गेल्या काही दिवसांपासून टिकरी सीमेवरच्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन करणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू झाला. हरयाणा सरकारने याबद्दल माहिती दिली आहे. या महिलेचं नाव मोमिता असून ती पश्चिम बंगालची रहिवासी असल्याचं कळत आहे. ही महिला पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाविरोधी प्रचार करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतही सहभागी झाली होती.

ही महिला टिकरी सीमेवरच्या शेतकरी आंदोलनात गेल्या काही महिन्यापासून सहभागी होती. तिला २६ एप्रिलपासून करोनाची लक्षणे दिसू लागली होती.
हरयाणा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षणे दिसल्यानंतर उपचारासाठी तिला एका रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे तिला बेड उपलब्ध होऊ शकला नाही. दुसऱ्या रुग्णालयात जागा न मिळाल्याने शेवटी तिला बहादुरगढमधल्या शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तोवर संसर्ग वाढला आणि गेल्या शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.

पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश भागातले शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर आंदोलन करत आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी चालवलेलं आंदोलन अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या १० हून अधिक फेऱ्या झाल्यानंतर देखील अद्याप या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलकांचे नेते राकेश टिकैत यांनी देखील पारित झालेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.