संतही कधीकधी शारीरिक व्याधीदुखं भोगताना दिसतात. रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कर्करोग झाला होता. त्याबद्दल एकदा माताजी (शारदादेवी ) म्हणाल्या की, ‘‘हे पाहून निम्मा कचरा बाहेरच्या बाहेरच परत जातो!’’ मनावर कितीही आघात करणारा असला, तरी भक्तीच्या नावावर ऐहिक सुखांची अपेक्षा बाळगत असलेल्या सकाम साधकांसाठी हा फार अचूक शब्दप्रयोग आहे! कारण मग अशांना वाटे की, यांनाच जर व्याधी जडली आहे, तर ते आपल्या व्याधी काय दूर करणार? एक फार मोठे सत्पुरुष होते. त्यांना हळूहळू दिसेनासं झालं आणि कालांतरानं काही काळासाठी त्यांची वाचाही गेली होती. ध्यानात त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत असत. पण दिसेनासं आणि बोलता येईनासं होताच गर्दीच आटली! कारण ‘हे आता काय सांगणार,’ हा भाव! ‘इतकी र्वष खरी भक्ती करा, हे सांगूनही कुणी ऐकून घेतलं नाही, मग आता बोलतही नाही आणि पाहातही नाही,’- हा त्या सत्पुरुषाचा आंतरिक भाव कुणाला कळावा! तेव्हा संत सत्पुरुषांच्या शारीरिक स्थितीवरून आपण त्यांच्या साधुत्वाचं मोजमाप करीत असतो. स्वामी तुरीयानंद या वृत्तीला अनुसरून म्हणतात, ‘‘शरीर का कधी साधू बनत असतं? मनच साधू बनत असतं!’’ आणि आज सगळा आटापिटा शरीर साधूसारखं बनवण्याचा सुरू आहे! जटा, दाढी, लांब केस, भगवी वस्त्रं आणि वेगवेगळ्या गंधरेषा आणि माळा; असा बाह्य जामानिमा, सजावट अचूक आहे, पण मन? ते खरंखुरं साधू बनलंय का? शरीराला साधूसारखं बनवणं सोपं काम आहे, पण मनाला साधू बनवणं मोठं कष्टाचं काम आहे. तेवढी उसंत कुणाकडे आहे? साधू होऊ पाहणारा माणूस आणि साधूची भक्ती करू पाहणारा समाज; या दोघांनाही तेवढी उसंत नाही. बाजार जोमात आहे, गर्दीनं फुललेला आहे आणि वेळ कमी आहे! साधुत्वाचा वेष पांघरलेल्या माणसाला, लोकांसमोर आशीर्वादाचा हात उंचावून आपल्या ऐहिक सुखाची व्यवस्था करायची तळमळ आहे आणि त्याच्या आशीर्वादाच्या जोरावर आपल्या सुखसाधनांमध्ये अखंड वाढच वाढ होत रहावी, अशी तळमळ साधकत्वाचा बुरखा पांघरलेल्या माणसालाही आहे.. मग मनाच्या जडणघडणीची पर्वा कुणाला आहे? स्वामी तुरीयानंद म्हणतात, ‘‘मनुष्य नेहमी सुखसोयीच शोधत असतो. ही सुखसोय शोधणं फक्त या जन्मीच नव्हे, तर शेकडो जन्म तो करत आला आहे. आणि ही सुखसोय सोडून देणं म्हणजेच मुक्ती! कोणीही कष्ट करू इच्छित नाही. प्रत्येक माणूस स्वतला त्यापासून वेगळं ठेवू इच्छितो!’’ सुख म्हणजे नेमकं काय, हे माहीत नसतं. या घडीला जे सुखाचं वाटतं ते मिळणं आणि जे दुखाचं वाटतं ते टळणं यालाच आपण सुख मानत असतो. मग ते सुख ज्या योगे मिळेल असं वाटतं त्या साधनांचा अखंड संग्रह, हाच जगण्याचा एकमात्र उद्देश बनतो. जो शरीरानं साधूसारखा भासत आहे तो आणि जो शरीरानं साधकासारखा भासत आहे; दोघंही याच एका उद्दिष्टात अडकून जगत राहतात. फरक इतकाच की असला ‘साधक’ प्रपंच वाढवण्यात, तर असला ‘साधू’ आश्रम, शिष्यसंख्या, सत्संग कार्यक्रम यांचा प्रपंच वाढवण्यात गुंतून जातो. मनानं साधू झालं पाहिजे, हे भान सोडाच आकलनच नसतं. त्यामुळे सुखभ्रमाची लालसा हीच दुखवास्तवाचं कारण बनत आहे, हेच लक्षात येत नाही! दुखाची भीती सोडली, तर सुखासाठीची लाचार वेठबिगारीही संपेल, हेच उमजत नाही.