देशात दडवून ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशाचे प्रमाण परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशापेक्षा खूप जास्त आहे, असे विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख न्या. (निवृत्त) अरिजित पसायत यांनी म्हटले आहे.

सध्या परदेशात जितका काळा पैसा आहे, त्यापेक्षा भारतात दडवण्यात आलेल्या काळ्या पैशाचे प्रमाण किती तरी जास्त आहे. काळ्या पैशाची निर्मिती थांबवली, तर त्याचा परदेशांकडे वाहणारा प्रवाह खूप कमी होईल, असे केंद्र व राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांसोबत कटक येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पसायत यांनी सांगितले.
धर्मदाय संस्था आणि शिक्षण संस्था यांच्यामार्फत कथितरीत्या टेबलाखालून होणाऱ्या व्यवहारांबाबत चिंताजनक स्थिती आहे. प्राप्तिकर खाते आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या आरोपांची छाननी करत असून काही प्रकरणांमध्ये कारवाईसाठी पावलेही उचलली आहेत, असे ते म्हणाले.