मुलींना जन्म दिला म्हणून या वर्षभरात पाकिस्तानात ५६ महिलांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ज्या देशात मुलींना जन्म दिला म्हणून आईची हत्या केली जाते, त्याला नैतिक समाज म्हणता येणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया मानवी हक्क कार्यकर्ते आणि मानवी हक्क  आयोगाचे पाकिस्तानातील कार्यालय सांभाळणारे आय. ए. रहमान यांनी व्यक्त केली आहे.
उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, देशात जानेवारी २०१२ ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत ९० महिलांवर अ‍ॅसिड हल्ले, ७२ घटना भाजल्याच्या, ४९१ घटना घरगुती हिंसाचार, ३४४ घटना सामूहिक बलात्काराच्या आणि ८३५ घटना महिलांविरोधात हिंसाचाराच्या नोंदल्या गेल्या आहेत. याशिवाय मुलाऐवजी मुलीला जन्म दिल्यामुळे ५६ महिलांची हत्या करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानात मुलींवर बलात्कार होत आहेत आणि आपण सर्व ओरडण्याखेरीज वास्तवात दुसरे काहीही करीत नसल्याचे रेहमान यांनी याआधी म्हटले होते.
पाकिस्तानात सकारात्मक बदल घडवून आणायचे असल्यास मुलींना आणि मुलांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे देशातील श्रीमंत आणि गरिबांना एकसारखे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवे, असे ते म्हणाले. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे, असे म्हणायला ६२ वर्षे लागली, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कौटुंबिक हिंसाचाराला अटकाव करणारे विधेयक अस्तित्वात आणण्याबाबत पंजाब विधानसभा प्रयत्नशील आहे, असे  सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीन लीग-नवाझ पक्षाच्या हिना परवेझ यांनी सांगितले.