चालणं! म्हणजे तुम्हाला खरं परमसुख हवं असेल, तर ते ज्या वाटेनं जाऊन दु:खंच दु:खं पदरात पडतं त्या वाटेनं जाऊन लाभणार नाही. मग सुख जर हवं असेल, तर तो मार्गही सुखाचाच असला पाहिजे. ज्ञान हवं असेल, तर अज्ञानाची उपासना करीत राहून ते लाभणार नाही. तेव्हा ही वाट ध्येयसंगतच असली पाहिजे. तर सत्कार्य कोणतं आहे? तर ते आहे, चिरंतन परमेश्वराच्या प्रकाशाकडे चालवाट करण्याची कृती. आता परमेश्वराचा उल्लेख इथं झाला. पण मुळात परमेश्वर म्हणजे कोण, हेच पूर्ण खात्रीनं माहित नसताना त्याचा प्रकाश म्हणजे काय, त्या प्रकाशाकडे चालवाट म्हणजे काय, हे कसं कळावं? तर हा परमेश्वर कोण आहे हो? बाबामहाराज सांगतात, ‘‘तुमच्या आत राहून तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या आकाराने नटणारा नटनागर श्रीहरी सतत आठवा आणि त्या जगदात्मा दयाळू परमात्म्याचे आपल्यावर असलेले सर्वाधिक प्रेम स्मरणात ठेवून त्याच्यावर तसेच प्रेम करा.’’ तर हा परमात्मा कसा आहे? तर.. १. तो आपल्याच आत आहे, २. तो आपल्या इच्छेप्रमाणे आणि आपल्या इच्छित आकाराप्रमाणे नटणारा आहे, ३. तो जगदात्मा दयाळू आहे, आणि ४. त्याचं आपल्यावर सर्वाधिक प्रेम आहे! आपण हे अनेकवार ऐकतो की तो परमात्मा आपल्याच आतमध्ये आहे. तो चराचरात भरला आहे आणि आपल्यातही आहे. आपण त्या परमेश्वराचेच अंश आहोत. पण तरीही ही माहिती  ऐकीवच वाटते, अनुभवाची नव्हे! त्यामुळे बाबामहाराज त्या आपल्याच अंत:करणात असलेल्या परमेश्वराबद्दल हे जे चार मुद्दे  मांडतात ते थोडं अंतर्मुख होऊन नीट परत परत जाणून घेण्यासारखे आहेत. तो परमेश्वर आपल्या आतच आहे, हे तर आपण ऐकतो. पण यातला विशेष आहे तो दुसरा मुद्दा! तो सांगतो की तो परमेश्वर जिवाच्या इच्छेप्रमाणे नटणारा आहे! आपण आजवर ऐकलं की आपली इच्छा आणि परमेश्वराची इच्छा यात भेद आहे आणि म्हणूनच आपल्या जीवनात दु:खं आहे. कारण त्याची इच्छा आपण जाणत नाही आणि आपल्या नश्वर गोष्टींच्या इच्छांपायी ईश्वरी इच्छेपासून आपण दुरावत असतो. पण इथं तर महाराज सांगतात की, तो जिवाच्या इच्छेप्रमाणे नटतो! याची उकल करण्यासाठी थोडं आतच डोकावून पाहायला हवं. थोडा विचार केला की जाणवेल, आपल्याला आपली सतत अखंड सोबत सुरू आहे. आपल्याला आपला स्वत:चा, आपल्या इच्छांचा कधीच कंटाळा येत नाही. आपण आपल्या इच्छेशी सदैव एकरूप असतो. इतकंच नाही, तर इच्छापूर्ती झाली तर मी कसा जगेन, या स्वप्नातही आपण रमतो. हे जे आपलं इच्छांशी, आपल्या स्वप्नांशी एकरूप होणं आहे, त्यात कल्पनेनं रमणं आहे, हे सारं त्याच परमेश्वराकडून सुरू आहे, असा नवा भाव बाबामहाराज रूजवू पाहात आहेत.  मग असं वाटेल की, आपल्या कित्येक इच्छा अगदी नगण्यही असतात. त्या इच्छांमधील आपली एकरूपताही त्याच्याच शक्तीनं सुरू आहे का?

– चैतन्य प्रेम