हवाईदल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी सोमवारी कारगिलमध्ये शहीद झालेल्या स्क्वाड्रन लीडर अजय अहुजा यांना श्रद्धांजली अर्पण केली. धानोआ यांनी मिग-21 हे लढाऊ विमान उडवून आकाशात मिसिंग मॅनची आकृती तयार करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. पंजाबमधील हवाईदलाच्या भिसियाना तळावरून त्यांनी मिग-21 उडवले. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यादरम्यान, एअर मार्शल आर. नांबियार यांनीदेखील अहुजा यांना श्रद्धांजली वाहिली.

1999 साली झालेल्या पाकिस्तान विरोधात झालेल्या कारगिल युद्धादरम्यान अजय अहुजा यांना हौतात्म्य आले होते. शत्रूवर हवाई हल्ला करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘व्हाईट सी ऑपरेशन’मध्ये ते सहभागी होते. युद्धादरम्यान, 27 मे रोजी अहुजा यांच्या विमानाला शत्रूंच्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले होते. त्यानंतर अहुजा यांनी स्वत:ला इजेक्ट करून घेतले. परंतु त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. परंतु काही दिवसांनंतर पाकिस्तानने त्यांचे पार्थिव भारताच्या ताब्यात दिले होते. त्यांच्या पार्थिवावर त्यांना जवळून गोळी मारण्यात आल्याचे निशाण सापडले होते. अहुजा यांना सरकारने 15 ऑगस्ट 1999 साली मरणोत्तर वीर चक्र देऊन सन्मानित केले होते.