अमेरिकेत कॅलिफोर्नियातील दोन वणवे वेगाने पसरत असून ते दशकभरातील सर्वाधिक वेग असलेले वणवे आहेत. त्यात एक जण मरण पावला असून अनेक घरे, उद्योग खाक झाले. महामार्गानजीकच्या अनेक रहिवाशांनी पलायन केले आहे. काही मोटारी अजूनही आग लागलेल्या अवस्थेत आहेत.
कॅलिफोर्निया वन विभाग व अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर सॅनफ्रान्सिस्कोमध्ये एक जण मरण पावला. ४०० घरे, दोन अपार्टमेंट, १० उद्योग संकुले यात जळून गेली, असे प्रवक्तया लिन व्हॅलेंटाईन यांनी सांगितले. आग्नेय दिशेला आणखी एक वणवा पेटल्याने त्यात ८१ घरे नष्ट झाली. मिडलटाऊन येथे अनेक दूरध्वनी व वीज खांब जळून कोसळले व तेथे लोकांना धुराच्या लोटांमधून वाट काढत निघावे लागले. सुमारे हजार रहिवासी असलेल्या नॅपा खोऱ्यातील घरे जळून गेली. अग्निशमन दले घरांना लागलेल्या आगी विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वाऱ्याचा वेग ताशी ४८ कि.मी. असल्याने वणवे पसरत चालले आहेत. त्यामुळे लेक काउंटी येथील आग विझवणे अवघड जात आहे. अग्निशमन दलाचे चारजण या आगीत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती स्थिर आहे. अजून हानीची अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही.