भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या बलिदान चिन्ह असलेल्या ग्लोव्ह्जवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कठोर भूमिका घेतल्यानंतर आता बीसीसीआय या वादातून माघार घेण्याची शक्यता आहे. या मुद्दावर आयसीसीला आव्हान देण्याची बीसीसीआयची  इच्छा नाही. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

बीसीसीआयला हा वाद वाढवण्याची इच्छा नाही. बीसीसीआय आयसीसीच्या नियमांचे पालन करण्याची भूमिका घेऊ शकते. बीसीसीआयने हा निर्णय घेतल्यास धोनीला पुढच्या सामन्यात पॅरा कमांडो दलाचे बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्हज घालून खेळता येणार नाही.

बीसीसीआयने या प्रकरणी धोनीच्या पाठीमागे उभं राहत धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळण्याची परवागी मागितली होती. मात्र ICC ने BCCI ची ही मागणी फेटाळली आहे. धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्याआधी आयसीसीकडे कोणत्याही प्रकारची परवानगी मागितली नव्हती.

कोणत्याही प्रकारचं चिन्ह किंवा एखादा लोगो घेऊन मैदानात उतरणं हे आयसीसीच्या नियमांना धरुन नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. ICC ने धोनीच्या ग्लोव्ह्जला आक्षेप घेतल्यानंतर भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर आयसीसीविरोधात रोष व्यक्त केला होता.

सोशल मीडियावर धोनीला पाठींबा देत सर्व प्रसारमाध्यमांनी आयसीसी आणि बीसीसीआयवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. केंद्रीय क्रिडामंत्री किरेन रिजिजू यांनीही याप्रकरणात जनभावनेचा आदर व्हायला हवा असं वक्तव्य केलं होतं. मात्र आयसीसीने आपल्या नियमांवर ठाम राहत बीसीसीआयची विनंती फेटाळली आहे.