पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची कुठलीही विशिष्ट प्रकारची गुप्तचर माहिती अमेरिकेला मिळाली नव्हती, असे स्पष्टीकरण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले आहे. या हल्ल्याबाबत इराकी गुप्तचरांनी माहिती दिल्याचा दावा काल करण्यात आला होता पण त्याबाबतही मतभिन्नता आहे. अमेरिकेने फ्रान्सशी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण मोठय़ा प्रमाणात करण्याची तयारी दर्शवली आहे. फ्रान्समध्ये हल्ले टाळण्यासाठी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण वाढवली जाईल, असे ओबामा यांनी सांगितले.
‘जी २०’ देशांच्या बैठकीसाठी येथे आले असताना ओबामा यांनी सांगितले, की पॅरिसमधील हल्ल्याबाबत कुठलीही विशिष्ट माहिती मिळाली नव्हती. अमेरिका फ्रान्समधील तपासावर लक्ष ठेवून आहे व हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी मदत केली जाईल. फ्रान्स हा दहशतवादविरोधी लढय़ात अमेरिकेचा मोठा भागीदार देश आहे. त्यामुळे फ्रान्सबरोबर लष्करी व गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्यात येईल. आयसिसच्या संभाव्य कारस्थानांची जी माहिती अमेरिकेला मिळेल, ती तातडीने फ्रान्सलाही दिली जाईल. सीरियातील पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी जे राजनैतिक प्रयत्न चालू आहेत, त्याची प्रशंसा करून ओबामा यांनी सांगितले, की राजनैतिक पातळीवर हालचालीत प्रगती होत आहे. व्हिएन्ना बैठकीत सीरियातील शस्त्रसंधी व राजकीय बदलांवर चर्चेत प्रगती दिसून आली.