जम्मू-काश्मीरमध्ये जवानांकडून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी धडाकेबाज कारवाया केल्या जात आहेत. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल २०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. मागील वर्षात १२ महिन्यांच्या कालावधीत १५७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.

दोन दिवसांपूर्वीच पुलवामा येथील मलंगपुरामध्ये राबवण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत हिजबुल मुजाहिदीनचा ऑपरेशनल कमांडर सैफ उल इस्लाम उर्फ डॉ. सैफुल्लाचा जवानांनी खात्मा केला होता. जून महिन्यात सर्वाधिक ४९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. तर, एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये २८ दहशतवादी मारले गेले. जुलै आणि ऑक्टोबरमध्ये २१ दहशतवाद्यांना ठार करण्याच जवानांना यश आलं. आकडेवारीनुसार दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक चकमकी झाल्या , जिथे ऑक्टोबरपर्यंत १३८ दहशतवादी मारले गेले.

भारतीय जवानांनी पाकिस्तानचे पाठबळ असलेल्या हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या सर्वाधिक ७२ जवानांचा खात्मा केला आहे. गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी हिजबुल मुजाहिदीन संघटनेला तेथील स्थानिकांना लक्ष्य करण्यास सांगण्यात आले होते. याचप्रकारे काश्मीर खोऱ्यात जवानांनी लष्कर ए तोयबाशी निगडीत असलेल्या ५९ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.