पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’मध्ये ग्वाही; राज्यांतील नियमनमुक्तीचा दाखला 

नवी दिल्ली : यापूर्वी  काही राज्यांत बाजार समिती कायद्याच्या नियमनातून फळे आणि भाज्या वगळल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला आहे. आता धान्य उत्पादक शेतक ऱ्यांना नवीन कृषी विधेयकांमुळे तसेच स्वातंत्र्य मिळणार आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कृषी विधेयकांचे समर्थन केले.

सध्या देशात कृषी विधेयकांच्या विरोधात मोठी आंदोलन  सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी  या विधेयकांचे फायदे या वेळी स्पष्ट केले. गत काँग्रेस सरकारांनी जी आर्थिक धोरणे राबवली त्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

पंतप्रधान मोदी  म्हणाले, की देशातील शेतक ऱ्यांनी कृषी क्षेत्र मजबूत केले असून आत्मनिर्भर भारत घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जर महात्मा गांधी यांचे आर्थिक तत्त्वज्ञान अनुसरले असते तर आत्मनिर्भर भारत योजना राबवण्याची गरज पडली नसती, भारत आधीच आत्मनिर्भर झाला असता.

‘मन की बात’ कार्यक्रमात विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, की कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त केल्यानंतर काही राज्यांत शेतक ऱ्यांना आधीच फळ व भाज्या विक्रीतून फायदा झाला आहे. आपल्या कृषी क्षेत्राने कोविड १९ काळातही चांगली कामगिरी केली, त्याचे श्रेय शेतक ऱ्यांनाच आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र जितके मजबूत तितका आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल.

शेतकऱ्यांचे अनुभव

ते म्हणाले, की  विविध राज्यातील शेतक ऱ्यांची व शेतकरी गटांची पत्रे येतात, त्यातून संवादही होतो. आता कृषी क्षेत्रात नवे बदल केले आहेत. हरयाणाच्या शेतक ऱ्याने २०१४ मध्ये फळे व भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून वगळल्याने झालेले फायदे वर्णन केले. महाराष्ट्र, तामिळनाडू व उत्तर प्रदेशातही असेच चांगले अनुभव  फळे व  भाज्या उत्पादक शेतक ऱ्यांना आले आहेत. आता त्यांना फळे व भाज्यांतच नव्हे, तर गहू, तांदूळ, मोहरी, ऊस जिथे चांगली किंमत मिळेल तिथे विकण्याचे स्वातंत्र्य सरकारने दिले आहे. गुजरातमधील एका शेतक ऱ्याने अभिनव पद्धतीने बटाटय़ाची शेती केली, त्याचे उदाहरण त्यांनी या वेळी दिले.

विविध राज्यांतील शेतक ऱ्यांच्या यशकथांचे उदाहरण  देऊन त्यांनी सांगितले,की कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतक ऱ्यांना मोठा फायदा होईल.

गोष्टींच्या परंपरेबाबत ते म्हणाले,की भारतात मुलांना गोष्टी सांगण्याची जुनी परंपरा आहे. गोष्ट ही गुंफत जावी लागते. आपल्याकडे हितोपदेश व पंचतंत्रातील गोष्टींची परंपरा आहे. त्यात पशुपक्षी, पऱ्यांचे काल्पनिक विश्व आहे. त्यातून अनेक गोष्टी सहजपणे मुलांना सांगता येतात, वेगळा उपदेश करावा लागत नाही. धार्मिक कथांची पद्धती प्राचीन आहे. त्यात कथाकालवेक्षम एक आहे. तामिळनाडू व  केरळात ‘विल्लू पाट’ ही कथापद्धती आहे. त्यात गोष्ट व संगीत दोन्ही असतात. कठपुतळी ही कथा जिवंत करण्याची एक पद्धत आहे. आजच्या काळात विज्ञानाच्या कथांना लोकप्रियता लाभत आहे. देशात गोष्ट सांगण्याची कला लोकप्रिय होत आहे. भारतात ही परंपरा जुनी असून त्याला उज्ज्वल भवितव्य आहे. कुटुंबानी त्यांचा काही वेळ गोष्टी सांगण्यासाठी वेगळा काढून ठेवावा. त्यांच्यासाठी तो वेगळा अनुभव ठरेल .

मोदी यांनी सांगितले, की करोनाचा मुकाबला करण्यासाठी मुखपट्टी व सामाजिक अंतराचा विसर पडू देऊ नका. हे नियम हीच करोना विरोधातील शस्त्रे आहेत.

कथाकथनाबाबत वैशाली व्यवहारे- देशपांडे यांचा उल्लेख

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, की गोष्टी सांगणे ही एक कला आहे. आता त्यावरही काही संकेतस्थळे तयार झाली असून त्यातील एक म्हणजे ‘गाथा स्टोरी डॉट इन’; ते आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केलेल्या अमर व्यास व इतर मंडळींनी चालवले आहे. ते परदेशातून परत आले व आता बंगळुरूत असतात. ते चांगले काम करीत आहेत. ग्रामीण भागातही लोक मुलांना गोष्टी सांगण्याचे काम करीत आहेत. मराठीत वैशाली व्यवहारे- देशपांडे यांनी यात मोठे काम केले आहे. चेन्नईत श्रीविद्या राघवन या संस्कृतीशी निगडित गोष्टी सांगण्याचे काम करतात. कथालय व स्टोरिटेलिंग नेटवर्क ही दोन संकेतस्थळेही तयार करण्यात आली आहेत. गीता रामानुजन यांनी ‘कथालय डॉट ओआरजी’ संकेतस्थळावर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘दी इंडियन स्टोरिटेलिंग’ नेटवर्कच्या माध्यमातून गोष्ट सांगणाऱ्यांची एक फळीच उभी केली जात आहे. बेंगळुरूतील विक्रम श्रीधर हे बापूंच्या गोष्टी सांगतात. अनेक लोक यात काम करीत आहेत, त्यांची माहिती लोकांनी समाजमाध्यमांवर टाकावी.