21 October 2018

News Flash

यंत्रं होत आहेत स्मार्ट, हुशार की शहाणी?

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या पुढचा टप्पा आहे

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या पुढचा टप्पा आहे, कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग. या टप्प्यात यंत्र त्याला शिकवलेले काम तर करत आहेच, पण ते आता स्वबळावर शिकण्यासदेखील उद्युक्त होण्याइतपत हुशार झाले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रोबो संदर्भातल्या एका बातमीने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ती बातमी म्हणजे सोफिया नावाच्या एका ह्य़ुमनबॉट (माणसासारख्या दिसणाऱ्या रोबोला) सौदी अरेबियाने नागरिकत्व बहाल केलं. सोफिया ही नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबो ठरली. सोफियाच्या मुलाखतीचे व्हीडिओ जगभरातल्या माध्यमांनी  दाखवले. हुबेहुब माणसासारखे हावभाव करणाऱ्या रोबोचं कुणालाही आश्चर्य वाटू शकते. धडाधड उत्तरं देऊन समोरच्याची बोलती बंद करणाऱ्या रोबोला बहाल केलेले नागरिकत्व हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट फार कमी लोकांनी सांगितली ती म्हणजे सोफिया ही रोबो जे काही बोलते त्यातलं तिला स्वत:ला अवाक्षरही कळत नाही. ती फक्त भावभावना व्यक्त करूशकणारा चॅटबॉट आहे. चॅटबॉट म्हणजे लोकांशी उत्तम रीतीने संवाद साधू शकणारा रोबो (उदा. सीरी, कोर्टाना). सध्या दूरसंवाद उद्योगामध्ये मोठय़ा प्रमाणावर असे चॅटबॉट्स वापरले जातात. २०११ मध्ये मुंबईच्या आयआयटी टेकफेस्टमध्ये काही जपानी शास्त्रज्ञांनी एक रोबो आणला होता. ४०० ते ४५० प्रकारच्या वेगवेगळ्या भावभावना व्यक्त करू शकणं ही त्याची खासियत होती. हान्सन रोबोटिक्सने या दोन्ही बाबी एकत्र करून सोफियाची निर्मिती केली आहे. समोरच्या माणसाचं बोलणं ऐकून स्वत:मध्ये साठवणूक केलेल्या, तसंच स्वत: केलेल्या अनेक संभाषणांचा अभ्यास करून तसंच समोरच्या माणसाचे हावभाव पाहून सोफिया स्वत:च्या प्रतिसादाचा कोड तयार करते आणि त्यानुसार उत्तर दिलं जातं. अर्थात असं करताना चॅटबॉटला एक छान चेहरा प्रदान करून चॅटबॉटशी नातं निर्माण करता येऊ शकतं. हा हान्सन रोबोटिक्सचा प्रयत्न अत्यंत अनोखा असाच आहे, पण सध्या जगात सोफियापेक्षा प्रचंड हुशार, स्वत:चा विचार स्वत: करू शकणारे अनेक रोबो आणि संगणक आहेत. त्याबद्दल आणि सध्याच्या प्रगत कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंगबद्दल जाणून घेण्यासाठी आपण थोडे मागे जाऊया. २०११ मध्ये अमेरिकेतल्या ‘जीओपॅरिडी’ नावाच्या प्रश्नोत्तरांच्या एका प्रसिद्ध (क्वीझ) कार्यक्रमाबद्दल एक बातमी आली होती. त्यात ‘वॉटसन’ नावाच्या एका रोबोने त्या कार्यक्रमातील आणि जगातल्या सर्वाधिक हुशार व्यक्तींना प्रश्नोत्तरांमध्ये हरवलं होतं. वरकरणी ही बातमी साधारण वाटू शकते. सर्व प्रश्नांची उत्तरं गुगलवर शोधणाऱ्या आपल्याला यंत्र हे माणसापेक्षा हुशार आणि अधिक कार्यक्षम असणारच असं वाटणं साहजिक आहे. पण वॉटसन हे साधारण यंत्र नव्हतं तर तो कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंगचा आविष्कार होता. कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग म्हणजेच दिवसागणिक माणसांसारखा अनुभवसंपन्न आणि हुशार होत जाणारा संगणक.

