चहा विशेष
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
गेल्या दहा वर्षांत चहाच्या बाजारपेठेत तसंच उत्पादनात ४.४ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. या वाढीत आपला वाटा चहा पिण्यात जास्त असून चहाच्या उत्पादनात मात्र आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत.

जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अगदी सामाईक असणाऱ्या घटकांमध्ये चहाचा नंबर कितवा लागतो माहीत नाही, पण चहा ही गरज असणाऱ्यांची संख्या मात्र मोठय़ा प्रमाणात आहे. आणि त्यात दिवसागणिक भर पडत आहे. त्यामुळे जगभरातील ५०हून अधिक देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारच्या चहाचं उत्पादन आणि अर्थातच वापरदेखील होत असतो. आजच्या काळात बाटलीबंद शीतपेयं आणि कॉफी यांच्या जोरदार मार्केटिंगमध्येदेखील चहाच्या स्थानाला फारसा धक्का लागलेला नाही. किंबहुना गेल्या दहा वर्षांतील चहाच्या बाजारपेठेत दरवर्षी सरासरी ४.४ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाढणाऱ्या या बाजारपेठेचा आढावा म्हणूनच घ्यावा लागेल.

india s oil import expenditure fell by 15 2 percent in last fiscal year due to oil imports from russia
रशियन तेलामुळे आयात-खर्चात १५.२ टक्के घट; आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत ७.९ अब्ज डॉलरची बचत
Mango pulp, industry, business
आंबा पल्प उद्योग अडचणीत, गेल्या वर्षाचा ३० टक्के पल्प पडून ?
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेने यावर्षी जाहीर केलेल्या अहवालानुसार २००७ ते २०१६ या काळात सर्व प्रकारच्या (ब्लॅक, ग्रीन, इन्स्टंट आणि इतर) चहाच्या उत्पादनात ४.४ टक्के वार्षकि वाढ झाली असून २०१६ चे जगातील एकूण उत्पादन हे ५.७३ दशलक्ष टन इतके झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही इतकी मोठी वाढ काही भारतासारख्या चहाबाज देशामुळे झाली नसून त्यालादेखील चीन कारणीभूत आहे. याच काळातील चीनमधील चहाचे उत्पादन हे १.१७ दशलक्ष टनपासून दुपटीहून अधिक वाढून २.४४ दशलक्ष टन इतके झाले असून जगातील एकूण चहाच्या उत्पादनातील ४२.६ टक्के वाटा चीनचा आहे. अर्थात चीनमधील चहाच्या वापरातदेखील वाढ झाली असून एकूण उत्पादनापकी २.१ दशलक्ष टन इतका चहा चीनमध्येच वापरला जातो. जगातील एकूण चहापकी ३८.६ टक्के चहा केवळ एकटय़ा चीनमध्येच वापरला जातो.

हे वाचून साहजिकच भारताचा नंबर कितवा लागतो हा सर्वसाधारण प्रश्न पडलाच असेल. तर भारतात २०१६ साली १.२७ दशलक्ष टन इतके चहाचे उत्पादन झाले होते आणि चहा उत्पादनात आपला नंबर दुसरा होता. पण एकूण उत्पादनापकी १.०५ दशलक्ष टन चहा आपण भारतातच वापरला आणि उरलेला निर्यात केला. जगातील चहाच्या वापरात भारताचा वाटा १९ टक्के इतका राहिला आहे. आपल्या वापराचे हे प्रमाण कधी कधी वाढून  वापरामध्ये आपण जगात पहिल्या क्रमांकावर जातो, पण सध्यातरी त्यामध्ये चीन आपल्याला कायमच मागे ढकलताना दिसते. आणि आपलाच चहा आपणच वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने चहाच्या निर्यातीतदेखील आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकत नाही. तेथे केनिया आणि श्रीलंका या देशांचा नंबर लागतो.

२००७ ते २०१६ या काळात जगातील निर्यातीत वर्षांला १.४ टक्क्यांची वाढ झाली असून १.७५ दशलक्ष टन चहा निर्यात केला जातो. २०१६ साली एकटय़ा केनियाने चार लाख ३६ हजार टन चहा निर्यात केला होता. केनियाच्या २०१५ मधील निर्यातीत थेट १६ टक्क्यांची वाढ त्यावेळी झाली होती. त्यापाठोपाठ श्रीलंकेचा नंबर लागतो. मग आपण तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर.

चहाच्या या जागतिक उलाढालीत वाढ दिसत असली तरी त्यामागे आणखीन एक घटक कारणीभूत आहे, तो म्हणजे ग्रीन टी. गेल्या काही वर्षांत नव्या पिढीचा ओढा या ग्रीन टीकडे वळला आहे. ब्लॅक टीच्या जागतिक उत्पादनवाढीचा वेग तीन टक्के इतकाच असून त्या तुलनेत ग्रीन टी मात्र ५.४ टक्क्यांनी वाढत आहे. यातदेखील चीन आणि केनियाचा वाटा मोठा आहे.

