जोपर्यंत माणूस प्रारब्धाचा आनंदाने स्वीकार करून आत्मानंदासाठी झटत नाही, तोपर्यंत त्यावर चमत्काराचा पगडा राहणार आहे आणि असे ‘चमत्कार’ करणारेही राहणार आहेत! पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचं हे मार्मिक विधान आपल्यालाही अंतर्मुख करणारं आहे. आपल्या आध्यात्मिक वाटचालीची फेरतपासणी करण्यासही उद्युक्त करणारं आहे. प्रारब्ध म्हणजे तरी काय? आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अशा घटना ज्या का घडतात, ते नेमकेपणानं उमगत नाही आणि त्या घटना टळतही नाहीत. त्या घटना आपल्याला प्रतिकूल भासतात, नकोशा वाटतात, पण तरी त्या चुकत नाहीत. मग त्या अडचणी असतील, संकटं असतील, शारीरिक व्याधी असतील, आर्थिक हानीचे प्रकार असतील, मानहानीचे प्रसंग असतील, वियोगाचे वा अपयशाचे प्रसंग असतील.  अगदी याचप्रमाणे प्रारब्ध म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अनेक अनुकूल घटनादेखील, ज्या का घडल्या, कशा घडल्या हे कळत नाही. मात्र अनुकूल काही घडलं की अनेकदा त्याचं श्रेय आपण आपल्या कर्तृत्वाकडे घेतो. म्हणूनच प्रारब्ध म्हटलं की त्याची नकारात्मक बाजूच अधिक ठसठशीतपणे जाणवते. जीवनातील प्रतिकूल गोष्टी टाळण्याचे किंवा बदलण्याचे आटोकाट प्रयत्न आपण आपल्या परीनं करतोच, पण त्यात यश आलं नाही की बेचैन होतो. त्यातूनच मग, असा कुणीतरी भेटावा की ज्याच्या नुसत्या आशीर्वादानं आयुष्यातल्या प्रतिकूल, मनाविरुद्धच्या गोष्टी दूर व्हाव्यात, असाही विचार मनात डोकावू शकतो. चमत्काराची ओढ त्यातूनच उद्भवते. चमत्कार म्हणजे तरी काय? परिस्थिती कशीही आली तरी तिचा मनानं स्वीकार करता येणं, हा चमत्कार आपल्याला नको असतो! उलट परिस्थिती मनासारखी होणं कितीही कठीण भासत असलं तरी कुणाच्या तरी नुसत्या आशीर्वादानं तसं घडावं, यालाच आपण चमत्कार मानतो. मग अशा कुणाचा तरी शोध सुरू होतो. जो खरा सत्पुरुष असतो त्याच्यापाशीही अशी चमत्काराची आस घेऊनच माणसं पोचतात. पण तो त्यांना त्या चमत्काराच्या आशेतून अलगद सोडवतो आणि प्रयत्नांची कास धरायला लावून फळाच्या आशेतून सोडवतो. पण जो खोटा आणि स्वयंघोषित ‘सत्पुरुष’ असतो तो? इथं मग पू. डॉ. देशमुख यांनी सांगितलेली मूर्ख लोभी आणि धूर्त लोभ्याची गोष्ट मार्गदर्शक ठरते. कुणीतरी सांगतो की मी तुमचे पैसे दुप्पट करून देतो, तेव्हा पैशाचा लोभ जागा होतो! त्या लोभाला मूर्खपणाची साथ मिळते आणि असा मूर्ख लोभी माणूस आहे ते पैसेही गमावून बसतो. असे पैसे दुप्पट करणं खरंच शक्य आहे का, जर ते शक्य असेल तर ज्याला ही ‘कला’ अवगत आहे तो दुसऱ्याचा फायदा का करून देईल, तो आपलेच पैसे परत-परत दुप्पट करीत चैनीत जगणार नाही का, हे प्रश्न मनात येत नाहीत. जोवर असे मूर्ख लोभी आहेत आणि जोवर काही न करता आपला भरपूर लाभ व्हावा, ही इच्छा त्यांच्या मनात कायम आहे, तोवर ते साधून देण्याची हमी देणारे धूर्त लोभीही त्यांना वेळोवेळी भेटणारच! म्हणूनच पू. डॉ. देशमुख सांगतात त्याप्रमाणे, योग्यता नसताना, कर्तबगारी नसताना, श्रमांची जोड नसताना, कौशल्य नसताना आणि प्रारब्ध अनुकूल नसताना जे मिळणार नाही किंवा घडणार नाही, ते कुणा बाबा-बुवाच्या पायावर नुसतं डोकं ठेवून मिळावं, असं ज्यांना वाटतं त्यांच्या अशा वाटण्याला पुष्टी देणारे त्यांना भेटतातच.

चैतन्य प्रेम