पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो अॅप’मधून डेटा चोरी होत असल्याचा काँग्रेसच्या आरोपांचा भाजपाला तोटा होण्याऐवजी फायदा झाल्याचं दिसत आहे. भाजपा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रसने डेटा चोरीचा आरोप केल्यानंतर नमो अॅप डाऊनलोड करणा-यांची संख्या वाढली असून तब्बल दोन लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. काँग्रेसने नमो अॅपविरोधात #DeleteNamoApp अशी मोहिमच सुरु केली होती. मात्र आपली ही रणनीती आपल्यावरच उलटेल असा विचारही त्यांनी केला नसावा असा टोला भाजपाकडून लगावण्यात आला आहे.

पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने बोलताना सांगितलं आहे की, ‘काँग्रेसने नमो अॅपविरोधात मोहिम सुरु केल्यापासून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. काँग्रेस आणि राहुल गांधींनी टीका करण्यास सुरुवात केल्यापासून डाऊनलोड करणा-यांची संख्या वाढली आहे’.

भाजपा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदारांसोबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅपच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाण्यावर भर दिला होता. स्थानिक पातळीवर काम करणा-या कार्यकर्त्यांना पक्षासोबत जोडण्यासाठी अॅपच्या माध्यमातून मोठी मोहिम राबवण्यात आली होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नमो अॅपच्या माध्यमातून डेटा परदेशी कंपन्यांशी शेअर केला जात असल्याचा आरोप केला होता. शिवाय नमो अॅप गुप्तपणे युजर्सचे ऑडिओ, व्हिडीओ आणि संपर्क वापरत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.