नरेंद्र मोदी की राहुल गांधी या प्रश्नावर देशातील राजकीय वातावरण तापले जात असतानाच पंतप्रधानपदाचा मुद्दा मागे ठेवत डाव्या आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या ११ पक्षांनी मंगळवारी तिसऱ्या आघाडीची मोट बांधली. ‘काँग्रेसला सत्तेतून बाहेर फेकण्याची आणि भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची हीच वेळ आहे,’ असे आवाहन करत चार डाव्या पक्षांसह समाजवादी पक्ष, संयुक्त जनता दल, अण्णाद्रमुक अशा ११ पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडवले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय रणांगणात काँग्रेस विरुद्ध भाजप असा जंगी सामना सुरू असतानाच तिसऱ्या आघाडीने यात उडी घेतली आहे. काँग्रेस आणि भाजपचा समावेश नसलेल्या या आघाडीसाठी माकप आणि भाकपच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न चालवले होते. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी नवी दिल्लीत चार डावे पक्ष, समाजवादी पक्ष, संयुक्त जनता दल, अण्णाद्रमुक, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि झारखंड विकास मोर्चा या पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला माकपचे सरचिटणीस प्रकाश करात, सपचे अध्यक्ष मुलायम सिंह, जदयुचे नितीश कुमार, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा, भाकपचे नेते ए. बी. बर्धन, अण्णाद्रमुक पक्षाचे एम. तंबीदुराई, आरएसपीचे टी. जी. चंद्रचुडन, फॉरवर्ड ब्लॉकचे देवव्रत विश्वास, माकपचे सीताराम येच्युरी आदी नेते उपस्थित होते. तासभर चाललेल्या या बैठकीनंतर या पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले. ‘देशात बदल घडवण्याची, काँग्रेसला सत्तेतून बाहेर फेकण्याची आणि भाजपसारख्या जातीयवादी पक्षांना रोखण्याची हीच वेळ आहे,’ असे या निवेदनात म्हटले आहे.
सत्तेसाठीचा २७२ हा बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यास काँग्रेस वा भाजपची मदत घेणार का, या प्रश्नावर जदयुचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट नकार दिला.  समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यांनी या आघाडीत आणखी चार पक्षांची भर पडेल, असे सांगत काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही, असे म्हटले. त्याच वेळी हे सर्व पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढवतील किंवा जागावाटप केले जाईल, या शक्यतेचा करात यांनी इन्कार केला.

घोषणेलाच दोघांची दांडी
अकरा पक्षांच्या आघाडीची घोषणा करण्याच्या दिवशीच, या आघाडीतील दोन पक्षांच्या नेत्यांनी दांडी मारून साशंकता निर्माण केली. आसाम गण परिषद आणि बिजू जनता दलाचा एकही नेता या बैठकीस उपस्थित नव्हता. आगपचे प्रफुल्ल कुमार महंता आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या आघाडीला पाठिंबा दिला आहे, असे करात यांनी ठासून सांगितले.

‘काँग्रेसचे शासन हे बेबंदशाही, प्रचंड भ्रष्टाचार, महागाई आणि सामाजिक असमानतेचे शासन आहे. तर भाजपही काँग्रेसपेक्षा वेगळा नाही. यापूर्वी केंद्रात त्यांची सत्ता असताना आणि आताही अनेक राज्यांत त्यांची कामगिरी काँग्रेसपेक्षा वाईट आहे.’
– प्रकाश करात, माकपचे सरचिटणीस

तिसऱया आघाडीच्या घोषणेवेळी उपस्थित प्रमुख नेते-
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयू अध्यक्ष शरद यादव, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव, माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा आणि सिताराम येचुरी