यंत्र आणि माणूस यांच्यात फरक करायची वेळ येते तेव्हा माणूस दोन मुख्य आघाडय़ांवर यंत्रापेक्षा वेगळा ठरतो; त्या म्हणजे माणसामधली नवीन गोष्टी आत्मसात करण्याची, शिकण्याची क्षमता आणि भावना. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांनी याच दोन पातळ्यांवर यंत्राला सक्षम करण्याचा विडा उचलला आणि त्या प्रवासामधला पहिला टप्पा होता कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटलिजन्स) विकसित करणे आणि शेवटचा टप्पा होता माणसाप्रमाणे त्याला स्वबळावर शिकण्यास उद्युक्त करणे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या टप्प्याला कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग असं म्हणतात. कॉग्निटिव्ह म्हणजे स्वत:च शिकणे किंवा आत्मसात करणे.

खरंतर १९५० मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना मांडल्यावर कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंगपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप रंजक आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करताना मुख्य आव्हान होते ते माणसाच्या पंचेंद्रियांना (कान, नाक, डोळे, त्वचा इत्यादी) काही यंत्रांचा पर्याय निर्माण करणे. आजूबाजूच्या गोष्टी शिकण्यासाठी यंत्रामध्ये या गोष्टी विकसित केल्या आणि मग क्रमाक्रमाने कॅमेरा इनपूट, टच सेन्सेटीव्हिटी आणि आता व्हॉइस रेकग्निशन टेक्नॉलॉजी विकसित झाली ज्यांच्या माध्यमातून संगणकाला आजूबाजूच्या गोष्टींची माहिती देता येऊ लागली आणि या साधनांच्या माध्यमातून मिळालेली माहिती वाचून प्रक्रिया करून त्याला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे निर्णय घेण्याची क्षमता यंत्रांमध्ये विकसित झाली. आता या पुढच्या टप्प्यावर काम सुरू आहे ते म्हणजे सर्व माहिती गोळा करून, जगभरात उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेऊन त्यातून स्वत:च योग्य पर्याय निवडून त्याची अंमलबजावणी करणारे यंत्र निर्माण करणे. या सगळ्यासाठी संगणकीय यंत्राला एका क्षणात भरपूर डेटा वाचून, त्यातून योग्य डेटा निवडून त्यावर निर्णय घ्यायचा असतो जे काही अंशी सध्या शक्य आहे. या पूर्ण इतिहासाकडे आणि संगणकाच्या प्रगतीकडे पाहिलं तर माणूस जसा लहानाचा मोठा होत जातो तसा संगणक दिवसागणिक मोठा आणि सक्षम होत गेल्याचं जाणवतं.

या सक्षम झालेल्या संगणकाचा आपल्याला किती उपयोग होणार, हा साहजिक प्रश्न उपस्थित होतो. तर त्याचं उत्तर आहे, आपण आत्ताच या प्रकारचा संगणक आपल्या दररोजच्या आयुष्यात वापरत आहोत. त्याची काही उदाहरण पहायची तर बुद्धिबळ खेळणारा आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूला हरविणारा संगणक किंवा चेस इंजिन. समजा एखाद्याने एक चाल खेळली की चेसचे इंजिन त्या चालीचे जगभरात आजवर किती गेम खेळले गेले, त्यावर समोरच्याने कोणती चाल खेळली होती, ठरावीक चाल खेळल्यावर संगणकाला जिंकण्याच्या किती संधी आहेत हे सर्व क्षणात तपासून आपली योग्य चाल ठरवितो आणि ती चाल खेळतो. म्हणजेच जगभरात जसजसे गेम्स खेळले जातील तितका संगणक अधिकाधिक हुशार होत जाणार. जगभरात वापरल्या जाणाऱ्या हुडिनी या चेस इंजिनची क्षमता सध्याचा जगज्जेता मॅग्नस कार्लसनपेक्षा अधिक झाली आहे. काही वर्षांपूर्वी बाजारात आलेली टेस्ला नावाची ऑटो ड्रायव्हिंग कार रस्त्यावरच्या वेगवेगळ्या परिस्थितीत नेमकं काय करायचं हे सतत शिकणारा आणि प्रगत होत जाणारा ड्रायव्हर उपलब्ध करून देते. आपल्या हल्लीच्या वापरात हेच तंत्रज्ञान हवामान खात्यात वापरलं जातं. या खात्याचा गेल्या काही वर्षांपासूनचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिल्यास एक गोष्ट जाणवेल की आपल्या हवामान खात्याचा अंदाज दिवसागणिक सुधारत आहे. पूर्वी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवल्यावर टळटळीत ऊन पडायचं. हल्ली असा घोळ कमी पहायला मिळतो याची दोन कारणं आहेत. हवामानाच्या शक्यता वर्तवताना आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी असलेल्या सॅटेलाइट्सची वाढलेली संख्या आणि दुसरं म्हणजे या सॅटेलाईट्सनी दिलेल्या माहितीवर तापमान, वाऱ्याचा वेग, वाऱ्यांची दिशा, कमी आणि जास्त दाबाचे वायूपट्टे या साऱ्यांचा आढावा घेत वेधशाळेतील प्रोग्राम्स आजपर्यंतच्या इतिहासातील सर्व परिस्थितीचा अभ्यास करून एक अंदाज बांधतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो. एवढंच कशाला, गुगल मॅप्समध्ये अनेकदा त्या नकाशातील ठरावीक रस्त्यांवर आपल्याला लाल, पिवळा, निळा रंग दिसतो. ते रंग अर्थात त्या ठिकाणचे ट्रॅफिक अपडेट आपल्याला देत असतात, परंतु सॅटेलाईट प्रत्येक वेळी तो रस्ता चेक करत नाही. तो डेटा गेल्या अनेक दिवसांतील त्या रस्त्यावरील त्या वेळेतील वाहतुकीचे, रहदारीचे स्टेट्स घेऊन तयार केलेला असतो. तो बहुधा चुकत नाही.

