अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट दैनिकाची सर्व मालमत्ता अ‍ॅमेझॉनने सोमवारी विकत घेतली. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ्री बिझोस यांनी वॉशिंग्टन पोस्ट २५० दशलक्ष डॉलरला विकत घ्यायला मंजुरी दिली. या व्यवहाराबद्दल वॉशिंग्टन पोस्टने वृत्त प्रसिद्ध केले.
वॉशिंग्टन पोस्टच्या खपामध्ये आणि महसूलामध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा व्यवहार झाला आहे. जेफ्री बिझोस यांनी पहिल्यांदाच वृत्तपत्र व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत बिझोस म्हणाले, हे माझ्यासाठी एकदम नवीन क्षेत्र आहे आणि त्यामध्ये विविध प्रयोग करण्याची गरज आहे. नव्या मालकामुळे काही बदल होणे अपेक्षित आहेत. मात्र, वॉशिंग्टन पोस्टच्या मूल्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही, हे वाचक समजून घेतील, अशी मला अपेक्षा आहे. वृत्तपत्राचे उत्तरदायित्व वाचकांकडे असते, मालकाकडे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वॉशिंग्टन पोस्टचे सध्याचे प्रकाशक कॅथरिन वेमाऊथ म्हणाले, हा दिवसही येईल, असे मला आणि माझ्या कुटुंबीयांना अजिबात वाटले नव्हते. गेल्या आठ दशकांपासून सांभाळलेल्या वॉशिंग्टन पोस्ट कंपनीवर आपले वृत्तपत्र विकण्याची वेळ आलीये.