गेल्या काही वर्षांतील ग्रीन टीकडे वाढणारा ओढा पाहिल्यास यापुढील काळात ग्रीन टी हेच चहाच्या बाजारातील उत्पन्नाचे मोठे साधन राहणार आहे. ग्रीन टी म्हणजे आरोग्याला फायदेशीर असे सर्वाच्याच डोक्यात अगदी फिट्ट बसल्यामुळे की काय पण ग्रीन टीचा वापर सर्वत्रच वाढल्याचे दिसून येते. भारतातदेखील ग्रीन टीचा वापर वाढत आहे, मात्र त्याबद्दलची ठोस आकडेवारी भारतीय चहा मंडळाकडे उपलब्ध नाही.

चहाच्या जागतिक बाजाराचे हे आकडे वाढीकडेच झुकलेले दिसतात. त्यावरूनच चहा हे सदासर्वकाळ मागणी असणारे उत्पादन आहे असेच म्हणावे लागेल. पण त्याचबरोबर त्याच्या भविष्याचा आढावादेखील घ्यावा लागेल. कारण कधीकाळी उत्साहवर्धक पेय या सदरात अगदीच मर्यादित बाबींचा समावेश होत असे. पण आज बाटलीबंद शीतपेयं आणि कॉफीने अनेक नवीन बाजारपेठा काबीज केल्या आहेत. पण बाजारपेठेत प्रत्येक उत्पादन आपली जागा शोधत असते. तसेच नेहमीच्या चहाला ग्रीन टी पर्याय म्हणून उभा राहताना दिसतो.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालात पुढील दहा वर्षांतील वाढीवर भाष्य करण्यात आले आहे.  ग्रीन टीच्या वाढीचा वेग पुढील दहा वर्षांत ७.५ टक्के इतका राहण्याची शक्यता या अहवालात वर्तविली आहे, तर याच वेळी ब्लॅक टीच्या उत्पादनाची वाढ केवळ २.२ टक्के इतकीच होईल असे तज्ज्ञांना वाटते. म्हणजेच २०१७ साली ब्लॅक टीचे उत्पादन हे ४.४२ दशलक्ष इतके असेल तर ग्रीन टी ३.६५ दशलक्ष टन असण्याची शक्यता आहे. त्यातदेखील चीनमधील ग्रीन टीचा वाढता वापर हा कारणीभूत ठरणार असून एकटय़ा चीनमध्ये ३.३१ दशलक्ष टन ग्रीन टी वापरला जाऊ शकतो. नेहमीच्या चहाच्या (ब्लॅक टी)  उत्पादनात मात्र चीन, भारत यांचाच वरचष्मा राहील, पण निर्यातीत केनिया त्याचे पहिल्या क्रमांकाचे स्थान टिकवून ठेवेल.

चहाची जगभरातील बाजारपेठ इतकी मोठी असली तरी या चहाच्या बाजारपेठेची एक उणीव आहे. ती म्हणजे चहाच्या बाजापेठेत फ्युचर ट्रेडिंग करता येत नाही. आपल्याकडच्या साखर, सोयाबीन अशा कृषी उत्पादनासंदर्भात  भविष्यात किती उत्पादन होणार या हिशोबाने ट्रेडिंग केले जाते. पण चहाला या फ्युचर ट्रेिडगमध्ये अजून शिरकाव करता आलेला नाही. कारण चहाच्या उत्पादनातील वैविध्य आणि गुणवत्ता. ट्रेडिंग करण्यासाठी लागणारे सामायिक गुणधर्म या उत्पादनात दिसत नाहीत. इतर उत्पादनांच्या किंमती वाढत गेल्या तशी आणि तेवढय़ा प्रमाणात चहाची किंमत वाढलेली नाही. त्याच जोडीने चहाला ठरावीकच भूप्रदेश आणि हवामानाची गरज असल्यामुळे तसंच गेल्या काही वर्षांतील हवामानातील बदलांमुळे चहाच्या एकूणच उत्पादनावर परिणाम होताना दिसतो. संयुक्त राष्ट्राच्या अहवालातदेखील चहावर वातावरण बदलाचे परिणाम होतील असे नोंदवले आहे.

या बाजारपेठेत आपण उत्पादन तसंच निर्यातीत पहिल्या क्रमांकावर नसलो तरी चहा पिण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहोत. जगभरातील चहाप्रेमींची संख्या मोजायची ठरवली तर ती कदाचित भारतातच सर्वाधिक असेल. चहाच्या वापरात आपण दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी चहावर प्रेम करणाऱ्यात आपलाच प्रथम क्रमांक असेल हे नक्की.

