News Flash

निसर्गाच्या सान्निध्यात

कार्बन फूट प्रिंट व कार्बन क्रेडिट हे आजचे परवलीचे शब्द झाले आहेत.

17-lp-prashant14-lp-11112016कार्बन फूट प्रिंट व कार्बन क्रेडिट हे आजचे परवलीचे शब्द झाले आहेत. मागच्या पिढीने निसर्गसंपदेचे जे शोषण केले आहे त्याचे प्रायश्चित्त म्हणजे कार्बन क्रेडिट असे काहीसे थोडक्यात सांगता येईल. आजकाल कार्बन फूट प्रिंट कमी करणे व कंपनीसाठी कार्बन क्रेडिट मिळविणे हे मॅनेजरसाठी आवश्यक कौशल्य बनले आहे. कायद्याचा बडगा उभारला गेल्यामुळे नैतिक जबाबदारी सोबतच कायदेशीर जबाबदारी म्हणूनदेखील कार्बन क्रेडिटकडे बघावे लागते.

पारंपरिक ऊर्जा स्रोतांना बाय बाय करून सोलार एनर्जीचा स्वीकार, सी.एफ.एल.च्या जागी एल.ई.डी. बल्ब, विजेवर चालणाऱ्या कार असे कार्बन क्रेडिट मिळविण्याचे रामबाण उपाय आहेत.

सेंट जॉन एपिस्कोपल चर्चने कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी नवीन थर्मोस्टॅट लावले व विजेच्या बिलामध्ये बचत केली. तर फर्स्ट युनेटेरियन चर्च (न्यू मेक्सिको) यांनी कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी सोलार एनर्जी कंपनीसोबत टायअप केले. कंपनीने सोलार पॅनेल चर्चच्या अनेक छतांवर लावले; या सोलार पॅनेल्समुळे चर्चची ७५ टक्के वीज मागणी कमी झाली व त्यांना घसघशीत कार्बन क्रेडिट मिळाले.

‘Yeutsche Post DHL’ ही कुरिअर व लॉजिस्टिक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी! हवाईमार्गे व रस्त्यांमार्गे वाहतूक करताना या कंपनीकडून कार्बन डाय ऑक्साइडचे मोठय़ा प्रमाणावर उत्सर्जन करण्यात येते. यामुळे प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिग होते. या घातक गोष्टींचे परिमार्जन करण्यासाठी डी.एच.एल. कंपनी अशा काही कंपन्यांबरोबर टायअप करते की ज्या कार्बन क्रेडिटच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. ज्या ग्राहकांचा माल डी.एच.एल. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पाठविते ते ग्राहकदेखील डीएचएल इतकेच या कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनाला जबाबदार असतात. हायड्रोलॉजिक सोशल एंटरप्राइज ही कंपनी सिरॅमिक वॉटर प्युरिफायर तयार करते. अशा प्रकारच्या प्युरिफायरमुळे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन आपोआपच कमी होते. अशा कंपनीबरोबर डीएचएल व तिचे ग्राहक काही उपक्रम हाती घेतात. कंबोडियामध्ये स्वच्छ पाणी पुरविण्याचे मिशन हायड्रोलॉजिक सोशल एंटरप्राइजने हाती घेतले आहे. त्यांच्या या मिशनला आर्थिक पाठबळ देऊन डी.एच.एल. व तिचे ग्राहक कार्बन क्रेडिट पदरी पाडून घेतात.

