19 February 2019

News Flash

९९. बाहेरून आत

कर्नाटकात कन्नूर या गावी श्रीगणपतराव महाराज म्हणून सिद्धपुरुष होऊन गेले.

कर्नाटकात कन्नूर या गावी श्रीगणपतराव महाराज म्हणून सिद्धपुरुष होऊन गेले. ‘सुलभ आत्मज्ञान’ हा त्यांचा छोटेखानी ग्रंथ साधकासाठी मार्गदर्शक आहे. वस्तुत: जीवन केवळ एका भगवंतानं दिलं असून ते त्याच्यासाठीच खरंतर व्यतीत करायचं असल्यानं अवघं जगणं हे एकसंधच असलं पाहिजे. तरीही अध्यात्माच्या वाटेवर पाऊल ठेवत असलेला साधक हा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ असे जगण्याचे दोन भाग पाडतो. त्यामुळे ‘परमार्था’त तो त्यागी, निर्भय, प्रेमळ होण्याचा प्रयत्न करीत असतानाच ‘प्रपंचा’ तो आसक्तीनं बरबटलेला आणि कोत्या स्वार्थी वृत्तीचा आणि म्हणूनच भयगंडानं पछाडलेला असतो. प्रपंचासाठी जगण्याचे नियम वेगळे असले पाहिजेत आणि परमार्थासाठी वेगळे नियम असले पाहिजेत, असंही तो मानतो. पण बरेचदा प्रपंच तो आसक्तीनं आणि असोशीनं करतोच, पण त्याचा परमार्थही प्रपंचच झाला असतो. अशा साधकाला सावध करताना गणपतराव महाराज म्हणतात, ‘प्रपंच करणे हे दुसऱ्यासाठीच आणि परमार्थ मात्र केवळ स्वहितासाठीच आहे.’ प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा, असं जो मानतो त्याच्यासाठी हे मार्गदर्शन आहे, हे लक्षात ठेवून ते वाचू. तर आपला प्रपंच हा आसक्तीनं बरबटलेला असतो. तो आपण आवडीनं करतो. तो करायला दिवसाचे चोवीस तासही पुरे पडत नाहीत. तो ‘मी’पणातून होत असल्याने, ‘मी’ला सतत सुख मिळावं, हा एकमेव उद्देश त्यात असतो. अशा साधकाला महाराज सांगतात की, प्रपंच हा दुसऱ्यासाठी आहे! थोडक्यात तो स्वत:साठी नाही, स्वत:ला सुख मिळावं, यासाठी नाही. तर दुसऱ्यांबाबत माझी जी जी कर्तव्यं आहेत ती पूर्ण करण्यापुरता प्रपंच आहे! ही जाणीव ठेवली तर प्रपंचात सुखाशेनं जे गुंतणं आहे, ते कमी होऊ लागेल आणि कर्तव्याची जाण वाढत जाईल. मग सांगतात की, प्रपंच म्हणजे निव्वळ कर्तव्यपूर्ती असताना, परमार्थ हा स्वहित साधण्यासाठीच आहे! आपण परमार्थ करतो आणि कधी कधी त्या जोरावर दुसऱ्याच्या प्रापंचिक चिंता मिटवण्याचा प्रयत्न करतो! म्हणजे स्वत: अध्यात्माच्या मार्गावर नीटसे वळलो नसतानाच, दुसऱ्याला या मार्गावर वळवण्याची धडपड सुरू करतो. दुसऱ्याचं हित साधून देण्याची धडपड करतो. आत्मोपकार साधला नसतानाच परोपकार साधण्याचा हा प्रयत्न आपला वेळ आणि क्षमता खर्ची करणारा तर असतोच, पण आपली ध्येयपथावरील वाटचाल खुंटविणाराही असतो. तेव्हा साधकानं आवश्यक ती सर्व कर्तव्यर्कम पार पाडत असताना परमार्थप्राप्तीसाठीच जगण्याचा अभ्यास केला पाहिजे, असं महाराजांना वाटतं. काही जण मात्र साधना न करण्याची सबब म्हणून प्रपंचाकडे बोट दाखवतात. म्हणजे, ‘काय करू हो, प्रपंचाची इतकी जबाबदारी आहे की इच्छा असूनही देवाधर्माचं काही करायला सवडच मिळत नाही,’ असं सांगतात. अशा पळवाटा खोटय़ा ठरवताना महाराज म्हणतात, ‘आत्माभ्यास करण्यास प्रापंचिक कामं आड येत नाहीत की प्रापंचिक कामं करण्यास आत्माभ्यास आड येत नाही!’ आंतरिक जागृती ठेवून जगण्याचा जो अभ्यास आहे त्याच्या आड प्रपंच कसा येईल? आणि तो अभ्यास तरी प्रपंचाच्या आड कसा येईल? असं तर कधी होत नाही, की काय करावं हो जप करताना कसा वेळ गेला काही कळलंच नाही आणि रात्रीचा सगळा स्वयंपाक करायचा राहिला किंवा नोकरीवर जायचंच राहिलं. इतकी काही आपण तन्मय होऊन साधना करीत नाही. कधी एकदा जप पूर्ण करतो आणि प्रपंचाकडे धावत जातो, हीच सूक्ष्म तळमळ असते. तेव्हा साधनेपायी कामं मागे पडत नाहीत.

– चैतन्य प्रेम

First Published on May 22, 2018 1:23 am

Web Title: loksatta chintan dhara part 99