आडमार्गाला कुणी गेला, तर जग त्याला थाऱ्याला उभं करीत नाही. आणि त्यात जगाचाही दोष नाही. जो आडमार्गाला गेला आहे त्याची पूर्ण जबाबदारी एका सत्पुरुषाशिवाय अन्य कुणी घेऊ शकत नाही. कारण त्या जिवाचं खडतर भवितव्य आणि त्या भावी खाचखळग्यातून त्याला कसं सोडवायचं, हे तेच केवळ जाणत असतात. भावनेच्या भरात कुणी एखाद्याला आसरा द्यायचा निर्णय घेतोही किंवा आपल्या प्रयत्नांनी एखाद्यात सुधारणा होईल, असं मानतोही. त्याचे हेतू प्रामाणिक असतात, पण तरीही एका मर्यादेबाहेर कुणीच कुणासाठी काही करू शकत नाही. कारण जो तो त्याच्या परिस्थितीनं बांधलेला असतो. एक सत्पुरुषच संपूर्ण नि:शंक, निर्भय, निर्लिप्त असल्यानं तो बद्ध आणि अवनत जिवालाही आधार देऊ शकतो. पण हा आधार लाभूनही आडमार्गाची गोडी सुटत नाही! त्या वाटेवर पावलं पडतातच आणि अशा वेळी त्याला आधार देणारा भौतिक जगातला दुसरा माणूस त्रागा करू शकतो की, ‘‘तुझ्यासाठी एवढं केलं तरी तुझ्यात काहीच सुधारणा नाही की जे केलं त्याची जाण नाही, तर आता काही तुला आधार देणं शक्य नाही. आता तू आणि तुझं नशीब!’’ तेव्हा जगाचा आधार असा कोणत्याही क्षणी किंवा जगाची सहनशक्ती संपताच सुटतो, पण सत्पुरुषाचा आधार अखंड असतो. अगदी तो जीव आडमार्गानं पुन्हा गेला, तरी तो त्याला सावध करीतच राहतो. श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या दर्शनाला परगावहून एक विधवा स्त्री आपल्या मुलासह आली होती. ती गोंदवल्यासच राहिली. आपल्यानंतर आपल्या मुलाचं कसं होणार, ही चिंता तिला पोळत होती. काही दिवसांतच ती आजारी पडली आणि आता काही आपण जगत नाही, हे तिला कळून चुकलं. तिनं आपली व्यथा महाराजांना सांगितली. महाराजांनी तिला सांगितलं, मी याचा सांभाळ करीन! तिच्या मृत्यूनंतर महाराज त्याला अगदी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळत होते. त्याला नजरेआड होऊ देत नव्हते. त्याला हवं-नको पाहात होते. काही र्वष गेली. त्यानं तारुण्यात पदार्पण केलं आणि महाराजांच्या सान्निध्यात असूनही त्याला वाईट गोष्टींचा नाद लागला. एकदा रात्री महाराज जागे झाले आणि मशाल घेऊन कोण कुठे निजलं आहे, ते पाहू लागले. तो तरुण दिसेना. तेव्हा त्याला शोधत ते माणगंगा नदीच्या किनारी गेले. तिथं एका स्त्रीबरोबर तो झोपी गेलेला आढळला. गार वारं सुटलं होतं. महाराजांनी काही न बोलता आपल्या अंगावरची शाल त्याच्या अंगावर टाकली. सकाळ झाली. त्याला जाग आली आणि आपल्या अंगावरची महाराजांची शाल पाहून तो चपापला. महाराज इथं येऊन गेले आणि आपल्याला तशा अवस्थेत पाहूनही आपल्या अंगावर शाल टाकून गेले, या जाणिवेनं तो शरमिंदा झाला. महाराजांच्या पराकोटीच्या वात्सल्यभावानंही त्याला अंतर्बाह्य़ हेलावून टाकलं होतं. तो मान खाली घालून महाराजांकडे आला आणि क्षमायाचना करून, ‘मला काही साधना सांगा,’ असं विनवू लागला. त्याच्या अंत:करणातली खरी तळमळ जाणून महाराजांनीही त्याला नाम दिलं आणि मग तो साधनेसाठी म्हणून गोंदवल्यातून गेला. तेव्हा ‘‘तव पदरी असता त्राता, आडमार्गी पाऊल पडता, सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता,’’ हे केवळ एका सद्गुरूंनाच लागू पडतं.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com