टेस्ला (Tesla) मोटर्स ही इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनी आहे. पारंपरिक इंधन जसे की पेट्रोल व डिझेलवर आधारित कार उत्पादन न केल्यामुळे या कंपनीला खूप कार्बन क्रेडिट आपसूकच मिळत आहे. पण कॅलिफोर्नियामध्ये इतर अनेक कार कंपन्या आहेत की ज्या पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या कार बनवत असल्यामुळे त्यांना कार्बन क्रेडिट मिळविणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. उदा. एक लाख गाडय़ा तयार करणाऱ्या कंपनीला उत्पादनाच्या एक टक्का म्हणजे एक हजार  कार्बन क्रेडिट पॉइंट्स मिळविणे आवश्यक आहे. प्रत्येक कमी पडणाऱ्या क्रेडिट पॉइंट्ससाठी फार मोठा आर्थिक दंड कंपनीला आकारण्यात येतो. हा दंड चुकविण्यासाठी मग या कार कंपन्या टेस्लाकडून कार्बन क्रेडिट खरेदी करतात. अशा प्रकारे टेस्लाला ‘आम के आम गुठली के दाम’ असा फायदा होतो.

टीडी बँकने कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी अनेक उपाय रचले आहेत जसे की पार्किंग लॉटमधील सर्व दिवे एलईडीमध्ये परावर्तित करणे, ऑफिसच्या कामकाजानिमित्त करण्यात येणारे प्रवास शक्य तितके टाळणे, व ग्रीन आयटी प्रॅक्टिस उपयोगात आणणे. प्रवास टाळल्याने हवाई (जेट) इंधनामुळे किंवा पेट्रोल, डिझेलमुळे होणारे प्रदूषण कमी होते. ग्रीन आयटी उपयोगात आणल्याने पेपरलेस ऑफिस ही संकल्पना सत्यात उतरते. कारण पेपरचा वापर टाळल्याने वृक्षतोड कमी होते म्हणजेच पर्यायाने कार्बन क्रेडिट वाढते.

पण जपानमधील एका रिक्रुटमेंट फर्मने मात्र कार्बन क्रेडिट, आरोग्य, सेंद्रिय शेती, वर्क लाइफ बॅलन्स, अशा अनेक गोष्टींची सांगड घालण्याचे ठरविले व ते यशस्वीदेखील करून दाखविले.

‘ढं२ल्लं’ ग्रुपने ‘फार्म टु टेबल’ या उपक्रमाअंतर्गत ऑफिसमध्येच शेती फुलविण्याचे ठरविले. कंपनीच्या आवारात (गवताचे) लॉन किंवा शोभेची फुलझाडे लावण्याऐवजी त्यांनी भाताची रोपे लावली. कंपनीच्या दर्शनी भिंतींवर व कॉन्फरन्स रूमच्या सिलिंग्सवर टोमॅटो व अन्य फळभाज्या व फळांच्या वेली सोडल्या. आपल्या कर्मचाऱ्यांना, कृषितज्ज्ञांच्या मदतीने शास्त्रोक्त शेती करण्यास शिकविले.

यामुळे कंपनीला खालील फायदे  मिळाले.

  • कर्मचाऱ्यांना रुटीन कामापासून जरा फुरसत मिळाली व त्यांना शेतीचा अनुभव मिळाला. कामात फन फॅक्टर आल्यामुळे कर्मचारी जास्त उत्साहाने काम करू लागले.
  • सेंद्रिय शेतीमुळे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या दुपारच्या जेवणात ताजे व पौष्टिक अन्न मिळू लागले.
  • कंपनीच्या कॅन्टीनच्या कच्च्या मालाच्या गरजा काही अंशी या शेतीमुळे भरून निघाल्या. त्यामुळे कंपनीच्या खर्चात बचत झाली.
  • आजूबाजूला हिरवाई असल्याने कामाच्या ठिकाणी निर्माण होणारा  कार्बन डाय ऑक्साइड आपसूकच शोषला जातो व झाडांमुळे जास्तीचा प्राणवायू कामाच्या जागी सतत खेळत राहतो. यामुळे दिवसागणिक कंपनीचे कार्बन फूट प्रिंट कमी होऊन कार्बन क्रेडिट वाढू लागले. थोडक्यात काय तर निसर्गाच्या सान्निध्यात विकास साधणे ही काळाची गरज आहे.
    प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2016 2:29 pm

Web Title: carbon footprint
Next Stories
1 लॅटरल थिंकिंग
2 कुरघोडी
3 नावीन्याचा ध्यास
Just Now!
X