हे तंत्रज्ञान सध्या मर्यादित आहे. म्हणजे रोबो किंवा संगणक फक्त चेस खेळू शकतो, किंवा फक्त हवामानाचा अंदाज देऊ शकतो. किंवा फक्त गाडी चालवू शकतो. आता याच्या पुढचा टप्पा असेल तो या सगळ्या गोष्टी किंवा यातले सर्वाधिक फीचर्स एकाच रोबो अगर यंत्रामध्ये समाविष्ट करणे. यातला छोटासा प्रयत्न सोफियासारख्या ह्य़ुमनॉइड्समध्ये केल्याचं दिसतं. सोफिया प्रसंगानुरूप खूप छान पद्धतीने भावभावना व्यक्त करू शकते. कोणत्याही विषयावर उत्तम प्रकारे संवाद साधू शकते. कार चालवू शकते; पण याला आता कॉग्निशन म्हणजे स्वयं अध्ययनाची जोड देता येण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. सोफियासारख्या ह्य़ुमनबॉट्सची मोठी फौज जगभरात आहे. हे सारं अधिक कार्यक्षमतेने साध्य करण्यासाठी प्रचंड कॉम्प्युटिंग क्षमता असणारा संगणक बनविण्याचं मोठ्ठं आव्हान सध्या जगासमोर आहे. प्रचंड या शब्दाबद्दल सांगायचं तर सुरुवातीला सांगितलेला आयबीएमचा वॉटसन चालवायला संगणकाला आपल्या संगणकात असतात तसे २८०० प्रोसेसर्स, १५ टीबी म्हणजेच १५००० जीबीचा रॅम लागत होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी क्वान्टम कॉम्प्युटिंगवर सगळ्या जगात खूप मोठय़ा प्रमाणावर प्रयोग चालू आहेत. येत्या एक ते दोन वर्षांत क्वान्टम कॉम्प्युटिंग किमान वापरण्यासाठी विकसित होण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर संगणक प्रचंड शक्तिशाली आणि कार्यक्षम होऊ शकतील. त्यामुळे संगणक क्षेत्रात खूप मोठी उलथापालथ होईल.

येत्या काळात क्वान्टम कॉम्प्युटिंग संगणकाची क्षमता कित्येक पटीने वाढवू शकणार आहे आणि तेच आपलं डिजिटल भविष्य आहे असं अनेकजण म्हणतात. पण क्वान्टम कॉम्प्युटिंग नेमकं काय आहे आणि ते साध्या संगणकापेक्षा वेगळं कसं हे समजून घेऊ. सध्याच्या संगणकामध्ये ट्रान्झिस्टर किंवा सेमीकन्डक्टर तंत्रज्ञान वापरून १ आणि ० च्या भाषेत संगणकाला प्रोग्राम केलं जातं ज्याला आपण बायनरी भाषा असं म्हणतो. क्वान्टम कॉम्प्युटिंगमध्ये संगणकाशी बोलण्यासाठीची ही १ आणि ०ची भाषाच रिप्लेस केली जाणार आहे. त्याएवजी क्वान्टम बीट्स वापरले जाणार आहे. क्वान्टम बीट्स समजण्यास जरा कठीण आहे. पण  तूर्तास एक नक्की की क्वान्टम बीट्स वापरून अधिक सोप्या पद्धतीने संगणकाशी संवाद साधता येऊ शकतो. ही भाषा अजूनही खूप काल्पनिक स्वरूपात आहे. पण ज्या झपाटय़ाने जगभरात या विषयावर काम चालू आहे ते पाहता येत्या तीनचार वर्षांत क्वान्टम कॉम्प्युटर नक्कीच पहायला मिळू शकतो. भारतातही आयसर कोलकाता, आयआयएसी, आयआयटीमधील शास्त्रज्ञांचे गट या विषयावर काम करीत आहेत.

