12 July 2020

News Flash

मुझसे बुरा न कोय

माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर

कबीराच्या एका दोह्य़ात ते म्हणतात, ‘जगात वाईट माणसं शोधताना मी माझा शोध घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आले की, माझ्या एवढा वाईट माणूस या जगात नाही.’ परमार्थाच्या मार्गावरून जाताना, ईश्वराचा शोध घेताना साधकाला आपल्यामधील दोषांची जाणीव होते. पश्चात्ताप होतो. आपलं मन त्याला खात

राहतं. तुकाराम महाराजांनी ही व्यथा एका अभंगात लिहिली आहे,

माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर

ते देवाला विनवितात, ‘आता आड उभा राही नारायणा, दयासिंधुपणा साच करी..’ संत नामदेवांना ज्यावेळी आपल्या दोषांची जाणीव झाली त्यावेळी ते देवालाच विचारतात, ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा न घे?’ माझं मन विषय सुखाकडे ओढ घेते, असं का होतं?

कवी बा. भ. बोरकरांना देखील ही खंत आहे, ईश्वरावर श्रद्धा असलेले बा. भ. बोरकर देवाला सांगतात, ‘माझ्यातले दोष काढण्यासाठी तू आता मला शिक्षाच कर,’ त्यांनी लिहिलेल्या त्या कवितेचं नाव आहे ‘साद’. त्यात ते म्हणतात,

 

एकच माझा साद, ऐक प्रभू, एकच माझा साद,

पचू न देई मला कधीहि इवलासाही प्रमाद ..

स्वार्थे माझे मिटता लोचन,

घाल त्यात अविलंबे अंजन,

मोही गुंतता जरा कुठे मन, मागे लाव प्रवाद

ठेच अचानक लाव पदाला,

खोक पडू दे अभिमानाला,

माज यशाची चढता मजला, चढला जरी उन्माद

निष्ठा जरी माझी दुबळी झाली,

खचवी भू झणी चरणाखाली,

विकल करी वरवंचित प्राणा, कोंडूनी अंतर्नाद

कवी म्हणतात, मी केलेल्या चुकांची, पापाची भरपाई केवळ तू मला केलेल्या शिक्षेनेच होईल. मी ही शिक्षा घेतल्यानंतर माझे जीवन समाधानी होईल आणि हे ईश्वरा, तू मला केलेली शिक्षा हादेखील मी तुझा प्रसाद मानतो किती सुंदर कल्पना आहे.

 

-माधवी कवीश्वर

  madhavi.kavishwar1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2016 1:02 am

Web Title: meditation
Next Stories
1 गोरूवे बैसली रुखा तळी
2 अवघाची संसार सुखाचा करीन
3 शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा
Just Now!
X