Chintandhara loksatta philosophy, Chintandhara article

स्वामी विवेकानंद यांच्या सांगण्यानुसार, ‘‘व्यवहार्य धर्म म्हणजे मी आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन जाणे. (त्यासाठी) चुकीचे तादात्म्यीकरण थांबवा!’’ तर, आत्म्याशी एकरूप होऊन जाणं, हाच व्यवहार्य धर्म आहे.. पण ‘आत्मा’ म्हणजे काय, याचा जोवर अनुभव नाही, तोवर त्याच्याशी एकरूप तरी कसं होणार? ते आत्मतत्त्व आकळण्यासाठीच या वाक्याचा उत्तरार्ध महत्त्वाचा आहे, तो म्हणजे, ‘‘चुकीचे तादात्म्यीकरण थांबवा!’’ तेव्हा स्वामीजींच्या सांगण्यानुसार आपण अशा काही गोष्टींशी तादात्म्य पावलो आहोत, एकरूप झालो आहोत की ज्या आपल्या मूळ मुक्त स्वरूपापासून आपल्याला दूर करीत असल्या पाहिजेत! आपल्याला बंधनात अडकवत असल्या पाहिजेत. त्या कोणत्या हे कळण्यासाठी थोडं शांत बसून, अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. पण ही शांतता, ही अंतर्मुखता साधण्यासाठी स्वामीजींसारख्या सत्पुरुषांचा बोध आचरणात आणणं, हाच एकमेव आधार आहे. मन शांत करण्याचा अगदी प्रारंभिक उपाय स्वामीजी सांगतात की, ‘‘मनाचं निमयन करा.’’ आता हा उपाय आपल्याला अनेकदा वाचून माहीत आहेच, पण तरीही मनाचं नियमन म्हणजे काय, हे लक्षात येत नाही. स्वामीजी सांगतात की, ‘‘ मन हे सरोवराप्रमाणे असून त्यात पडणारा प्रत्येक दगड लाटा उत्पन्न करतो. या लाटा आपण कोण आहोत, हे आपल्याला पाहू देत नाहीत. संपूर्ण चंद्राचं प्रतिबिंब सरोवराच्या पाण्यात पडलेले आहे, परंतु सरोवराचा पृष्ठभाग इतका विचलित झालेला आहे की, आपण ते प्रतिबिंब स्पष्टपणे पाहू शकत नाही. पृष्ठभाग शांत होऊ द्या. प्रकृतीला लाटा उत्पन्न करू देऊ नका. शांत रहा आणि काही वेळानं प्रकृती तुमचा पिच्छा सोडून देईल. मग आपण कोण आहोत ते आपल्याला कळेल.’’ आता शांत सरोवरात लाटा उत्पन्न करणारी दोन कारणं स्वामीजींनी इथं सांगितली आहेत. ती म्हणजे ‘दगड’ आणि ‘प्रकृती’. दगड म्हणजे बाह्य़ जगात घडणारी आणि आपल्या मनोजीवनासाठी आपल्याला महत्त्वाची भासणारी घटना आणि ‘प्रकृती’ म्हणजे आपली स्वभावप्रकृती! दगड जसा सरोवरात बाहेरून टाकला जातो त्याप्रमाणे बाह्य़ जगातल्या अनुकूल किंवा प्रतिकूल घटना या आपल्या अंतरंगावर आघात करतात. त्या आघाताचा आपल्या मनावर आपल्या स्वभावाच्या घडणीनुसार जो सुखद किंवा दु:खद ठसा उमटतो आणि त्यानुसार मनाचं जे आंदोलित होणं आहे त्या म्हणजे प्रकृतीनं लाटा उत्पन्न करणं आहे.  आता बाह्य़ जगातल्या घटनेकडे आपण तटस्थपणे पाहूच शकत नाही. ‘मी म्हणजे अमुक’ ही जी ठाम समज जन्मापासून आपल्या मनात रूतून असते त्या ‘मी’पणापलीकडे आपल्याला जाताच येत नाही. प्रत्येक विचार त्या ‘मी’पणाच्याच भिंगातून भिडतो. त्या ‘मी’पणाच्याच भिंगातून आपण त्या घटनेकडे पाहतो आणि तिला प्रतिसाद देत असतो. तेव्हा हे सरोवर शांत तेव्हाच होईल जेव्हा बाह्य़ आघातांनुसार मनात उत्पन्न होणाऱ्या  विचारांमागे आपण वाहवत जाणार नाही. हे लगेच साधणार नाही. हळूहळू प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक ते साधेलही. मग उमटणारा प्रत्येक विचारतरंग मनाला मोहित करून आपल्याला फरपटत नेऊ शकणार नाही.. अविचारी कृतीसाठी उद्युक्त करू शकणार नाही. मग मनाचा पृष्ठभाग स्थिर होत गेला की, आपल्याच मनाची धाव कुठे आणि कशी आहे, हेसुद्धा हळूहळू जाणवू लागेल.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

– चैतन्य प्रेम