भारतीय बाजारपेठ

भारतीय बाजारपेठेचा एकंदरीत भर हा देशांतर्गत वापरावरच अधिक दिसून येतो. आपल्या देशात उत्पादन होणारा चहा हा मुख्यत: सीटीसी (क्रश, टिअर अ‍ॅण्ड कर्ल) या वर्गातील असतो. आर्थोडॉक्स म्हणजे चहाची सुकवलेली पाने वापरून केल्या जाणाऱ्या चहाचे प्रमाण काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे मोठे होते. मात्र सध्या सीटीसीचा वापर सर्वाधिक होतो. देशातील चहा उत्पादनाची दक्षिण आणि उत्तर अशी दोन महत्त्वाची केंद्रे आहेत. आसाम, प. बंगाल, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, नागालॅण्ड, त्रिपुरा, सिक्कीम, उत्तराखंड, बिहार आणि हिमाचल प्रदेश ही उत्तरेकडील राज्य, तर कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू दक्षिणेतील राज्य चहाचे उत्पादन करतात. दक्षिणेत चहाचे उत्पादन असले तरी ते एकूण देशाच्या उत्पादनाच्या तुलनेत जवळपास एक षष्ठांश आहे. २०१७-१८ या वर्षांत एकूण देशात तेरा लाख एकवीस हजार टन चहाचे उत्पादन झाले होते. त्यापकी दक्षिणेचा वाटा हा केवळ दोन लाख ३३ हजार टन इतकाच होता. आणि उत्तरेतील चहाचे सर्वाधिक उत्पादन हे आसाममध्ये घेतले जाते. देशातील एकूण उत्पादनाच्या जवळपास निम्मे म्हणजेच सहा लाख ७६ हजार टन चहाचे उत्पादन आसाममध्ये घेतले जाते. देशभरातील एकूण उत्पादनाचा साधारण कल पाहिल्यास आपल्या चहाच्या एकूणच उत्पादनाची व्याप्ती, वाढ लक्षात येते.

 

वरील आकडेवारी पाहिल्यास थेटपणे लक्षात येते की चहाची देशांतर्गत गरज जशी वाढत गेली तसे आपण उत्पादन वाढवले, पण त्याच वेळी आपल्या निर्यातील फारसा फरक पडलेला दिसत नाही. १९८१ साली आपण सर्वप्रथम आपल्याकडील सर्वाधिक निर्यात नोंदवली आहे. आणि २०१६ मध्ये पुन्हा तो आकडा गाठला आहे. हे पाहता आपण मुळातच चहा आपल्या स्वत:साठी पिकवतो हेच यातून दिसून येते. याशिवाय आपण काही चहा हा आयातदेखील करतो. विशेष सदरात मोडणारा हा २१ हजार १२० टन चहा आपण २०१७ साली आयात केला होता.

जागतिकीकरणानंतर देशात अनेक परदेशी संस्था व्यापारास उतरल्या. तसेच परदेशी जीवनसंस्कृतीचा परिणामदेखील झाला आहे. त्याचा परिणाम चहाच्या बाजारपेठेवरदेखील दिसून येतो. भारतीय चहाच्या बाजारपेठेबद्दल गिरनार चहाचे संचालक, विद्युत शहा सांगतात, ‘‘गेल्या काही वर्षांत चहाच्या बाजारपेठेची वाढ नेहमीच्याच वेगात आहे. त्यामध्ये नोंद करावा असा बदल झालेला नाही. वाढत्या लोकसंख्येबरोबर चहाच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांत दिसून यावा असा मोठा बदल, वाढ झालेली नाही. पण त्याचबरोबर नवीन पिढीच्या आवडीनुसार ग्रीन टीची वाढ ही वेगाने होताना दिसत आहे.’’ ग्रीन टीकडे असणारा ओढा हा एकंदरीतच जागतिक वाढीशी साधम्र्य दाखवणारा आहे हे नक्की.

देशातील चहाचे मळे तसंच बाजारपेठेतील एका महत्वाच्या बदलावरदेखील यानिमित्ताने प्रकाश टाकायला हवा. २०१७-१८ मध्ये देशातील एकूण चहा उत्पादनामध्ये छोटे उत्पादक आणि संघटित उत्पादक यांची संख्या जवळपास समसमान आहे. संघटित उत्पादकांनी सात लाख टन चहाचे उत्पादन केले आहे, तर छोटय़ा उत्पादकांनी सहा लाख टन. देशातील छोटय़ा उत्पादकांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढली त्याचे कारण म्हणजे चहा मळ्यातील कामगार कायद्यात झालेल बदल. या नव्या रचनेमुळे संघटित मळेवाल्यांना कामगारांना अनेक सुविधा द्याव्या लागतात, त्या तुलनेत रोजचे वेतन कमी असते, छोटे मळेवाले सुविधा देण्यास कायद्याने बांधील नसतात, पण ते अधिक वेतन देतात.