मध्यंतरी फेसबुकने दोन चॅटबॉट्स तयार केले होते. त्यांना एक विशिष्ठ प्रोग्रॅम देण्यात आला होता. पण फेसबुकच्या असं लक्षात आलं की हे दोन चॅटबॉट्सनी त्यांना दिलेल्या प्रोग्रॅम व्यतिरिक्त त्यांची स्वत:ची भाषा विकसित केली आणि फक्त त्यांनाच समजेल आणि बाकी कुणाला समजू शकणार नाही अशा भाषेत संवाद साधायला सुरूवात केली. त्याचे परणिाम लक्षात घेऊन फेसबुकने हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे आपले हे चॅटबॉट बंद करून टाकले.

कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंगच्या ताकदीची झलकच यातून दिसते. गेल्या काही काळात विकसित होत असलेले कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग आता परिपक्वतेच्या एका टप्प्यावर आले आहे. यापुढे ते अधिकाधिक विकसित होत जाण्याच्या शक्यता आहेत. माणसाच्या विचारशक्तीला कोणताही पर्याय नाही असं मानणारे आज जरी कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग या संकल्पनेला विरोध करत असले तरी कुणालाही ते नाकारता येणार नाही अशा टप्प्यावर आपण आहोत. रोबो शक्तिशाली होत जाणं ही अपरिहार्यता आहे. ती आपल्याला हवी तशी वळवून घेणं हा मानवी प्रज्ञेचा भाग आहे. कॉम्प्युटर आले तेव्हाही बेकारी वाढेल अशी चर्चा सुरू झाली होती. पण कॉम्प्युटरने नवीन रोजगार निर्माण केले. चुकांविरहित म्हणजेच एररलेस कामांसाठी रोबोंचा वापर होऊ शकतो. रोबोमधून माणसाला उत्तम सहाय्यक मिळू शकतो. अनावश्यक कामांमध्ये खर्च होणारी मानवी उर्जा इतर ठिकाणी, अधिक चांगल्या कामांसाठी वापरली जाऊ शकते. अशा अनेक शक्यता कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंगच्या बाबतीत आहेत.

सोफिया एकटी नाही..

ऑक्टोबर २०१७ मध्ये जपानच्या हान्सन रोबोटिक्सने विकसित केलेली सोफिया ही सोशल रोबो बरीच गाजली, पण जगात ती एकमेव ह्य़ुमनॉइड नाही. त्यापूर्वी अनेकांनी सुंदर ह्य़ुमनॉइड्स तयार केले आहेत. सिंगापूरची नेदीन (ठअऊकठए) सोफियाप्रमाणे संवाद साधू शकते. काही ठिकाणी ही रोबो रिसेप्शनिस्टसारखं काम करू शकते. ती संवादानुसार भावभावनासुद्धा व्यक्त करू शकते. केंब्रिज विद्यापीठाच्या काही प्रोफेसर्सनी मिळून चार्लस नावाचा भावभावना व्यक्त करणारा रोबो बनवायचा घाट घातला आहे. तो समोरच्याच्या चेहऱ्यावरच्या भावभावना वाचून स्वत:मध्ये साठवतो आणि परिस्थितीनुसार त्या वापरतो. त्यावर काम चालू असलं तरी पूर्णत्वास गेल्यावर हा अतिशय उत्तम आणि शिकत जाणारा असा भावभावना व्यक्त करणारा रोबो ठरेल. चॅटबॉट्स आणि पर्सनल असिस्टंट प्रकारातले काही रोबो तर सध्या भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत. त्यात झेन्बो, मिको यांसारखे पर्सनल असिस्टंट रोबो आहेत. याशिवाय माणसासारख्या हालचाली करू शकणाऱ्या रोबोंमध्ये बोस्टन डायनामिक्सचा अ‍ॅटलास हा उत्तम रोबो आहे. संवाद साधू शकणारा, फुटबॉल खेळणारा, रस्ता दाखविणारा होंडा कंपनीचा असिमोसुद्धा प्रसिद्ध आहे. सोफियाच्या मुलाखती पाहून उत्सुकता वाढली असेल तर सर्फिग लिस्टमध्ये ही नावं टाकून या रोबोंचे व्हिडिओ नक्की बघा.
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 5, 2018 1:05 am

Web Title: smart gadgets artificial intelligence