जीवहट्टासाठी सद्गुरूंना  जिवाच्या पातळीवर खाली उतरावं लागतं. यात कार्याचा दर्जा साहजिक कमी होतो, अनावश्यक विलंब होतो आणि परिणामांविषयी अनिश्चितता निर्माण होते. आता जिवाच्या पातळीवर सद्गुरू कसे उतरतात, याचे अनेक दाखले अनेक सत्पुरुषांच्या लीलाचरित्रात आढळतील. श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातला एका गांजेकस बुवाचा प्रसंग प्रसिद्ध आहे. बाळंभट जोशी यांना महाराजांनी गोंदवल्यात आग्रहानं आणलं तेव्हा ते म्हणाले की, ‘‘महाराज तुम्ही म्हणता ते नाम वगैरे मी घेईन हवं तर, पण मला रोज एक आण्याचा गांजा लागतो. ते व्यसन तुम्ही पुरवत असाल, तर मी येईन.’’ महाराजांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आणि त्यांचं व्यसन पुरवायचं आश्वासनही दिलं. मग बाळंभटांना रोजचा जपही नेमून दिला आणि ठरलेल्या वेळी कुणाबरोबर तरी महाराज त्यांना गांजाही पाठवू लागले. एकदा महाराजांनी यात थोडा विलंब केला. त्यामुळे बेचैन झालेले बाळंभट महाराजांना जाब विचारायला म्हणून मंदिरात आले. तेव्हा महाराजांसमोर बरीच माणसं बसली होती आणि त्यांच्याशी सुख-दु:खाच्या गोष्टी महाराज करीत होते. ते बोलणं ऐकत असताना बाळंभटांचं भान हरपलं. काही क्षण जाताच महाराजांनी अचानक त्यांच्याकडे लक्ष गेल्यासारखं दाखवलं आणि म्हणाले, ‘‘अरे हो! बाळंभट आज तुमच्याकडे गांजा पाठवायचा राहिलाच बघा. मीच आता बाजारात जाऊन तो आणतो!’’ असं म्हणत महाराज हातात पिशवी घेऊन निघाले. तोवर महाराजांचा मोठेपणा बाळंभटांना जाणवला होताच. आपल्यासारख्या एका तुच्छ जिवाचं तुच्छ व्यसन सांभाळण्यासाठी महाराज स्वत: बाजारात निघाल्याचं पाहून त्यांचं हृदय पिळवटलं. धावत जाऊन त्यांनी महाराजांच्या पायांना मिठी घातली आणि, ‘‘महाराज मला या व्यसनातून सोडवा,’’ असं कळवळून म्हणाले. महाराजांनीही मग त्यांना मोठय़ा प्रेमानं त्या व्यसनातून सोडवलं. कलावती आईंच्या चरित्रातही त्यांनी चहाच्या व्यसनातून एका सेवेकरी महिलेला सोडवल्याचा असाच प्रसंग आहे. आता खरं पाहता सद्गुरू व्यसनातून लोकांना सोडवण्याच्या कार्यासाठी आले आहेत का? खरं तर भवाचं  जे व्यसन जिवाला अनंत काळापासून जडलं आहे, त्यातून त्याची कायमची सुटका करण्यासाठी ते आले आहेत. मात्र अशा गोष्टींतच आपण त्यांचा वेळ घेतो आणि त्यापायी अनावश्यक विलंब होतो. आता हा विलंब कोणत्या गोष्टीत होतो? तर, तो आंतरिक वाटचालीत विलंब होतो. आधी जिवाच्या भौतिकातल्या सवयी सांभाळा, मग त्या सवयी सोडण्याची इच्छा त्याच्या मनात जागी करा, मग त्या सवयींपासून त्याची सुटका करा, मग त्याचं भौतिक जगणं सुधारून द्या, मग त्या भौतिकाइतकंच आंतरिक जगत सुधारण्याची प्रेरणा त्याच्या मनात निर्माण करा, या आंतरिक वाटचालीनं भौतिक जगणं धोक्यात येणार नाही हे सिद्ध करा, मग त्या आंतरिक वाटचालीसाठी त्याची तयारी करा, त्या वाटेनं त्याला चालायला शिकवा.. पहा बरं.. किती मोठी प्रक्रिया सद्गुरूंना पार पाडावी लागत असते. आणि या प्रत्येक टप्प्यावर जिवाची देहबुद्धी आणि जिवाच्या आप्तस्वकीयांची देहबुद्धी वळवत त्या देहबुद्धीच्या जागी आत्मबुद्धी जागवण्याची प्रेरणा देत जीवनाचं मुख्य जे परमध्येय आहे त्याचं भान जागतं ठेवावं लागतं. या प्रत्येक टप्प्यावर जी तोडकीमोडकी साधना जीव करत असतो तिचे परिणामही अधांतरीच असतात!