18 February 2019

News Flash

१९४. मार्ग-सूचन

साधकासाठी म्हणून श्रीअरविंद आश्रमाच्या ‘साधकाची चिंतनिका’ या पुस्तिकेतला बोध आपण पाहात आहोत.

साधकासाठी म्हणून श्रीअरविंद आश्रमाच्या ‘साधकाची चिंतनिका’ या पुस्तिकेतला बोध आपण पाहात आहोत. आता सर्व तऱ्हेच्या उतावीळ कर्माचा त्याग करायला अर्थात मनाच्या ओढींनुसार अविचारानं कर्ममोहांत फसणं थांबवायला, निर्थक वाद किंवा गप्पांत वेळ न घालवायला, आपलं कौतुक करीत कर्म अहंभावानं करणं टाळायला, कल्पनेमागे मनाचं वाहणं थांबवायला आणि आत्मभावाच्या पोषणाव्यतिरिक्त बुद्धीचा अन्यत्र सुरू असलेला संचार थांबवायला ही चिंतनिका सांगते. अर्थात हे काही साधकाला तत्काळ साधणार नाही. याची कल्पना असल्यानं या अभ्यासाला बळ येण्यासाठी जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायला हवी, तीदेखील ही चिंतनिका सांगते. ही गोष्ट म्हणजे, ‘तुमच्या श्रद्धाविषयास चिकटून राहा आणि त्यास धरूनच सर्व व्यवहार करा. समजा चुकून काही वर्तन झाले तरी निराश उदास  न होता आपल्या आढय़तेस चांगलाच प्रतिकार करा.’ आता सद्गुरूबोध हाच साधकाचा श्रद्धाविषय असला पाहिजे. या बोधास चिकटून आणि त्या बोधाचं अवधान सुटू न देता सर्व व्यवहार करा, असं ही चिंतनिका साधकांना सांगते. आणखी एक मोठा दिलासा आहे तो म्हणजे, ‘समजा चुकून काही वर्तन झाले तरी निराश उदास  न होता आपल्या आढय़तेस चांगलाच प्रतिकार करा.’ म्हणजेच हातून चूक होऊ शकते, हेदेखील गृहित धरलं आहे. जो अभ्यास करीत आहे अशा साधकाकडून कधी चूक आणि कधी बरोबर होणारच. त्यामुळे वर्तनात काही चूक झाली, बोधाशी विपरीत असं वर्तन घडलं तरी निराश किंवा उदास होऊ नये. आता त्याला जोडून जे ‘आढय़तेचा प्रतिकार करा,’ हे सांगितलं आहे त्याचा अर्थ काय असावा? कारण जे मन निराश वा उदास होतं ते आढय़ताखोर असू शकेल का? तर इथं आढय़ता म्हणजे काय? तर एकदा का चुकीला सूट मिळाली की आपलं मन चुकांना निर्ढावतं! उलट आपल्या साधनेमुळे, सद्गुरूबोधाच्या शाब्दिक ज्ञानामुळे जो अहंभाव मनात रूजत असतो त्यामुळे आढय़ताही सूक्ष्मपणे मनात शिरते. मग आपल्या चुकांचं काहीच वाटेनासं होतं. तेव्हा त्या आढय़तेचा प्रतिकार साधकानं केला पाहिजे, असं ही चिंतनिका सांगते. या आढय़तेचा प्रतिकार करतानाच आणखी काय करायला हवं? तर चिंतनिका सांगते की, ‘‘सतत नम्र, शांत आणि समवृत्ती राखण्याचा आणि घडणाऱ्या घटनांचा मनावर अति खोल संस्कार होऊ न देण्याचा अभ्यास ठेवा. आत्मोन्नतीचा हाच एक सुलभ आणि खराखुरा मार्ग आहे.’’ आता नम्र राहणं म्हणजे काय? तर अहंभावानं जगण्याची सवय सोडून देणं. शांत राहणं म्हणजे मनाची भ्रम-मोहानं होणारी धाव रोखणं. समवृत्ती राखणं म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल अशा गोष्टींबद्दल समान भाव राखणं, अमुक व्हावं किंवा अमुक टळावं, या भावनेनं मनाची उलाघाल न होऊ देणं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घडणाऱ्या घटनांचा मनावर अति खोल संस्कार न होऊ देणं. म्हणजे काय? तर अनुकूल घडलं तरी त्यानं शेफारून न जाणं किंवा प्रतिकूल घडलं तर त्यानं खचून न जाणं. थोडक्यात ज्या जगात आपण वावरतो त्याचं आपलं आकलन बरचंसं आपल्या देहबुद्धीनुरूपच असतं. अर्थात ते वास्तविक असतंच असं नव्हे. तेव्हा त्या आकलनानुसार जगाकडे पाहण्याची सवय सोडून सद्गुरूबोधाला सुसंगत जगण्याकडे अधिक लक्ष देण्यास ही ‘चिंतनिका’ सुचविते.

– चैतन्य प्रेम

First Published on October 8, 2018 1:34 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 58